पाठलाग – (भाग-१६) Aniket Samudra द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पाठलाग – (भाग-१६)

बाहेरची आवरा-आवर करून स्टेफनी दिपकच्या खोलीत आली तसा दीपक अचानक तिच्यावर खेकसला, “तू इथे काय करते आहेस? गेट आऊट, तुझ्या खोलीत जाउन झोप”

“अरे पण का? काय झालं?”, स्टेफनी
“का काय का? तो मोहिते बसला आहे बाहेर. त्याने तुला माझ्या खोलीत बघितले तर?” दिपक
“पण मी एकटीनेच झोपायचे? आणि मला आज तू हवा असशील तर?” स्टेफनी
“थोडे दिवस स्टेफनी…. आत्ता काहीच पर्याय नहिए…. प्लिज…. “, दीपक

स्टेफनीने काहीश्या नाराजीनेच खोलीचे दर उघडले आणि अचानक अंधारातून कुठूनतरी येउन समोर मोहिते उभा राहीला.

“तुम्ही इथे झोपता का?”, अर्धवट उघडलेल्या खोलीच्या दारातून आत पाहण्याचा प्रयत्न करत मोहिती म्हणाला.
“काय बोलता आहात मुर्खासारख?”, काहीसे चिडून स्टेफनी म्हणाली आणि त्याला बाजूला ढकलून निघून गेली.

मोहिती स्टेफनी दिसेनाशी होईपर्यंत तेथेच थांबला आणि मग चेहर्यावर एक हास्य आणत तेथून निघून गेला


दुसर्‍या दिवसापासुन स्टेफनी आणि दिपकचे आयुष्य बिकट होऊन बसले. एकमेकांचा सहवास सोडाच, एकमेकांकडे बघणं सुध्दा अवघड होऊन बसले होते. क्षणाक्षणाला मोहिते त्यांच्या मागावर होता. त्याची ससाण्यासारखी नजर सतत त्या दोघांवर रोखलेली असायची.

“मला एक सांगा मिसेस स्टेफनी..”, स्टेफनीला एकांतात गाठुन मोहीते म्हणाला.. “थॉमससरांना दिल्लीतील हॉटेलबद्दल माहीती कशी मिळाली होती?”

“इंटरनेटवरुन..”, स्टेफनी
“अच्छा, बर मी त्यांचा संगणक थोड्या काळासाठी वापरू शकतो?”, मोहिते
“तुम्हाला संगणक वापरता येतो’, त्याच्या चेहर्यावरचे बावळट भाव बघत स्टेफनी म्हणाली

“हो हो… येतो ना…. ” अस म्हणून स्टेफनीने दाखवलेल्या संगणकाच्या खोलीकडे मोहिते मार्गस्थ झाले.

“तू त्याला संगणक हाताळू द्यायला नको होतास…”, दीपक नंतर स्तेफनीला म्हणाला
“रेलैक्स, मला नाही वाटत त्या बावळटाला त्यातील काही कळत असेल…”, स्टेफनी

साधारण एक तासानंतर मोहिते बाहेर आला. दीपक आणि स्टेफनी हॉटेलची काही बिल तपासत असल्याचे नाटक करत बसले होते. नाकावर घसरणारा आपला जाड भिंगाचा चष्मा सावरत मोहिते म्हणाला, “अम्म… मी सगळा संगणक तपासला पण त्या हॉटेलची माहिती देणारे काही माझ्या हाताला लागले नाही. मला नाही वाटत थॉमससरांना इंटरनेट वरून काही माहिती मिळाली असेल.

“तपासला म्हणजे? आता थोडी न ती माहिती तेथे असणार आहे?. थॉमससरांनी डिलीट करून टाकली असेल तेंव्हाच…” स्टेफनी
“कस आहे ना बाई”, मोहिते कुचकट स्वरात म्हणाले, “तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगतो, संगणकावर ना कुकीज, ब्राउजर हिस्टरी, सेशन डाटा वगैरेची माहिती असते त्यावरून गेल्या वर्षी सुध्दा संगणकावर काय काम केले होते हे शोधत येते. ”

“असेल ना मी कुठे नाही म्हणते, पण थॉमससरांनी ती माहिती इथल्याच संगणकावरून घेतली असे कश्यावरून?”, स्टेफनी
“म्हणजे?”
“म्हणजे इथे इंटरनेट चा फार मोठ्ठा प्रोब्लेम आहे, आम्ही अनेकदा तक्रार सुद्धा केली होती. त्यामुळे थॉमससर बर्‍याचदा बाहेरगावी तेथील कॅफे मधून सुद्धा इंटरनेट वापरत असत…. ”

“हम्म …. असेल कदाचित…”, थोडासा नरम होत मोहिते म्हणाला


मोहीत्याचे प्रश्न दिवसेंदिवस वाढतच चालले होते. कधी तो थॉमसच्या बॅंकेचे डिटेल्स मागे, कधी त्याच्या मोबाईल्सचे कॉल रेकॉर्ड्स, कधी त्याचे कपाट उघडण्याचा हट्ट धरी तर कधी अजुन काही.

सुरुवातीला केवळ स्टेफनी आणि क्वचीत दिपकचीच चौकशी चाले, पण हळु हळु तो सपोर्ट स्टाफमध्ये शिरला. वेळ काळ न पहाता कधीही, कोणालाही, कुठेही गाठुन प्रश्नांच्या फैरी झाडत असे.

दिपक आणि स्टेफनीचे आयुष्य पुर्ण बिघडुन गेले होते. एकदिवशी मोहीते बाजुला नसताना स्टेफनी दिपकला म्हणाली, “दिपक प्लिज.. मला इथुन बाहेर पडायचे आहे, जेथे हा मोहीते नसेल.. फक्त तु आणि मी.. वैताग आलाय ह्याचा.. वाटतं आहे, नको ते पॉलिसीचे पैसे.. आम्हाला एकटं सोड..”

स्टेफनी दिपकच्या जवळ आली की दिपक लगेच संकोचीत होत असे, दचकत असे.. तो स्टेफनीकडे कमी, इतरत्रच कोठे मोहीते दिसतो का ते पहात बसे..

“दिपक….” जवळ जवळ ओरडतच स्टेफनी म्हणाली..
“श्श..!! हळु बोल..”, स्टेफनीला बाजुला ढकलत दिपक म्हणाला…

“तुझं लक्ष आहे का मी काय बोलते आहे ते?”, स्टेफनी
“हो आहे.. पण हा मोहीते असे पर्यंत ते शक्य नाहीये.. तु प्लिज जा इथुन..”, असं म्हणुन दिपक उगाचच काही तरी काम करण्यात मग्न होऊन गेला.

स्टेफनी दिपककडे दोन मिनीटं रागाने पहात उभी राहीली आणि मग खांदे उडवुन निघुन गेली.


दुसर्‍या दिवशी दिपक लॉबीमध्ये रजिस्टर तपासण्यात मग्न होता. मोहीते तेथेच बसुन उगाचच काही प्रश्न सुचत आहेत का पहात विचारात मग्न होता. इतक्यात तेथे स्टेफनी लंगडत लंगडत आली.

स्टेफनीला लंगडताना पाहुन दिपक उठुन उभा राहीला पण मोहीत्याला तेथेच पहाताच तो थोडा कॉन्श्यस झाला आणि म्हणाला, “लंगडत चालायला काय झालं मॅडम? काही लागलं का?”

“नाही विशेष काही नाही.. थोडा मुरगळला आहे, मी येते जरा सिटीमध्ये दवाखान्यात जाऊन”, स्टेफनी
“पण मॅडम, दुखर्‍या पायाने तुम्हाला ड्राईव्ह नाही करता येणार, त्यापेक्षा कुणालातरी घेऊन जा..”, दिपक

“कुणाला घेऊन जाऊ? आज सगळे इन्व्हेंटरी मध्ये बिझी आहेत.. तुला वेळ असेल तर चल, नाही तर मी करते काही तरी मॅनेज…”, स्टेफनी

दिपकची काही वेळ चलबिचल झाली पण मग त्याने रजिस्टर बंद केले आणि ड्रॉवरमधुन कारची किल्ली घेउन तो स्टेफनीबरोबर बाहेर आला. त्याने मोहीतेकडे पाहीले नाही, पण मोहीत्याची रोखलेली नजर त्याच्या पाठीला जाणवत होती.

दिपकने गाडी पार्कींगमधुन बाहेर काढली. स्टेफनी लंगडत त्याच्या शेजारच्या सिटवर येऊन बसली. दिपकने गाडी गेअरमध्ये टाकली आणि काही क्षणातच धुरळा उडवत गाडी दिसेनाशी झाली.
काही अंतर गेल्यावर स्टेफनीने आरश्यातुन मागे कोणी येत नाही ना ह्याची खात्री केली आणि मग गाडीचे सिट थोडे मागे करुन ती आरामशीर बसली. आपले दोन्ही पाय तिने डॅशबोर्डवर क्रॉसकरुन ताणुन ठेवले आणि ती हसत दिपककडे पाहु लागली.

दिपक तिच्या सरळ पायांना पाहुन आश्चर्यचकीत झाला.. “हे काय? तुझा पाय दुखत होता ना?”
“कुणी सांगीतलं..?” हसत हसत स्टेफनी म्हणाली…
“म्हणजे? मग मगाचंच ते सगळं?”, दिपक
“..नाटक होतं…”, दिपकच्या ओठांवर बोट ठेवत स्टेफनी म्हणाली..

“यु आर मॅड…”, दिपक मान हलवत म्हणाला…
“खरंच??”, स्टेफनीने केसांची रिबीन काढली आणि खिडकीतुन येणार्‍या वार्‍यात आपले केस मोकळे करत स्टेफनी म्हणाली…

“खरंच मी मॅड आहे दिपक??…माय अ‍ॅडोरेबल डार्लिंग?”, दिपककडे बघत स्टेफनी म्हणाली..
“काय बोलते आहेस तु स्टेफनी? चल मी गाडी वळवतो आहे मागे.. मोहीतेला कळलं आपण कुठल्या डॉक्टरकडे गेलो नव्हतो तर त्याला उगाच संशय येईल…”

“हेल विथ दॅट मोहीते.. सोड ना त्याला.. त्याला जे करायचं ते तो करेलच… आय लव्ह यु दिपक.. आय रियली डु…”, स्टेअरींगवरील दिपकच्या हातावर हात ठेवत स्टेफनी म्हणाली…

दिपकने गाडी कडेला घेतली आणि करकचुन ब्रेक लावला.


“उद्या काय होईल माहीत नाही दिपक.. लाईफ़ आपल्याला सोडुन पुढे निघुन गेली आहे असं वाटतं आहे.. वाटतं मी खुप एकटी राहीली आहे.. किनार्‍यावर रेतीला सोडुन समुद्राच्या लाटा जश्या माघारी वळतात तसं… होल्ड मी दिपक.. होल्ड मी…”, स्टेफनी बोलत होती..

ती दुपार दोघांसाठी खुप मस्त गेली. एका मस्त रेस्टॉरंट मध्ये दोघांनी जेवण घेतले…

“स्टेफनी.. आपण निघुन जाऊ इथुन.. त्या मोहीत्याचा मला काही भरोसा वाटत नाही. उद्या त्याने जुनी प्रकरणं उकरुन काढली, थॉमससर कधी दिल्लीला गेलेच नव्हते हे सिध्द केलं तर होत्याचं नव्हतं होऊन बसेल.

मी तर तुरुंगात जाईनच.. पण तु सुध्दा आत्तापर्यंत थॉमस होता म्हणुन वाचलीस. एक तर तुझा इथला स्टे इल्लीगल आहे, शिवाय तुझ्या हातुन झालेला तो मर्डर.. एकामागोमाग एक प्रकरणं बाहेर येत रहातील.. मरु देत ती पॉलीसी.. आपण परतच जाऊ या नको.. काय म्हणतेस??”, दिपक

“तु म्हणतोस ते बरोबर आहे दिपक.. पण आपण असं किती दिवस पळत रहाणार? जर हे पॉलीसीचे पैसे मिळाले तर आपण हा देशच सोडुन जाऊ.. माझ्या देशात.. तिकडेच आपण सेटल होऊ. रिस्क आहे, पण

आपल्याला ही शेवटची रिस्क घ्यायलाच हवी. मी आपल्या पासपोर्ट, व्हिसाचं बघायला लागते. त्याला पैसे लागतात दिपक. पॉलिसी क्लेम सेटल होईपर्यंत आपलं काम होऊन जाईल… देन जस्ट यु अ‍ॅन्ड मी डिअर…”, स्टेफनी म्हणाली.

वेटरने टेबलावर बिल आणुन ठेवले.

स्टेफनीने पर्समधुन क्रेडीट कार्ड काढले तसा दिपक म्हणाला..”नो क्रेडीट कार्ड.. कॅश दे…”

स्टेफनीने एकवार दिपककडे पाहीले आणि मग तिने कॅश काढुन बिल पे केले.

“वुई हॅव टु बी एक्स्ट्रॉ केअरफुल… काय माहीत मोहीतेचे कश्या कश्यावर लक्ष आहे. उद्या त्याला बिलामध्ये हॉटेल दिसले तर…”, दिपक

“सो व्हॉट दिपक? दवाखान्यातुन येताना आपण एखाद्या हॉटेलमध्ये एकत्र जेऊ शकत नाही का?”, वैतागत स्टेफनी म्हणाली..

“आय जस्ट सेड लेट्स बी केअरफुल. तु पॉलीसीचं मला आधी कल्पना दिली असतीस तर आपण आधीच निट प्लॅन करु शकलो असतो…”, दिपक

“बरं ठिक आहे.. अजुन किती वेळा मला ऐकवणार आहेस? म्हणलं ना सॉरी.. चल जाऊ आपण..”, स्टेफनी तणतणत गाडीत जाऊन बसली.

येताना गाडीत कोणीच काही बोलले नाही.


हॉटेल आल्यावर स्टेफनी गाडीतुन उतरली आणि दिपकची वाट न पहाताच आत निघुन गेली. मोहीते अजुनही तेथेच बसला होता. स्टेफनीना ताड्ताड पावलं टाकत येताना पाहुन मोहीते म्हणाला, “अरे वा! मॅडमचा पाय बरा झालेला दिसतो लग्गेच.. फारच छान डॉक्टर आहे हं…”

स्टेफनीने एकदा त्याच्याकडे रागाने पाहीले आणि काही नं बोलता तेथुन निघुन गेली.

“मॅडम चिडल्या बहुतेक…”, दारातुन येणार्‍या दिपकला मोहीते म्हणाला… “पण मी तर काहीच नाही बोललो.. येताना गाडीत काही झालं का?”

दिपकने मोहीतेकडे पुर्ण दुर्लक्ष केलं आणि तो आपल्या रुममध्ये निघुन गेला.


दुसर्‍या दिवसापासुन मोहीते बर्‍याच वेळ बाहेरच राहु लागला. सकाळी लवकर उठुन तो कुठेतरी निघुन जाई ते दुपारी उशीरा येई. मग जेवण झाल्यावर खोलीत काही तरी करत बसे आणि मग संध्याकाळी परत कुठेतरी जाई ते रात्री फार उशीरा परतत असे.

तो काय करतो? कुठे जातो? ह्याची दिपकला आधी फार चिंता वाटे, पण नंतर त्याने मोहीतेकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. हा मोकळा वेळ तो आणि स्टेफनी पुन्हा एकदा एकत्र घालवु लागले. पण ह्या वेळेस पुर्वीसारखं बंद खोलीत बेड वर एकमेकांच्या सानीध्यात न घालवता पुढील आयुष्याचं प्लॅंनींग करण्यात त्यांचा वेळ जाऊ लागला.

एक तर मोहीते कधी परतेल ह्याची निश्चीत वेळ ठरलेली नसे. त्यामुळे एकत्र एका खोलीत बेडवर दोघांना बघण्यापेक्षा एकत्र बोलताना बघणे हिताचे होते. आणि शिवाय पुढचा प्लॅन ठरणे आवश्यक होते. पॉलीसीचे पैसे मिळाल्यावर अधीक वेळ न दवडताच दोघांनी प्लॅन पुर्णत्वास न्हेण्याचे ठरवले होते.

सर्व काही सुरळीत चालु आहे असे वाटत होते.. पण अचानक माशी शिंकली..

एके दिवशी सकाळी मोहीत्याने दोघांना खोलीत बोलावुन घेतले.


आधी दिपक आणि मग काही वेळाने स्टेफनी मोहीत्याच्या खोलीत गेले. दोघंही खोलीत आल्यावर मोहीतेने खोलीचे दार लावुन घेतले.. आज त्याच्या चेहर्‍यावर एक विलक्षण तेज दोघांना भासत होते.

आपल्या चेहर्‍यावर एक विस्फारलेले हास्य आणत मोहीते दोघांकडे बघत म्हणाला.. “तुम्हाला कदाचीत आश्चर्य वाटेल, पण मला पुर्ण खात्री आहे की थॉमससर दिल्लीला कध्धीच गेले नव्हते…”
दिपक लगेच खुर्चीत सरसावुन बसला. तो काही बोलणार त्याच्या आधीच त्याला थांबवत मोहीते म्हणाला, “एक मिनीट.. आधी मला बोलु द्या….”

दिपक तोंड बंद करुन पुन्हा खुर्चीत मागे सरकुन बसला.

“हं.. तर माझी खात्री आहे म्हणा किंवा माझा दावा आहे म्हणा.. थॉमससर कध्धीच दिल्लीला गेले नव्हते. मी आजुबाजुचे सर्व ट्रॅव्हल्स, बस स्टॅन्ड्स, एअरपोर्ट, टुरिस्ट एजन्ट्स सर्व सर्व ठिकाणी पुन्हा पुन्हा चौकशी केली. अर्थात थॉमससर तसे बर्‍याच जणांच्या परीचयाचे होते. त्यामुळे सर्वांनीच ठामपणे थॉमससर निदान त्या कुणाबरोबर तरी गेले नव्हते ह्याची खात्री दिली. थॉमस दिल्लीला गेले होते ह्याचा कोणताही पुरावा जसं त्यांचे जाण्याचे तिकीट, तेथे कोणत्या हॉटेलमध्ये ते राहीले, कुठल्या पार्टीशी डिल करण्याकरता कॉन्टॅक्ट केला वगैरे वगैरे ह्यापैकी कोणताच पुरावा उपलब्ध नाही.

ह्या केसवर काम करणारा फक्त मी एकटा नाही मॅडम.. सर.. आमची पुर्ण फौज ह्यावर काम करत असते. ह्यापैकी इतर कुणालाही दिल्लीमध्ये थॉमससरांच्या अस्तीत्वाचा पुरावा मिळाला नाही. हं.. डोन्ट अंडरएस्टीमेट आवर टिम.. इफ़ आय मस्ट से.. मुडद्याला सुध्दा बोलती करणारी आमची लोकं आहेत.. जेंव्हा ते म्हणतात तेंव्हा ते एकशे-एक टक्के सत्य आणि फक्त सत्यच असते. त्यात कोणतीही चुक असुच शकत नाही.

पण मग तो अ‍ॅक्सीडेंट ती डेड बॉडी? ती एक मिसींग लिंक राहील कारण ती बॉडी जशी थॉमसचीच होती हे कोणी खात्रीपुर्वक सांगु शकत नाही.. तसेच ती बॉडी थॉमसची नव्हती असेही सांगणारं कोणीच नाही ना…”

मोहीते बोलत होता.

दिपकने तळहाताने चेहर्‍यावरील घाम पुसला.

“मग थॉमससर कुठे गेले? असे अचानक गडप कसे झाले? हे प्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच आहेत. त्यांचा खुन झाला? का ते जाणुन बुजुन पॉलीसीचे पैसे मिळवण्यासाठी कुठे लपुन बसले आहेत आणि तुमच्या मदतीने हा फ्रॉड प्लॅन केला आहे.. सांगु शकत नाही..”, मोहीते म्हणाला..

“अहो काय बोलताय तुम्ही.. आम्ही कश्याला फ्रॉड केस करु?”, स्टेफनी चिडुन म्हणाली…

“बरोबर.. मलाही वाटत नाही ही केस फ्रॉड आहे. थॉमससरांचा मृत्यु झाला आहे.. ह्या मताचा मी पण आहे. फक्त तो.. तुम्ही जसं म्हणता.. तसा दिल्लीला अ‍ॅक्सीडेंटल झाला? का त्यांचा खुन…..”, मोहीते
“हे बघा मोहीते.. कामाचं बोला.. हा क्लेम तुम्ही अ‍ॅक्सेप्ट केला आहे का? का अजुनही त्यावर काही बाकी आहे ते सांगा. मला वाटतं आता दिड महीना उलटुन गेला. तुमच्याकडुन होत नसेल तर तसं सांगा मी ही केस हेड ऑफीसला एस्कलेट करतो..”, दिपक म्हणाला…

“ट्राय युवर लक..” छद्मी हास्य करत मोहीते म्हणाला.. “ईफ़ आय वेअर यु.. मी असला मुर्खपणा करणार नाही…”
“म्हणजे???”, दिपक आणि स्टेफनी एकदमच म्हणाले..

“मी तुम्हाला क्लिनचीट देण्याचं ठरवले आहे..”, काही क्षण शांततेत गेल्यावर मोहीते म्हणाला.. “येस्स.. क्लिनचीट.. यु विल गेट द फुल मनी बॅक.. फाईव्ह करोड इंडीयन रुपीज फ्रॉम आवर कंपनी…” मोहीते म्हणाला..

दिपकने नकळत एक सुस्कारा सोडला…

“पण…”, मोहीते पुढे चालुच होता.. “त्या पाच करोड मधले चार करोड पन्नास लाख रुपये तुम्ही मला द्यायचे…”
“व्हॉट??”, स्टेफनी आणि दिपक पुन्हा ओरडलेच..

“येस सर.. येस मॅम.. फ़ोर क्रोर, फिफ़्टी लॅक्स ओन्ली… तुम्ही मला द्यायचे…”, मोहीते
“पण का?”, स्टेफनी..

मोहीतेने खांदे उडवले आणि मग आपली बॅग उघडुन त्यातुन त्याने एक एन्व्हलोप काढले आणि ते टेबलावर फेकले…

थरथरत्या हाताने दिपकने ते एन्व्हलोप उघडले आणि त्यातील ऐवज बघुन त्याच्या चेहर्‍यावरचा रंगच उडाला…

“काय झालं दिपक?” असं म्हणत स्टेफनीने ते एन्व्हलोप दिपकच्या हातातुन काढुन घेतले. आतमध्ये तिचे आणि दिपकचे काही फोटो होते. कधी हॉटेलच्या कुठल्याश्या कोपर्‍यात एकमेकांच्या मिठीमध्ये विसावलेले, कधी एकमेकांकडे चोरटे कटाक्ष टाकताना, कधी कुठे तर कधी कुठे.. अगदी काल परवाच्या दुपारच्या जेवण्याच्या वेळचे फोटो सुध्दा त्यात होते…

“तुम्हाला काय म्हणायचे आहे मोहीते..”, स्टेफनी रागाने फणफणत म्हणाली..
“मला काहीच म्हणायचे नाहीये मॅम.. मी तर तुम्हाला हे सर्व माहीत असुनही क्लिन चिट दिली आहे.. शिवाय तुम्हाला पन्नास लाख रुपये मिळणार आहेतच ना. मला फक्त उरलेले पैसे द्या.. एव्हढंच माझं म्हणणं आहे..”, मोहीते..

“आणि जर नाही दिले तर???”, स्टेफनी
“तर.. हे एव्हीडंन्स मी हेड ऑफीसला पाठवुन देईन. तुमच्या दोघांमध्ये काय चालु आहे ते समजण्यापुरते हे फोटो पुरेसे आहेत. आणि राईचा पर्वत करण्यात आमची कंपनी एक नंबर आहेच. क्लेमचे पैसे द्यावे लागु नयेत म्हणुन ते ह्या फोटोंवरुन अनेक तर्कवितर्क काढतील… अनेक स्पष्ट न झालेल्या गोष्टी स्पष्ट होत जातील.. कश्याला गडे मुडदे उखडायचे.. तसा तुम्ही थॉमससरांचा खुन नसेल केलेला.. पण उगाच तपासात भलते सलते काही निघाले.. तुमच्यावर कंपनीने खोटे आरोप सिध्द केले..”, मोहीते

“अहो पण सरांचा खुन आम्ही केलेला नाहीये..”, दिपक
“मान्य आहे.. सर.. मान्य आहे.. तुम्ही चिडु नका.. पण काय आहे ना.. कंपनीकडे शेकडो वकीलांची फौज असते, अनेक गुप्तहेर संधीची वाट बघत बसुन असतात… एकदा का त्यांच्या डोक्यात संशयाचा भुंगा शिरला की मग तुमचा क्लेम नक्की कोणत्या जन्मी सेटल होईल सांगु नाही शकत..”, मोहीते..

“अहो पण म्हणुन एव्हढे पैसे.. निदान ५०-५०% तरी..”, स्टेफनी..
“मॅडम.. अहो नका घासाघीस करु.. पैसे घेणारा मी एकटा थोडी नं आहे. मी म्हणालो तुम्हाला ह्या केसवर माझ्याबरोबर अनेक जण काम करत होते. सगळ्यांचीच तोंड बंद करावी लागतील ना.. ऐका माझं, उगाच रिस्क नका घेऊ…”, मोहीते

दिपक आणि स्टेफनीची चिडचीड होत होती.

“हे बघा.. उद्या मी सकाळी थोडं बाहेर चाललो आहे, दुपारपर्यंत मी परत येईन तेंव्हा तुमचा निर्णय मला सांगा..” असं म्हणुन मोहीते उठुन खोलीच्या बाहेर निघुन गेला.

काय होणार पुढे? दिपक-स्टेफनी मोहीत्याचा सल्ला मानणार का? का त्याचाच डाव त्याच्यावर उलटवण्याचा प्रयत्न करणार? का अजुन काही होऊन कथेला अनपेक्षीत वळण मिळणार?

मित्रांनो वाचत रहा कथेचा पुढचा भाग..

[क्रमशः]