विहार
महाकाय पिंपळ बोधीवृक्षाखाली बाबा त्रिशरण जपायचे. अगदी भल्या पहाटेलाच मी सायकलवरून तालुक्याला दहा किमीचा प्रवास करीत कॉलेजात जायचा. माझ्या शिक्षणातील हा नित्यक्रम होता आणि सांजेला पुनश्च गावात परत येणं व्हायचं. माध्यमिक शिक्षणापासून आता पदव्युत्तर शिक्षणापर्यंत नियमीत खडतर प्रवास, नित्य अभ्यास आणि त्या करिता अथक परिश्रम मी घेतलेत. गावाच्या वायव्येकडून जाणारी ही निमा नदी, तीला लागून असलेली ही टेकडी, दगड धोंड्याची पायवाट वजा रस्ता तुडवणं अगत्याचं होतं.
आमचं गाव अगदी छोटसं खेडं. पाचपन्नास झोपडीवजा घरं. प्रत्येकांना चार-दोन एकर शेती, शेतमजुरी आणि त्यावरच गुजरान व्हायची. गावात असं शिकलं सवरलं कुणीच नाही. मॅट्रिक झालेली चार-दोन पोरं होती एवढीच. कॉलेजात जाणारा मी एकटाच.
निमा नदीच्या काठावरील नागमोडी वळण, निसर्गाच्या अमृतमयी सानिध्यात टेकडीच्या पायथ्याशी असलेलं नयनरम्य वातावरण आणि उंचवट्यावर असलेलं एक भग्न विहार, मला मात्र दररोज दिलासा दयायचे. या पिढीत तरी कुणी त्या विहारात गेले नसतील पण त्या भग्न विहाराला पाहून माझे मन मात्र त्या वळणावरून समोर जातांना वंदन करायचं. कदाचित आपण आपल्या स्वप्नसत्याला ध्येयाला उदिष्ट्य प्राप्तीकडे नेतांना या परिसराचा आशिर्वाद मिळावा असच मनोमन वाटायचं. आता अंतीम वर्षाची परीक्षा झाली नि संपलं शिक्षण. पुढे कुठतरी उदरनिर्वाहासाठी नोकरी करावी हाच विचार...
तसं पाहता मी एकदाही त्या टेकडीलगतच्या विहारात गेलो नाही असेही नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तिथे जायचा. तिथला एकांतवास मला खुप बोलकं करायचा. विचाराचं थैमान समृद्धतेकडून सृजनशिलतेकडे घेवून जायचा. मधल्या काळात मी माझ्या वर्ग मित्रांना इथली छोटी सहल करायला घेऊन आलो होतो. दिवसभर ते नयनरम्य स्थळ आणि इथला विसावा. खूप आनंदी झाली होती मित्रमंडळी. पण या ठिकाणी हे त्रिशरण जपणारे बाबा नव्हते. असच एकाकी होतं विहार.... निर्जनस्थळ....
आज मला मात्र फार उदासवानं वाटत होतं. अगदी पहाठेलाच जाग आली. दोन महिन्यापासून शेतशिवार आणि मी असाच नित्य क्रम सुरू होता. वारंवार त्या विहाराकडे दृष्टी जायची. मी पहाटेलाच सायकल घेतली आणि अध्र्या तासातच टेकडीकडील विहाराची वाट धरीत पहाटेच्या अंधारवेळेसच येथे पोहचलो....
बाबा पहाटेलाच उठून त्या विहारातील पिंपळवृक्षाखली ध्यानस्थ बसले होते. त्यांचे त्रिशरण संपले तेव्हाच त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं.
मी त्यांच्या पायाला स्पर्श करायला जाणार तर अलगद खांदे पकडून त्यांनी मला वर करून घेतलं.
‘अरे ! नको, हे काय करतो आहेस ?’
‘बाबा आशिर्वाद हवा...’
‘छे! कसला रे माझा आशिर्वाद... मीही माणूसच ना...! अरे शरण जावं तर त्या बुद्धाला....’
त्यांनी मला अलगद पिंपळवृक्षाच्या बुंदयाखाली बैठकीवर बसविलं. माझ्याकडे निरखुन बघीतलं.... मलाही त्यांच्या निस्तेज चेहऱ्यात नि बुभूळवलयात एक पहाटेला उमलणाऱ्या सूर्यतेजाची शलाका दिसत होती.... ती या दुनियेला नवतेज देणार आहे... होय... नवतेजच तो.... मला अनपेक्षितपणे बाबाला बघून भासच झालेला होता.
‘कुठला रे बाळ तू ?’
‘बाबा मी या शेजारगावचाच आहे.’
‘आणि इकडे भल्या पहाटसमयी कसा काय ?’
‘बरेच दिवस उलटलेत बाबा, मी इथे आलो नव्हतो, तसं दररोज कॉलेजात जातांना हे विहार मला खुणावतं. हाका मारीत असतं.... इथल्या निसर्गाचं, इथल्या संवेदनाचं नि माझं काहीतरी नातं आहे याची जाणीव देतं मला...’
‘बराच हळवा आहेस रे बाळ तू!’
‘बाबा एक विचारू ?’
‘हं ! बोल, निसंशय बोल, बाळा !’
‘बाबा, तुम्ही अशा निर्जन स्थळी एकटेच. केव्हापासून आहात आणि का बरं ?’
‘अरे बाळ, मी कुठं एकटा आहे. तू आहेस ना. आणि हे निर्जन स्थळ कसं काय ? इथे तर बुद्ध.... जसं तुला वाटते ना .... इथली ओढ अगदी तशीच मलाही.....’
बाबा बरेच गुढ बोलत होते. सकाळसमयी त्यांनी त्यांच्या तांब्यातील निमा नदीचं पाणी पिलं. मलाही सायकलने आल्याने घशाला कोरड पडली होती. मी सुद्धा त्यांच्या तांब्यातील पाणी मागीतलं... मला फार बरे वाटू लागले होते... थकवा दूर झाला होता. बाबांना मी एकसारखा निरखत होतो. बाबा बरेच काही मला बुद्धत्वाचं ज्ञान सांगीत बसले. मलाही बाबांनी बोलकं केलं.... मी माझं शिक्षण, परिस्थिती आणि बरच काही बाबांना सांगीमलं..... ते मला आणि माझ्या बोलण्याला फार-फार निरखित होते. ऊन्ह आता बरच वर आलं होतं.... सकाळचा सूर्य... पिवळया शलाकेतून आता पांढराफक्क्ड होतोय की काय ? निळया आभाळाकडे मी एक नजर फिरविली...... निमा नदीच्या पात्रात वाहणारं पाणी आणि पसरलेली किरणे.... माझ्या डोळयासमोर फार-फार मोठा आशावाद निर्माण करीत होते.... आणि हे पडकं विहार... टेकडी.... अगदी शांत-शांत.... पाखरांचा तेवढा गुजांरण्याचा आवाज.... आठ तरी वाजले असावेत.... मी बाबांचा निरोप घेवून जाणार तोच त्यांनी मला एक पिंपळाचं पान भेट दिलं.....
‘बाळ जप या पिंपळपानाला.... ते तुला खुप काही समाधान देईल.’
मी त्यांनी दिलेली भेट शर्टच्या खिशात ठेवली. त्यांच्या भेटीने मला खरेतर निस्सिम आनंद निर्माण झाला होता.
बरेच दिवस उलटले असतील. मधल्या काळात मी शहरात राहायला गेला. शिक्षण आणि पार्टटाईम जॉब मिळाल्यानं मी खुश होतो. मनातील इच्छा आकांशा पूर्ण होत असल्यानं आता कुठलीही चिंता उरली नव्हती. गाव खेडयातील आई बाबाला इथं घेवून यायचं असंच ठरवलं होतं.
एकेदिवशी मी गावाकडे निघालो. प्रवासात ही निमा नदी, ती टेकडी, पुनश्च ते विहार दृष्टिक्षेपात येताच बऱ्याच दिवसांनी टेकडीवरील बाबाची आठवण झाली... मी अलगद सायकल उभी केली. मी टेकडी चढून त्या पिंपळ वुक्षाकडे गेलो.... तिथे माझी नजर त्या बाबाला शोधत होती..... पण आज तिथे बाबा नव्हते... जणू कित्येक दिवसापासून इथे कुणी फिरकलं नसल्याचच भासत होतं. माझं मन गहिवरलं.... कुठं गेले असतील बाबा ? माझं मन बेचैन झालं. मी त्या पिंपळवृक्षाखली निवांत बसलो... वाहत्या निमेचं मी गोड पाणी पिवून आलो. भग्न विहार आणखी पडझड झालेलं. जिकडे-तिकडे वाळलेला गवत आणि पालापाचोळा कचरा पसरला होता. ऊन्ह डोक्यावर आलं होतं...
कुठे गेले असतील बाबा ? बरं, हे बाबा कोण होते बरे ! कुठून आले ? काय माहित ? अरे हो, आपण त्यांना एकदाच भेटलो होतो. कसे काय ओळख देणार पहिल्याच भेटीत. पण काही का असेना माझ्या मनात बाबा ठासून बसले होते. बाबा मात्र आस्तिक नव्हतेच मुळी. या भग्न पडक्या विहारात बुद्धाचे त्रिशरण जपत बुद्धाला शरण जाणारी ती व्यक्ती कुणीतरी महंतच असावी. दुःखमुक्तीच्या सिद्धांताला जाणणारी... जीवनातील सर्वोच्च स्थान आणि त्यातील सर्वोच्च आनंद प्राप्त करणारी....
माझं मन कावरं-बावरं झालं. ना इथं कुठली मुर्ती ... हे स्थळ नेमकं बुद्धाचं की अन्य कुठलं ? तेही कुणाला ठावूक नाही.... इथल्या पडक्या अवशेषावरून ते पूर्वी विहार होतं हे तोंडोतांडी गावातील पूर्वजाकडून तेवढं ऐकलं होतं.. होय, सम्राट अशोकाच्या काळातीलच ते विहार असावं... चैऱ्याशी हजार विहारातील ते एक विहार.... नांलदा विद्यापिठासारखं ते ज्ञान देणारं, बुद्धज्ञानाचा झरा आणि ही निमा नदी.....
अनेक स्थित्यंतरानंतर ते या अवस्थेत आलंय... कित्येक पिढया होवून गेल्यात आज इथे मात्र कुणीही येत नाही की जात नाही. मला फार बरं वाटलं म्हणून मी.... आणि दुसरे ते बाबा.... नाहीतर लोकांच्या अनंत दंतकथा.... म्हणे अनेकांनी इथं काहीतरी वेगळच बघितल्याचं.... अंधश्रद्धाच ती... कदाचित पसरवलेली की खोटी..?. मी तर अनेकदा इथं आलो आहे.... आईबाबा म्हणायचे अरे नको जावूस तिकडे.... काही तरी ..?
निसर्गाच्या अनंत आक्रमनाने ते विहार मात्र पडकं आणि संपल्यात जमा झालेलं. पण हे विहार असावं हा ठाम विश्वास मलाही आला होता... इथं कुणीही येणारं जाणारं असं नाहीच... फक्त मी आलो असेल इथल्या ओढीने आणि हे बाबा कुठल्या कारणाने कुणास ठावूक ? पण आता ते बाबाही नाहीत इथे ? होय, कुठे गेले असतील गावाकडे, येतील कधीतरी, पण त्याचं वास्तव्य या स्थळाला मात्र पालवी देवून गेलं आहे. इथला पिंपळ आता फार-फार डेरेदार आणि मोठा झाला आहे....
मी त्या पिंपळाचं पान हातात घेतलं. त्याला निरखलं आणि पुन्हा खिशात जसाच्या तसेच ठेवले. एका अनामिक ओढीने गावाकडची वाट घरली. आज बऱ्याच दिवसांनी गावात आलो होतो. गावही मला नवखे भासत होते. आई बाबाला अगोदरच कळवल्याप्रमाणं आम्ही शहरात जायची तयारीही केली. मीही दोन दिवस गावात राहून निरोप घेणार होतो. त्यामुळचं गावात सर्वांच्या भेटीगाठी घेतल्यात. एक दुःखद वेदना गाव सोडल्याची आणि जीवन सार्थकी लागल्याचं समाधान, तेवढाच आनंदही मला प्राप्त झाला होता.
रात्री जेवतांना आईला त्या टेकडीवरील बाबाबद्दल विचारलं. तर त्यांनाही माहित नव्हतं. मात्र ते बाबा बरेच दिवस तिथे राहिलेत आणि नंतर ते कुठं गेले कुणासही कळलं नाही. ते दररोज गावात यायचे कुणाच्या ना कुणाच्या घरी भोजनदान मागायचे आणि कुणाशिही कधीच न बोलता निघून जायचे. मात्र ते नेहमी त्रिशरण मुखोदगत जपतच असायचे. ‘बुद्धम् शरणम् गच्छामी...!’
मी आता गाव सोडल्याला पाच-सहा वर्षे उलटली असतील. गावाकडे तसं जाणं झालंच नाही. आता शहरात मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती. आई बाबा आणि सोबत पत्नीही होती. होय, यंदाच माझं लग्नही झालं. या शहरी जीवनात ती निमा नदी, टेकडी आणि त्या विहारातील त्रिशरण जपणारे बाबा कधीतरी मला आठवायचे.
बऱ्याच दिवसांनी पहाटेलाच स्वप्नाने जागा झालो होतो. आज एकाएक ते त्रिशरण जपणारे बाबा, विहार मला हाक देत होते. ‘बाळ’ होय, त्यांनी मला बाळ म्हणूनच हाक दिली होती. मी अचानक जागा झालो होतो. इतक्या वर्षानंतरही मला ती टेकडी तो परिसर ती निमा नदी आणि ते भग्न विहार डोळयासमोर तरळत होते.... असं का बरं होत असावं... माझं डोकं थोडं गरगरू लागलं. मी उठून घटाघटा पाणी प्यालो.... तेवढ्याच आठवणी उन्मळून येत होत्या... सगळे मात्र अजूनही झोपलेलेच होते....
परत पहाटेला डोळा लागला नाही.... मी पाहिलेले स्वप्नही थोड्या वेळाने विसरून गेलो. छान घराशेजारी फिरण्याच्या सवयीने मी रस्त्यावर फिरायला गेलो. फिरून परत येताच दाराच्या आतमध्ये पडलेलं वृत्तपत्र नित्यसवयीप्रमाणं हातात घेतलं आणि काय ? मला थरकाप जाणवू लागला... हृदयातील श्वास जड होत चालला होता. डोळयातील झापडं आता अंधारात गडद होणार की काय? मी स्वतःला सावरत सोप्यावरती बसलो. बातमी एकटक वाचत होतो. मागेहून पत्नीने अगदी खांद्यावर हात ठेवून आधार दिला होता. मी अधाशासारखा भराभर ते वृत्त मुखपृष्ठावर असलेला फोटो बघत, वाचत होतो. आतापर्यंत मी एवढा अनभिज्ञ असल्याचं मलाच कोडं पडलं होत.....
‘गर्वसे कहो हम हिंदू है’ चे जनजागरण करून मंदिर वही बनायेंगे चा नारा बुलंद करणारा, बाबरी विध्वंस आणि धर्मद्वेष्ठा नेता अखेर दिवंगत.... एक पर्व संपले’ त्यांच्या आचरण विचाराला नमन, वंदन, सलाम जयभिम अशा अनेक मतीतार्थाने बातमीची रंगत वाढली होती... तेवढीच....
धर्माच्या अठ्ठाहासापायी आपणच आपली माणसे मारतो. सर्वांच रक्त असतं एकाच रंगाचं. लाल.... अगदी तशीच झाडाची पानही असतात हिरवीगार... परंतु फॅशनच्या आणि विज्ञानाच्या कालखंडात पानाचा रंगही झाला आहे बेरंगी... बाता सगळीच पानं नसतात हिरवी. कदाचित पुढे माणसांच्या रक्ताचा रंग विज्ञानाच्या शोधात बदलवता आला तर... ओळखता येईल या जगातील माणूस कुठल्या धर्माचा आहे ते... तर हा रंगच देता येईल प्रत्येक धर्माला आणि जातीलाही... माणूस ओळखणं अगदी सोपं....
असं निस्सिम माणुसकीचं आणि प्रगाढ बुद्धविचाराचं तत्वज्ञान देत बाबरी विध्वंसात शेकडो माणसाचं रक्त सांडल्यानंतर विचारप्रेरीत होणारा, कलिंगच्या स्वारीनंतर शांती आणि अहिंसेचं तत्व स्वीकारून धम्माच्या प्रसारार्थ आणि सत्याच्या शोधार्थ झटणाऱ्या सम्राट अशोकाप्रमाणे जगणारा आजचा विसाव्या शतकातील बुद्ध.... हा देश बुद्धमय करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न. स्वतःच्या नव्हे तर समाजाच्या दुःखमुक्तीच्या कारणांचा शोध घेत अखेर प्रखर हिंदू असूनही जगाला खरेच कशाची गरज आहे ते ओळखून बौद्धधम्मास स्वीकारत या युगाला शांतीचा पाठ देत सर्व धनसंप्पती, एैश्वर्य आणि राजकारण यांचा त्याग करून अगदी मनाने निर्मळ पवित्र होत, निमा नदीच्या टेकडीवरील भग्न विहाराच्या पिंपळ वृक्षाखाली बुद्धम् शरणम् गच्छामी..... त्रिशरण जपत कायमचा विसावला. तिथेच त्यांना......
मी क्षणार्धात अंतरंगातून ओरडलो. बाबा... होय, तेच बाबा... बुद्धम् शरणम् गच्छामी त्रिशरण म्हणीत कुणाशिही कधीच न बोलणारे बाबा. त्यांचा स्थितप्रज्ञ फोटो. अंतीम क्षणांची वृत्तभर पुरवणी आणि माहिती वाचताच माझे डोळे भरून आले.... मी आणि माझी पत्नीही......
मी आणि ही स्कुटर्सवरून सटरफटर तयारी करीत बाबांच्या अंतीम भेटीस निघालो. बऱ्याच वर्षानंतर गावाकडचा खडकाळ लालसर मुरूमरस्ता.. पुढे निमा नदी... टेकडी आणि ते भग्न विहार.....
माझी पावले जड होत होती. बाबाच्या अंतीम दर्शनासाठी विहारात अलोट गर्दी उसळली होती. त्या पिंपळ वुक्षाखाली बाबाचा देह ... त्याचं मुर्तीमंत बुद्धरूप पाहून माझे डोळे रडवेले झाले. मी ‘बाबा’ म्हणत त्यांच्या चरणावर डोकं ठेवत ढसाढसा रडत होतो. माझे बाबा गेले. फक्त माझ्याशीच कदाचित बोलणारे. त्यांच्या स्मृतीतील ते दोन्ही पिंपळपान खिशातून बाहेर काढीत त्यांच्या चरणावर अर्पण केले आणि माझ्या अश्रूचे थेंब त्यांनी दिलेल्या चरणावरील पिंपळपानाला न्हाऊ घालत होते. वारा वाहत होता. अचानक वाऱ्याच्या झुळूकने ते पिंपळपान हवेत तरंगत त्या निमा नदीच्या प्रवाहात वाहत पुढे-पुढे जात होते. बाबाचा पाणी प्यायचा तांब्याही कुणाच्या तरी धक्क्याने त्याच प्रवाहात घरंगळत.....पिंपळपानासवे जात होता. मी त्या वाहत्या निमेकडे बघतच राहिलो. हीच निमा थेंब थेंब ज्ञानामृत बौद्धधम्माच्या रूपानं प्रवाहीत करेल... बाबाच्या आचारणाचं बीज माझ्या रक्तात बिंबत होतं. अखेर मी आणि ती..... बराच वेळ..... नव्हे ! तर कायमचेच..... अजूनही त्रिशरण जपतो आहोत...
बुद्धम् शरणम् गच्छामी....
धम्मम् शरणम् गच्छामी....
संघम शरणम् गच्छामी.....