बळीराजाचा टाहो Sanjay Yerne द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बळीराजाचा टाहो

बैलपोळा निमित्त विशेष लेख :

बळीराजाचा टाहो

बळीराजाच्या राब- राब राबण्यातील कष्टत झीजण्यातील प्रत्येक क्षण दुःख संवेदनेत, कुटुंब विवंचनेत चिंतेत पुरलेला असतो.

“एक बिजा केला नाश, मग भोगिले कणीस!!” या संत तुकारामाच्या तत्त्वज्ञ ओळीचा सारांश त्याच्या प्रत्येक रुधीर कणात आणि जीवनातील प्रत्येक क्षणात निपजलेला असतो. हे तत्वज्ञान साधेसे नाही तर एक बीज शेतीत पेरल्यावर त्यातून कणसाचे ढीग, रास निर्माण होते, हे त्या बळीराजालाच ठाऊक असते. असं निर्मितीचं तत्वज्ञान डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतापेक्षाही अनोखे आहे, वेगळे आहे. पण आमच्यासारख्या पांढरपेशा सुसंस्कारित आत्ताच्या बहुजन समाजाने हे समजून घेतलेही असेल पण बापजाद्यांनी जगलेला तुकाराम वा ज्याच्या बळावर आम्ही पोसले जात आहोत त्या बळीराजाचे तत्वज्ञान कधीही आम्ही समजून घेतलंच नाही. हीच खरी शोकांतिका आहे.

याला कारण म्हणजे एखादी रूढी निर्माण होणे व कालांतराने ती तशीच पाळली जाणे. अगदी असेच हजारो वर्षापासून निर्मित होत गेलेली ही व्यवस्था त्यातून निर्माण झालेली भांडवलशाही, आताची दंडुकेशाही अथवा त्यातून निर्माण झालेल्या अनेक शोषण व्यवस्थेचे स्वरूप अगदी आनंदानं रूढी परंपरेचे नाव स्वीकारत आम्ही जगत आहोत एवढंच....

एकंदरीत काय तर? समाजव्यवस्थेत निर्माण होणारी श्रीमंत-गरीब ही विषमतेची दरी, पोटाची आग, तर दुसरीकडे भरमसाठ विषारी नाग, असं दिसत असलेले हे स्वरूप आहे. आज आपण व आपला बाप बळीराजा याकरिता निर्माण झालेली दहशत, भीती व्यवस्था बघू जाता बळीराजाचे संपणे हे भयावह होणार आहे. तरीपण त्याचं सरळ मनाचे निर्मळ जगणं सुरू असतं.

ज्या बैलांनी त्याचा बाप बनवून त्याला वर्षभर जगवलं, पोसले. त्याचाच कृतज्ञता दिवस म्हणून पोळा सण आपण उत्साहाने साजरा करीत आलेलो आहोत.

स्वतःच्या मुलीच्या लग्नात एखादा बाप आनंदाने जेवढा हरकून जाणार नाही तेवढा तो आपल्या बैलरुपी बापाच्या कृतज्ञ सोहळ्यात आनंदानं हरखून जातो. त्याला अगोदरच्या दिवशी पूजा करीत ‘आवतण’ देत जेवायला बोलवतो. पूजा करतो, “आज आवतण देतो, उद्या जेवायला येजो.” म्हणत स्वतःची तो खोर भरतो. खांद्यावर असलेल्या घोंगडी व पळसाच्या डाळीने बैलाचे खांदे शेकत, आंजोळीने जोंधळे, गहू खोरीत भरत तो म्हणतो, “खोर भरो, खरा भरो... खोर भरो, घर भरो.... खोर भरो, पोट भरो....”

बैल बापाच्या पूजनात किती लोभसवाणा जिव्हाळा असतो नाही का? दुसऱ्या दिवशी तर पोळ्यात त्याला नटऊन-थटऊन तो त्याला स्वतःच्या पोटाला न पोराबारायलाही वर्षभर गोड-धोड भरवलंही नसेल, पोटाला चिमटा देत जगलेलाही असेल पण त्या बैलबापाला तो त्या दिवशी पुरणाचा घास त्या माऊलीच्या हाताने भरवितो. ती माऊली अंतकरणातून वर्षभर रडलीही असेल पण पोराला घास भरवताना जेवढी तन्मय झाली नाही त्याहूनही कितीतरी तन्मयतेने बैल बापाचे पाय धुत ती त्याला ओवाळते, पुरणपोळीचे जेवण भरविते.

असतो असा हा कृतज्ञतेचा कुटुंब सोहळा... पण या सोहळ्यातील तिचं अंतरंगातून रडणं, म्हणजेच जगणं, आपण समजून घ्यायला हवं होतं.

दुसऱ्या पाडव्याच्या दिवशी अगदी पहाटेलाच “ढेकुल मोंगसा घेऊन जा गे मारबत.” म्हणत तो बळीराजा उठतो. अर्थात मारबत बोंबलतो. याला गूढ इतिहासात अर्थ काय? तर आजच्या शोषित, भांडवलशाही समाज व्यवस्थेने केलेले शोषण जसे ढेकुल मोंगसा आपल्या रक्ताचे शोषण करतो, त्यापासून आपली हानी होते. अगदी अशीच आजची ही धर्म, राज्य, शिक्षण, अर्थ, समाज व्यवस्था आपल्याला चिरडत आलेली आहे. या व्यवस्थेलाच ‘घेऊन जा गे मारबत’ असे प्रतिकात्मक तो म्हणत असतो. एकंदरीत माणुसकीचे राज्य यावे, खऱ्या बळीराजाची व्यवस्था यावी असे तो अंतकरणातून बोंबलत असतो.

पुन्हा तुकारामाचं निर्मिती तत्वज्ञान आणि बळीराजाची समृद्ध सुसंस्कृत सुसंस्कारित वर्तन प्रणाली त्याला मिळावी. आतातरी पोटभर कुठल्याही भीती दहशतीत न जगता अथवा अन्य नैसर्गिक संकटे न येता, कुटुंबाचे भरणपोषण व्हावे हाच उद्देश या कृतीत असतो.

अर्थात मारबत ही त्याच्या आदर स्थानी असते. तिला वंदन करीत तो खरंच ही विषमता नष्ट करायला सांगतो आहे. मग सांगा बरे! मारबत हे आजचे प्रातिनिधिक स्वरूप वाईट कसे? ज्याला आम्ही वंदन करून आपले दुखणे दूर करायला लावावे, तो आपला मानद व्यक्तीच असेल ना! मग मारबत रुपी राक्षसाला हिंस्त्र व वाईट ठरवणारे आपण कोण? अरे, यावरूनच राक्षस हाच आपला देव आहे. आपले त्याच्याशी नाते आहे. हा अर्थ यातून सूचित होतो. या परंपरेतूनच आपल्याला हे सारं काही कळून येते.

शेतकऱ्यांचा बैलपोळा अपूर्व असा मारबत सोहळा आणि आज बालकांचा तान्हा पोळा ही सारी काही रुपे पुढील शेतीव्यवस्था बळकट करण्यास व बळीराजाचं राज्य निर्माण होण्यास्तव संपन्न होत आहेत. नव्हे तर भावी पिढीला आपल्या कष्टाचे श्रमाचे मोल प्रदान करणारा असा हा अपूर्व सोहळा होय. या सोहळ्याला अगदी मनातून आपलंसं आपण करायला हवे. यातील प्रतिकात्मक अर्थ यानिमित्ताने जाणून घेत काही काव्यओळी बघूया....

बेंबीच्या आगीनं अंतकरण फोडतो टाहो

ढेकुल मोंगसा घेऊन म्हणे मारबत जावो….

काळाची अवदसा मनामनात भिजली

केव्हा पावसात भिजली, कधी उन्हात शिजली

पडले उघडे संसार, शोषित रचेत चिता

अशा नंग्याच्या दुनियेतील गाथा

खोल-खोल डोळे, गाल म्या चिंतातुर होऊन पाहो

ढेकुल मोंगसा घेऊन म्हणे मारबत जावो….

मातीत वळणारे बैल बा ढेकळे फोडीत मेला

बीज भरीत पोरं, सावकारीचा पोट आला

कर्जाचा काळा नाग, महागाईत पेटला शेला

माय पोराने झिजत घेतला ईशाचा रे प्याला

टांगत्या मुंडक्याच्या वरातीचा भाव म्या पाहो

ढेकुल मोंगसा घेऊन म्हणे मारबत जावो….

धर्मा कर्माच्या नावानं लूटले रे बापाला

चाबूक हातात घेऊन नागवले रे बापाला

अर्थ पैशाच्या चळवळीट झोपवले रे बापाला

घोषणांच्या भोंदूगिरी सपन दाखविले रे बापाला

शोषितांच्या या जगण्याला आता तरी बळ येवो

ढेकुल मोंगसा घेऊन म्हणे मारबत जावो….

निवडणुकीत नेतेगिरीची वरात नाचत असे

विकास करी भकास, तवा मतदार कापत दिसे

त्यांनी रचले इमले, बांधल्या उंच माड्या

अन् आमच्या झोपड्यात होते विझत दिवे

अशा ढोंगी पुढार्‍यांची चाटुगिरी करता काहो

ढेकुल मोंगसा घेऊन म्हणे मारबत जावो…..

संजय येरणे, नागभीड. जिल्हा चंद्रपूर ९४०४१२१०९८.