kod books and stories free download online pdf in Marathi

कोड - The Story of leukoderma  Girl….. 

कोड

The Story of leukoderma Girl…..

पहाटेलाच जाग आलेली, बेडवरून उठून डोळयावरून पाणी शिंपडलं, नैपकीनने हलकेच चेहरा पुसत असतांना पुनश्च तीचं लक्ष स्वतःच्या चेहऱ्याकडे गेलं. ती स्वतःचा चेहरा व हात निरखत राहिली. होय अगदी बालवयापासून तीला कोड झालेलं. ती अगदी खिन्न झाली, स्वतःच्या चेहऱ्याचीच तीला किळस येवू लागलेली. तीचं मन रडवेलं झालं. तीने अलगद टुथपेस्ट हातात घेत ब्रशला लावलं आणि तोंडात घालत ती दारातून बाहेर आली....

ती बराच वेळ विचार करीत ब्रश करीत होती. समोरची टेकडी, निसर्गरम्य परीसरातील झुळूक वारा आणि त्यातील मनमोहकता मनाला थोडीशी तरलता देवून गेलेली. या निसर्गानेच तीला आता कुठं जीवन जगण्याला नवा आयाम दिला होता.

कालच तिचा तीसावा वाढदिवस तीने घरीच एकटीत साजरा केला होता. आईबांबाच्या पुण्यस्मरणाचे फोटो खोलीत हाराने टांगलेले. ती अलगद त्यांच्याकडे बघतच राहिली. बाजूलाच ‘हॅपी बर्थ डे उर्मी’ असं तीने काल लावलेली चित्रपटटी. पुन्हा ती हिरमुसली. असं आपण किती दिवस एकटयाने काढायचे, मला का बरं हे लोक टाळतात. घरच्यांनीही टाळलं आणि या समाजानेही. खरंच कोड असणं हे शाप असेल काय?

ती इथे नुकतीच आलेली, हे घर तसं किरायाचं, अगदी कौलारू खेडयातील घर, घरमालक इथे राहात नव्हतेच बाजूची खोली तशी रिकामीच. ती इथे एकटीच राहायची.

हे छोटसं अंतापूर खेडेगाव, अगदी पाच पन्नास घराचं ते गाव, जिल्हास्थळापासून कोसो दूर असलेलं. आणि तीच्या स्वगावापासून दोनशे किमी दूर असलेलं. तीला पहिल्यांदाच इथे स्कूल टिचर चा जॉब मिळालेला. घरासमोर मोकळी जागा, वालकंपाउंड तारेचं कुंपन असल्यासारखं... बाजूलाच हिरवीगार शेती, समोरचं डांगरराई सारं काही निसर्गरम्य असं ठिकाण होतं.....इथं यायला अगदी थंड हवेच्या ठिकाणी सहलीला नागमोडी वळणाने जावं तसंच हे ठिकाण. तीला फार आवडलं होतं. पण एवढया लांबवर सुखसुविधा नसलेल्या ठिकाणी राहणं तसं फार कठीण काम होते.

या खेडयातूनच आसपासच्या चार दुर्गम गावात जाणारी कच्ची पायवाट, घरापासून अगदी शेजारीच तीची शाळा, शाळेत दहा-बारा विदयाथी, सोबतीला एक म्हातारे मुख्याध्यापक टिचर, समोरच एक छोटीसी जिल्हा बॅंक, एक दोन किराणा दुकान, चहापानाची टपरी संपलं. बाकी काही नाही.

इथे आल्यावर या खेडयातील लोकजीवन पाहून खरे तर ती रडली होती, पण पर्याय कुठला नोकरी तर करावीच लागणार होती. ती डी एड झाली नी तीला या अंतापूरात नोकरी लागलेली. तीच्या स्वगावी तरी असं काय होत?

आई बाबा अपघातात एकाच वेळेस गेले तेव्हा ती फार लहान असलेली, समजही तेवढी नव्हती. तिच्या काकाने काकूने तिचा सांभाळ केलेला. पण काकूचा स्वभाव असा फार छान नव्हता. तिला मुळीच पटायचं नाही. मात्र काका स्वभावानं फार छान होते. त्यांनी तीला शिकविलं. त्यांनाही तिच्या पेक्षा पाच वर्षे लहान एकच मुलगी होती. ती पहायला सुंदर होती. काकू तीचे लाड खूप करायची. मात्र उर्मी ही आपली मुलगी नाही व तीला बालपणात अचानक कोड आल्याने चेहरा व हातावर असलेले डाग बघुन तीला घृणा यायची. ती तीची हेळसांड करायची. अखेर उर्मीला चे पालण पोषण करणं म्हणजेच तीच्या वडीलांच्या शेती व पैस्याअडक्याचा प्रश्न होता बरंच काही त्यांना मिळालं होतं. व लोक काय म्हणतील या उददेशातूनच त्यांनी आधार दिला होता.

उर्मीचं लग्न होवून चांगल्या घरी पडावं असं तीच्या काकांना वाटायचं पण ती काकू त्यांच काही चालू देईना.... एक दोनदा पाहुणे बघायला आले, पण तीला मागणी तरी कोण घालणार.... तीचं कोड पाहूनच त्यांनी नकार दिलेला.... उर्मी फार नाराज व्हायची, तीला वाटायचं आता आपलं लग्न जुळणं अशक्य आहे. तीच्या काकूंना तर वाटायचं की हिला स्पर्श केल्याने कदाचित आपल्यालाही कोड होईल म्हणून ती तीचे कापडं, सामान भांडे तीच्या खोलीत वेगळे ठेवायची. उर्मीलाला ते ठावूक होतं. तीही दररोजच्या या किळसवाण्या प्रकाराला पाहून ती विटली होती. काकूची मुलगी मनिषाही तिचं राग करायची... तीलाही आपण रूपवान आहोत आपल्याला छान वर मिळेल असं वाटायचं, उर्मिलाचं लग्न काही जुळेना आणि मनिषाही लग्नवयाची झाल्याने मनिषाकरीताही वर शोधण्याचं कार्य सुरू होतं.

कॉलेजात जातांना तर लहान बहीण मनिषाला सोबत घ्यावसं तिला अनेकदा वाटायचं पण ती मनिषा लहान असूनही ‘मी नाही गं येत तुझ्याशी’ असं म्हणत तीच्याकडे वाकडया नजरेनं बयायची.

आज पाहूणे आले होते. शाळेत टिचर असलेला नात्यातील मुलगा मनिषाला बघायला आला होता.... काकूने उर्मीलाला घरात कोंबून ठेवल...

’उर्मिला पाहूणे येणार आहेत मनिषाला बघायला’

‘ होय काकू, मी सगळी कामे उरकते आणि तयारी करून देते,’

‘ नको, नको तू आपल्या खोलीत जा... पाहुण्यांना दिसू नकोस, त्यांना कळता कामा नये तुला कोड आहे म्हणून... समजलं ना.... नाहीतरी तुझं लग्न काही जुळत नाही पण कमीतकमी तिच्या लग्नाच्या तू आड येवू नकोस....’

ती हिरमुसली होती नि दाराची कडी लावून पुस्तक हाताशी घेत एकटीच रडत बसली.

दुपारला पाहूणे आले होते. वर छान होता. आई, बाबा आणि सोबत एक मध्यस्थी नातलग, मनिषा चहाचा ट्रे घेवून पाहुण्यांना चहा पोहे दिले, पाहुण्यांना काकानी बरीच तिच्या गुणांची माहिती दिली. वरांकडीलही माहिती विचारण्याचं सोपस्कार पार पडलं.... मुलगा नोकरीवर असल्यानं नकार देण्याचा प्रश्नच कुठे येणार होतं. मुलांलाही मुलगी पसंद आलेली... लवकरच कळवू म्हणून त्यांनी निरोप घेतला होता.

काका काकूंना तर ही पार्टी अगदी योग्य वाटलेली, त्यांच्या होकाराचीच वाट बघत राहिली, दुसऱ्या दिवशी मात्र मध्यस्थीचा फोन निरोप आलेला...

‘बघा तुमची मुलगी त्यांना पसंदही आली, पण त्यांना कुणीतरी सांगीतलं की तुमच्या कडे मोठी मुलगी आहे तिचं लग्नही जुळत नाही आहे, आणि तीला कोड आहे, आपण ती माहिती लपविली त्यांचा त्यांना रागही आला, त्यांनी यामुळेच नकार दिला....’

काका काकुचा पारा भडकला होता... उर्मीला कॉलेजातून येताच काकूने तिच्याशी भांडण उकरून काढले होते,

‘अगं कैदासिन, तुझ्यामुळं माझ्याही मुलीचा सत्यानाश होतो आहे... या घरातून निघून तरी का नाही जात? अगं इतके दिवस आम्ही तुला सांभाळलं हे काय कमी झालं? कोण कुणाचं करतं. तरीपण तुझ्यामुळं आमच्या कुटूंबात असं अघटीत घडत असेल तर...’

‘अगं तू चूप बस.... तीचा काय दोष त्यात बालपणी तीचे वडील आई गेले, आणि आता तीला हा आजार यात तिचा काय दोष... तिच्या दुःखाला सांभाळण्यापेक्षा तू स्वतःच्या सुखसमाधानाचा विचार करतेस. अगं आपल्याला शोभेल काय? जे काही आज बरंचसं चांगले दिवस बघायला मिळाले ते तिच्या वडीलांच्या पैशामुळेच ना... नाहीतर आपण आज काय असतो याचा साधा तरी विचार केलास का?’

उर्मीलाचे काकानी तीची बाजू घेतली आणि उर्मिला रडतच आत खोलीत पळाली होती. पुन्हा तीला या घरात अपमानाचा स्वतःच्याच काकूकडून सामना करावा लागला होता. तीला आता इथलं जीवन नकोसं झालं होतं. वाटायचं आता आपण डीएड केलं लवकरच आपल्याला नोकरी मिळेल आणि आपण निघून जावू.... ते कायमचंच पुन्हा ना कधी या घराचं तोंड पाहायचं की या आपल्या वडीलांच्या शेतीवाडी ला विचारायचं. ते सारं काही त्यांनाचा लखलाभ करायचं. तीचं मन तीला समजावत होतं आणि ती डोळे पुसतच परत आरश्यासमोर उभी राहली होती....

तिला आज तिचं जीवन आठवत राहिलं होतं. ती येथं आल्यापासून ना काकांचा फोन की साधा लहान बहीणीचा निरोप, पत्र काहीच नाही. नाहीतरी घरची मंडळी आपल्याला टाळतच होती... त्यांनाही फार बरं वाटत असेल... मी त्या घरातून मुक्त झाल्याचं असं तीच्या मनाला वाटून गेल.

शाळेची घंटा वाजायला थोडा अवधी होता. तीने एकटीचे घरातले काम उरकले. स्वतःचा स्वयंपाक केला, आंघोळ आटोपत ती शाळेला जाण्यास तयार झाली होती.

अगदी ही छोटीशी शाळा, त्यामुळं दिवसभर इथे शिकवणं असं फारसं नव्हतंच, म्हातारे मुख्याध्यापक अधामधात तर मिटींग ऑफीस कामे यात गुंतले असले की ती बरेचदा शाळेत एकटी असायची. आजही ते नव्हतेच.

शाळेची बेल झाली, प्रार्थना सुरू झाली, एवढयात एक मुलगी रडत आलेली, तीच्या आईने तीला आणून दिलेलं...

‘काय गं रेशमा का बरं रडतेस... ये मी तुला चैकलेट देते....’ म्हणत उर्मीलाने तीला हात लावत जवळ केल. एवढयातच तीच्या आईचं लक्ष तीच्या चेहऱ्याकडे व हाताकडे गेलं... ती धावतच मुलीला आपल्याकडे ओढून घेतलं.

‘ओ मॅडम बाई, माझ्या मुलीला अंगाला हात लावू नका, आवं तुम्हाला तं कोड हाय, आमच्याबी लेकरांना होईल ना, आवं असं कसं तुम्हाला नोकरीला ठेवलं येथं.... बया बया बया....’

उर्मीला तिच्या बोलण्यानं अगदी हिरमुसली होती तिचं डोकं सुन्न शांत झालं होतं आणि सारे मुलं मॅडम व तिच्या आईकडे पाहू लागली होती..... ती बाई आपल्या मुलीला घेवून म्हणाली....‘म्या काय म्हणते आपलं दुरूनच शिकवित जा आहे तोवर... म्या यांना सांगून तुमची बदली करावालेच लावते बघा.’

ती जावू लागली.... उर्मीला तिच्या पाठमोरी आकृतीकडे बघतच राहिली मुलं वर्गात बसायला पळाली होती. चिमुकल्या मुलांना तरी रेशमाच्या आईच्या बोलण्याचा अर्थ कुठं उमगला होता...

आज तिचा दिवस अगदी मनातून खराब गेला होता. ती कशीबशी एकटी असल्याने शाळेत राहिली होती. घरी जाताच ती पुन्हा ओक्साबोक्शी रडू लागली. शाळेत आज पहिल्यांदाच असं घडलं होतं...... तीच्या मनात आता नाना प्रकारचे विचार येवू लागले होते...वाटलं हे जीवनच संपवलं तर....मात्र तीला यावर मात करायची होती.

तिला रूप आहे पण सौंदर्य नाही एवढच कारण पुरेसं होतं. समाजात मानवाच्या मनापेक्षा रूपाला महत्व देणारी ही लोक बघून घृणा यायची. स्वतःचं दुःख पुरायला कुणीतरी संगत साथ देणारा असावा. आजाराच्या या निराळया तर्हेचं काही उपाय कायमचं शोधावं लागेल... पण असं उपाय कुठं सापडेल काय? मागे चार-दोन डॉक्टरकडे मी सहज काकासोबत गेली होती. पण चार दोन महिण्याच्या औषधानेही काही एक असा बदल घडला नव्हता. हा आजार संसर्गजन्य नाही असे अनेकदा म्हणतात, आनुवंशिकतेचा विचार केला तर ते ही घराण्यात कधी कुणाला झाल्याचे ऐकिवात नव्हते... मग मीच अशी दळभद्री का?

तीचं मन नाना तर्हेचं विचार करीत राहिलं. आज ती शाळेतून आल्यापासून काहीही न खाता तशीच या विराण एकटया वाडयात पडून राहिली होती. तीला कशावरही मन लागत नव्हतं..... तीला कशाचेही भान उरले नव्हते.... झोपेत कशी गाढ विलीन झाली ते दुःखद मनालाही कळले नाही.

आज सुटटी असल्यानं तीनं सकाळीच चहा करीत सर्व तयारी करीत पर्स हातात घेत बाहेर निघाली होती.... एवढया निसर्गमय वातावरणातही तिचं मन कलुशित वाटत होतं. चैकातील वळणावर वाट बघत अखेर लवकरच आलेल्या बस वर बसून निघून गेली तेव्हाही आणि बसमध्येही अनेकांच्या नजरा तिच्या चेहऱ्याकउे घृणात्मक नजरेने कशा बघतात याची जाणिव झाली होती.

बसमधून ती बाहेर चं जग पाहू लागली... एवढयात काही शाळेला जाणाऱ्या कॉलेजच्या मुली तीला दिसल्या आणि ती बसच्या प्रवासात आपलं कॉलेजचं पुर्वीचं जीवन आठवू लागली...

होय तीला कॉलेजमध्येही कुणी मित्र तर मिळालाच नाही. एखादया मुलाने जर का कधी ढुंकूण तिच्याकडे पाहिलं असेल तर.... पण मैत्रिणी तरी... पुरत्या दुरून आणि लांबवरून निमित्य मात्र बोलणाऱ्या होत्या. ती कॉलेजात आज उशिरा आली होती तेव्हा ती अचानक तास चालू असतांना एका बेंचवर जागा असल्याने आपल्या आवडत्या मैत्रिणीच्या शेजारी बसली.... मात्र तीने तर तास डिसटर्ब करीत तिला सरळ म्हटलं....

‘अगं अशी कशी गं तू.... तुला समजत नाही का ? चल जा मागच्या बाकावर बस.... नाहीतर तुझ्यामुळे आम्हालाही तुझ्यासारखं व्हावं लागेल....’ सर तिच्या वाक्याकडे बघतच राहिले. अगदी जातीभेदाच्या भिंतीपेक्षाही संसर्गजन्य आजाराच्या भितीने या समाजातील मनाच्या आजाराच्या भिंती खूप भेदक व जिवघेण्या आहेत याची तिला कल्पना आली.... ती सरळ उठली आणि लायब्ररीत जात एका पुस्तकाच्या कवेत ओक्साबोक्शी रडत राहिली....

बाजूलाच एका सायंस्टीस्टचे चित्र तिला दिसले होते ते न्याहाळतच राहिली..... आणि एका बाजूला बाबासाहेब ........

बस च्या हॉर्नने ती भानावर आली होती.... गाडी बरीच पुढे आली होती. वळण घेताच बस थांबली आणी ती उतरायला तयार झाली.... एवढयात बसमधील एक स्त्री तीला स्पर्श होईल म्हणून काळजी घेत उतरत होती आणि अचानक तिचा थोडा स्पर्श त्या महिलेला होताच ती म्हणाली ‘ थोडं दुरून चला नाही तर बाजूला थांबा ताई अशा परिस्थितीत आपण स्वतःच काळजी घ्या... नाहीतर’

तिचं वाक्य अर्धवट राहिलं होतं.... तिला काय म्हणायचं आहे ते सारं काही समजली होती..... तिच्या डोळयातून अश्रू अलगद उतरले रूमालाचा आधार घेत ती बसमधून उतरली आणि झपाझप पावले टाकीत ती समोर जात राहिली....

‘हॉस्पीटल.... ल्युकोडर्मा.....स्पेशालिस्ट’ ती कस्टमर केअर ला नोंदणी करीत बराच वेळ खुर्चीत बसून राहिली. चार दोन पेशंट येत जात होते.... ती अनेकांच्या चेहऱ्याकडे आणि त्यांच्या शरीराकडे केवीलवाण्या नजरेने बघत राहिली.... तिला तिच्यासारखं पेशंट दिसला.... तिला थोडं बरं वाटलं. आपणच नाही तर अनेक पेशंट याप्रकारचे आहेत यामुळे तिला दिलासा मिळाला...तीला आत प्रवेश मिळाला डॉक्टर्स जवळ जातांचा तिने जुन्या फाईल पिशवितून काढून दाखवल्या, तिला तीच्या आजाराची हिस्ट्री विचारल्या जावू लागली.... उर्मीला तशी अगदी खिन्न मनाने बसली असली तरी काही समाधान मिळेल काय? या आजाराचा कायम उपचार असेल काय? मी कायम बरी होईन काय? असे अनेक प्रश्न मनात घोळवत तिथे बसली होती.

‘हं तर मी तुम्हाला काही प्रतिबंधात्मक उपाय व्हावेत म्हणून औषध देते ते तुम्ही नियीमत घ्या.... ’ डॉक्टरर्सने फाईल बघत म्हटले होते...

‘डॉक्टर्स, काहीच का नाही उपाय यावर.... मी या शापातून नाही का होणार मुक्त?’

‘बघा तसं काही नाहीए.... हे शाप वैगेरे असे काही बोलू नका.... हो, मेलॅनिन पेशी नष्ठ झाल्यामुळे होणारा आजार आहे, याला अनेक कारणं असतात, मी हे पुस्तक देते आपण ते घरी निट वाचा... मग सारं काही समजेल तुम्हास... ओके...’

‘डॉक्टर्स’

‘आणखी काही विचारायचं आहे का तुम्हाला’

‘हो,,’

‘विचारा’

‘हा आजार संसर्गजन्य नाही ना.... मग ही घरची मंडळी, समाजातील मंडळी माझा स्पर्शही होवू नये म्हणून....’

‘खरं सांगू तुम्हाला.... तो त्या व्यक्तींच्या मनाला झालेला आजार आहे..... आपण कितीही प्रबोधन केलं वा विज्ञानाचं संशोधन जरी मांडलं ना त्यांच्या पुढयात तरीपण ते रूढी परंपरा अंधश्रद्धेला कधी सोडणार नाहीत.... याला आपण तरी काय करू शकतो.... आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करावं.... होईल नक्कीच बदल होईल..... तुम्हाला सांगू काय? माझ्या आईला पण हाच आजार होता... ती आज नाहीए....तेव्हापासून मीच मनातून ठरवलं.... आपण डॉटर्स व्हायचं ल्युकोडर्मा स्पेशालिस्ट......’

‘इटस् ओके, बरे या आपण...’

तिच्या मनाचं समाधान झालं होतं ती उठून हॉस्पीटलच्या बाहेर पडली...

आज ती अगदी शिकविण्यात धुंद होती अगदी त्याचवेळेस शाळेत एक तरूण मुलगा प्रतिक आत आला होता.

‘मॅडम, एक्सक्युज मी.... आपणाशी काम होतं.’ ती आश्चर्यचकीत झाली होती आपण यांना पहिल्यांदाच इथे बघतो आहोत, अगदी हॅन्डसम तरूण आणि तिच्याशी पहिल्यांदाच जिव्हाळयानं बोलणारा.... ती बाहेर आली

‘हं बोला! काय म्हणालात आपण....’

त्याने तीच्या चेहऱ्याकडे बघीतलं पण त्याला तीची करूणा आली असावी....

‘मॅम, मला आपल्या रूमच्या बाजूची रूम किरायाने हवी होती..... मी प्रतिक, मी आजच या डिस्ट्रीक बॅंकेत बदलीने रूजू झालोय, तिथे चैकशी केली तर मॅनेजर म्हणाले, इथे फक्त एक रूम मिळेल.... तुमच्याकडे, घरमालक बाहेर असल्याने त्यांनी तुम्हालाच चाव्या दिल्यात असे सांगीतले...’

‘होय, या बसा ना.... दाखवते मी तुम्हाला जर का पसंद आली तर बघा.’

ते थोडा वेळ तीथं बसले, मॅडम मुख्याध्यापकांना घरून येते म्हणून सांगीत मुलांना अभ्यास करायला सांगत त्यांच्याकडे आल्या.... ‘चला, जावूया...’ ते दोघेही बोलत बोलत घराकडे गेली होती.

प्रतिकला रूम पसंद आलेली, त्याने त्या रूमवर राहायचा निर्णय घेतला तोही बदलीने लांबवरून या गावात आला होता, त्याचं वयही तिच्या वयाच्याच आसपास होतं... दोघेही एकमेकांच्या शेजारी राहू लागले होते...

सायंकाळी ती शाळेतून येताच प्रतिक हातात पिशवी धरून मार्केटला जायला निघाले, उर्मिलाने सहज त्यांना

‘म्हटलं कुठं चाललात?’

‘रूमवर राहायचं तर काही किराणा आणि सामान घेवून यावं करीता निघालो ’

‘बरे या... पण आजचं स्वयंपाक मीच बनविते हं... इथे तुम्हाला हॉटेलवैगेरे काहीही मिळणार नाही....’

‘ बरं ! ठिक आहे’ तो तिच्याकडे बघत स्मीत हसला. पहिल्यांदाच असं तीच्याशी गोड हसणारा मुलगा व आत्मियतेने बोलणारा मुलगा बघून तीच्या मनाला फार बरे वाटले होते.... बऱ्याच दिवसांनी ती एखादया बागेतील कळीगत उमलली होती तेवढेच तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. ति अलगद आत येत आज पुन्हा आपल्या चेहऱ्याला आरशात न्याहाळू लागली होती.

उर्मिलाचं आज मन खुश होतं. तीला कुणीतरी मायेने बोलणारा एक व्यक्ती मिळाला होता... छान कळी, भजी, लोणचं, पापड असं बेत करीत जेवण तयार केलं होतं. लगेच तीने प्रतिकला आवाज देत जेवायला बोलावविलं होतं. प्रतिक करीता तिने ताट वाढले...

‘चला जेवण आटोपून घ्या, खूप लांबवरचा प्रवास नि ऑफीस करून थकले असाल.’

‘आणि तुम्ही..’.

‘तुमच्या नंतर करेन’

‘असं कसं... या सोबतच घेवू या जेवण.... तुम्हाला हरकत नसेल तर....’

ती लाजली होती, अगदी आपल्याला कोड असूनही हे आपल्याला समजून घेताहेत याने ती अगदी आनंदली... ती लगेच सोबत जेवायला बसली... दोघांच्याही गप्पा सुरू होत्या जेवण झाले..... रात्रो आज आभाळ चांदण्याच्या प्रकाशानं फुलंल होत आणि चंद्राचे पूर्ण सतेज रूप अंगणात मंद तेज बहरवित होते..... उर्मिला या फुलण्यानं शहारली होती. रात्रोचे काम आटोपून ती केव्हा निद्रीस्त झाली ते तिलाही कळले नाही...

चार महिने उलटले होते. प्रतिक आणि उर्मिला शेजारीच राहायचे, दोघांची चांगली मैत्री झाली होती.... उर्मिलाच्या कपाटात खूप सारे पुस्तकं होती तिला इथे एकांत असतांना वाचनाचा फार छंद जडला होता... प्रतिकही एकांताला टाळण्यासाठी बरीचशी वाचनाची पुस्तके वाचायला उर्मिलाकडून मागून नेवू लागला होता....

त्याला तिच्या लायब्ररीमध्ये ल्युकोडर्मा नावाचं पुस्तक मिळालं.... त्याने ते अलगद घेतलं

‘मी घेवू का हे वाचायला....’

‘घ्या ना... पण या पुस्तकातून तुमची काय करमणूक होणार... ते माझ्या या आजारासंबंधीचं पुस्तक आहे.... मागे डॉक्टरर्सनी दिलं होतं मला....’

‘एक विचारू का... केव्हापासनं तुम्ही यापासून ग्रासले आहात...’

‘अगदी बालपणापासून निटसं नाही आठवत मला, आणि आई-बाबा ही गेले तेपण नाही आठवत मला फार छोटी होते मी....’

तिच्या डोळयात पाणी आले होते, रूमालाने ते टिपले.

‘स्वॉरी हं... तुम्हाला दुःख होणार असेल तर ....सहजच मनात आल म्हणून विचारलं...’

प्रतिक आपल्या खोलीत पुस्तक घेवून निघून गेला होता ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिली...

उर्मिलाला प्रतिकविषयी फार जिव्हाळा वाटायचा तो तिला अगदी मनातून समजून घेतो आहे. कुठलीही हेहसांउ न करता, भेदभाव न करता तो तिला अगदी मनातून समजून घेतो आहे हे बघून तीला त्याविषयी आत्मियता वाटू लागली....

‘प्रतिक, खरंच करेल का आपला स्वीकार,’

पण आपण तो आपल्याशी छान बोलतो म्हणून का त्याला कसं काय विचारावं, कदाचित तोही आपल्याला स्वीकार करण्यास्तव घेईल का पुढाकार... त्यांनी पुढाकार घेतला तरच..... आज सहा महिने झालेत आपल्याशी तो अगदी आपुलकीने वागतो, मग याचा अर्थ प्रेम नाही तर काय म्हणावे.... असो, आपण तरी त्याला का म्हणून आपल्या प्रेमाचा स्वीकार करायला लावायचा... कुणी आपल्या मनाला समजून घेतलं म्हणून का जीवनभर संगत करण्याचा त्यांनी पर्याय शोधावं.... मला स्वीकारून कदाचित त्याला आयुष्यभर त्रास तर नाही ना होणार..... तीचं मन अंतरंगातून त्याचा विचार करू लागले होते.

शाळेत असतांना तिच्या काकांचा अचानक फोन आला होता, तीलाही आश्चर्य वाटलं होतं... काकानी ती येथे आल्यापासून चारदाच फोन केलं होतं.... काकू आणि तिची बहीण मात्र तिच्याशी कधीही बोलली नव्हती. याचं तीला दुःख व्हायचं... प्रत्येक वेळी मात्र तुला मुलगा शोधतो आहे, मुलगा बघीतला यासंदर्भीच त्यांचं बोलणं असायचं... मात्र ते एकदाही इकडे भेटायला आले नव्हते. आणि मला असा आजार असल्यानं कुठलाही साधासा मुलगाही माझ्याशी लग्न करायला तयार होत नव्हता...

‘हॅलो, काका’

‘उर्मिला, मागे दोनतीनदा तुझ्यासाठी काही स्थळ बघीतले, पण निराशाच झाली, पण आता एक स्थळ बघीतलंय, ते तुझ्याकडे डायरेक्ट येणार आहेत, बघ तुला योग्य वाटेल तर....’

‘मला काय योग्य वाटायचं राहिलं काका, त्यांना मी योग्य वाटायला हवं की नाही’

‘हो तुझं म्हणंण खरं आहे... तुझ्या भावना मी समजू शकतो पोरी, पण मी तरी काय करणार, उर्मिला मीही हताश आहे, तो मुलगा येणार आहे तो दुजवर आहे, त्याला दोन मुली आहेत, पत्नी अपघातात गेलीय.... कदाचित आता याशिवाय....’

उर्मिलाला सारं काही समजलं होतं. तिच्याकरीता आता दुजवर वराचा शोध सुरू आहे. तिलाही आता पर्याय उरला नव्हता.... ती फोन बंद करून बराच वेळ विचार करू लागली होती आणि मुले अभ्यासात मग्न झाली होती.

आज तिच्याकडे पाहूणे येणार होते या बेताने तिने घर स्वच्छ करून निटनिटके केले होते. आणि शाळेतून कुणीतरी सोबत असावं म्हणून मुख्याध्यापकांनाही बोलावून घेतलं होतं

वयाने चाळीस पंचेचाळीशीत असलेला युवक, अगदी लठठ, एका सोबतीच्या म्हाताऱ्या माणसांसह आले होते. मुख्याध्यापकाने त्यांना आत येतांना स्वागत केलं.... उर्मिलाला आवाज देत चहा, नाश्ता आणायला लावलं.... पाहुण्यांनी सारी काही माहिती विचारली. त्यांना माहिती देण्यात आली मात्र तीला कोड असल्याचं त्यांनाही ठावूक होतं तरी पण वरांच्या मनावर असा काही आनंद दिसत नव्हता... त्यांनी निरोप घेतांना तुमच्या काकांना कळवू असे म्हणून ते निघून गेले होते.

उर्मिला फार विचार करू लागली होती.... दुजवर आहे म्हणून काय झालं त्यांच्या मुलींचा स्वीकार करीत आपण त्यांना होकारच देणार आहोत, कारण आपल्याला काकांचाही मान ठेवावाच लागेल ना....पण त्यांनी तरी आपल्याला होकार दयायला हवा की नाही....

आपल्याला पाहूणे बघायला आले हे प्रतिकलाही कळले होते....पण त्यावर त्यांची काही एक प्रतिक्रीया झाली नाही... मात्र प्रतिक आज अगदी शांत वाटला होता....त्यांच्या मनात काय होतं कोण जाणे... पण कित्येक दिवसापासून तो गावला न गेल्याने आज अचानक काही एक न सांगता तो निघुन गेलेला.

उर्मीला एकांतात विचार करीत होती, ती वारंवार आपल्या मनातील उधाणाला थोपवण्याचा प्रयत्न करीत राहिली, तीने आजतागायत तर आपल्या मनातील भावनांचे उधाण अनेकदा थोपविलेच होते.... या समाजातील प्रत्येक मानवाच्या मनात ल्युकोडर्माविषयी असलेली घृणता म्हणजेच एक आजार होय, कमीतकमी तो आजार आपल्याला मिळणाऱ्या जीवनसाथीला तरी नसावा.... खरेच स्वीकारेल काय आपल्याला.... काकांनी सांगीतलेला दुजवर मुलगा तरी.... की अचानक एकांतात मग्न झालेला प्रतिक तरी.....

काकांचा फोन आला होता... ती अत्यंत उत्सुक झाली होती,

‘काय म्हणालेत ते?’

पलीकडच्या बोलण्याची वाट न बघताच ती घाईत म्हणाली होती..... तिचा चेहरा निस्तेज झाला.... पलीकडील आवाज दबका येत होता.... तीच्या हातातून फोन बाजूला हळूच ठेवल्या गेले होतं आणि ती आरशाकडे एकटक बघू लागली होती.... परत आज तिची निराशा झालेली..असं कितीदातरी झालं होतं.... पुन्हा बेडच्या उशीत मान घालुन ती अक्षरशः ओक्साबोक्सी रडतच राहिली.......

आठ दिवस झाले होते..... शाळेतून परतल्यावर प्रतिकही आज गावावरून परत आल्याचे दिसले. तोही बॅकेतून डयूटी आटोपून घरी परतला होता.... आपल्या खोलीत उर्मिलाकडे न बघताच गेला... त्याचं मन उदास होतं.... उर्मिलाला वाटलं काहीतरी बोलावं, जावं त्याकडे, पण तीनेच आपलं मन आवरलं..... लगेच प्रतिक उर्मिलाच्या दारात परतला. आणि त्यांने तीचं ल्यकोडर्मा पुस्तक अलगद टेबलवर ठेवत परत जावू लागला... उर्मिला आत असलेली लगबगीने बाहेरच्या खोलीत आली. कंठातून तीच्या ‘प्रतिक’ म्हणून आवाज निघणार तोच प्रतिक गेटच्या बाहेर जातांना दिसला. ती घाईने त्याच्याकडे ते पुस्तक घेवून दारापर्यत आलेली, आणि तो निसर्गरम्य टेकडीच्या परीसराकडे वाटेवर हातात बॅग घेवून एकटाच जात होता... उर्मिला त्यांच्याकडे बघतच राहिली तो डोळयासमोर ओझर होईपावेतो......

लेखक

संजय व्हि येरणे,

नागभीड जि. चंद्रपूर

9404121098


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED