पाठलाग (भाग – १९) Aniket Samudra द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पाठलाग (भाग – १९)

बंगल्याच्याच आवारातील एक १५ x २० ची खोली दिपकला रहायला मिळाली होती. आठवड्याभरामध्येच दिपक ‘माया मॅडम’च्या स्केड्युलशी समरस होऊन गेला.

सकाळी ५.३० ते ६.३० ह्या वेळात बंगल्याच्याच क्लबहाऊसमध्ये मेडीटेशन चालु असायचे त्या वेळेत दिपक आंघोळ करुन तयार व्हायचा.

६.४५ ला सोलॅरीस क्लबवर टेनीस आणि जिम
८ वाजता बंगल्यावर परत.
८-९ बंगल्यातील स्विमींग पुलमध्ये स्विमींग
१० वाजता ऑफीस

सकाळी ऑफीसला निघतानाच बंगल्यातील सेक्रेटरी मायाच्या दिवसभरातील बाहेरील मिटींग्सची प्रिंटआऊट दिपकला देत असे. त्यात वेळ, ठिकाण, मॅप आणि फोन नंबर दिलेला असे. ठरल्यावेळी दिपक ऑफीसच्या गेटपाशी गाडी घेऊन थांबे.

संध्याकाळी ८ वाजता बंगल्यावर परत
९ वाजता आधीच ठरलेल्या कुठल्याश्या हॉटेल्समध्ये पार्टीज, अन-ऑफीशीअल मिटींग्स
रात्री १२ पर्यंत बंगल्यावर परत

सगळं कसं अगदी आखीव-रेखीव, इकडची गोष्ट तिकडं नाही, कधीही कश्यातही अचानक बदल नाहीत. यांत्रीक…

दिवसाचे १२ तासांपैकी दिपक ६-७ तास तरी किमान माया बरोबरच असायचा. पण दोघांमध्ये कधीच कसलाच संवाद नसे. गाडीत असताना बहुतांश वेळी माया फोनवरच असे. दिपक तिचं बोलणं कान देऊन ऐके. तिची लोकांना सुचना देण्याची पध्दत.. क्लायंट्सशी बोलतानाचा टिपीकल टोन, कामात चुका करणार्‍यांची खरडपट्टी.. क्वचीत अचानक उद्भवलेल्या अडचणींवर तिने शिताफीने काढलेले तोडगे.. सगळं दिपक ऐकत असे. बर्‍याच वेळा त्याला तिचा अभिमानच वाटे.

एके दिवशी लेट नाईट पार्टी आटपुन दोघं जण परतत होते. चंद्राचे स्वच्छ चांदणं पडलं होतं. पार्टीच ठिकाण तसं जरा आडबाजुलाच होतं. त्यामुळे परतताना रस्ता अगदी सामसुम होता. दोन्ही बाजुला दाट झाडी होती. दिपक व्हाईट रंगाची जॅग्वार १३० च्या वेगाने पळवत होता. अचानक डावीकडच्या झाडीतुन काहीतरी पळत रस्त्याच्या मध्ये आलं. गाडीच्या झिनॉन दिव्यांचा पांढराशुभ्र प्रकाशात समोर कोण आहे समजेपर्यंत गाडीची जोरदार धडक बसली होती.

दिपकने करकचुन ब्रेक्स दाबले. गाडीचे ‘एबीएस’ क्षणार्धात अ‍ॅक्टीव्हेट झाले आणि गाडी क्षणार्धात जागेवर उभी राहीली.

‘व्हॉट हॅपन्ड?”, मायाने विचारले…

दिपक आणि माया दोघंही गाडीतुन खाली उतरले. रस्त्याच्या मधोमध एक कुत्र्यासारखा दिसणारा पण काहीसा आकाराने मोठा प्राणी मरुन पडला होता. दिपक आणि माया दोघही तेथे जाऊन उभे राहीले. मध्ये एक मोठ्ठा लांडगा मरुन पडला होता. तोंडाला गाडीची धडक बसली होती आणि जबडा जवळ जवळ तुटुन निघाला होता. वाकडं झालेल्या तोंडातुन रक्ताची धार वहात होती.

‘ओह माय गॉड’.. त्या अजस्त्र देहाकडे बघत माया म्हणाली.
‘मॅडम तुम्ही गाडीत बसा.. मी हे.. जरा कडेला टाकुन देतो नाहीतर एखादा गाडीवाला अचानक ब्रेक मारायचा आणि अपघात व्हायचा…’, दिपक

माया माघारी वळणार तोच मागुन गुरगुरण्याचा आवाज आला.

दिपक आणि माया दोघंही सावकाश वळले. दोघांपासुन काही पावलांवरच अजुन एक लांडगा उभा होता. त्याचे हिंस्त्र डोळे दिव्याच्या प्रकाशात लुकलुकत होते.

माया गाडीकडे पळायचा प्रयत्न करणार हे लक्षात येताच दिपक म्हणाला.. ‘डोन्ट मुव्ह.. यु वोंट बी एबल टु रिच टु द कार, हि विल कॅच यु..’
‘गाडीत पर्स मध्ये रिव्हॉल्व्हर आहे…’ माया

पण दिपकच मायाच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. त्याची नजर अजुनही लांडग्याच्या नजरेला भिडलेली होती, पण तो हळु हळु खाली वाकत होता.

त्या लांडग्याचेही दिपकच्या हालचालीवर लक्ष होते. दिपकला खाली वाकताना पाहुन त्याच्या गुरगुरण्याचा आवाज वाढत होता. आपलं तोंड फेंदारुन त्याने आपले अणुकुचीदार दात बाहेर काढले होते.

दिपकने आपल्या उजव्या पायाची पॅन्ट हळुवार वर केली आणि मोज्यामध्ये लपवलेला एक मिलीटरी नाईफ बाहेर काढला.

मायाकडे कामाला लागल्यावर सुरुवातीला खर्चासाठी जे काही थोडेफार पैसे त्याला मिळाले होते त्यातुन त्याने पहील्यांदा हा मिलीटरी नाईफ खरेदी केला होता. चंद्राच्या प्रकाशात त्याच धारदार पात चकाकलं तसं त्या लांडग्याने दिपकडे धाव घेतली.

माया ‘आ’ वासुन जमीनीवरच खिळुन होती.

दिपकने तिला पटकन बाजुला ढकलले आणि गुडघ्यावर खाली वाकुन अंगावर झेपावलेल्या लांडग्यावर त्याने सपकन वार केला.

मागे बघायचीही गरज नव्हती.

लांडगा काही पावलं पुढे गेला आणि खाली कोसळला. फाटलेल्या पोटातुन त्याची आतडी लोंबत होती.

माया अजुनही विस्फारलेल्या डोळ्यांनी दिपककडे आणि रस्त्यात मरुन पडलेल्या त्या दोन लांडग्यांकडे बघत होती.

दिपकने ते दोन्ही लांडगे ओढत रस्त्याच्या कडेला न्हेऊन टाकले. मग गाडीतुन पाण्याची बाटली काढली आणि रक्ताळलेला तो सुरा निट धुऊन परत मोज्यामध्ये ठेउन दिला. मग गाडीच्या ग्लोव्हज कंपार्टमेंटमधुन व्हिस्कीची एक बॉट्ल काढुन त्याने दोन पेग बनवले. एक त्याने मायाला दिला आणि दुसरा एका घोटात पिऊन टाकला.

माया अजुनही थोडीशी भेदरलेलीच होती. पण मग तिनेही टॉप-टू-बॉटम पेग संपवला.

दिपक गाडीत जाऊन बसला. त्याने गाडी सुरु केली आणि वळवुन परत रस्त्यावर सरळ घेतली. माया जेंव्हा नेहमीप्रमाणे मागच्या सिटवर न बसता, पुढे, ड्रायव्हरच्या शेजारच्या सिटवर येऊन बसली तेंव्हा त्याला आश्चर्यच वाटले. पण काही न बोलता त्याने गाडी गेअरमध्ये टाकली.

थोडे अंतर गेल्यावर माया म्हणाली, “हु आर यु?”

दिपकने एकवार तिच्याकडे पाहीले आणि तो म्हणाला, “दिपक.. दिपक कपुर..”
“अं हं.. नॉट दॅट.. ज्या शिताफीने तु त्या लांडग्याला मारलेस.. तु ड्रायव्हर तर नक्कीच असु शकत नाहीस. टेल मी युअर पास्ट….”

दिपकने काही क्षण विचार केला.

“डोन्ट वरी, यु कॅन ट्रस्ट मी… तु इथे तुझ्या मोटरबोटने आलास.. तुला गोळी लागली होती.. माहीती आहे मला. ह्या गावात माझ्यापासुन काही लपुन रहात नाही.. सो टेल मी..”

“मॅडम.. फार मोठी गोष्ट आहे.. आपण उद्या बोलु.. उशीर झाला आहे..”, दिपक आढेवेढे घेत म्हणाला
“इट्स ओके, आय डोन्ट माईंड, मी उद्याच्या मिटींग्स शिफ्ट करु शकते, बट आय मस्ट नो.. हु आर यु???”, माया

दिपकने नेहमीचा रस्ता सोडुन गाडी आडमार्गाने एका वळणावर वळवली. गाडी बर्‍याच वेळ खाचखळग्यातुन, खराब रस्त्याने चढावर जात होती. आजुबाजुला बर्‍यापैकी दाट झाडी होती. झाडांच्या फांद्या गाडीच्या काचांवर आपटत होत्या.

काही मिनीटांनी गाडी एका पठारावर येउन थांबली. थोड्याच अंतरावर दिपस्तंभ प्रकाशाचा झोत काळ्याकुट्ट अंधारात बुडालेल्या समुद्रावर फेकत होता. दुरवर गावातील रस्त्यावरचे दिवे लुकलुकत होते. समुद्राच्या लाटांचा धिरगंभीर आवाज येत होता.

दिपक गाडीतुन खाली उतरला. पाठोपाठ माया सुध्दा उतरली.

दिपकने गाडीच्या ग्लोव्हज बॉक्स मधुन स्कॉचची एक बॉटल काढली आणि त्याचे दोन पेग बनवले.

स्कॉचचा जळजळता घोट घश्याखाली उतरल्यावर तो काहीसा कंफर्टेबल झाला आणि मग जेनी पासुन त्याने आपली हकीकत सांगायला सुरुवात केली..


त्याचवेळी दुरवर मुंबईतील आडवस्तीतील एका जुनाट इमारतीमध्ये पत्याचा डाव रंगला होता. सिगारेटच्या धुराने खोली पुर्ण भरुन गेली होती. धुराच्या त्या उग्र वासातच दारुचा कडवट वास पसरला होता. उंची मद्यापासुन ते देशीदारुपर्यंत सर्व प्रकारची मदीरा तेथे वाहत होती.

इमारतीपर्यंत पोहोचणार्‍या एका चिंचोळ्या रस्त्यावरुन सफेद रंगाची एक ऑडी येत होती. एखाद्या तिसर्‍या नविन माणसाला त्या जुनाट, गरीबीने गांजलेल्या भागात ऑडी पाहुन डोळे विस्फारले असते. पण तेथील जाणकारांना मात्र ती गाडी आणि त्या गाडीत बसलेली व्यक्ती पुर्णपणे माहीती होती.

गाडी इमारतीपाशी थांबताच सुस्तावलेली इमारत खाड्कन जागी झाली..

भाई आले…

सर्वत्र एकच कुजबुज. लोकांनी हातातील पत्ते, दारुचे ग्लास ठेवुन दिले आणि सर्वजण उभे राहीले.

भाई, अर्थात माफीया जगताचा बादशहा ताड्ताड पावलं टाकत त्या इमारतीमध्ये शिरत होता. तोच नेहमीचा ट्रेडमार्क फुलाफुलांचा ‘हुला’ शर्ट, फिक्क्ट काळा कोट, दिवस असो वा रात्र डोळ्यावर चढवलेला गॉगल आणि हातामध्ये उंची सिगार.

भाई सरळ आतल्या खोलीत शिरले.

टेबलावर पैश्याने भरलेल्या ३ मोठ्या सुटकेस होत्या. भाईने त्याकडे दुर्लक्ष केले आणि म्हणाला, “चिकना ला पाठव..”

जॉनी चिकना, भाईचा भरवश्याचा शुटर बाहेर स्टुलावर पाय ठेवुन बसला होता. एक पाय गुडघ्यात मुडपुन त्यावर आपली स्नायपर बंदुक ठेवुन तो ती स्वच्छ करत होता.

भाईने बोलावल्याचे कळताच तो बंदुक कडेला ठेवुन उठला आणि सरळ आतल्या खोलीत शिरला.

“एनी लक?”, भाईने विचारले
“नो भाई.. पण मी सांगतो ना, त्याला गोळी नक्की बसली आहे.. जगणं शक्यच नाही..”
“शो मी हिज बॉडी..”, सिगारेटच्या धुराचे हवेल गोल सोडत भाई म्हणाला

भाई महीना होऊन गेला, आत्तापर्यंत समुद्रातील माश्यांनं गटकावला असेल त्याला.

“मग त्याला माश्यांच्या पोटातुन बाहेर काढा.. पण एक तर त्याला शोधा.. आणि मेला असेल तर त्याची बॉडी आणा.. माझ्या भावाला मारणारा जिवंत असेल तर ते मी सहन करु शकत नाही. मला पुरावा हवा…”, भाई

“भाई.. एवढ्या मोठ्या समुद्रात त्याला शोधायचा…”
“त्याची मोटर-बोट.. ती तर सापडेल?”
“पण..”
“हेलिकॉप्टर घे.. सगळा परीसर पिंजुन काढ…”
“पण भाई.. बॉर्डर एरीया आहे.. हेलिकॉप्टरला परमिशन…”

भाईने खिश्यातुन बंदुक काढली आणि जॉनी चिकनावर रोखली..

“सो यु आर सेईंग.. इट्स नॉट पॉसिबल बाय यु???”

जॉनी चिकनाच्या कपाळावर घर्मबिंदु जमा झाले. आजपर्यंत भाईला इतकं चिडलेले त्यानी कध्धीच पाहीलं नव्हतं. जॉनीवर आजपर्यंत त्याने कध्धीच आपली गन रोखली नव्हती.

“मी शोधतो भाई..”

जॉनी खोलीतुन निघुन गेला

जॉनी गेल्यावर भाईच्या कामाची सुत्र संभाळणारा बाबु आत आला.

जॉनी प्रमाणेच बाबुचे नाव सुध्दा नक्की कुणाला माहीत नव्हते. भाईचे काम सांभाळणारा मॅनेजर आणि मॅनेजरचा बाबु झाला आणि तेंव्हापासुन सगळे त्याला बाबुच म्हणत..

बाबुने सगळ्या डिलीव्हरीजचे स्टेट्स भाईला सांगीतले.. तो बोलत असतानाच भाईने त्याला थांबवले आणि म्हणाला, “मायाचा फोन आला होता?”

“हो भाई”, बाबु.. “माल उतरलाय सगळा पोर्टवर.. नॉट टु वरी…”

भाईच्या चेहर्‍यावर हास्य पसरले…

“आय लव्ह दॅट गर्ल..”.. भाई स्वतःशीच पुटपुटला..

दिपक तिकडे आपला पुर्व-इतिहास मनमोकळेपणाने मायाला सांगत होता.. आणि इकडे.. इकडे अंडरवल्डचे आणि मायाचे संबंध आहेत हे दिसत होते.

कोण होती माया? तिचा आणि भाईचा काय संबंध? ति माफीयाचीच एक हिस्सा आहे का? आणि असेल तर दिपकचे काय होणार? माया दिपक जिवंत असल्याचे भाईला कळवेल का?

काय होणार पुढे? दिपकच्या मागे लागलेला हा ससेमिरा.. हा पाठलाग संपणार का? दिपक सापळ्यात अडकणार का?

सर्व प्रश्नांची उत्तर लवकरच उघड होतील.. पाठलागच्या येणार्‍या पुढच्या भागांमध्ये..

वाचत रहा.. पाठलाग….

[क्रमशः]