Pathlag - 24 books and stories free download online pdf in Marathi

पाठलाग (भाग-२४)

डिसुझा जेंव्हा दमणला यायला निघाला तेंव्हा अनेकांनी त्याला अंडरकव्हर रहायला सांगीतले होते. अनेक जण त्याला म्हणाले होते की तेथील स्टेट पोलिस तपास करत असताना सि.आय.डी. ऑफीसर तपास करायला आला म्हणल्यावर खरे गुन्हेगार सतर्क होतील. कदाचीत त्याच्या जिवाला सुध्दा धोका पोहोचवु पहातील.

पण डिसुझाला खरं तर तेच हवं होतं. गुन्हेगारांनी सतर्क व्हावं, त्याच्या हालचालींवर नजर ठेवावी किंवा त्याच्या हल्ला करण्याची सुध्दा हिंमत करावी. कारण तसं केलं तरच गुन्हेगार समोर येऊ शकतील.. अती सावधानतेच्या प्रयत्नात ते एखादी चुक करुन बसतील हे डिसुझा पुर्ण ओळखुन होता आणि म्हणुनच जेंव्हा दमणला तो हॉटेलमध्ये चेक-ईन करत होता तेंव्हा त्याने तेथील रजिस्टरमध्ये आपल्या नावाच्या प्रोफ़ेशनमध्ये सि.आय.डी इन्स्पेक्टर अशी नोंद केली होती.

डिसुझाने सामान रुममध्ये फेकले, पट्कन एक शॉवर घेतला आणि कपडे करुन त्याने तडक पोलिस-स्टेशन गाठले.

इन्स्पेक्टर राणा तेथील इन्चार्ज होते. डिसुझाने आपले आय.डी. कार्ड पुढे करताच राणा अदबीने उठुन उभे राहीले.

“एनी प्रोग्रेस इन्स्पेक्टर?”, डिसुझाने त्यांना बसायची खुण केली आणि समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाला
“येस्स सर, एक महत्वाची माहीती हाती लागली आहे..”, राणा म्हणाले.. त्याच बरोबर त्यांनी सब-इन्स्पेक्टर पटेलला खुण करुन एक फाईल मागवुन घेतली.

फाईल येताच ती उघडुन डिसुझा समोर ठेवली आणि राणा म्हणाले, “सर, आपल्याला त्या रॉडवर काही फिंगर प्रिंट्स मिळाल्या आहेत.. रस्त्यावरचाच एक रॉड असल्याने तश्या बर्‍याच प्रिंट्स आहेत.. पण काही प्रिंट्स अगदी ठळक आहेत.”

डिसुझा शांतपणे ऐकत होता.

“आम्हाला वाटतं त्याच प्रिंट्स खुन्याच्या असतील.. परंतु तरीही शंका नको म्हणुन आम्ही शक्यतो सर्व प्रिंट्स फॉरेन्सिक टिमला पाठवुन दिल्या..”, राणा

“मला नाही वाटत त्यापैकीच कुणी खुनी असेल. कारण इतकी ढोबळ चुक कुठलाही खुनी करणार नाही. आणि केलीच तरी त्या प्रिंट्सवरुन लगेच तपासाला दिशा मिळणं कठीण आहे..”, डिसुझा

“नाही सर, उलट आम्हाला वाटतं आपल्या तपासाला दिशा मिळेल…”, राणा
“ते कसं?”, डिसुझा
“सर.. त्या प्रिंट्सपैकी एक प्रिंट्सचे मॅचींग रेकॉर्ड्स आपल्याला सापडले आहेत..”, राणा..

“काय?”, जवळ जवळ आश्चर्याने ओरडतच डिसुझा म्हणाला

“येस्स सर.. आम्ही सर्वप्रथम फॉर्मालिटीनुसार ह्या प्रिंट्स मॅचींगसाठी सर्व पोलिसरेकॉर्डला पाठवल्या होत्या.. त्यातील एक प्रिंट्स आपल्या रेकॉर्ड्सला आहेत. हे त्याचे डिटेल्स..”, असं म्हणुन राणाने ती फाईल डिसुझाकडे दिली.

डिसुझा ती फाईल उघडुन वाचु लागला.

“गोकर्ण-महाबळेश्वर जवळ जो कारागृह आहे.. तेथील एका कैद्याचे निशाण मिळते-जुळते आहेत सर..”, राणा म्हणत होता..
“दीपक कुमार??”, डिसुझा फाईल वाचता वाचता म्हणाला.. “कोण आहे हा दिपक कुमार? काय चार्जेस होते त्याच्यावर? काही माहीती केली?”,

“येस्स सर.. दिपक कुमार काही साथीदारांसमवेत त्या तुरुंगातुन पळाला आहे सर, आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे त्या जेलचा जेलर हा मयत इन्स्पेक्टर शेखावतच होता..”, राणा
“आय सी.. म्हणजे नक्कीच काही तरी लिंक आहे तर..”, डिसुझा.. “कदाचीत जो बदल्याचा अंदाज आपण वर्तवला होता तेच कारण असु शकतंय..”
“येस्स.. सर आम्हाला पण तसंच वाटतंय..”, राणा

“गुड वर्क राणा.. अजुन काही माहीती मिळाली? हा दिपक कुमार सध्या कुठे आहे? काही थांगपत्ता.. जेलमधुन पळाल्यावर पुढे त्याचं काय झालं वगैरे?”, डिसुझा
“नो सर.. पण आम्ही त्या अनुषंगानेच तपास करतो आहोत. अधीक डिटेल्स मिळाले की लगेच कळवतो..”, राणा
“ओके देन..हे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स..”, असं म्हणुन डिसुझाने आपल्या लॉजचा पत्ता राणाला दिला… “काहीही माहीती मिळाली तरी लगेच मला कळवा.. तो पर्यंत मी जरा इथे अजुन काही तपास करुन हाती काही लागतंय का ते पहातो..”

“येस्स सर..”, राणाने उठुन डिसुझाला हस्तांदोलन केले आणि डिसुझा तेथुन बाहेर पडला.

तासाभरानंतर डिसुझा आपल्या रुममध्ये खुर्चीवर पाय टाकुन आरामशीर बसला होता. थोडावेळ विचार करुन मग त्याने कमीशनरला फोन लावला, हाती लागलेली सर्व माहीती पुरवली आणि म्हणाला, “सर ‘दिपक कुमारची’ माहीती आम्ही मागवली आहे, ती इथे मिळेलच, पण मला ह्या शेखावतची सुध्दा पुर्ण माहीती पाहीजे. पोलिस-फोर्स जॉईन केल्यापासुन ते तो मरेपर्यंतची सर्व.”

“दिपक, जॉनी चिकनाचा पत्ता सापडला आहे. तो सध्या मुंबईतच आहे. तुला मुंबईला जावं लागेल..”, माया दिपकला सांगत होती.

“मुंबईला? पण का? आपलं तर ठरलं होतं की एकेकाला इकडे फसवुन आणायचे आणि मग मारायचे?”, दिपक

“येस्स.. तसंच ठरलं होतं.. पण आपल्याकडुन प्लॅनमध्ये काही चुका झाल्या.. शेखावतचा मृत्यु हा खुन आहे हे आता सर्वांना ठाऊक झालेलं आहे आणि अश्यात आपल्याला इथे अजुन एक खुन होणं परवडणारं नाही..”, माया

“आपल्याकडुन नाही माया, तुझ्याकडुन..”, दिपक
“ओके.. ओाके.. माझ्याकडुन.. बट स्टिल.. इथं नको.. मी तुझी मुंबईला जायची व्यवस्था करते.. तु दोन-तीन दिवसांतच निघ, मी सगळी व्यवस्था करते. .”, माया

“पण माया, उगाच घाई कश्याला करायची? आपण अजून निट प्लैन पण केला नाहीये, उगाच पुन्हा काही चुका नको व्हायला अस नाही का वाटत आहे?”, दीपक
“नो दीपक, आपल्याकडे वेळ नाहीये, लेट द मोमेंटम कंटीन्यु…”, दिपकला बोलायची संधी न देता माया निघून गेली

मुंबईला कमीशनर-ऑफ-पोलिसचे पुर्ण ऑफीस कामाला लागले होते. एका दिवसात त्यांना शेखावतची पुर्ण माहीती गोळा करुन डिसुझाला पुरवायची होती. फक्त पोलिस स्टाफच नाही तर सर्व खबरी सुध्दा कामाला लागले होते. कुठलाही दुवा, कुठलीही बारीक-सारीक माहीती सुटता कामा नये असे डिसुझाने जाताना सर्वांना बजावले होते.

डिसुझा आपल्या खोलीमध्ये दिपकची फाईल घेऊन बसला होता. त्याआधी त्याने रिसेप्शनला फोन लावला होता आणि आपल्याला कोणीही कुठल्याही गोष्टीसाठी डिस्टर्ब करु नये म्हणुन बजावले होते. ‘लॉन्ड्री सर्व्हिस’, ‘रुम सर्व्हिस’, ‘टेलीफोन कॉल्स’ कुठल्याही गोष्टीसाठी खोलीमध्ये कुणालाही पाठवायचे नाही हे निक्षुन सांगीतले होते.

प्रॉन्स, खारवलेल्या काजुंचे दोन पुडे आणि सोडा व व्हिस्की घेऊन तो खुर्चीत रेलुन बसला आणि त्याने दिपकची फाइल उघडली.

पहील्याच पानावर दिपकचा ८x१०” चा आर्मी युनीफॉर्ममधला फोटो होता. तेजस्वी चेहरा, आर्मीच्या युनिफॉर्मच्या कॉन्फ़ीडन्सने अधीकच मोहक भासत होता.

डिसुझा खुप वेळ त्या फोटोकडे पहात बसला होता. त्याला कुठल्याही प्रकारे दिपक हा निर्ढावलेला, खुनावर खुन पाडणारा गुन्हेगार भासत नव्हता. बर्‍याच वेळ निरीक्षण केल्यावर त्याने तो फोटो कडेला ठेवुन दिला आणि फाईल वाचायला सुरुवात केली.

दिपक आपल्या रुममधील सेटीवर आरामात पहुडुन टि.व्ही पहात होता. मायाने त्याला आज सुट्टी दिली होती आणि ती एकटीच गाडी घेऊन कुठेतरी गेली होती. दिपकने कंटाळवाना पिक्चर बदलुन न्युज चॅनल लावला. न्युजमध्ये शेखावतच्या खुनाची बातमी चालु होती.

“दमण पोलिसने आज एक संदिग्धका रेखाचित्र जारी किया है …जिसके साथ डि.सी.पी. शेखावतकी हातापायी होने की खबर बताई जाती है. पोलिस को लगता है, की ये आदमी इस कतल के बारेमै कुछ जानकारी दे सकता है.

अगर आपमेसे कोई इस शक्स को पहेचानता है, या इसे कही देखा गया है, तो तुरंत पोलिस को जानकारी दे.

जानकारी देने के लिए निचे दिए गए नंबर्स पर संपर्क करे…”

बातमीच्या बरोबरीनेच एका दाढीवाल्या, गाल फुगर्‍या, फेल्ट हॅट घातलेल्या व्यक्तीचं रेखाचित्र प्रसारीत केलं जात होतं. मिळालेल्या माहीतीच्या आधारे, पोलिसांनी ‘त्या’ दारुड्याला मॅच करेल असे रेखाचित्र बनवले होते आणि डिसुझाच्या सांगण्यावरुनच ते नॅशनल चॅनल्सवर दाखवले जात होते.

दिपकने स्वतःला शेजारच्या आरश्यात निरखुन पाहीले. कुणीसुध्दा त्या रेखाचित्रातील व्यक्ती दिपकच आहे हे छातीठोक म्हणु शकला नसता.

दिपक स्वतःशीच हसला. घड्याळात फक्त साडेसातच वाजले होते. मायाने त्याला संध्याकाळी कुठलीही वेळ दिलेली नव्हती, त्यामुळे तो पुर्ण संध्याकाळ मोकळाच होता. शेवटी कंटाळुन तो उठला. उगाचच ह्या बंद खोलीत लोळत पडण्यापेक्षा गावात एखादा फेरफटका मारण्याचा त्याने निश्चय केला. तसंही दमणला आल्यापासुन एकटा असा तो कुठे बाहेर पडलाच नव्हता. एक तर सतत तो मायाच्या कामावर बिझी असायचा नाहीतर घरी येईपर्यंत इतका उशीर झालेला असायचा की बाहेर तो पर्यंत सगळी सामसुम झालेली असायची. त्यामुळे बाहेर कधी फिरायला निघण्याचा त्याला योगच आला नव्हता.

त्याने टी.व्ही. बंद केला, कपडे केले आणि खोली बंद करुन तो बाहेर पडला.

डिसुझाने फाईल पुर्ण वाचुन बंद केली. काही क्षण तो डोळे बंद करुन खुर्चीत बसुन राहीला. फाईलमध्ये लिहील्याप्रमाणे पहील्या खुनाची तर शिक्षा झाली होतीच, पण त्यानंतर तो तुरुंगातुन पळाला हे खरं होतं.. त्यानंतर पुन्हा शेखावतकडुन पकडला जाताना तो स्टेफनीचासुध्दा खुन करुन पळाल्याचं निमुद केलं होतं. शिवाय स्टेफनीचा पती थॉमस ह्याच्या मृत्युबद्दल साशंकता निर्माण होत होती, कारण त्याचा इंन्शोरंन्स क्लेम केल्यानंतर त्या केसवर काम करणार्‍या इंन्शोरन्स एजंटचा सुध्दा मृतदेह सापडला होता. आणि पर्यायाने दिपक आणि मोहीतेनेच तर थॉमसचा काटा काढला नसेल ना? खरी माहीती उघड होते आहे म्हणल्यावर त्यांनीच तर त्या इंन्शोरन्स एजंटला मारलं नसेल नं? आणि शेवटी स्टेफनीचा मृत्यु.

सगळाच प्रकार अशक्य, पण तरीही घडलेला होता. दिपकसारखा एखादा बाणेदार आर्मीतील उच्च पदावर असणारा अधीकारी असं करु शकतो ह्यावर डिसुझाचं मन विश्वास ठेवायला तयार होत नव्हतं. परंतु त्याच वेळेला घडलेल्या घटना तो डोळ्याआड सुध्दा करु शकत नव्हता.

डिसुझाने फाईल कपाटात ठेवुन दिली आणि रिसेप्शनला फोन केला.

“डिसुझा बोलतोय.. मला कुणाचे निरोप? कुणाचे फोन कॉल्स?”
“तसं दिवसभर नाही सर, पण आत्ताच एक तासाभरापुर्वी इन्स्पेक्टर राणा तुम्हाला भेटायला आलेत..”
“ओके..आत्ता कुठे आहेत ते?”
“इथेच आहे, लॉबीमध्ये. त्यांना पाठवुन देऊ रुम मध्ये?”

“नाही नको. मीच खाली येतोय म्हणुन सांगा. दिवसभर खोलीत बसुन कंटाळा आला.. बाहेरच जातो आता.” असं म्हणुन डिसुझाने फोन ठेवुन दिला.

तोंडावर पाणी मारुन तो फ्रेश झाला आणि पटकन कपडे करुन तो खोलीच्या बाहेर पडला.

लॉबीमध्ये राणा न्युजपेपर आणि पेन घेउन कश्यात तरी मग्न होते. डिसुझाला पहाताच ते उठुन उभे राहीले.

“गुड इव्हनींग सर..”, राणा
“गुड इव्हनींग राणा,.. सॉरी तुम्हाला ताट्कळत रहावं लागलं.. काय कोडी सोडवत होतात की काय?”, पेन आणि पेपरकडे बघत डिसुझा हसत म्हणाला..

“नाही सर.. दिवसभर डोकं चालवुन बधीर होऊन जातं. तेथील कोडी सोडवता सोडवता नाकी नऊ येतं आता कुठं परत कोडी सोडवायची. मी आपलां असाच टाईमपास करत बसलो होतो. बाकी काही नाही, घरात दोन लहान मुलं आहेत ना, त्यांच्याच सवयी लागल्यात…”, असं म्हणुन डिसुझाने हातातला पेपर डिसुझापुढे धरला

राणाने पेपरमधील निधन झालेल्या जाहीरांतींमधील चेहरे, खेळांच्या बातम्या, जाहीरांतींमधील मॉडेल्स सगळ्यांना पार रंगवुन टाकले होते. कुणाला जटा काढुन साधु, कुणाला पागोटं, दाढी मिश्या, कुंकु, बंदुका काढुन डाकु तर कुणाला काय…

डिसुझा त्या कलाकृती बघुन हसत राहीला आणि म्हणाला.. “काय राणा तुम्ही पण..” आणि हसता हसता अचानक थांबला व म्हणाला..

“बाहेर आपणं थोड्यावेळाने जाऊ, चला पट्कन माझ्या खोलीत..”

राणा काही बोलेपर्यंत डिसुझा दोन दोन पायर्‍या एका दमात चढत खोलीकडे गेला होता. राणासुध्दा त्याच्या मागोमाग पळत गेला.

खोलीत पोहोचेपर्यंत डिसुझाने दिपकची फाईल बाहेर काढली होती. पट्कन त्याने दिपकचा फोटो बाहेर काढला, आणि पेनने त्यावर गिरगोट्यामारायला सुरुवात केली.

दोन क्षणातच राणाच्याही सगला प्रकार लक्षात आला.

काही वेळातच डिसुझाच्या चेहर्‍यावर हास्य पसरले. त्याने संशयीत दारुड्याचे ते रेखाचित्र आणि दिपकचा तो रंगवलेला.. अर्थात त्याच्या फोटोवर दाढीमिश्या आणि इतर कारागीरी करुन बनवलेला चेहरा राणासमोर धरला आणि म्हणाला…

“चला राणा, लेफ्ट्नन दिपक कुमार दमणच्या पाहुणचाराला उतरलेले दिसतात, आपल्याला त्यांचा शोध घ्यायला हवा…”

“सर, लगेच न्युज चॅनलवर दिपकचा सुध्दा फोटो झळकवायचा का?”, जिना उतरता उतरता राणा म्हणाला
“नो !! झुंडीने ओरडा-आरडी करुन, हाकाट्य पिटत कोंडीत धरत सिंहाला पकडण्यात काय मजा? त्याला पकडायचे तर तो बेसावध असताना त्याच्या समोर जाऊन. स्वतःच्या बेडरपणाची लाज वाटतानाचा त्याचा झालेला चेहरा प्राईसलेस असतो राणा.. चला”, असं म्हणुन डिसुझा आणि राणा लॉजच्या बाहेर पडले.

[क्रमशः]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED