सन १९९३. हवाईदलाच्या तांबरम पोस्टींगवर नुकताच पोहोचलो होतो. तेथील स्टेशनच्या गणेश चतुर्थीच्या आरतीला एयरमन लोकांनी एका हॉलमधे मला बोलावले होते. म्हणून मी कुटुंबासह तेथे पाचारण झालो होतो. मी आल्याचे पाहून तेथील एयरमन लोक उठून उभे राहिले. एक आसामी तरीही खुर्चीत बसून राहिलेले मी पाहिले. नंतर मला नेमकी त्याच्या शेजारची खुर्ची बसायला दिली गेली. आरतीची तयारी चालली होती. तोवरच्या वेळेत शेजारी बसलेल्या व्यक्तीने सुरवात केली, ‘माफ करा सर’ मी उठू शकत नाही. कष्ट पडतात उभे राहायला मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. नंतर परतायच्या आधी म्हणाला, ‘सर मला काही मदत करू शकाल का आपण?’ मी तोंड देखले, ‘पाहू काही करता आले तर’ म्हणून गेलो. काही दिवसांनी एक व्यक्ती हातात काठी टेकत टेकत आमच्या क्वार्टरचे फाटक उघडताना मुलीने पाहिले. कोणी चुकून आले की काय असे वाटून ती थबकली.
‘सर आहेत का?’ असे मराठीत विचारल्यावर, ‘हो आहेत’ म्हणून ती मला ‘डॅड कोणी भेटायला आलेत. “सव्वासहा” वाजलेत असे दिसतायत’ म्हणाली. एरव्ही सव्वा आणि पावणे या मराठी शब्दात अडखळणाऱ्या मुलीला तो सव्वासहा म्हणजे कसा? ते पहायला मी उत्सुक झालो. मी बाहेर येईपर्यंत ती व्यक्ती कोचाजवळील खुर्चीत कष्टपुर्वक बसायचा प्रयत्न करीत होती. हातात टेकायच्या काठीवर पुर्ण भाग टाकून टाकून कमरेच्या वरील भाग पुर्णपणे पुढे झुकलेला. जणु काही घड्याळातील काटे सहा वाजून १५ मिनिटांनी जसे दिसतात तसे त्याच्या शरीराचे अवघडलेपण होते... मुलीने केलेले वर्णन एकदम फिट्ट होते.
मी सार्जंट तांदळे. आल्या आल्या त्याने आपली ओळख सांगून म्हटले, ‘आपण गणपतीच्या दिवसात मदत करतो म्हणाला होतात म्हणून फार आशेने आलोय.’
‘सर, गेले अनेक महिने मी असा अपंगावस्थेत दिवस काढतोय. क्षुल्लक कारणावरून माझ्या पाठीत बाक येऊन अशी दीन अवस्था झाली आहे. सर्वांगाला ठणका आहे. नक्की निदान कोणाला होत नाही. जो कोणी काही सुचवतो त्याच्या मागे लागून जमेल ते सर्व उपाय करतोय. पण गुण येईल तर शपथ. रोज नाही नाही ते कडेलोटाचे विचार येतात. पण घरच्या निष्पाप बाळांकडे पाहून आणि पत्नीच्या धीर देण्याने मी सावरतो. ‘हेही दिवस जातील’ असा विचार करून हवाईदलातील दिवस ढकलतोय. दर मेडिकलबोर्डाच्या वेळी मला नोकरीतून काढून टाकायच्या भितीने मन सैरभैर होते. माझ्यासारख्या अधेडवयाच्या अपंग माणसाला बाहेरच्या जगात कोणी दरवाज्यात तरी उभे करील का? असे वाटून मी हवाईदलातील औषधपाण्याच्या खुराकावर दिवस कंठतोय. का कुणास ठाऊक तुम्ही काहीतरी मदत कराल असे वाटले म्हणून मी शारीरिक वेदना सहन करून आपल्या इथे चालत चालत कसाबसा पोहोचलो आहे.’
मला काय बोलावे सुचेना. सहज मदत करीन म्हटलेले तो इतके मनावर घेईल असे वाटले नव्हते. चहाचा कप येईपर्यंत मी इकडचे तिकडचे बोलून वेळ काढला. ‘मी म्हणालो खरा पण मला आपल्याला मदत करता येईल असे नाही वाटत’ असे म्हटल्यावर तरी तो जाईल असे वाटले. उठता उठता मला म्हणाला, ‘सर आपण मला फार निराश केलेत. मी फार आशेने आपल्याला भेटायला आलो होतो. जाऊ दे. इतक्यांनी थट्टा केली त्यात आपली भर पडली.’
मी तरी काय करणार होतो मदत? थोडे आठवले. पण त्याची याला काय मदत होणार असे वाटून मी मनांत विचार टाळला. एक मन म्हणाले, ‘आपण सांगून तर पाहू. निदान त्याला आपण विन्मुख पाठवले नाही असे आपल्याला नंतर वाटणार नाही.’ आपसुक बोललो, ‘इथे नुकताच आल्याने तांबरममधील काही माहिती नाही. पण पुर्वी एकदा माझ्या एका नातेवाईकाच्या मित्राबाबत एकांनी काही मदत केली होती. त्यांचा पत्ता मी तुम्हाला देतो. तेथे पहा काही काम होते का ते. पण त्यासाठी पुण्यात जावे लागेल.’ त्याने चेहरा आणखी टाकला. म्हणाला, ‘आत्ता तरी मला ते शक्य दिसत नाही. रेल्वेप्रवासाची दगदग, शिवाय तिथे नातलगांची मदत होणार नाही. बराय पहातो काही. आणखी शक्य ते करून.’
... हळू हळू काठी टेकत टेकत ती व्यक्ती डोळ्याआड झाली. काही वर्षांपुर्वी मी पुण्याला पोस्टींगला असताना अविनाश - माझ्या मेव्हण्याने मला एकांकडे नेले होते. त्याला असे भेटायला जायला आवडे. तेंव्हा तो म्हणाला होता, ‘फार पॉवरफुल आहेत ते. मीपण भेटलेलो नाही त्यांना बऱ्याच काळात. फाटक गुरुजी म्हणतात त्यांना. चल तुला भेट घ़डवतो.’ आम्ही गेलो तोवर त्यांचे निधन झाले होते. असे त्यांच्या पत्नीकडून समजले. वाईट वाटले. मात्र त्यांची गादी आता त्यांची एक मुलगी चालवते. काही त्रास किंवा लागीर असेल तर लोक इथे येतात. आम्ही दिलेल्या मंत्राच्या अंगाऱ्याने उतारा पडतो. ती सर्व गुरूकृपा आहे. आम्ही त्यांच्यावरील दृढ श्रद्धेच्या बळावर मार्गदर्शन करतो. लोकांना गुण येतो.’
त्यांचे बोल मला अचानक सार्जंट तांदळेशी बोलताना आठवले. खरे तर तांदळेच्या शारीरिक व्याधीशी अंगाऱ्या-धुपाऱ्याचा संबंध नव्हता. मी आपला एक उपाय म्हणून सुचवले की एक फाटक गुरुजी म्हणून पुण्यात सहकारनगर भागातील स्टेट बँक कॉलनीत राहतात. त्यांच्याकडे अंगारा व मंत्रोच्चाराने लोकांना गुण येतो असे म्हणतात. पहा त्यांच्याकडून काही मदत होते का ते. असा माझा अनाहूत सल्ला त्याने ऐकलान खरा पण तो खरोखर जाईल याची मला शंका होती... या गोष्टीला बराच काळ लोटला...
... ‘हू इज देअर’ मी करड्या आवाजात कडाडलो. ऑफिसच्या धामधुमीच्या वेळात मी माझ्या प्रशस्त केबीनमधे सहकाऱ्यांशी कामाच्या निमित्ताने चर्चा करत होतो. मधेच माझी नजर दरवाज्याच्या पडद्याकडे गेली. तो कोणी तरी हालवून पहात होते असा भास होत होता... पडदा खरेच हालला. आणि ‘मे आय कम इन सर’ म्हणून माझ्या हो म्हणायची वाट न पहाता. युनिफॉर्ममधील सार्जंट तांदळे हातातली काठी लांब टाकत आत आला. ‘सर मला राहवत नाही हो ... डोळ्यावर विश्वास बसणे शक्य नव्हते. सार्जंट तांदळे काठीच्या शिवाय एक पाऊल न टाकता येणारा. ताठपाठीने मला हस्तांदोलन करायला सरसावत पुढे आला. ‘सर काय सांगू. अन् कसं सांगू असे झालयं. सुटीवरून परतलोय ते तुम्हाला केंव्हा भेटतोय असं झालय. सर, पहा काय चमत्कार झालाय. माझी काठी सुटली. पाठ सरळ झाली. माझा जणु काही पुनर्जन्म झालाय.
काय झाले, कसे झाले, सांगताना त्याचे डोळे भरून आले. मला राहावले नाही. मी त्याला बसलेल्या लोकांचा पर्वा न करता छातीशी लावले. महौल काही वेगळा आहे याची जाण राखून लोक पांगले.
‘सर तुम्ही सांगितलेलेल्या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी ताईंनी मला अंगारा दिला आणि मला काही मंत्रून दिलेले सोपस्कार करायला सांगितले व म्हणाल्या, ‘आपल्याला आत्तापासून बरे वाटायला लागेल.’ आणि खरच मला त्यांच्या जिन्याच्या पायऱ्या उतरत असताना जाणवले की माझ्या वेदना दर पायरीनिशी कमी कमी होतायत. खरोखरच त्या दैवी उपायांनी मला उतारा पडला. आणखीन काही दिवस त्यांच्या सानिध्यात घालवून मी आता खडखडीत बरा झालोय. एकदम सर्वांचा या घटनेवर, दैवी उपायांवर विश्वास बसायचा नाही. नस्ते झंझट उभे राहायचे नको म्हणून आणखी काही काळाने हवाईदलातील औषधाचा गुण येऊन मला पुर्णतः ठीक झाल्याचे मी इथे लोकांना सांगेन.... त्याच्या नव्या शारीरिक अवस्थेचा उन्मेश, नवा उत्साह, आजही माझ्या मनांत घर करून राहिला होता. ...
.................................................................................
... सर, नमस्कार. तांदळे बोलतो. आमचे कँपातील ईस्ट स्ट्रीटवरील ऑफिस पहायला जरूर या. मी आपली वाट पहातो. असा मोबाईलवरून प्रेमळ आग्रह झाला आणि मी आज दि १६ ऑक्टोबर २०११ला पोहोचलो. हातात पुष्परचना घेऊन. फुल शर्ट-पँट, शूज, टायमधले तांदळेसर आता एक्झिक्युटीव्हच्या थाटात माझे स्वागत करायला हजर होते. त्यांनी त्या नव्या व्यवसायाची सुरवात कशी केली आणि आता त्यांच्या मुलींनी तो व्यवसाय कसा आत्मसात केला आदि वर्णन करून ते म्हणाले, ‘सर आता आम्हाला मार्गदर्शन करावे.’ मी थोडा चक्रावून गेलो. आता मी काय सांगणार त्यांना त्यांच्या व्यवसायातील बारकावे. नवे आकृतीबंध, नवी आव्हाने. पण अशी एक उर्मी आली आणि मी सांगत गेलो...जणु हे आधीच माहित होते मला की गरजू लोकांना असे सांगायला यावे म्हणून काही काळापुर्वी मी केलेले एकेक व्यावसाय़िक प्रयोग. मला असे मदत करतील म्हणून....
एके काळचा निराश अपंग सार्जंट.... आजचा यशस्वी उद्योजक तांदळे सर...
ओठी ओळी येतात ...काय होतास तू.... काय झालास तू...’
... आताचे ताठमानेचे आणि ताठ कण्याचे तांदळेसर कसे दिसतात ते कायम लक्षात राहावे म्हणून... त्यांच्या ऑफिसमधे मी त्यांच्या सोबत एक फोटो काढवला...