Bhatkanti - Suruvaat aeka pravasachi - 13 books and stories free download online pdf in Marathi

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग १३)

आकाशने पुढचा रस्ता, सखाला विचारून बनवला होता. परंतु अर्धाच रस्ता सखाला माहित होता. फक्त त्याने सरळ जाण्यास सांगितले होते. रस्ता तसा सरळ नव्हताच. प्रचंड रानं होतं. झाडा-झुडुपातून वाट काढत जावे लागत होते. त्या गावाच्या मंदिराचा कळस तेवढा दिसला होता आकाशला. त्यावरून आकाशने एक अंदाज लावला होता. आज जेवढं अंतर पार करता येईल तेवढं पार करायचं. संध्याकाळ होण्याच्या आधीच कुठेतरी थांबायचे... कारण सखा बोलला असला तरी आज त्या गावात संध्याकाळ पर्यंत पोहोचणं शक्य वाटतं नव्हतं. हे त्याने सगळयांना बोलून दाखवलं. सगळ्यांना ते पटलं.


" सगळ्यांनी पटापट पाय उचला... आज पोहोचू शकत नाही तिथे पण जास्त अंतर पार करू आजच... म्हणजे उद्या दुपारी तरी पोहोचु... कळलं ना सर्वांना... " आकाश चालताना सूचना करत होता. सर्व ग्रुपला घरी जायचे वेध लागले होते. त्यामुळे आकाश सांगेल ते ऐकत होते. सुप्री तर केव्हा पासूनच त्याच्याकडे लक्ष देऊन चालत होती. आकाशच्या लक्षात आलं ते. कारण त्यानेही एक-दोनदा चोरून बघितलं होतं तिच्याकडे. एक वेगळंच नातं फुलत होतं दोघांमध्ये. हे बाकी कोणाला कळलं नसलं तरी संजनाला ते कळत होतं.


चालता चालता दुपार झाली. पटपट चालता येत नसतानाही खूप अंतर पार केलं होतं सगळ्यांनी. आता थोडावेळ थांबून मग पुढचा प्रवास करावा असं आकाशने ठरवलं. एक चांगली जागा बघून सगळ्यांनी आपापलं सामान खाली ठेवून विश्रांती केली. आदिवासी पाड्यातून सोबत आणलेले पदार्थ, फळ खाऊ लागले. आकाशने थोडंच खाल्लं आणि त्यातल्या त्यात एका उंच जागी उभा राहून , पुढची वाट कशी आहे ते बघू लागला. सुप्रीने त्याला जाताना बघितलं होतं, त्यामुळे तिनेसुद्धा खाणं झटपट संपवलं आणि त्याच्या मागोमाग गेली.


आकाश दूरवर नजर टाकून काही दिसते का ते बघत होता. सुप्री त्याच्या मागेच उभी होती. आकाशाला थोड्यावेळाने तिची चाहूल लागली.

" Any questions.....सुप्रिया मॅडम... " तिच्याकडे न बघताच आकाशने विचारले.

" तुम्हाला काय मागे पण डोळे आहेत का ? ",

"हो... " आकाशच उत्तर....

"हो का... एवढी वेडी वाटते का मी.... असो, काय बघताय... " ,

" पुढचा गावं किती लांब आहे ते... ",

"ok, बघा... " म्हणत सुप्री तशीच उभी राहिली. आकाशने आणखी थोडा वेळ निरीक्षण केलं. आणि सुप्रीकडे वळला.

" अरेच्चा !! अजूनही इथेच का... आणखी काही प्रश्न आहेत वाटते... चेहऱ्यावरून तरी तसंच दिसते " सुप्रीला प्रश्न होताच, फक्त कसं विचारू याची वाट बघत होती.

" तुम्ही खरंच ... आकाश आहात का.. ग्रेट फोटोग्राफर.... ",

"हो ... वाटतं नाही का... मीच आहे तो म्हणून... " आकाश हाताची घडी घालून उभा राहिला.

" नाही.... means तसं नाही... ज्याला अजून कोणी बघितलं नाही... एवढे छान फोटो काढतो तरी ज्याचा एकही फोटो नाही... असा आकाश... माझ्या समोर उभा आहे.. यावर विश्वास बसत नाही. " सुप्री अडखळत बोलली. आकाशच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य आलं.

" मीच आहे तो... माझं कार्ड तर दिलं ना तुम्हाला." सुप्रीने कार्ड जपून ठेवलं होतं.

" तसं नाही तर... तुम्ही कोणाला भेटत नाही ... आणि मला डायरेक्ट कार्ड वगैरे दिलंत... म्हणून विश्वास बसत नाही... ",

" त्याचं काय आहे.. तुम्ही मला तुमच्या मनातलं सांगितलं.. काहीतरी सीक्रेट share केलंत, जे तुमच्या best friend ला ही माहित नाही... आणि मी बोललो होतो... माझं नावं सांगेन कधीतरी.. म्हणून.... मी एवढं तरी करू शकतो ना तुमच्यासाठी... चला, निघूया... " सुप्री आणि आकाश , त्याच्या विश्रांतीच्या ठिकाणी एकत्र निघाले.

" एक सांगू का.. " सुप्री त्याला थांबवत म्हणाली. " मी तुमची खूप मोठ्ठी फॅन आहे... ते फोटोज तर किती छान असतात. मला तुमची सही भेटेल का.. प्लिज.. " ,

"शहरात पोहोचलो कि नक्की... " दोघे गप्पा मारत सगळ्या ग्रुप जवळ आले.


अर्धा - पाऊण तास विश्रांती घेऊन त्यांनी पुन्हा चालायला सुरुवात केली. आता थोडी मोकळी जमीन दिसत होती. जंगल संपल्याची खूण होती ती. समोर काही पडकी बांधकामं होती. पडकी घरं, झोपड्या.. असंच काहीसं... पहिली इथे वस्ती असावी असा आकाशने अंदाज लावला. खूप वर्षांपूर्वीच इथल्या लोकांनी हि जागा सोडली होती. ते भग्नावशेष बघत सर्व पुढे जात होते. पुढे काही मोकळी शेतंही दिसली. इतकी वर्ष कोणीच लक्ष दिलं नव्हतं त्यावर. रानटी गवत तेवढी पसरली होती आता त्या शेतांवर. तसल्याच एका शेतातून ते चालत होते. "ते" गावं अजून बऱ्यापैकी दूर होते. संध्याकाळ सुद्धा होतं आलेली. आता पण चालणे सुरूच ठेवले तर रात्र झाल्यावर त्या गावात पोहोचू असा अंदाज आकाशला आला. रात्रीचे चालणे , अश्या ठिकाणी तरी ठीक नसते... हे आकाश जाणून होता. म्हणून त्या ठिकाणीच कुठेतरी जवळपास मुक्काम करायचं ठरलं. आकाश जागा बघू लागला. तर थोड्याच अंतरावर एक मंदिर दिसलं. आकाश सगळयांना घेऊन त्या मंदिरात आला.


ते मंदिरसुद्धा खूप जुनं असावं, संपूर्ण दगडाचे बांधकाम... भक्कम असं..... बऱ्यापैकी मोठ्ठ मंदिर. फक्त त्यात मूर्ती काय ती दिसत नव्हती.

" यातला देव कुठे आहे ? " एका मुलाने प्रश्न केला.

" बहुदा... ते गावं बघितलं ना मघाशी...त्यांचंच असेल हे मंदिर, जाताना त्यांनी त्यांचा देव सुद्धा नेला असेल सोबत.. " आकाश म्हणाला.

" मग इकडेच तंबू लावायचे का ? " संजनाने विचारलं.

" तंबूची काय गरज,.... तसं बघितलं तर इथे सगळयांना जागा होईल झोपायला, इथेच थांबू आजही रात्र... उद्या सकाळी निघूया, म्हणजे त्या गावात लवकर पोहोचू... " सगळयांना पटलं ते. सामान ठेवलं सगळ्यांनी आणि ती जागा साफ करू लागले. आकाशला ते बघून बरं वाटलं. एवढ्या दिवसात,सगळयांना असं स्वतःहून काम करायची सवयच लागली होती. आकाशसुद्धा मदत करू लागला.


पुढच्या अर्ध्या तासात मंदिराचे सभागृह साफ करून झालं. आकाश, मंदिराचे निरीक्षण करू लागला. मंदिराच्या गाभाऱ्यातुन एक जिना, मंदिराच्या छताकडे जात होता. आकाश त्या जिन्याने वर गेला. पाचच मिनिटे थांबला असेल तो. खाली आला आणि सगळ्यांना वर येण्यास सांगितले. एक -एक करून सगळे वर आले आणि समोर दिसणारे द्रुश्य बघून हरखून गेले.


देऊळ उंच असल्याने ,आजूबाजूचे.... बऱ्यापैकी दूरवरचे दिसत होते. एक-दोन शेतं सोडून एक नदी वाहत होती. आधी दिसलेल्या,पूर आलेल्या नदी पेक्षा , हि नदी खूप शांतपणे वाहत होती. संध्याकाळ होतं असल्याने जवळच्या झाडावर परतून येणाऱ्या पक्षांच्या किलबिलाटाने परिसर मोहून गेला होता. पावसाळा असल्याने सर्वच शेतं, हिरवाईने फुलून गेली होती. संध्याकाळची शांत हवा वाहत होती. शिवाय तिथून पुढच्या गावातलं मंदिरही दिसत होतं. " उद्या बहुदा.. सकाळीच पोहोचू आपण तिथे... आणि गाडी भेटलीच तर.... " आकाश बोलता बोलता थांबला. कारण सुप्री त्याच्याकडे बघत होती कधीपासून.. हे त्याच्या लक्षात आलं. उद्या, या सगळ्यांबरोबर तीही निघून जाईल, या अश्या विचित्र भावनेने त्याला पूढे बोलताच आलं नाही. बाकी कोणाचं त्यावर एवढं लक्ष नसलं तरी सुप्रीला कळलं ते. " बसा रे सगळ्यांनी खाली... ज्यांना खाली जायचे असेल त्यांनी खाली जा... " असं म्हणत सुप्री तिथेच बसून राहिली. आणखी दोघे -तिघे ते द्रुश्य बघत बसले, बाकी सगळे खाली जाऊन शेकोटीची तयारी करू लागले. आकाश सुद्धा तिथेच बसून फोटो काढत होता.


काळोख झाला तसे सगळेच खाली आले. शेकोटी भोवती गप्पा सुरु झाल्या. आकाश त्यात नव्हता... सुप्री त्यालाच बघत होती. कुठे गेला .... गेली असती शोधायला परंतु सगळे तिथेच बसलेले होते म्हणून जाऊ शकली नाही. आकाश होता कुठे मग..आकाश त्या मंदिराच्या काळोख्या गाभाऱ्यात एकचित्त बसून होता. खूप वेळ तिथेच बसून विचार चालू होता. सुप्रीला त्याची काळजी वाटू लागली. कुठे गेला असेल.... बाकीच्या गप्पामध्ये तिला इंटरेस्ट नव्हता. संजनाला तिची चुळबुळ कळली.

" काय झालंय नक्की तुला... ? ",

"अरे... तो मिस्टर A... तो दिसत नाही ना म्हणून... " संजना आजूबाजूला बघू लागली.

" हो गं... कोणाच्या लक्षातच आलं नाही हे... " संजना बोलली तसे सगळे उठले आणि आकाशला शोधू लागले.


बाहेरच्या शांततेत यांचा गडबड-गोंधळ ऐकू येत होता. आकाशची तंद्री त्या आवाजाने भंग झाली. आणि नक्की बाहेर काय चालू आहे हे बघण्यासाठी त्या रिकाम्या गाभाऱ्यातून बाहेर आला. त्याला बघून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

" कुठे जाता ओ मधेच... इकडे काळजी वाटते ना.. " सुप्री रागात म्हणाली.

" का ? ",

" का म्हणजे ... अजून शहरात पोहोचलो नाही आम्ही... असं मधेच सोडून जाऊ शकत नाही तुम्ही आम्हाला.. समजलं ना... " आकाश त्यावर काही बोलला नाही.

" चला, जेवणाची तयारी करू.. सखाने दिलेल्या पैकी अजून बाकी आहे खाणं... तेच खाऊ ... उद्या त्या गावात गेलं कि मिळेल काही.... " एवढं बोलून आकाश शांतपणे शेकोटी जवळ जाऊन बसला. सगळ्यांना भूक लागली होती, शिवाय फळं खाण्याची सवय झाली होती एव्हाना... होतं तेच खाल्लं... खाऊन झाल्यावर जे खूप दमले होते ते लगेचच झोपी गेले. आकाश पुन्हा मंदिराच्या कळसाजवळ जाऊन बसला. काय झालंय आपल्याला... पहिले तर असे कसले विचार मनात आले नव्हते... यांना तर त्यांच्या घरी पोहोचवायचे ,एवढंच ठरलं होतं... मग आता का वाईट वाटते मला.... आकाश बराच वेळ विचार करत होता.. रात्री उशिराने त्याच जागी झोप लागली त्याला.


सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने त्याला जाग आली. आपण इथेच झोपलो, याचे आश्चर्य वाटलं त्याला. पण सकाळ झाली, आता लगेचच निघावं लागेल म्हणून डोळे चोळत चोळत खाली आला. बाकीचे मस्तपैकी झोपले होते. " चला... उठा सगळ्यांनी... निघायचे आहे आपल्याला.. " आकाश मोठ्या आवाजात ओरडला. सगळे खडबडून जागे झाले. पटापट तयारी केली आणि निघण्यास तयार झाले. आकाशने सगळयांना एकदा बघितलं.... कितीजण आहेत ते मोजलं आणि पुढच्या प्रवासाला निघाले.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED