Bhatkanti - Suruvaat aeka pravasachi - 12 books and stories free download online pdf in Marathi

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग १२)

पुढचा दिवस, आकाशचा पाय आता दुखत नव्हता तरी देखील मलमपट्टी तशीच ठेवली होती. त्यामुळे आकाश आतातरी, स्वतःच्या पायावर उभा राहू शकत होता. जाग आली तसा तो झोपडी बाहेर आला. पाड्यातली बहुतेक मंडळी जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी निघत होती. आकाशचा ग्रुप तेव्हढा एकत्र बसून गप्पा-गोष्टी करत होता. आकाशला बाहेर आलेलं बघून ,सगळे त्याच्याभोवती गोळा झाले. आकाशला त्या दोघांनी "Sorry, thank you " बोलून झालेलं.
" पण तुम्हाला घरी जायला अजून उशीर होणार... कारण माझा पाय बरा झाला नाही , तर हे सोडणार नाहीत. " आकाश बोलला.
" हो सर... तुम्ही काही टेन्शन घेऊ नका... ज्याला घरी जायचे असेल ना त्याला आपण नदीत टाकून देऊ. " सुप्री म्हणाली. तसे सगळे हसू लागले. इतक्यात सखा आला.
" काय साहेब... झाली का झोप... आराम करायचा ना अजून... "सखा आकाशला म्हणाला.
" नको रे आराम... एक काम करूया... तू जरा आम्हाला फिरवून आणतोस का... काही लोकांना "छान" बघायचं असते ना... या कोणाला माहित नाही जंगल कसं असते ते. " ,
" चाललं... पन सांबालून चला... पायाखाली साप असतात हा इथं.. " सखाने बजावून सांगितलं


सखा सगळ्यांना घेऊन चालत होता. कितीतरी प्रकारची झाडं-झुडुप त्याने दाखवली असतील या सगळ्यांना. काही झाडं तर त्याने स्वतःच लावली होती , तो लहान असताना. त्या झाडांमधून गार वारा वाहत होता. विविध प्रकारचे पक्षी ओरडत होते. मधेच माकडांचा आवाज कानावर पडत होता. असेच पुढे पुढे जात होते. एका ठिकाणी ते येऊन थांबले. " बघा.. इथून कस दिसतं ते नदीचं रुपडं... " सखाने सगळ्यांना एका दिशेला बघायला सांगितले. अथांग पसरलेला निळा रंग. जसा काही समुद्रच.... एवढी मोठी नदी... थोडीशी मातकट रंगाची किनार होती त्या निळ्या रंगाला... दोन्ही काठांना प्रचंड हिरवाई.. ,झाडे-झुडुपांनी भरलेले काठ... त्यात पाऊस नसल्याने आभाळ मोकळंच होतं. त्याचंच प्रतिबिंब खाली पाण्यात पडलं होतं जणू. एखाद-दुसरा पाखरांचा थवा खाली झेपावत पाण्याला स्पर्श करून निघून जात होता. आकाशने पटपट दोन-तीन फोटो क्लिक करून घेतले. लगेच प्रश्न पडला त्याला..
" सखा... पण मी ऐकलं होतं कि नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध बाजूला गेलो कि त्याची रुंदी कमी होत जाते. पण इकडे उलटं कसं.. जो प्रवाह आम्ही पार करत होतो... त्यापेक्षा याची रुंदी खूपच जास्त आहे . " ,
"कस असतं ना साहेब.... हा निसर्ग हाय... यात लय गोष्टी आपल्याला माहीतच नसतात... त्यातलीच हि समजा... " हे बोलणं चालू असताना , अगदी अचानक , पक्षांचा जो किलबिलाट चालू होता, तो बंद झाला. चिडीचूप सगळे. सगळयांना कळलं ते, सखाला पण.
" हम्म... त्यांचा राजा येत असलं... " सखा वर बघत म्हणाला.
" म्हणजे ? " एका मुलीने विचारलं.
"गरुड... " असा बोलतो न बोलतो तोच समोरच्या झाडावर गरुड येऊन बसला. सखाचं बोलणं एकदम बरोबर होतं.
" तुला कसं कळलं रे... ?" आकाशने कुतूहलाने विचारलं.
"म्या इकडचं राहतो ना... जुन्या -जाणत्या लोकांनी शिकवलं हे.. हे पक्षी आपल्या राजाला खूप मान देतात... म्हणून तर.... तो आला कि सगळेच गप होतात... " सखा म्हणाला. पुढची २-३ मिनिटे तो झाडावर बसून होता. टेहळणी केली आणि आला तसा निघून गेला. केवढा तो रुबाबदार पक्षी.. डोळ्यात मावणार नाही असं त्याचं रूप.. तो गेला , तसे सगळे अजून पुढे आले.


"तुला पावसाचं सुद्धा कळत असेल ना सखा... " आकाशने विचारलं.
" जास्त नाय.. पन कलत थोडं थोडं.. " ,
"मग आता येईल का पाऊस... " एका मुलाने विचारलं.
" ते तिथं ... वर जाऊन बघायला पाहिजे.. " सखाने एका ठिकाणी बोट दाखवत म्हटलं. त्या ठिकाणी एक मोठ्ठा दगड होता.
" तिथून ना... सगलं रान दिसतं... नदी दिसते... आजूबाजूची गाव दिसतात... छान वाटत तिथं... " आकाशने ती जागा बघून ठेवली. थोडयावेळाने सगळे खाली आले. चालून चालून भूक लागली. दुपारची जेवणं वगैरे आटपली. सुप्री जेवून बाहेर आली, तर तीच लक्ष आकाशकडे गेलं. आकाश गळ्यात कॅमेरा अडकवून , लंगडत लंगडत कुठेतरी निघाला होता.
" ओ.... मिस्टर A .. कुठे निघालात ? " सुप्री त्याच्याकडे धावत पोहोचली.
" फोटोग्राफी.... अजून काय येते मला.. ",
"अहो... पण पाय दुखतो आहे ना... ",
"चालते सगळं... " म्हणत आकाश पुढे निघाला. सुप्री त्याला बघत होती चालताना. काय मनात आलं तिच्या, तीसुद्धा त्याच्या मागाहून चालू लागली.

" अरे... तुम्ही कुठे निघालात.. " आकाश सुप्रीला बघून बोलला.
" तुमच्या पायाला लागलं आहे तरी निघालात... अजून काही झालं तर आम्हाला घरी कोण सोडणार....म्हणून तुमचा पाठलाग करते आहे. ",
"हो का... चांगली गोष्ट आहे मग... करा पाठलाग.. " दोघेच वरच्या बाजूला निघाले होते. थोड्यावेळाने एका जागी येऊन पोहोचले. सुप्री लगेच म्हणाली,
" अरे... सकाळी तर येऊन गेलो ना इथे ... परत कशाला आलात ? " आकाशने तिच्याकडे बघितलं...
" तुम्ही कधी पाऊस बघितला आहे का.. " आकाशचा प्रश्न...
" हा हा हा... nice joke .... खूप हसायला आलं... anyways.... हा प्रश्न होता कि joke.... " सुप्रीने उलटं विचारलं.
"सांगा तर... पाऊस बघितला आहे का कधी... ? " ,
"अरे हा काय प्रश्न आहे.... एवढे दिवस तर भिजतो आहे ना आणि घरी असली कि पण भिजते मी... ",
"भिजणं आणि बघणं... यात खूप फरक आहे मॅडम.. " ,
" हो का... गणूने कमी दिली असली ना तरी थोडी अक्कल आहे माझ्याकडे... म्हणे फरक असतो... " सुप्री वेडावत म्हणाली.
" चला मग... दाखवतो फरक... सखाने सांगितलं मगाशी... पाऊस येइल म्हणून... " आकाश, सखाने सकाळी दाखवलेल्या त्या मोठ्या दगडाकडे निघाला. मागोमाग सुप्री होतीच.


५ - १० मिनिटात ते पोहोचले त्या दगडावर. मोठ्ठा दगड होता तो. शिवाय वरही होता थोडा. सखाने सांगितल्याप्रमाणे , तिथून संपूर्ण जंगल दिसत होतं. नदी दिसत होती. " बसा खाली, पाऊस दिसेल आता... " दोघेही त्या दगडावर बसले. सुप्री आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत होती. आकाश फोटो काढण्यात गुंतला होता. १५-२० मिनिटे गेली असतील. " बघा...तुम्हाला पाऊस बघायचा होता ना.. समोर बघा.. " सुप्री मागे एक पक्षी आवाज करत होता, तिथे बघत होती. आकाश बोलला तसं तिने समोर पाहिलं. समोर नदीचं विशाल पात्र होतं. समोरून काळे ढग येताना दिसत होते. वाराही वाहत होता... काहीतरी वेगळंच होतं होते तिथे... सुप्रीने निरखून पाहिलं. ते ढग पुढे येत येत पाऊस पाडत होते. मधेच एखादी विजेची शुभ्र लकेर चमकून जात होती, त्या काळ्या ढगात... मधेच ती वीज पाण्यावर पडून त्यात विरघळून जात होती. सुप्री हरखून गेली. एकाच वेळेस दोन ऋतू दिसत होते तिला. ते बसले होते तिथे ऊन पडलं होतं. आणि समोर नदीवर ,दूर काळ्या ढगांची गर्दी झाली होती, पाऊस पडत होता. एका बाजूला मोकळं आभाळ आणि दुसऱ्या बाजूला सुंदर पाऊस... काय सुरेख नजारा होता तो. आकाशने फोटो काढून घेतले. सुप्रीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. आकाशने बघितले ते. काही बोलला नाही तो.


समोर पाऊस तसाच पडत होता. सुप्रीने डोळे पुसले. आकाशने रुमाल पुढे केला.
" झालं का रडून... कशाला एवढं इमोशनल व्हायचं... " आकाशने विचारलं.
" येते पाणी आपोआप.. " सुप्री सारवासारव करत म्हणाली.
" तुम्ही असं मनात नका ठेवू काही..... मनात ठेवलं ना कि असं बाहेर येते कधी कधी... " सुप्री गप्प होती. डोळ्यात पुन्हा पाणी साठलेलं. आकाशने बघितलं.
" चला... आता तुम्ही आजचा दिवस तरी बोलणार नाही कोणाशी... मी जातो खाली... तुम्ही या सावकाश, रडून झालं कि... " आकाश उभा राहिला..
" सॉरी... बसा खाली, मला काही share करायचे आहे तुमच्या बरोबर..... " आकाश पुन्हा खाली बसला. सुप्री शांत बसली होती.
" सांगायचे नसेल तर राहू दे... " आकाश उभा राहत होता.
" त्याचं नाव नाही सांगणार मी... पण होता कोण तरी माझ्या life मध्ये... माझ्या सारखाच होता.... जरासा वेडा, जरासा शहाणा... छान जमायचं आमचं, छान वाटायचं त्याच्यासोबत असताना... कॉलेज मधली ओळख. तेव्हा एकत्रच असायचो आम्ही..नंतर जॉबला लागलो तरी जवळपास रोज भेटायचो. तो माझी वाट बघत बसायचा. मग घरापर्यंत सोडायला यायचा. सकाळी ऑफिसला असले कि चॅटिंग करायचो. वीकएंडला तर फिरायला पण जायचो आम्ही. मस्त दिवस होते ते... ",
"मग आता नाही आहेत का ते दिवस.. ? " , आकाश..
" माहित नाही त्याला काय झालं अचानक... नकोशी झाली त्याला मी... बोलणं बंद केलं... मला भेटायचं बंद केलं..... चॅटिंग, कॉल.. सर्व बंद झालं अचानक... मी स्वतःहून मॅसेज केला तरच रिप्लाय करायचा... तोही थोडंच बोलायचं... कॉल केला तर बोलायचं कि जास्त बोलता येणार नाही... भेटणं तर बंदच झालं... खूप महिन्यांनी, गेल्या महिन्यात तो समोर आलेला... असाच अचानक समोर आला, माझ्या मैत्रिणी बरोबर बोलत होता, मला फक्त एकदाच "Hi " केलं, त्यानंतर एकदाही माझ्याकडे बघितलं नाही. काहीच न बोलता निघून गेला समोरून... माझं नक्की कुठे चुकलं ते अजून पर्यंत कळलं नाही मला... त्यालाही अशी निसर्गाची आवड आहे... आम्ही फिरायला जायचो ना ... समुद्रकिनारी, पावसात.... तेव्हा तो पण असे फोटो काढायचा... माझे पण फोटो काढायचा गुपचूप... म्हणून हे असं काही बघितलं कि त्याची आठवण येते मला...मला माहित आहे, त्याच्या life मध्ये मी आता कुठेच बसत नाही... यातून खूप प्रयन्त करून बाहेर आले मी... पण अशी आठवण आली कि येते डोळ्यातून पाणी... " हे बोलताना सुप्री डोळे पुसत होती.


आकाशने ऐकून घेतलं. " हम्म ... तर हा प्रॉब्लेम आहे... भूतकाळ.... आता मी काही philosopher नाही, पण मला एवढं कळते कि एखाद नातं तुटलं कि काय वाटते मनाला... तो अचानक का निघून गेला किंवा तुमचं काही चुकलं... ते मला माहित नाही. तुम्हीच बोलला ना, कि त्याच्या life मध्ये मी कुठेच बसत नाही... मग तुम्ही तरी कशाला ते भूतकाळाचं ओझं मनावर घेऊन फिरता... भूतकाळाला कुरवाळत बसलं ना, कि तो पाळीव होतो... जसे पाळीव प्राणी असतात ना अगदी तसाच.... मग आपण जिथे जाऊ ना.. तिथे तो आपल्या मागून येतो... जीवन बघा किती सुंदर आहे.. " आकाश समोर बघत म्हणाला.. " अश्या सुंदर जीवनात कशाला असं काही मागे लागून घेयाचं... त्यापेक्षा, भूतकाळ अनुभवासाठी आठवावा.. भूतकाळात केलेल्या चुकांपासुन शिकायचं. भूतकाळाला बँकेच्या ATM सारखं बघावं... म्हणजे एखाद्या प्रसंगात अनुभवाची गरज भासल्यास, पाहिजे तेवढा अनुभव ATM card, swipe करून काढून घेयाचा... उरलेल्या अनुभवाचे व्याज बँकेत जमवून ठेवावं. ते नंतर उपयोगी पडतेच. काय .... समजलं ना ,सुप्री ma'am .... " आकाशने बोलणं संपवलं... सुप्री हसत हसत डोळे पुसत होती. छान समजावलं आकाशने तिला.


"मलाही फोटो काढायला शिकवाल का... माझ्या मनात आहे खूप फोटोग्राफी शिकायचं... " सुप्रीने विषय बदलला.
"शिकवीन.. पहिलं शहरात जाऊ... मग शिकू खूप काही...आता चला खाली ,नाहीतर सगळे शोधत राहतील... " आकाश उभा राहिला...
" एक प्रॉमिस करा... हे कोणालाच सांगायचं नाही हा... संजनाला सुद्धा नाही... " सुप्री म्हणाली.
" असं आहे तर... निदान तिला तरी सांगायचं ना.. after all, ती तुमची जवळची मैत्रिण आहे. " चालता चालता आकाश सुप्रीला म्हणाला.
" माझ्यापेक्षा तिला सांगितलं असत तर जास्त छान झालं असतं .. ",
" सांगेन तिला... काय माहित, पण तुम्हाला सांगावस वाटलं... चालेल ना... मी share केलेलं तुमच्या सोबत... ",
"हो.. नक्की.. चला आता पटपट खाली जाऊ... " आणि दोघे खाली आले.
सुप्री बऱ्यापैकी नॉर्मल झालेली. खाली आल्या बरोबर ती तिच्या मैत्रीणीबरोबर गप्पा मारायला गेली. आकाश त्याने काढलेले फोटो बघत बसला. छान छान फोटो होते सगळे... अचानक एका फोटोवर त्याची नजर खिळली. सुप्रीचा फोटो होता तो. मघाशी पाऊस बघतानाच फोटो.. तिला कळू न देता त्याने क्लिक केलेला. किती छान हसते हि... स्वभाव सुद्धा छान आहे... पण जरा भूतकाळात हरवली आहे. त्यातून बाहेर आली तर खूप छान होईल. आकाश किती वेळ तिचा फोटो बघत होता. Actually, त्याला सुप्रीचा स्वभाव आवडायला लागला होता. गेल्या महिन्यात, त्या ऑफिसच उदघाट्न होतं, तेव्हापासूनची ओळख फक्त... काही लोकं चटकन मनात घर करून राहतात. त्यातलीच एक सुप्री.... आकाशला तिच्या बरोबर बोलायला आवडायचं. फक्त तो कधी असा कोणाशी मोकळेपणाने बोलला नाही आधी कधी.


इथे सुप्रीला सुद्धा आकाशची सोबत आवडायला लागली होती. बऱ्याच वेळा तीच आकाशची विचारपूस करायची. त्याच्या सारखं वागायला बघायची. त्याचं फिरण्याचं वेड, विचार करण्याची पद्द्त तिला आवडायची. फक्त तो कमी बोलायचा हे तिला खटकायचं... तरी गेल्या काही दिवसांपासून जी भटकंती सुरु होती, तेव्हा पासून खुप बदलली होती ती. आकाश छान समजावयाचा तिला. म्हणून आजकाल जास्तच आनंदी राहायला लागली होती.


दुपार होऊन संध्याकाळ झाली. आकाशने request करून त्याच्या पायाची मलमपट्टी काढायला सांगितली. आता त्याचा पाय अगदी बरा झाला होता. सखाला विचारून त्याने पुढचा रस्ता देखील बनवला होता. उद्या सकाळी निघायचे म्हणून सगळ्यांची तयारी झाली होती. इथे दोन दिवस कसे गेले, कळलंच नाही. त्या पाड्यातील रहिवाश्यांना सुद्धा खूप मज्जा आली या शहरी पाहुण्यांबरोबर... आता उद्या सगळे जाणार म्हणून एक छोटी "पार्टी" त्यांनी आयोजित केली. छानपैकी जेवण केलं होतं. त्यानंतर मोठी शेकोटी रचून त्या भोवती त्याचे आदिवासी नृत्य करू लागले, त्यांची गाणी म्हणू लागले. त्यात या शहरी पाहुण्यांना सुद्धा सामील करून घेतलं. आकाश फोटो काढत होता.. पाय आताच बरा झाला म्हणून त्याला कोणी नृत्यासाठी आग्रह केला नाही. पाऊस नव्हता तरी थंड हवा वाहत होती. वर आभाळात चांदण्या चमकत होत्या. आणि खाली शेकोटी भोवती, छान फेर धरला होता सगळ्यांनी.. आकाश खूप आनंदात होता... मनोमन हसत होता. enjoy करत होता. सुप्री नाचत होती... आकाशला हसताना बघून तिला आनंद झाला. आकाश सुप्रीकडे हळूच बघत होता... किती उत्साहाने नृत्य करत होती... भूतकाळाच ओझं दूर फेकून दिल्यासारखी वाटत होती... सगळेच छान... रात्री उशिरापर्यत "पार्टी" चालू होती. नाचून नाचून दमलेले सगळे पटकन झोपून गेले. सकाळी लवकर निघायचे आहे, हे आकाशने आधीच सांगून ठेवलं होतं.


पुढचा दिवस, कोंबडयाच्या अरवण्याने तो आदिवासी पाडा जागा होत होता. प्रथम आकाश जागा झाला. त्याला एक वेगळीच झोपडी दिली होती झोपण्यासाठी... दोन दिवसांत पहिल्यांदा तो एवढ्या पहाटे जागा झाला होता. सकाळचे ७ वाजले असतील. अजूनही सूर्य देवाने दर्शन दिले नव्हते. आकाश झोपडी बाहेर आला. धुकं पसरलेलं होतं. अगदी वेगळंच द्रुश्य.... धुकं जमिनीलगतच राहिलं होतं. जणू काही हि झाडं, झोपड्या ढगांच्या वर तरंगत होती... काय एक-एक चमत्कार असतात ना निसर्गात... आकाशने पटकन कॅमेरा काढला आणि फोटो क्लीक केला. अजून पुढे गेला थोडा, एका झाडाच्या फांदीवर एक पक्ष्यांचं जोडपं एकमेकांना बिलगून बसलं होतं. कदाचित यांची पहाट अजून झालेली नाही. तो क्षणही त्याने कॅमेऱ्यात टिपला. येणाऱ्या वाऱ्यासोबत ते पायाखालचे धुकं हलायचं.. एक वेगळीच लहर उठायची तिथे, अगदी समुद्रात येणाऱ्या लाटांसारखी. आकाश त्या धूक्यातुन वाट काढत जात होता. आजूबाजूची मंडळी अजून गाढ झोपेत होती,कोंबडा आरवला तरी. थंड वातावरण होते ना तिथे.... आकाशच्या मनात काय आले कोणास ठाऊक... तो त्या दगडाच्या दिशेने निघाला. छान फोटोज मिळतील तिथून सकाळचे, असा विचार करत तो झपझप चालत निघाला. धुक्यातून वाट काढत आकाश तिथे पोहोचला, तर तिथे आधीच कोणीतरी बसलं होतं. दुरुनच बघितलं त्याने. निरखून बघितलं.. सुप्री !!! कमाल आहे... प्रत्येक वेळेस वेगळीच भासते हि... कुठेतरी एकटक बघत होती... चेहऱ्यावर कमालीचं समाधान होतं तिच्या ... त्यात तिच्या आजूबाजूनी धुकं वाहत होतं... वेगळीच वाटली आकाशला ती.... फोटोत साठवण्यासारखा क्षण... क्लीक केला त्याने. हळूच तिच्या मागे जाऊन उभा राहिला.


" बसू का इथे... if you don't mind... " आकाशने विचारलं.
" हो... हो, बसा ना... " सुप्री म्हणाली....
" एवढ्या सकाळी सकाळी... तेही एकट्याच... भीती नाही वाटत का... आणि डोळ्यात पाणी नाही आज... कि झालं रडून .... " आकाश सुप्रीकडे बघत म्हणाला. सुप्रीला हसायला आलं त्यावर..
" नाही... कशाला रडायचं... भूतकाळ पाळीव करू नये, असं कोणीतरी म्हणालं मला. पाळीव प्राणी तसे पण मला नको असतात मागे मागे " सुप्री छान बोलली.
" हो का... पण एकट्या काय करत आहेत इथे.. ",
"अशीच आली... कोणी उठलं नव्हतं ना... मग हि जागा आठवली, बसली येऊन... छान वाटते ना इथे.. धुकं पसरलं आहे.. एवढया उंचावरून सगळं कसं छोटं छोटं वाटते ना... Like top of the world... " बोलता बोलता सुप्रीला शहारल्यासारखं झालं.
" very nice thoughts.... पण मला एवढया उंचीवर आलं कि आपली खरी किंमत कळते. आपण केवढेसे आहोत , आपली जागा किती शुल्लक आहे या निसर्गात याची जाणीव होते. " आकाश म्हणाला.
p" किती वेगळे विचार आहेत तुमचे... या जगातले वाटतच नाही तुम्ही... " दोघेही मनापासून हसले. पुढे १५-२० मिनिटे गप्पा चालू होत्या त्यांच्या.


७.३० वाजले तसा आकाश बोलला. " निघायचे आहे ना आपल्याला... चला खाली जाऊ... सखा बोलला आहे ना, पुढल्या गावात वाहन मिळेल शहरात जाण्यासाठी...आजच भेटलं तर खूप बरं होईल... " ते ऐकून सुप्री हिरमुसली.
" तुम्ही लक्षात तरी ठेवाल ना आम्हाला... कि विसरून जाणार आम्हाला... मिस्टर A ... " ,
"नाही विसणार ... आणि तुम्हाला तरी नाही विसणार कधी.... चला आता " दोघे निघाले..
" तुम्ही काढलेले फोटोज तरी दाखवा.. किती फोटो काढलेत ,एक पण नाही दाखवला.. " आकाशने कॅमेरा सुप्रीकडे दिला.. एक -एक फोटो एवढे छान होते... सुप्री हरखून गेली... काहीतरी वाटलं तिला... हि फोटोग्राफीची style तर एकाशी खूप जुळते.... आकाश... एकदा तिने त्याकडे बघितलं... पुन्हा फोटो बघू लागली. तिचाच फोटो समोर आला तिच्या. फोटोत तर कित्ती वेगळी दिसत होती ती. स्वतःचा फोटो बघून , स्वतःच्याच प्रेमात पडली ती.. एवढी छान दिसते मी..
" कधी क्लिक केलात.. समजलंच नाही मला ...",
" फोटो अजाणतेपणी काढले ना कि ते original expression मिळतात, असे फोटो नेहमी छान असतात... त्यात तुमचे फोटो छान येतात, माझी काहीच creativity नाही त्यात... so thank you.. " आकाश म्हणाला.
" मी थँक्स बोललं पाहिजे... आज वेगळ्याच सुप्रीला बघितलं मी तुमच्यामुळे... थँक्स... " बोलता बोलता ते खाली आले.
" तुमचं नावं कधीच कळणार नाही का मला... " सुप्री थांबत म्हणाली.
" मिस्टर A.. ",
" खरं नावं... " ,
" सांगेन पण कोणाला सांगायचं नाही... ",
"प्रॉमिस !!! " तसं आकाशने त्याच्या कॅमेराच्या बॅगमधून एक कार्ड काढलं.. सुप्री समोर धरलं...
" A फॉर आकाश... " आकाश हसत म्हणाला. आणि कॅमेराकडे बोट दाखवत निघून गेला...


कार्डवर पण तेच नावं, तेच मॅगझीनच नांव.... सुप्रीला आनंदाचा मोठा धक्का बसला. तोंडावर हात ठेवून कसं express होयाचे तेच समजत नव्हतं तिला. एवढे दिवस ज्याला भेटायचा प्रयन्त करत होती, तोच आकाश त्यांच्यासाठी शहरात जाण्याची वाट शोधत होता. त्याने काढलेले फोटो बघून त्याची एक वेगळी प्रतिमा सुप्रीने मनात बनवून ठेवली होती. तसाच नाही पण एक वेगळा,त्याहून चांगला आकाश तिला भेटला होता. amazing feeling होतं ते.... काहितरी सापडल्यासारखं ... सुप्रीला अजून विश्वास बसत नव्हता.


थोडयावेळाने सगळे जागे झाले. निघायची तयारी झाली. सखा तयारीत होता. सगळ्या ग्रुपनी त्या लोकांचा निरोप घेतला. आणि निघाले पुढच्या प्रवासाला. आकाश ,सखा सोबत पुढे होता. सुप्री त्याच्याकडेच बघत होती चालताना... वेगळ्याच खुषीत होती. संजनाला समजलं ते.
" काय गं... काय झालं... एवढी खूष का आहेस ... ",
"असंच... ",
"सांगतेस का आता " संजनाने परत विचारलं..
"असंच तर... एक ख़ुशी कि किमत तुम क्या जानो संजना बाबू... " दोघीही हसायला लागल्या. पुढच्या अर्ध्या तासात, सखा त्यांना एका ठिकाणी घेऊन आला.
" ते दूरवर मंदिरं दिसतं का तुमाला... " आकाश , सखा दाखवत असलेल्या दिशेने बघू लागला. दूर एका मंदिराच्या कळसाच्या बाजूला असलेला झेंडा दिसत होता.
" हो... दिसलं मंदिर... " ,
"हा.. तिथंच तो गाव सुरु व्हतो.. तीत तुमाला गाडी मिलेल .. शहरात जान्यासाठी... " ,
"खूप छान... पण ते तर खूप लांब वाटते... म्हणजे किती वेळ लागेल... माहिती आहे का तुला... " ,
"वेळ नाय माहित... पटपट चाललात ना तर दुपारची उन्ह उतरली कि पोहोचाल तुमी... " ,
" नदी वगैरे नाही ना या वाटेत.. " ,
" हाय... पन त्याबाजूला हाय... इथून सरल रान फक्त वाटेत... नाकासमोर चालत जा... बराबर जाल तीत.. म्या याच्या पुढं जावू सकत नाय ना ... नायतर म्याच आलू असत गावापर्यंत... " आकाशला समजलं ते. प्रत्येकाची वेस असते, सीमा असते. त्या बाहेर सहसा जात नाहीत हे.
" सखा .... खूप मदत झाली तुझी... खूप आभारी आहे तुमच्या सर्वांचा... जमलं तर येईन पुन्हा तुला भेटायला... आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला... " सगळ्यांनी सखाचा निरोप घेतला आणि निघाले त्या गावाकडे...

============================= क्रमश :

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED