Paris - 9 books and stories free download online pdf in Marathi

पॅरिस - ९

बीच-बेबी-बीच- एट्रीटात- ११ मे, २०१८

पॅरिसला निसर्गाची, सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण आहे, .. पण समुद्र किनारा नाही. फ्रेंच रिव्हिएरा .. जेथे जगप्रसिद्ध फॉर्मूला-वन कार रेसेसचा मोनॅको ट्रॅक आहे तेथील बीचेस खूपच प्रसिद्ध आहेत पण एक तर तिथे जाणे आणि रहाणे अती महागडे आहे आणि तेव्हढा वेळही हातात नव्हता. पण दुसरा पर्याय होता तो म्हणजे एट्रीटातचा. परिसपासून साधारणपणे २५० कि.मी. वर वसलेले हे छोटेसे पण सुंदर हार्बर. मायाजालावर फोटोबघून इथे जायचेच हे आधीच ठरवले होते. पॅरिसवरुन इकडे जायला ट्रॅव्हल बसेस आहेत. ४-५ तासाचा प्रवास होता. बसचे बुकिंगही आधीच करून टाकले होते.

फॉरेनचे बीचेस आणि ते पण उन्हाळ्यात म्हणल्यावर 'मन मै लड्डू' वगैरे फुटत होते. काय काय बघायला मिळेल ह्या विचाराने मनात गुदगुल्या होत होत्या. पण सकाळी आवरायला उठलो आणि बाहेरचे दृश्य बघून सर्व विचारांवर अक्षरशः पाणीच पडले. बाहेर जोरदार पाऊस सुरु होता. आधीच थंडी, त्यात पाऊस त्यामुळे जाम गोठून गेलो होतो. खास-बीचसाठीचे कपडे असू देत बरोबर म्हणून बॅगेत भरले आणि अंगावर दोन जाड टी-शर्ट्स, कानटोपी, त्यावर पावसाळी जाड जर्किन, छत्री वगैरे सामान घेऊन बाहेर पडलो.

बसचा स्टॉप १-२ कि.मी. लांब होता. पावसातून रस्ता तुडवत बसस्टॉपवर येऊन थांबलो. थंडी सहन होत नव्हती, कधी एकदा बस येतीय असं झालं होतं. शेवटी एकदाची ती लांबलचक व्होल्वो येऊन थांबली आणि आम्ही पटकन आत शिरलो. फ्री वायफाय, फोन चार्जिंगची सोय, बाथरुम वगैरेची सोय बसमध्ये होती. ह्यावेळी बसमध्ये खाण्यापिण्यावरही बंधन नव्हती. मस्त कोझी-कोझी वाटत होते. सगळे प्रवासी भरल्यावर बस एट्रीटात कडे मार्गस्थ झाली.

ह्यावेळचा सगळा रस्ता कंट्रीसाईडचा होता. भुरभुरणारा पाऊस, कडेने दिसणारा हिरवेगार डोंगर, रस्त्याच्या कडेने भरपूर शेती, विविध रंगाच्या फुलांचे ताटवे ह्यामुळे खिडकीतून बाहेर बघत छानच वेळ जात होता.

साधारणपणे ३ तासाच्या प्रवासानंतर हायवे सोडून बस एका छोट्या रस्त्याने आत वळली. एव्हाना पाऊस नावापुरता का होईना उघडला होता. ह्या छोट्याश्या रस्त्याचा प्रवास तर अधिकच सुंदर निसर्गाने नटलेला होता. बाहेरील दृश्य नजरेत साठवायला सुद्धा अशक्य होत होते. पुन्हा एकदा विचार मनात आला, काय पुण्य केलं असेल इथल्या लोकांनी मागच्या जन्मी, कि ह्या जन्मी त्यांना इथे, इतक्या सुंदर ठिकाणी राहायला मिळाले. म्हणायला हा परिसर खेडेगाव प्रकारातला असल्याने सर्व काही छोटे छोटे पण सुबक आणि सुंदर होते. छोटी घर, छोटीशी कुंपणं घातलेली शेत, लायब्ररी, चर्च, शाळा, प्लेग्राऊंड्स.. सगळंच मनाला भावणार.

तासाभरानंतर आम्ही एकदाचे एट्रीटात मध्ये पोहोचलो. पाऊस पूर्णपणे थांबला होता, पण सूर्य अजूनही ढगांच्या आडच होता. आम्ही बसमधून उतरुन जवळ जवळ उद्या मारतच बीचच्या दिशेने धावलो. थोडासा उंचवटा चढलो आणि समोर अथांग पसरलेला निळाशार समुद्र नजरेस पडला. स्वच्छ निळे पाणी, ज्यासाठी एत्रितात प्रसिद्ध आहे ते पांढऱ्या शुभ्र खडकांचे डोंगर आणि त्याला जणू मोजून मापून कोणीतरी मुद्दाम कोरून कापून काढले असतील असे कमानी. इथला समुद्रही अगदी फॉरेनचे इटिकेट्स पाळताना दिसत होता. लाटांचाही आवाज अगदीच हळुवार.. लाटा सुद्धा अगदी नजाकतीने किनाऱ्यावर येऊन धडकत होत्या. भारतातला गरजणारा, कधी रौद्र भासणार, दुरवरही लाटांची गुंज ऐकवणार समुद्र पाहण्याची सवय असणाऱ्या आम्हाला, हा समुद्र अगदीच विरोधाभास होता.

खरंच, इथे फोटो टाकू शकलो असतो तर अधिक बाहेर झाली असती, पण तुम्ही जरूर गुगल वर etretat सर्च करून फोटो बघा.

केवळ निशब्द करणारं ते दृश्य होतं. दुसरी गम्मत म्हणजे, इथे बीचवर वाळू नावाचा प्रकारचं नव्हता, तर सर्व किनारा हा रंगेबिरंगी, गुळगुळीत छोट्या-मोठ्या दगडांनी भरलेला होता. कडेलाच मोठ्या पाटीवर हि दगडं उचलून न्हेऊ नयेत अन्यथा दंड होईलची पाटी होती. अर्थात इतक्या सकाळी कोणी सरकारी अधिकारी दिसत नव्हता, त्या दगडांचा मोह सोडवत नव्हता, तेव्हढीच एक आठवण म्हणून छोटे १-२ रंगीत दगड पटकन खिश्यात टाकलेच .. भारतीय मेंटॅलिटी दुसरं काय!

झपाटल्यासारखे फोटो काढले अख्खा ३-४ कि.मी.चा बीच पायी हिंडलो. अर्थात ते 'मन-मै-लड्डू' काही कुठे दिसले नाही आणि त्याला कारणही तसंच होते. इतक्या प्रचंड गारठ्यात बिकिनीवर फिरणे म्हणजे स्युसाईडचाच प्रकार होता. भरपूर पायपीट करून एका ठिकाणी बसकण मारली आणि स्वातीताईने एक आनंदाचा धक्काच दिला. तिने चक्क पॅरिसमधून सामोसे मिळवले होते. भारतापासून इतक्या दूर, अश्या आड बाजूला, समुद्रकिनारी सामोसे म्हणजे व्वाहच होते. जिओ स्वातीताई !

छानशी विश्रांती झाल्यावर पुन्हा उठून चालायला लागलो. मुख्य गावातून शेजारच्या डोंगरावर जायला पाऊण-एक तासाचा छोटा ट्रेक होता. व्यवस्थित पायऱ्या असल्याने आम्ही वरती जायचे ठरवले. चढायला सुरवात केल्यावर सुरुवातीला मज्जा आली, पण हळू हळू दम लागायला लागला. बरोबरीने अनेकजण होते, अगदी साठीच्या पुढचे काही फ्रेंच आजोबाही. मग मध्येच थांबत, फोटो स्टॉप घेत एकदाचे वर पोहोचलो. वरून दिसणारा नजाराही अप्रतिमच होता. एव्हाना सूर्यमहाशय ढगांच्या बाहेर पडले होते. हवेतला तो गडद करडा प्रकाश जाऊन स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता. निळ्या आकाशने समुद्राच्या पाण्याची निळाई अजूनच खुलून आली होती.

कुठेही फेरीवाले नाहीत, गल्लोगल्ली दुकान नाहीत, रस्त्याने कचरा नाही, कसला गोंधळ नाही .. मन अगदी प्रसन्न होऊन गेले होते. डीएसएलआर, गोप्रो, मोबाईल, टॅब सगळ्यातून डझनाने फोटो काढून समाधान झाल्यावर शेवटी विसावलो. डोंगरमाथ्यावर एक पुरातन काळातले चर्च होते, पण बंद असल्याने आत जात नाही आले. काही प्रेमी युगुलांची मनसोक्त चुम्मा-चाटी चालू होती.

थोडं अजून बसू, थोडं अजून बसू, करत चांगला तासभर गेला आणि मग आम्ही दुसऱ्याबाजूने उतरायला सुरुवात केली. इतकं लोकप्रिय ठिकाण असूनही गावात मात्र फारशी गर्दी नव्हती. म्हणजे लोकं इथं राहतात कि नाहीअशी शंका यावी इतपत गर्दी कमी होती. वाटेत दिसलेलं स्मशानही इतकं सुंदर आणि आकर्षक वाटत होतं, कि वाटलं जाऊन बसावं आतमध्ये शांतपणे. वाटेत एक छानशी बाग लागली होती, इंटरनेटवर त्याचे फोटोही मस्त दिसले, पण तिकीट फारच होते, १२ युरो, अर्थात साधारण पर माणशी ९६० रु. ४-५ हजार रुपये फक्त बागेत घालवायला अर्थातच श्रीमंती वाहून जात नव्हती, सो नाईलाजाने निघून आलो


खाली गावात पोहोचल्यावर काहीबाही खरेदी केली. एकेठिकाणी विविध रंगाच्या आकर्षक म्हाताऱ्या अर्थात बूढ़ी-के-बाल मिळत होते ते खाल्ले आणि मग पेटपूजा करायला रेस्तरॉं मध्ये शिरलो. पास्ता, गरम गरम पिझ्झा, हॉट चॉकोलेट पोटात ढकलल्यावर अधिक हुशारी आली

ऊन पडलेलं बघून एव्हाना लोक बीचच्या दिशेने निघालेली दिसत होती. नाही म्हणायला अगदीच लड्डू नाही पण बाकरवड्या तरी फुटल्याचा. दुधाची तहान ताकावर.. दुसरं काय. आमची परतण्याची वेळ येत चालली होती, त्यामुळे पुन्हा बीचकडे जायला कदाचित उशीर झाला असता, आणि पायही दुखायला लागले होते. त्यामुळे स्टेशनच्या परिसरातच थोड शॉपिंग करत फिरलो. तिथे फिरत असतातानाच एक साधारण पंचविशीतली तरुणी, सडपातळ बांधा, साधारण ५.६" उंच, गोरीपान, सोनेरी केस नीट पोनी बांधलेले, डोळ्यावर मोठ्ठा गॉगल, अंगात टाईट फिटिंगचा पांढरा शर्ट, काळी लेदरची टाईट पँट घातलेली पार्किंगमध्ये जाताना दिसली.

बघूया कुठली गाडी काढतोय म्हणून मी ही पार्किंग पाशी गेलो, तर मॅडम डायरेक्ट एका व्होल्वो मध्ये चढल्या आणि एकदम स्टाईल मध्ये सफाईने ती मोठ्ठी बस पार्किंगच्या बाहेर काढली.

"इथे अगदी नॉर्मल आहे, अनेक तरुणी इथे बस चालवतात", स्वाती ताईने माहिती पुरवली..

पुन्हा एकदा.. आपला जन्म इथे का नाही झाला म्हणून नशिबाला शिव्या घालून आमच्या बसच्या दिशेने निघालो.

नशिबाने हवामानाने साथ दिली होती. निघताना जसा पाऊस होता, तसा पाऊस लागला असता तर २०-२२ हजार पाण्यातच गेले असते. त्या उंच टेकाडावरील चर्चला नमस्कार करून मनोमन आभार मानले आणि बसमध्ये चढलो.

[ क्रमशः ]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED