Paris - 5 books and stories free download online pdf in Marathi

पॅरिस – ५

बेल्जीयम वरून पॅरिसला परत येताना, सकाळपेक्षा हायवे-वर वाहतूक अंमळ जास्त होती, पण अर्थातच कुठेही घाईगडबड नाहीच. ओव्हरटेकिंग नाही की होंकिंग नाही. शेजारी पसरलेल्या विस्तीर्ण शेतांमध्ये सधन शेतकरी आपली अवजड वाहन चालवत शेतातली कामं करत होती. सूर्याची तिरपी, कोमल किरणं मस्त गोल्डन लाईट पसरवत होती. बसमध्ये खायला परवानगी नव्हती, पण ऐकू तर आपण भारतीय कुठले. एकेठिकाणी थांबलेल्या मॉल वर काही वेगळ्याच चवीचे चिप्स आणि कुकीज घारेदी केल्या होत्या त्या खुणावत होत्या. आजूबाजूची जनता घोर झोपेत मग्न होती. मग हळूच पिशवीत हात घालून एक एक गोष्टी काढून, आवाज न होऊ देता चर्वण चालू केले.

पॅरिसमध्ये शिरुन अर्धा-पाऊण तास होऊन गेला आणि अचानक समोर दिसला तो लांबलचक पसरलेला चॅम्प्स एलिसिस (Champs-Élysées) मार्ग...

जे लोक सायकलींग स्पोर्ट्स चे किंवा सायकलींची जगप्रसिद्ध रेस 'टूर-दी-फ्रांस' चे चाहते आहेत, त्यांना 'चॅम्प्स एलिसिस' काही नवीन नाही. 'टूर-दी-फ्रांस' रेसची पॅरिसमधील ज्या ठिकाणी सांगता होते, जेथे बक्षीस समारंभ होतो, हाच तो रस्ता.

ह्या रस्त्यावर काय नाही?

साधारण २ किलोमीटरचा हा रस्ता फिरण्यासाठी तर खूपच छान आहे. आजूबाजूला अनेक ब्रँडेड कंपन्यांची दुकानं आहेत. खरेदीची आवड असेल आणि खिश्यात बक्कळ पैसा असेल तर इथे शॉपिंगसाठी भरपूर वाव आहे.

H&M, Louis Pion, Gap, ZARA,Tiffany & Co.,BOSS,Tissot, Victoria Secret अश्या अनेक नावाजलेल्या ब्रॅंड्सची दुकान तर आहेतच, शिवाय लंडन आय सारखं मोठ्ठ 'Big Wheel' आहे, लिडो कॅब्रे आहे (त्याबद्दलही, पुढच्या एखाद्या भागात सविस्तर लिहिणार आहेच), पॅरिसीयन टच असलेल्या खास खाद्य-पदार्थांची रेलचेल आहे, तरुणाईने अखंड खळाळून वाहणारा उत्साह आहे, दुसऱ्या टोकाला 'आर्क-द-ट्रिओम्फ' (Arc De Triomphe) आहे.

पॅरिसला पोहोचेपर्यंत ८.३० वाजून गेले होते. पण मस्तपैकी ऊन असल्याने आजूबाजूचा परीसरही फिरुन घेतला. Arc the triomphe, Place de la Concorde square बघितला. पॅरिस मध्ये Eiffel tower नंतर Arc the triomphe आणि त्यासमोरचा हा रस्ता सर्वात जास्ती फोटो काढण्यात येत असलेला परिसर आहे.

Big Wheel

[Arc de Triomphe]

Arc De Triomphe

वर म्हणल्याप्रमाणे, कितीही छोटी ट्रिप असली तरी आयफेल-टॉवर पाठोपाठ आर्क-द-ट्रायोम्फला प्रवासी भेट देतातच. French Revolutiona आणि Napoleonic Wars च्या काळात फ्रांस चे जे सैनिक धारातीर्थी पडले त्यांच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ सन १८०६-१८३६ मध्ये, नेपोलियनच्या पुढाकाराने आर्क-द-ट्रायोम्फची उभारणी करण्यात आली. त्याकाळी फ्रेंच सैन्याला 'Grande Armee' म्हणून संबोधत असत. १८०५ मध्ये जेंव्हा 'Grande Armee'ने युरोपचा बहुतांश भाग जिंकून घेतला होता आणि जेंव्हा फ्रेंच आर्मी जवळ जवळ अपराजित म्हणूनच गणली जात होती तेंव्हा, Austerlitz वरील विजयानंतर नेपोलियन त्याच्या सैन्याला म्हणाला होता -
“You will return home through archs of triumph”

आर्क-द-ट्रायोम्फला आतल्याबाजूने साधारण २५० पायऱ्या आहेत, त्या चढून वरती जाता येते

Louvre museum

पूर्वीच्या कुठल्याश्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेकांनी लूव्हरे-म्युझियमचा असा फोटो बघितला असेलच.

[Louvre museum]

जगप्रसिद्ध मोनालिसाचे लिओनार्डो डाव्हिंसी ने चितारलेले पेंटिंग ह्याच म्युझियममध्ये पहावयास मिळते.

एकेकाळी राजवाडा असलेली ही भव्य वास्तू आज लूव्ह म्युझियम आहे. आतमध्ये प्रचंड गर्दी होती, एक तासाभराची तरी रांग नक्कीच होती. अर्थात मला म्युझियममध्ये फारसा उत्साह नसल्याने आम्ही आतमध्ये गेलो नाही .. मोनालिसाची भेट परत कधी तरी ..

लूव्ह म्युझियम ने जगभरातील कलाप्रेमींना भुरळ घातलेली आहे. जर्मनीचा हिटलरही त्याला अपवाद नव्हता. जर्मनीने जेंव्हा फ्रांस वर आक्रमण केले तेंव्हा हिटलरने लूव्ह म्युझियम ला भेट दिली होती. असं म्हणतात, जगविख्यात मोनालिसाच्या चित्रासमोर तो अर्धा तास खिळून उभा होता.

आपलं चित्र 'लूव्ह म्युझियम' मध्ये लावलं जावं अशी प्रत्येक कलाकाराची एक सुप्त इच्छा असते. क्रिकेट प्रेमींसाठी जसे 'लॉर्डस', तसे कलाप्रेमींसाठी लूव्ह म्युझियम म्हणायला हरकत नाही.
लाटूर, लिओनार्डो डाव्हिंसी, ले व्रुन, क्लोद, डेव्हिड, गेरिको, राफेल, वेरॉनिज, रुबेला अश्या अनेक whose-who कलाकारांच्या कलाकृती इथे पहायला मिळतात. इथे पेंटीग्स बरोबर अनेक आखीव-रेखीव शिल्प हि आहेत, त्यातील बहुसंख्य शिल्प रोमन साम्राज्यात आढळतात त्यासारखी- नग्न रूपातील पुरुष आणि बायकांची.

अर्थात मला मात्र भुरळ पडली होती ती ह्या काचेच्या मोठ्या पिरॅमिडची. काय विशेष होते त्या पिरॅमिड मध्ये? तसं म्हणलं तर काहीच नाही आणि तसं म्हणलं तर खूप काही.. कदाचित शब्दात नाही सांगता येणार. क्लोज शॉट्स, वाईड अँगल, उभे, आडवे सर्व तऱ्हेने ह्या पिरॅमिडचे फोटो मी कॅमेराने टिपून घेतले. खरं तर अधिक वेळ थांबून, अंधार पडल्यावर, आकाशात निळाई पसरलेली असताना आणि हा काचेचा पिरॅमिड दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेला असताना त्याच रुप डोळ्यात आणि कॅमेरात साठवून घ्यायला मला आवडलं असतं, पण दिवसभराच्या प्रवासाने आणि पायपिटीने सगळेच दमले होते, शिवाय, इथे उन्हाळा चालू असल्याने किमान १०.३० वाजेपर्यंत तरी सूर्यास्त व्हायची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे नाईलाजाने का होईना, तेथून बाहेर पडलो.

काही अंतरावरच बस-स्टॉप होता, आम्हाला हवी असलेली बस १.३० मिनिटात येईल असा तिथला साईन-बोर्ड सुचवत होता. पण माझं लक्ष वेधलं गेलं ते रस्त्याच्या शेवटी उभ्या असलेल्या भव्य 'ऑपेरा- हाऊस'. फारच सुंदर वास्तू होती ती. लगेच कॅमेरा काढला आणि क्लिक-क्लीकाट चालू केला, परफेक्ट अँगल मिळवण्याच्या नादात फुटपाथ सोडून किंचित रस्त्यावर उभं राहिलो होतो. आपली 'सब चलता' है वाली Indian मेन्टॅलिटी, दुसरं काय? आधी म्हणल्याप्रमाणे, इथल्या बसेस हायब्रीड होत्या, त्यामुळे बसच्या इंजिनाचा आवाजच नसतो, त्यामुळे मागून आलेली बस मला कळलीच नाही. अगदीच नाईलाज झाला असावा म्हणून ड्रायव्हरने हॉर्न वाजवला आणि मी दचकून बाजूला झालो.

हॉर्नच्या आवाजाने अर्थातच अनेक लोकांचे माझ्याकडे लक्ष वेधले गेले होते हे सांगायला नकोच. ड्रायव्हरने दोनचार शिव्या हासडतच बसचे दार उघडले. गृहपाठ विसरुन वर्गात शिरलेल्या पोरासारखा गपगुमान आतमध्ये शिरलो आणि एकदम मागच्या सीटवर जाऊन बसलो.

एव्हाना पोटात कावळे कोकलायला लागले होते.

पॅरिसला जातो आहेस .. तर क्रेप्स नक्की खा असे काही लोकांनी आवर्जून सांगितले होते. साधारण आपल्याकडच्या डोश्यासारखा दिसणारा हा पदार्थ, बटाटा भाजी ऐवजी चिकन, मटणच्या बरोबरीने अनेक स्वादिष्ट गोड पदार्थ जसे न्यूटेला-बनाना, चॉकलेट्सचे विविध सिरप्स, जेम्सच्या गोळ्या वगैरेंचा फिलिंग भरून मिळतो. अर्थात गल्लो-गल्ली क्रेप्स मिळत असले तरी, आम्ही जिथे राहत होतो तेथे एक चांगले क्रेप्सचं दुकान आहे असं स्वाती-ताईने सांगितले. मेट्रोने एक स्टेशन अलीकडे उतरुन थोडं चालावं लागेल इतकंच.

शेवटी हो-नै करता करता तयार झालो. मग पुन्हा बसमधून अर्ध्या रस्त्यात उतरून मेट्रोचा मार्ग धरला. पॅरिसची बहुतांश मेट्रो भूमिगत आहेत, किमान ७-८ जिने उतरुन खाली जावे लागते. पुन्हा पायपीट करत एकदाचे मेट्रो-स्टेशनला पोहोचलो. अर्थात इथे मेट्रोसाठी फारशी वाट पाहावी लागत नाही. मग एक स्टेशन अलीकडे उतरून, पुन्हा ७-८ जिने चढून वर आलो आणि काही १-२ पूल ओलांडून एकदाचे त्या दुकानापाशी पोहोचलो खरं, पण हाय रे दुर्दैव !, नेमकं ते दुकान बंद होते. त्या दिवशी सोमवारही नव्हता, आणि दुपारचे १-४ हि वाजले नव्हते .. तरी दुकान बंद म्हणजे काय?

चिडचिड झाली, पण पर्याय नव्हता. पाय ओढत ओढत पुढचे २ कि.मी. चालून एकदाचे घरी पोहोचलो

उद्याचा दिवस आम्ही प्लॅन केला होता सायकलिंग साठी, पण सद्य परिस्थिती बघता, एकूणच 'मैदान पर काले बादल छाये हुए है, बुंदाबांदी कि आशंका जताई जा रही है" चीच परिस्थिती होती. आधीच पायाचे तुकडे पडले होते, त्यात परत सायकलींग जरा अवघडच वाटत होते.

हवेत गारवा प्रचंड वाढला होता. पाय पण ठणकायला लागले होते. बरोबर काही रेडी-टू-कुक पंजाबी-कोल्हापुरी भाज्या न्हेल्या होत्या त्याच बनवल्या, फोटोंचा बॅकअप घेतला आणि मस्त जाड-दुलईमध्ये शिरलो...

[ क्रमशः ]

इतर रसदार पर्याय