टिक-टॉक .. टिक-टॉक .. टिक-टॉक …
घड्याळाचा काटा अती संथ गतीने पुढे सरकत होता. एअरपोर्ट वरच महागडं आणि बेचव खाण्यापेक्षा घरुनच मस्त पुरी-भाजी करुन न्हेली होती. ती खाल्ली, थोडं झोपायचा हि प्रयत्न केला, पण त्या खुर्चीत असं अवघडून बसून कितीशी झोप लागणार.? उगाच इकडे तिकडे टाईमपास फोटोही काढून झाले. मला असं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं असं निरीक्षण करायला वगैरे नै आवडत. लोकांना भारी आवडतं ब्वा हे व्यक्तीनिरीक्षण.
नेट वापरुन वापरुन फोनच्या बॅटरीने मान टाकली मग चार्जर घेऊन चार्जिंग पॉईंटपाशी जाऊन उभा राहीलो. तेथे जमलेल्या काही लोकांनी भारी शक्कल लढवली होती. स्मार्ट-फोन बरोबरच एक साधा कि-पॅड वाला फोन पण बरोबर ठेवला होता. भारी आयडिया.. त्याची बॅटरी २-३ दिवस सहज चालते.. कुठे अडायला नको बॅटरी संपली म्हणून. त्याच वेळी एक भयाण विचार माझ्या डोक्यात येऊन गेला. स्वाती-ताईचा, बायकोच्या बहिणीचा, पत्ता मी मोबाइलमध्येच ठेवला होता. पॅरिसला गेल्यावर बॅटरी संपली असेल तर? चार्जिंग पॉईंट्च नाही मिळाला तर? कुठे जायचं कुणाला माहीत. लगेच कागद-पेन काढलं आणि तो पत्ता आधी लिहून काढला.
मागच्या अमेरिकेच्या प्रवासात शिकलेली अजून एक गोष्ट म्हणजे आपला ‘एअरपोर्ट-लुक’ अगदीच साधा असावा. शक्यतो बेल्टची गरज भासणार नाही अशी पॅन्ट घालावी.. जॉगर्स वगैरे असेल तर बेस्टच, शूज शक्यतो साधेच. फ्लोटर्स बेस्टच. ह्याच कारण कि विशेषतः इंटरनॅशनल ट्रॅव्हलला सेक्युरिटी खूप कडक असते. बेल्ट काढावा लागतोच, पण शूजला मेटल असेल तर ते हि काढायला लावतात. त्यामुळे प्रत्येकवेळची हि कसरत टाळायच्या असतील तर ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. ती की-पॅड मोबाईलची आज ज्ञानात पडलेली भरच म्हणायची. म्हणतात ना, प्रत्येक प्रवास आपल्याला काही ना काही तरी नवीन शिकवत असतो..
चेक-इनची वेळ जवळ आली तशी काउंटरपाशी लगबग सुरु झाली, कर्मचारी वर्ग उपस्थित झाला होता, लोकांनी रांगा लावल्या होत्या. मग सामान उचलून आम्ही रांगेत जाऊन थांबलो.
महत्प्रयासाने 4 तास घालवल्यानंतर शेवटी एकदाचे चेक-इन आणि नंतर इमिग्रेशन सुरु झाले होते. काउंटरवरच्या त्या येडीने बोर्डिंग-पास देताना माती खाल्ली आणि आम्हाला दोन पुढच्या आणि दोन मागच्या रांगेत सीट्स मिळाले, अर्थात हे त्यावेळी बोर्डिंग पास वेळीच न तपासल्याची शिक्षा..
‘टीप नंबर फलाना फलाना, बोर्डिंग पास नीट तपासून घेणे.. ‘
आता पुढे अजून तीन तास होते, ड्युटी-फ्री दुकानांतून फिरण्यात बरा वेळ गेला आणि मग परत तंगड्या पसरुन खुर्चीत विसावलो.
एक एक मिनिट तासासारखा भासत होता आणि शेवटी एकदाचं त्या गेट मधून विमानाकडे न्हेणाऱ्या बसमध्ये शिरलो. कुठलं तरी एक कुटुंब अजून पोहोचायचे होते, त्यामुळे बस काही हालायचं नाव घेईना. वेळ होता म्हणून मग फेसबुक उघडलं, नेहमीचंच ‘ट्रॅव्हलिंग टु’, ‘विथ’, ‘फिलिंग एक्सायटेड’ वगैरे टाकलं, व्हॉट्सऍपवर मित्र मंडळींना गुडबाय पाठवले तरी बस काही जागची हलेना. शेवटी मोबाईल बंद करून टाकला आणि इकडे तिकडे नजर टाकावी म्हणून समोर बघतो तर काय… आश्चर्याचा मोठ्ठा सुखद धक्का बसला. समोर साक्षात ‘जॉन्टी रोहड्स’. पहिल्यांदा माझा विश्वासच बसेना, बरं असं विचारणार तरी कसं? एक जण सोडला तर बाकीचे सहप्रवासी काही बोलणं सोडा, पण कोणी बघत नव्हते. मग मी हळूच जरा जवळ सरकलो. तो काही तरी हार्दिक पंड्या बद्दल सांगत होता, मग मात्र माझी खात्री पटली. लगेच परवानगी घेऊन दोन चार फोटो काढले.
पण मला माझा फोटो त्याच्याबरोबर हवा होता, मग बायकोकडे मोबाईल देत मी म्हणालो.. ‘please click a perfect picture of us’
‘there is no such thing as perfect sir..’, Jonty
‘oh ofcourse there is, and you are the perfect example of being a perfectionist.. i still remember your runout of 92 worldcup..’.. मी माझं फाड-फाड कोकाटे इंग्लिश झाडत म्हणालो
‘by the way where are you headed?’
‘i’m going to the same place where you are.. this bus is taking us to the flight which will took us to the same destination.. Abu Dhabi’.. माझी फिरकी घेत तो हसत हसत म्हणाला
‘no, i mean from there?’
‘i am headed home.. to SA.. i was here for MI IPL meeting.. what about you?’
‘we are travelling to paris’
‘ahh Paris, excellent place.. happy holidays’
‘you already have made my holidays happy sir.. i will remember this day forever’
एव्हाना बस जागची हालली होती आणि काही वेळातच आम्ही विमानापाशी पोहोचलो. त्याला गुडबाय करून मी विमानात शिरलो. नेहमीचीच ती सेफ्टी-प्रात्यक्षिक झाल्यावर अखेर विमानाने अबुधाबीकडे प्रयाण केले. आमच्या प्रवासातला तो पहिला टप्पा होता. तेथून पुढे दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर अबुधाबीवरून पॅरिसला जाणारे दुसरे विमान पकडायचे होते. रात्रभर जागरण झाल्यामुळे झोप येत होती… बाहेर झुजमुंज व्हायला लागले होते, थोड्याच वेळात सूर्यप्रकाश येणार होता म्हणून मग खिडक्यांची दार लावून टाकली, दिवे बंद केले आणि मस्त ताणुन दिली. अर्थात हि निद्रित अवस्था फार काळ टिकली नाही. थोड्याच वेळात ब्रेकफास्ट आला. हवाई-सुंदरीने आपला आवाज शक्यतो नाजूक ठेवत ४-५ प्रयत्नांनंतर मला जागं केलं आणि ब्रेकफास्टचा तो ट्रे हातात कोंबुन पुढे निघून गेली.
प्रचंड चिडचिड मोमेंट..
पण खाणं तरी कसं सोडायचं? मग तो गरमागरम खाना खाऊन घेतला. फ्लाईट ३ तासांचीच असल्याने ह्यात काही इन्फो-टेनमेंट सिस्टीम नव्हती. पण अपेक्षेपेक्षा लवकर वेळ गेला. विमान जसं जसं खाली उतरू लागलं तसं अबुधाबीचे विशाल वाळवंटात उभारलेले एअरपोर्ट दिसू लागले. चांगले १५-२० मिनिटं आम्ही वेळेच्या आधी उतरलो होतो खरं, पण टर्मिनलला वेडी वाकडी वळणं घेत संथ गतीने पोहोचेपर्यंत बराच वेळ गेला.
अबूधाबीला ड्युटीफ्री मध्ये काहीतरी शॉपिंग करायचा प्लॅन होता, म्हणून वेगळी करंसी डॉलर्सच्या रूपात बरोबर ठेवलीही होती.. पण ती शक्यता धुसर झाली जेंव्हा विमानातून बाहेर पडल्यावर समोर इमिग्रेशनची मोठ्ठी रांग बघितली. नुसती जत्रा उसळली होती. त्यातच लोकांचं बेल्ट काढा, जॅकेट काढा, शूज काढा, मग परत पुढे जाऊन सगळ्या वस्तू गोळा करण्याचा सावळा गोंधळ चालू होता.
इंटरनॅशनल फ्लाईट्सचे चेक-इन ३ तास आधी सुरु होते, ह्याचा अर्थ आमच्या फ्लाईट्सचे चेक-इन आधीच सुरु झालेले होते. आमचा जवळ जवळ तासभर वेळ त्या रांगेतच गेला. तेथून बाहेर पडलो आणि तो विमानतळ किती अवाढव्य आहे ह्याची जाणीव झाली. अराईव्हल एका टोकाला तर डिपार्चर दुसऱ्या टोकाला होतं. वॉशरुम्सला हिsss गर्दी होती त्यात अजून अर्धा पाऊण तास गेला . घड्याळ बघितलं, बोर्डिंग सुरु झालं होतं. “दोन तास खूssप आहेत, काय करायचं तेथे?” असं म्हणणारे आम्ही आता लिटरली पळत सुटलो. गेट शोधण्यात अजून १५-२० मिनिट गेली. विमानात शिरणारे आम्ही जवळ जवळ शेवटचेच होतो, पण पोचलो एकदाचे.
विमानात शिरलो आणि आम्ही चौघंही एकदमच “वॉव” उदगारलो.
फ्लाईट-बुकिंग करताना अनेक पर्याय समोर होते, टर्किश एअरलाईन, गल्फ एअर, एअर इंडिया, इतिहाद, इथोपिया एअर, फ्रांस एअर. फ्रांस एअर खूपच महाग होते, तर इथोपिया एअर सगळ्यात स्वस्त, जवळ जवळ अर्ध्याने तिकीट कमी होते, पण त्यात इथोपियाला ७ तासाचा लेओव्हर होता. ७ तास… आणि ते पण इथोपियामध्ये… विचार करण्याच्या पलीकडे होते. रिव्ह्यू मध्ये इतिहादला बऱ्याच लोकांची पसंदी होती. पण एक तर प्रीमिअर एअरलाईन, त्यात आम्ही खूपच उशिरा तिकीट काढल होतं त्यामुळे थोडा चुना लागला खरा , पण .. पण हौसेला मोल नाही.. नाही का..??
फ्लाईट खूपच सुरेख होती. पुढचे ६ तास आरामात जाणार ह्या विचाराने सुखावत आसनस्थ झालो. विमानाचं टेकऑफ झालं आणि लगेचच समोरची इन्फो-टेनमेंट सिस्टीम सुरु झाली, फार छान छान हिंदी-इंग्लिश सिनेमे होते.. सोबत मस्त आणि खूप चविष्ट लंच आला, मदिरा हि आली. ३५,००० फूट उंचावर आम्ही सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत होतो. दोन चित्रपट बघेपर्यंत पॅरिस जवळ आल्याची माहिती मॅप वर कळत होती. वाटलं काय यार.. अजून जरा प्रवास हवा होता हा..
“केबीन-क्रू, प्लिज बी सीटेड फॉर लँडिंग”, वैमानिकाने सूचना केली आणि हार्ट-बिट्स डबल झाले. फायनली.. वुई आर अबाउट टु लँड इन पॅरिस…
बाहेर मस्त ऊन पाहून जिवात जीव आला.. चला.. पाऊस दिसत तरी नव्हता… हवेत ४-५ गिरक्या घेऊन विमान एकदाचे धावपट्टीवर उतरले….
Yippeeeeee!!!!
आता पुन्हा इमिग्रेशन.. एक तास नक्की खाणार!.. म्हणून आत शिरलो आणि बघतो तर काय.. काहीच गर्दी नाही, ७-८ लोकांनंतर आम्हीच की. बायको मला तेथील स्मार्ट-हँडसम-डॅशिंग पोलीस ऑफिसर दाखवत होती, पण बघायला काय फक्त तिलाच होतं का? तिथल्या लेडी पोलीस सुद्धा अगदी मॉडेल शोभाव्यात अश्या टीप-टॉप होत्या. व्हिसावर अप्रुव्हडचा शिक्का बसला आणि कोण आनंद झाला.
म्हणतात ना, नशिबाची साथ असेल तर सगळं कसं आपल्या मनासारखं होतं, अगदी तसंच सगळं झालं. आउट-ऑफ-द-ब्ल्यू पॅरिसचा प्लॅन बनतो काय आणि दोन महिन्यात आम्ही पॅरिसला पोचतो काय. मुंबईला दि-ग्रेट क्रिकेटर जॉन्टी ऱ्होड्स काय भेटतो.. कुठलीही फ्लाईट डीले / कॅन्सल नाही, सामान हरवणं नाही, कुठे चुकामुक नाही, ज्याची भीती वाटायची तो टर्ब्युलंसही काही ‘सन्माननीय’ अपवाद वगळता फारसा जाणवला नाही…
सगळे टप्पे पार करुन एकदाचे आम्ही एअरपोर्टच्या मुख्य लॉंज मध्ये येऊन धडकलो…
[क्रमशः]