Paris - 10 books and stories free download online pdf in Marathi

पॅरिस - १०

शेवटचा दिवस ... अलविदा पॅरिस

.. अचानक पॅरिसचा प्लॅन ठरतो काय, दोन महिन्यात आम्ही इथे येऊन धडकतो काय, आणि आता जायची वेळही येती काय. सगळंच विलक्षण होते. इथले १० दिवस अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने भुर्र्कन उडून गेले होते. दिवसाचे १६-१८ तासही कमी पडावेत इतके फिरलो, तरीही वाटतंय खुप काही बघायचं राहून गेलंय. इथे येण्यापूर्वी जी जी लोकं मला म्हणाली होती, "अरे १० दिवस काय करणार पॅरिसला, पॅरिसला ३ दिवसही खूप आहेत की" .. अश्या लोकांचं मला खरंच आता हसू आलं, आणि वाईटही वाटलं. पॅरिसला इतकं काही आहे बघायला, अनुभवायला, पण आजही अनेक लोकांच्या लेखी पॅरिस म्हणजे केवळ आयफेल टॉवर, आर्क-द-ट्रायोम्फ, नॉट्रे-डेम आणि मोनालिसा म्युझियम एव्हढच आहे.

अनेक लोक, केवळ बाकीचे देश, उदाहरणार्थ जर्मनी, आम्सटरडॅम, स्विझरलँड, प्राग वगैरे, जवळ जवळ आहेत म्हणून भोज्याला शिवून आल्यासारखं युरोप टूर्स करतात. एक ना धड. अश्याने एकही जागा व्यवस्थित बघणं होतं नाही असं मला वाटतं. इतके पैसे खर्च करुन आपण जातो ते काय केवळ जागांची नाव आपल्या फेसबुकवरच्या चेक-इन मध्ये लावायला का? परत गेल्यानंतर पॅरिसला "धावती" भेट देऊन आलेल्यांना आम्ही पाहिलेल्या जागा पाहिल्यात का विचारल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक मोठ्ठ प्रश्न चिन्ह होते.

मधल्या दोन दिवसांमध्ये जार्डन-दे-लक्साम्बर्ग, अर्थात लक्साम्बर्ग ची प्रसिद्ध बाग जी हॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये आहे ती पहिली, साक्रे-कर आणि आजूबाजूचा विलक्षण कलाप्रेमींनीनी भारावलेला परिसरही पहिला. पॅरिसचा पाऊस अनुभवला आणि कडाक्याची थंडीही. मेट्रो, बस, ट्राम, लॉंच, क्रूझ इतकंच काय, पण दोन पर्वतांना रोपवेने जोडल्यावर काचेच्या त्या छोट्या गाड्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जातात त्यातही बसलो. भरपूर पायपीट केली. रस्ता चुकलो, मध्यरात्री, रस्त्यावर भयाण शुकशुकाट असताना, एका अनोळखी माणसावर विश्वास ठेवून अंधाऱ्या लेन्समध्ये शिरलो.. बेल्जीयमची खास आईस्क्रीम्स आणि चॉकलेट्स खाल्ली, पॅरिसचे प्रसिद्ध पाणिनी आणि क्रेप्स खाल्ले. शॉपिंगही भरपूर झालं आणि आठवणी.. आठवणी तर आयुष्यभर पुरतील इतक्या जमवल्या ....

जायच्या दिवशीही सकाळपासूनच पाऊस लागून राहीला होता. नशिबाने हवामानाने आम्हाला छानच साथ दिली होती. हे ८-१० दिवस मस्तच वेदर मिळाले होते फिरायला. मित्र-मंडळी, नातेवाईकांसाठी चॉकलेट खरेदी राहिली होती. तशी बेल्जीयमला काही चॉकलेट घेतली होती पण पॅरिस स्पेशल राहिली होती म्हणून मग सकाळचं आवरुन झाल्यावर जवळच्या शॉपिंग मॉलमध्ये गेलो. अनेक सेक्शन्स विविध प्रकारच्या वाईन्स, शॅम्पेन्स आणि बिअरने भरुन गेले होते. भारतात असताना एकदाच चव चाखलेली आणि नंतर परत कुठेच न मिळालेली मला आवडलेली बिअर 1664 Blanc पण होती.. हाय रे माझं दुर्दैव, घराच्या इतक्या जवळ असुनही मी तिचा आस्वाद घेऊ शकलो नाही .. ह्याच्यासाठी, त्याच्यासाठी करता करता चोक्लेट्सचा ढीग झाला होता.

घरी परतताना पावलं जड झाली होती.. परत इथे कधी येता येईल का? हा स्वप्नवत अनुभव पुन्हा आपल्या नशिबी असेल का? असाच विचार सतत डोक्यात चालु होता.

फ्लाईट रात्री ९ ची होती, पण चेक-इन ६ लाच होते त्यामुळे संध्याकाळी ४ वाजताची कॅब बूक केली होती. सुपर-मार्केटमधून खरेदी आटपून येईपर्यंतच दुपार होऊन गेली. मग पटापट उरलं सुरलं सामान, आत्ताच शॉपिंग बॅगेत भरलं आणि बॅगा लॉक करुन टाकल्या. जेवायला फारशी कुणाला भूक नव्हतीच, तरी पण थोडं फार पोटात ढकलून बसेस्तोवर ४ वाजत आलेच. बाहेर पडणाऱ्या पावसाने आधीच कुंद वातावरण अधिकच सॅड भासत होते.

कॅब आली तसे सामान घेऊन आम्ही निघालो. एअरपोर्ट-रोडला बऱ्यापैकी ट्रॅफिक होते, पण हातात वेळ होता.. ५.३० ला एअरपोर्टला पोहोचलो. चेक-इन काउंटरला भलीमोठी रांग लागलेलीच होती. काउंटरला एक विशीतली जपानी मुलगी ओक्सबोक्शी रडत होती. तिचं लगेज बहुदा लिमिटपेक्षा कितीतरी अधिक झाले होते. एक तर त्यातलं सामान काढून ठेवा किंवा जास्तीचे पैसे भरा हे दोनच पर्याय तिच्यासमोर होते. जास्तीचे काहीतरी २०० का ४०० डॉलर्स भरावे लागणार होते ते तिच्याकडे नव्हते. शेवटी ती आणि तिची मैत्रीण एका कोपऱ्यात बॅगा उघडून बसल्या.. सगळं सामान बाहेर काढून अजून एखादी बॅग घेऊन त्यात भरात येईल का?, काही सामान हॅन्ड-बॅग मध्ये बसेल का? कमी करायचंच झालं, तर इथे एअरपोर्टवर काय टाकून देता येईल ह्यावर त्यांची बरीच खलबत चालू होते.

प्रत्येक प्रवास माणसाला काहीतरी शिकवत असतो, मला वाटतं, त्या दोघी ह्या अनुभवातून खुप काही शिकल्या असतील.

एअरपोर्टवरच वायफाय पकडून घरी फोन करुन आम्ही निघाल्याची खबर देऊन टाकली. बोर्डिंग पास घेतला, बॅगा चेक-इन करुन टाकल्या आणि आम्ही आतल्या लाउंज मध्ये शिरलो. पॅरिसचे अरायव्हल कक्ष तसे खूपच छोटे होते, अगदी पुण्याचे एअरपोर्ट आहे तसे .. डिपार्चर मात्र पॉश आणि मोठ्ठे होते.

इंटरनॅशनल विमानतळावर वेळ घालवण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. विविध प्रकारचे लोक, त्यांच्या लकबी, त्यांचं कुटुंब किंवा मित्र-परिवार, त्यांचे पोशाख, भाषा न्याहाळण्यात मस्त वेळ जातो. एका मोठ्या काचेतून बाहेरची येणारी जाणारी विमान दिसत होती. नवीन विमान आलं की क्रू लोकांची गडबड, मोठमोठ्या बॅगांची रांग वाहून न्हेणाऱ्या छोट्या ट्रॉलीज, क्षणाक्षणाला बोर्डवरील बदलणारी येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांबद्दलची माहीती अविरहित चालुच असते.

बघता बघता आमची निघायची वेळ झाली, बोर्डींग सुरु झालं तसं आम्ही रांगेत जाऊन उभं राहीलो.

विमानात बसताना Hemingway च "Moveable Feast" मधील हे वाक्य आठवत होते -

" If you are lucky enough to have lived in Paris as a young man, then wherever you go for the rest of your life, it stays with you, for Paris is a moveable feast .. "

एअरहोस्टेसेसच नेहमीच ब्रिफींग झालं होतं, सगळ्यांनी 'कुर्सीकी पेटीया' बांधे रखली होती. विमान हळू हळू कडेच्या धावपट्यांवरून मुख्य धावपट्टीवर येऊन थांबलं होतं. वैमानिकाला ग्रीन सिग्नल मिळाला तसं विमानाचा वेग वाढला आणि विमान आकाशात झेपावले.. विमानाची चाक आतमध्ये गेली आणि आमचा आणि पॅरिसचा संबंध संपला होता, निदान ह्यावेळेपुरता तरी ..

-----------------------------------------

विशेष टिप्पणी -

१. ह्या विमान प्रवासामध्ये आमचा प्रवासाचा मार्ग, जाताना आणि येतानाही .. मुंबई > अबुधाबी > पॅरिस असा होता.

अबुधाबी विमानतळाबद्दल लिहीन तितकं कमीच आहे, अति-विशाल प्रकार आहे तो. दोन्ही वेळेस आमचा हॉल्ट दोन तासांचा होता. बहुतांशवेळी इंटरनॅशनल विमान प्रवासात, केनेक्टिंग फ्लाईट्समधला वेळ हा ६-८ तासांचा मिळतो, त्यामानाने २ तास गॅप मस्तच मिळाली होती, पण तरीही दोन तास मध्ये काय करायचं हा प्रश्न होताच. पण वास्तविक बघायला गेलं तर हे दोन तास आम्हाला कमीच पडले. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायलाच इतका वेळ गेला कि दोन्ही वेळी विमानात प्रवेश करणारे आम्ही बहुदा शेवटचेच होतो. अर्थात अबुधाबी विमानतळाबद्दल नंतर कधीतरी सावकाशित लिहीनच, पण तुम्ही कधी अबुधाबी मार्गे कुठे प्रवास करणार असाल तर मधली वेळेची गॅप जरा जास्तीच ठेवा.


२. पॅरिसची सार्वजनिक वाहतूक अति-उत्तम आहे. मेट्रो सर्व ठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध आहेत, पण त्या भूमिगत असल्याने कधी कधी बसने प्रवास करायलाही हरकत नाही. पॅरिसमध्ये एक पास मिळतो, प्रति व्यक्ती २५ युरो ८ दिवसांसाठी. ह्या पासचा वापर करुन तुम्ही कोणत्याही वाहतूक पर्यायाचा कितीही वेळा वापर करू शकता

-----------------------------------------

भविष्यात कधी पॅरिसची ट्रिप प्लॅन करणार असाल आणि अधिक माहिती हवी असेल तर मला जरूर संपर्क करा - aniket.com@gmail.com

[ समाप्त ]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED