धुक्यातलं चांदणं ..... भाग १० Vinit Rajaram Dhanawade द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

धुक्यातलं चांदणं ..... भाग १०

बाहेर पावसाने " सॉलिड " वातावरण बनवलं होतं. " १० मिनिटात सुरुवात होईल बहुतेक. ",विवेक स्वतःशीच पुटपुटला.
" ह्या… जसं काही कळतेच तुला पावसाचं… ",
"बर… बघ , १० मिनिटाचा time लाव. " , पूजा घाबरली.
" चल मग निघू… पाऊस येण्याअगोदर. " ,
" थांब गं… " विवेकने तिला बळजबरीने खाली बसवलं. १० मिनिटांनी बरोबर पावसाने सुरुवात केली. तेव्हाच रेडीओवर song सुरु झालं. " रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन,भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन…. ". विवेक तर आता खिडकीपाशी जाऊन उभा राहिला, पाऊस बघत. त्याचे केस येणाऱ्या वाऱ्यासोबत उडत होते. गोड हसत होता तो. बाहेर रिमझिम पाऊस. कुंद वातावरण आणि रेडीओवर लागलेलं गाणं. romantic वातावरण झालं होतं. हवेचा थंड झोत खिडकीतून आत शिरला. पूजाच्या अंगावर शहारा आला.विवेककडेच पाहत होती ती, जणूकाही तिच्या मनातच पाऊस पडत होता आता.


" चल बाहेर जाऊ… ", विवेकच्या बोलण्याने पूजा जागी झाली.
" नाही. आता नको… भिजणार सगळे आपण. " ,
" चल न्या… किती मस्का लावावा लागतो तुला.",
" हो का…. लाव अजून मस्का." पूजा हसत म्हणाली.
" ठीक आहे, आपण जाऊ घरी. taxi करून जाऊ, पण त्यासाठी तरी खालीच जावं लागणार ना… taxi काय वर येऊ शकत नाही , हॉटेलमध्ये. " पूजा जरा नाखूष होऊन जागेवरून उठली.


दोघेही खाली आले. सुट्टीचा दिवस, त्यात सकाळचे १०.३० वाजले होते. आणि सोबतीला पाऊस. रस्त्यावर एकही taxi नव्हती. पाऊस तर मस्तच पडत होता. " चल विवेक, आपण पुन्हा वर जाऊया. " पूजा बोलली. विवेकने काही reply नाही दिला. तो तर पावसाकडे पाहत होता. " विवेक …. विवेक… " पूजा त्याला हाक मारत होती. विवेक तर कधीच पुढे गेलेला पावसात, चालत चालत. डोळे बंद करून तो पावसात उभा राहिला होता. पूजा तशीच हॉटेलच्या दारापाशी उभी होती. विवेक पावसात भिजत होता, आनंद घेत होता. थोड्याच वेळात पावसाने जोरदार सुरुवात केली. विवेक आता उगाचच पावसात उड्या मारत होता, आजूबाजूला साचलेलं पाणी उडवत होता. त्याला पाहून आजूबाजूला भिजणारी लहान मुलं त्याच्या बरोबर येऊन नाचू लागली. पूजाला तर हसू आलं. कसा लहान मुलासारखा खेळत आहे पावसात. छान… पुजाकडे हातवारे करून विवेक तिला बाहेर बोलावत होता, भिजायला. पूजा कसली बाहेर जातेय. ती तिथेच उभी राहून विवेकला पाहत होती.


आता तर पावसाने अजूनच काळोख केला होता. सोबतीला वारा होताच. फेसाळलेल्या लाटा काठावर धडकत होत्या. वर आकाशात ढगांचा गडगडाट होतं होता, विजांचा कडकडाट होतं होता. जणू काही विजांनी ढगांभोवती फेर धरून नृत्याला सुरुवात केली होती. सगळ्या रस्त्यांचे छोटया नदीत रुपांतर झाले होते. झाडं येणाऱ्या वाऱ्याबरोबर झुलत होती.पूजा सगळं पाहत होती. कोणी पावसापासून वाचण्यासाठी धावत होतं, धावताना धडपडत होतं. कोणी उगाचच मुद्दाम धडपडत होतं, जोडीदाराने सावरण्यासाठी. हातात हात देताना कोणी लाजत होतं, कोणी विजेच्या आवाजाचा बहाणा करून दुसऱ्याच्या मिठीत जात होतं. कोणी जोडप्याने पावसाचा आस्वाद घेत, मक्याच्या कणीसांवर, कांद्या भज्यावर ताव मारत होतं. तर कोणी एकटाच छत्रीत उभा राहून त्या पावसात हरवलेले क्षण शोधत होतं. आणि या सर्वामध्ये विवेक, त्या मुलांसोबत नाचत होता. एक जोरदार सर आली, त्याच्यासोबत वारा… पूजा आत उभी असली तरी तिच्या गोबऱ्या गालांवर पावसाचे थेंब उडाले.


थंड… एकदम थंड. पूजाच्या अंगावर रोमांच उठले. वेगळचं मनात आलं तिच्या काही. खरंच, पावसाला आपण किती लांब ठेवलं ना… नको आता. मलाही भिजायचे आहे. विवेकसारखं… मनसोक्त, विवेक तर पावसात बिझी होता. पूजाने त्याच्याकडे पाहिलं. त्याचं लक्ष नव्हतंच. पूजाने तिचं सामान तिथेच ठेवलं. हात पुढे केला तिने… थंडगार… पावसाचा स्पर्श. तसं काही पावसाला ती पहिल्यांदा अनुभवत नव्हती,आज काहीतरी वेगळं होतं.पाऊस तर नेहमीचाच होता, परंतु आज प्रेम बरसत होतं, पावसाच्या रुपात. पूजा हळूच बाहेर आली दरवाजातून. विवेक सारखे तिनेही डोळे मिटून घेतले आणि पावसात तल्लीन झाली ती.


व्वा !! किती सुरेख वाटतं पावसात. पूजाने डोळे उघडले. मन अगदी धुवून गेल्यासारखं वाटते. मनातला राग, द्वेष, दुःख, अडचणी, tension…. वाहून जातात पावसात.इतकी वर्ष आपण हा आनंद, आपल्यापासून लांब ठेवला होता. Thanks विवेक… तुझ्यामुळे मला हा आनंद मिळत आहे. Thanks.… पूजा हात पसरून, स्वतः भोवतीच गिरक्या घेत होती. विवेकचं लक्ष तिच्याकडे गेलं. अरे… हि कधी आली बाहेर… चक्क भिजायला… विवेकला हसायला आलं.


पूजा तशीच गिरक्या घेत होती. विवेक हळूच तिच्यासमोर येऊन उभा राहिला. किती वेळ तो तिच्याकडे पाहत होता, " पूजू… " विवेक हळूच आवाजात बोलला. पूजा थांबली जागेवर. विवेकला बघून छान हसली ती,
" काय madam, पाऊस नको …पाऊस नको …म्हणणारी पूजा कूठे गेली.",
" ती पूजा ना… तिच्या घरी गेली. " पूजा हसत म्हणाली.
" असं का… मग मीही जातो घरी.",
"का रे ? ",
" मी त्या पुजूला ओळखतो… तुम्हाला नाही madam.",
" हो का… " पूजाने चापटी मारली विवेकला.
" चल… खेळूया पावसात. " ,
" माकडा… मी काय लहान आहे, पावसात खेळायला.",
" पावसात खेळायला वय लागत नाही, वेळ असावा लागतो. चल पकड मला." म्हणत विवेक पळाला सुद्धा. पुजालाही मज्जा वाटली. ती त्याला पकडायला धावली.


आणि पूजा-विवेकचा खेळ सुरु झाला भर पावसात. वेड्यासारखे दोघे धावत होते. समोर येणाऱ्या जोडप्यांना धडकत होते, मधेच येणाऱ्या छत्र्याना आपटत होते. धावताना एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते. छान एकदम. कितीतरी जोडपी, त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते. हसत होते. पण त्यांचं फक्त आणि फक्त पावसाकडेच लक्ष होतं. एव्हाना ते धावत धावत खूप पुढे आले होते. विवेकने मागे वळून पाहिलं. पूजा लांब राहिली होती. विवेक थांबला. तशी पूजाही थांबली. आणि जागेवरच पुन्हा गिरक्या घेऊ लागली. विवेक तसाच तिला बघत उभा राहिला.

जिथे पूजा-विवेकचा खेळ सुरु होता, तिथे समोरच एका हॉटेलमध्ये सुवर्णा तिच्या मैत्रिणी बरोबर नास्ता करायला आली होती. तिला हॉटेलमध्ये येऊन १ तास झाला होता. पाऊस कधी थांबतोय याकडे तिचं लक्ष होतं.
" शी… यार, काय हा पाऊसपण. एवढा सुट्टीचा दिवस, बाहेर पडले तर सुरुवात केली याने." , सुवर्णा तिच्या मैत्रिणीला सांगत होती.
" होतो गं कधी कधी जास्त पाऊस. आणि आता तर त्याचे दिवस आहेत पडण्याचे… मग तो पडणारच ना… ",
"हो. पडू दे ना मग. मी कूठे थांबवलं आहे त्याला. पण मी घरी गेल्यावर पड म्हणावं." सुवर्णा आता वैतागली होती.
" चल यार… हा काय थांबणार नाही. निघूया आपण." ," नको… मी थांबते जरा वेळ… छान वातावरण झालं आहे. तू पण थांब. "," नको… मी जाते, Bye… " म्हणत सुवर्णा निघाली.


हॉटेलच्या बाहेर आली ती. taxi साठी इकडे-तिकडे बघत होती ती. शट्ट !! एकही taxi नाही. आज भिजणार बहुदा मी… सुवर्णा स्वतःशीच गप्पा मारत होती. तेव्हा तिला समोर कोणीतरी भिजताना दिसलं… काय मंद आहे तो मुलगा.… भिजतोय पावसात, मग सर्दी, ताप… डॉक्टरकडे पळापळ…. कोणी सांगितलं आहे एवढं करायला.…. स्वतःशीच हसली ती. taxi काही येत नव्हती. तिचं लक्ष राहून राहून त्या मुलाकडे जात होत. ओळखीचा आहे का… मग मला का असं वाटतंय… तिने निरखून पाहिलं.


विवेक !! अरे … हो, विवेकच आहे तो. हा काय करतोय इथे… भिजायला इथे आला, एवढया लांब… कमाल आहे याची हा… सुवर्णाला विवेकला पाहून आनंद झाला. विवेकला तिला भेटायचं होतं, मध्ये पाऊस होता ना. " विवेक…. ये विवेक…" सुवर्णा त्याला मोठयाने हाक मारत होती.विवेकच लक्ष नव्हतं. कूठे लक्ष आहे याचं…. ये विवेक… नाहीच बघत इकडे… आणि हा सारखा समोर कूठे बघतो आहे… सुवर्णाने विवेक बघत असलेल्या दिशेने पाहिलं… एक मुलगी पावसात गिरक्या घेत होती. तिलाही निरखून पाहिलं सुवर्णाने… " पूजा !! " , म्हणजे पूजासुद्धा आहे इकडे… दोघे एकत्र भिजत आहेत पावसात. थोडयावेळाने विवेक पूजाजवळ गेला आणि पुन्हा ते एकमेकांवर पाणी उडवू लागले. सुवर्णाला ते दृश्य पाहून वाईट वाटलं. आपली जागा पूजाने घेतली बहुदा… सुवर्णाच्या डोळ्यात पाणी जमा झालं. तितक्यात समोर taxi येऊन थांबली. सुवर्णा त्यात बसली. जाता जाता त्या दोघांकडे एक नजर टाकली. नंतर तिला त्यांच्याकडे बघताच आलं नाही… पाणी साचलेलं ना डोळ्यात.


खूप वेळ झाला होता, पूजा आणि विवेक दोघेही दमलेले होते आता. पाऊस मात्र तसाच पडत होता अजून.
" बस… झालं आता पूजा… " विवेक बोलला.
" थांब रे… इतक्या वर्षात पहिल्यांदा मी भिजली पावसात. भिजू तर दे मला.",
"घरी नाही जायचे का तुम्हाला… " घरंच नाव काढलं तेव्हा तिला घरची आठवण झाली.
" हो रे …. विसरली मी, आणि आता कसं जाणार घरी. स्टेशन तर लांब आहे.",
" taxi ने जा घरी… ",
"माकडा … भिजली आहे मी… taxi वाला घेणार का गाडीत.… ",
" घेणार ना… " विवेकने हात करून एक taxi थांबवली. नशीब पटकन भेटली.
" ओ… taxi वाले… हिची छत्री हरवली म्हणून हि भिजली आहे. जरा घरी सोडता का तिला…. " ते ऐकून taxi निघून गेली. पूजा कसली हसायला लागली.
" म्हणे… नेईल घरी. आणि माझं सामान त्या हॉटेलमध्ये आहे, ते कोण घेऊन येणार… ",
" अरे… हो, विसरलो मी. चल जाऊया. " म्हणत पूजा आणि विवेक चालत चालत निघाले. विजा अजूनही चमकत होत्या. पूजाने हळूच विवेकचा हात पकडला. विवेकला छान वाटलं ते…


हॉटेलमध्ये आले ते. एक taxi बाहेरच उभी होती. तो तयार झाला, पूजाला घरी सोडण्यासाठी. तिने तिचं सामान ठेवलं taxi मध्ये.
" चल विवेक… आणि thanks ",
" thanks कशाला ?.",
"या क्षणासाठी… जो आतापर्यंत मी कधी अनुभवला नव्हता. thank you very much." पूजाने विवेकला मिठी मारली. अनपेक्षित होतं ते, विवेकसाठी. त्यानेही तिला मिठीत घेतलं. " चल Bye गोलू… thanks again… I love rain, love you गोलू…. " म्हणत पूजा taxi मध्ये बसली आणि निघाली.


विवेकला हे नवीन होतं… पूजा आपल्या प्रेमात आहे कि आपण तिच्यावर प्रेम करू लागलो आहे, विवेकला गोड प्रश्न पडला. तेव्हाचं… " कडकडाट्ट…. " विजेचा जोरदार आवाज झाला. विवेकने वर आकाशात पाहिलं. बापरे !!! नक्कीच कूठेतरी पडली असेल… पावसाचा जोर अजून वाढत जात होता. सकाळचे ११.३० झाले तरी अजून काळोखच होता. निघायला पाहिजे आता, म्हणत विवेक निघाला आणि पुन्हा वीज चमकली.… लख्ख प्रकाश, विवेकच्या मनात कससं झालं. डोळे दिपून गेले अगदी. पूजाची taxi अजूनही विवेकला दिसत होती. तिकडे नजर टाकून विवेक वळला, पुन्हा विजेचा कडकडाट…आणि त्याच्यासमोर बघतो तर….


" मानसी !! " , विवेक तसाच स्तब्ध होऊन तिला पाहत राहिला. विवेकचं पहिलं प्रेम, जिच्यासाठी तो वेडा झाला होता ती मानसी…. एका वर्षापूर्वी ज्या मुलीने विवेक पासून सगळे संबंध अचानक तोडले होते ती मानसी…. आज त्याच्या समोर उभी होती. मानासीही त्याला बघत होती. दोघांमध्ये फरक एवढाच कि ती छत्री मध्ये तर विवेक पावसात भिजत होता.


वर आकाशात , विजांचा तांडव सुरु झाला होता…आवाजासोबत कितीतरी प्रकाश दिसत होता, लख्ख प्रकाश…. त्या प्रकाशात मानसीचा गोरा चेहरा अजूनही उजळून दिसत होता. विवेकच्या मनावर जणू त्या विजा, जुन्या आठवणींचे प्रहार करत होत्या. खरंच…. आभाळ आता अधिक गडद होतं होतं.…विवेकच्या मनातलंही.

========================= क्रमश : ==============================