धुक्यातलं चांदणं .....भाग ५ Vinit Rajaram Dhanawade द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

धुक्यातलं चांदणं .....भाग ५

पूजा घरी आली. आणि विचार करू लागली. पाऊस थांबला होता, ती तिच्या बाल्कनीत उभी होती. खरंच , आपला तारा असतो का आकाशात ? तिने वर पाहिलं. आभाळात अजूनही ढग होते. विवेक बोलला तसं, " धुक्यातल चांदणं " … आणि दुसरा अर्थ काय बोलला तो , प्रेम केलं असतंस तर कळलं असत , म्हणाला. म्हणजे विवेकने कोणावर प्रेम केलं होतं का ? त्याला विचारूया का … नको … राहू दे. आता नको. मी पण कोणावर प्रेम केल नाही का कधी. स्वतःलाच प्रश्न केला तिने. पूजाला सुद्धा एक मुलगा आवडायचा. परंतु तिने ते "नात" मैत्री पुढे जाऊ दिलं नाही कधी. घरी तसं चालणार नाही म्हणून. खरंच , आपण प्रेम काय आहे ते विसरून गेलो आहोत कि मी मुद्धाम समजून घेत नाही. पूजा विचारात गढून गेली.


अजून दोन दिवस गेले. सुवर्णा अजूनही मुंबईला आली नव्हती. आज सुट्टीचा दिवस, रविवार. त्यात पावसाळा सुरु झालेला. मग विवेकने कॅमेरा घेतला आणि तयारी केली निघायची. तेवढयात त्याचा मोबाईल वाजला.… पूजाचा फोन… कमाल आहे. त्याने उचलला…
" शुभ प्रभात पूजू… आज कशी काय आठवण झाली माझी. तीही सुट्टीच्या दिवशी, सकाळी ७.३० ला, ते सुद्धा घरून. " ,
" हो का… गप." ,
" ठीक आहे . बसतो गप्प.",
" गप… बोल सरळ." विवेकला हसू आलं.
" अगं, तू घरी असलीस कि कधी call करत नाहीस ना. म्हणून जरा मस्करी केली. बोल. काय काम होतं madam चं. ",
" तसं काही नाही. असाच लावला call, तुझा आवाज ऐकायचा होता म्हणून. " ,
" अरे बापरे !! " आणि विवेक हसायला लागला.
" हसतोस काय असा ? " ,
" नाही , काही नाही असंच. हसायला आलं जरा.… बर…. आज घरातून कसा फोन केलास ? … तुझे बाबा ओरडतील ना तुला. " ,
" गप्प रे, माझ्या बाबांना काय वेड लागलाय, सारखं ओरडायला. …अरे, ते सगळे म्हणजे भाऊ, आई , बाबा… सकाळीच फिरायला गेले.", " मग तू का नाही गेलीस ? " ,
" मला नाही आवडत पावसात फिरायला. ",
" OK " ,
" तू काय करतो आहेस ? ",
" तेच… जे तुला आवडत नाही ते ." ,
" म्हणजे ? ",
" मी चाललो आहे , बाहेर … फोटोग्राफीसाठी." ,
" wow !! फोटोग्राफी मला सुद्धा आवडते. " ,
" मग येतेस का माझ्या सोबत. ",
" नको… पाऊस आला तर. " ,
" आज नाही येणार. " ,
" तुला काय पावसाने सांगितलं आहे वाटते. " ,
" मला कळते पावसाबद्दल थोडाफार. म्हणून बोललो तुला ",
" आणि आला तर… " ,
" नाही येणार बोललो ना… विश्वास ठेव." पूजा पुढे काही बोलली नाही.
" Hello …. पूजा …. येते आहेस का… नाहीतर मी निघतो. ",
" शी… बाबा, तू विचारसुद्धा करू देत नाहीस. थांब.… येते मी. " , विवेक आनंदला. " ये लवकर… दादर स्टेशनला वाट पाहतो आहे मी. "


पूजा आली स्टेशनला. विवेक तर तयारीतच होता.
" बंर लवकर आलीस. मला वाटलं कि एक - दोन तास तरी येत नाहीस. " ,
" आणि असं का वाटलं तुला ? " ,
" मुलींना वेळ लागतो ना तयारी करायला म्हणून. " , पूजाने त्याच्या पोटात गुच्च्या मारला.
" बाकीच्या मुलींना लागत असतील , दोन - तीन तास , मला नाही . कळलं. ", बोलता बोलता विवेकने तिचा फोटो काढला पटकन.
" माझेच फोटो काढणार आहेस का ? ".
"जमल तर काढणार ना . " ,
" OK . छान. आता कुठे जायचे आहे.",
" कर्नाळा… " ,
" नावं ऐकलं आहे मी… " ,
" पक्षी अभयारण्य आहे." ,
" चल जाऊया पटकन. " दोघे निघाले. वेळेवर पोहोचले.
" छान वाटते इकडे. ",
" मस्त आहे ठिकाण…मी येतो इकडे पाऊस सुरु झाला कि. " ,
" हो का … बर. " ,
" तुला तुझ्याबद्दल एक गोष्ट माहित आहे का ? " ,
" कोणती रे ? " ,
" तू दोन शब्द जास्त बोलतेस , बोलताना. ' हो का ' आणि ' बर '. " ,
" हो का. " , " बघ बोललीस ना." विवेक हसत म्हणाला. पूजाही हसली.


दोघेही फिरत फिरत , फोटोग्राफी करत खूप आत मध्ये आले. गप्पा तर चालूच होत्या.
" तुला काय आवडते रे एवढं इकडे ? " ,
" थोडावेळ थांब जरा.… दाखवतो तुला. " ,
" काय… आणि तू काय रोज फिरत असतोस का ? ",
" रोज म्हणजे कधी वेळ मिळेल तेव्हा. रविवारचा तर बाहेरच असतो मी. " ,
" एकटाच … ? " ,
" एकटा नाही… आम्ही दोघे. " .
" दोघे ? " ,
" मी आणि कॅमेरा " ,
" तू ना खरंच वेडा आहे . " ,
" तुला आता कळलं का… माझी आई ना मला कधी कधी वेडा म्हणूनच हाक मारते. " ,
"चांगल आहे , आईंना पण माहित आहे ते. " पूजा हसत म्हणाली.
" हा निसर्ग आहे ना… त्याने मला वेडा केलं आहे लहानपणापासून. म्हणून बाहेर फिरत असतो मी. शिवाय कधी घरी लवकर गेलो ना, तर घरापासून थोडयाच अंतरावर समुद्र आहे… तिकडे जाऊन बसतो मग. छान वाटते.… तू फिरतेस का कधी ? " .
" नाही रे. आज पहिल्यांदा मी कोणाबरोबर बाहेर फिरायला आले आहे ." .
" म्हणजे ' Date' वर आली आहेस माझ्याबरोबर . " ,
" गप रे … काहीही. " , पूजा लाजत म्हणाली.
" त्यात काय लाजायचं ? ",
" आमच्या घरी चालत नाही असं " ," बर बाबा… " विवेक बोलला आणि बोलता बोलता थांबला.


" एक गोष्ट करशील का ? ",विवेक पूजाला बोलला .
" कोणती ? ",
" तुला डोळे बंद करून चालता येते का ? " ,
" तू तरी चालशील का…. काही सुद्धा बोलतोस … आणि इकडे पडायला नाही होणार का, डोळे बंद करून चाललं तर. " ,
" पण पुढे जायचे असेल तर तुला डोळे बंद करून यावं लागेल… surprise आहे.",
" मी चालू कशी पण… " ,
" माझा हात पकडून चाल. ",
" नको. " ,
" का नको ? " ,
" नको, माझ्या घरी आवडणार नाही ते. " ,
" अगं, पण त्यांना कसं कळणार आहे , तू माझा हात पकडलास ते. " ,
" तरी सुद्धा नको. ",
" OK, ठीक आहे. तुला मी बाहेर सोडतो, तिथून तू घरी जा. मी थांबतो इथे. " विवेक नाराज झाला.
" Sorry , राग आला का तुला ? " ,
" राग कशाला येणार ? आणि मला राग नाही येत कधी. तुझं सुद्धा बरोबर आहे. मी तसा अनोळखी आहे तसा तुझासाठी. मी उगाच जबरदस्ती करत होतो." विवेक हळू आवाजात म्हणाला.
" Sorry ना, एवढं काय मनाला लावून घेतोस… चल जाऊया आपण, मी करते डोळे बंद… पण हात सोडू नकोस हा, नाहीतर पडेन मी. " ,
" एकदा हात पकडून तर बघ… कधीच नाही सोडणार, विश्वास ठेव माझ्यावर. " पूजा हसून त्याचाकडे पाहत होती.


तिने डोळे मिटले आणि विवेकच्या हातात हात दिला. पहिल्यांदा ती कोणा मुलाच्या हाताला स्पर्श करत होती. त्याच्या हाताचा उबदारपणा तिला जाणवला. एक थंड लहर तिच्या पूर्ण शरीरातून फिरली. वेगळाच अनुभव. विवेकने ही तिचा हात घट्ट पकडला होता. त्यालाही जरा वेगळा अनुभव आला. तरी त्याने तिचा हात सोडला नाही आणि पूजाला घेऊन तो एका उंच जागी आला. हळूच तिचा हात सोडला. " विवेक … विवेक…. ये गोलू… कूठे आहेस… सोडलास ना हात… ", पूजाचे डोळे अजूनही मिटलेलेच होते. " मी तुझ्या पाठीशीच आहे… फक्त आता काही बोलू नकोस… पहिली शांत हो… दीर्घ श्वास घे आणि हळू हळू डोळे उघड. "


पूजा शांत झाली. दीर्घ श्वास घेतला आणि हलकेसे डोळे उघडले. हळू हळू तिच्या डोळ्यासमोर हिरवा रंग पसरत जात होता. समोर झाडेच झाडे हिरवीगार, वरती निळाशार आभाळ, थंड वारा.… पूजा वेडीच झाली ते पाहून. " WOW !!! " पूजा ओरडली. विवेक हळूच तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. पूजाच्या नजरेतला आनंद त्याला दिसत होता. पूजाही सगळं कसं डोळ्यात भरून घेत होती. एक थंड हवेचा झोत आला , तसा तिने विवेकचा हात गच्च पकडला. विवेकला ते अपेक्षित नव्हतं. पूजा तशीच त्याचा हात पकडून होती, विवेकच्या अंगावर शहारा उठला.

============ क्रमश: ===========