प्रेमपरीक्षा Vrushali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेमपरीक्षा

प्रेमपरीक्षा

हिवाळ्यातील थंडगार सकाळ होती. सभोवतालचा निसर्ग अजूनही धुक्याची दुलई पांघरून साखरझोपेत होता. पक्षांची नाजुक किलबिल आणि झाडांच्या फांद्यातून फिरणारा उनाड वारा मिळून भूपाळी गात होते. आळसावलेल्या सूर्याने नुकतच डोकं वर काढलं. त्याची कोवळी कोवळी किरणं सगळा आसमंत व्यापू पाहत होती. पिवळट केशरी रंगाचे फर्राटे ओढलेल्या ढगांवर सकाळी कामाला जाणाऱ्या पक्ष्यांची एक वेगळीच नक्षी उमटत होती. ती रोजप्रमाणे कॉफीचा मग घेऊन बाल्कनीतून पहाटेच रूप न्याहाळत होती. ' शहरात पण पहाट प्रसन्नच होते... आपल्याला फक्त अनुभवायला यायला हवी ' ही त्याची पहाटेची फिलॉसॉफी.

ती म्हणजे सूर्यवंशी... सूर्य उठल्याशिवाय आपण नाहीच उठायचं हे वाक्य घोकतच झोपणारी. तिची पहाट नेहमीच आठ वाजता उगवायची. रविवारची तर वतनदारीच दिली होती तिला. त्याला भेटल्यानंतर मात्र तिची पहाट अगदी पहाटेच होत असे. सकाळी कॉफी पित काही वेळ सभोवतालचा आळसावलेला परिसर डोळे भरून बघायचा जणू छंदच जडलेला.... एव्हाना सूर्य झोप झटकून किरणांच्या हातांनी तिचे गाल गोंजारायला लागला. ही देखील त्याचीच उपमा. पहाटेची किरणं तिच्या गालावर पडली की तिचा चेहरा गुलाबासारखा उमलतो अस वाटायचं त्याला.... मग कित्येक वेळ तो पापणीही न लवता एकटक तिच्या गालावरच्या लालीमध्ये हरवून जायचा..... त्याच्या आठवणीने गोड हसू पसरलं तिच्या ओठांवर आणि डोळ्यातील पाणी अलगद गालांवरून घरंगळल. हल्ली ती कधीच पुसत नाही तिचे अश्रू... त्या अश्रुंच्या गरम स्पर्शात ती त्याचा स्पर्श शोधते.

आजही अर्धवट उरलेली कॉफी तिने तशीच ठेवली. पसारा पडलेल्या हॉल वरून एकवार थंड नजर फिरवली. मागचे कित्येक दिवस तो पसारा तसाच पडला होता आणि रोज नवीन पसाऱ्याची भर पडत होती. अस्ताव्यस्त पसरलेले कपडे त्यातून तिला वाकुल्या दाखवत होते. खरतर तिला रागच आला त्या कपड्यांचा... तोच आवरायचा ना सगळं... आता तो नाही तर समोरचा पसारा तिला हिणवतोय अस वाटत होत. मलापण येत की आवरता... तो नाहीये तरी का ह्या सगळ्या गोष्टी त्याची आठवण काढतात... शी... ती फणकाऱ्याने आपलं आवरून त्या पसाऱ्याकडे ढुंकूनही न बघता तिने दार आपटलं. त्या बंद झालेल्या दारामागच्या घराने तिच्यासाठी दोन आसू ढाळले.

काही वर्षांपूर्वी याच घरातून त्यांची प्रेमकहाणी चालू झालेली. तिच्या वडिलांचा अकस्मात मृत्यू झाल्याच्या दुःखातून सावरत असतानाच कोणत्यातरी नातेवाईकाने मोलाचा सल्ला दिला ' ह्या वर्षी हीच लग्न नाही झाल तर पुढची तीन वर्ष नाही करू शकत.' झालं... दुःख बाजूला पडलं आणि घरचे तिच्या वरपरीक्षेच्या तयारीस लागले. हे सगळं चालू असताना ती मात्र वडिलांच्या दुःखात आणि फायनल एक्झामच्या तयारीत गुंतलेली होती. तिला कळलं तर उगाच कांगवांगा करेल म्हणून तीच मत देखील विचारायची तसदी कोणी घेतली नाही. शेवटचा पेपर झाला आणि घरात पाऊल टाकताच कांद्यापोह्यांचा कार्यक्रम तिची वाट पाहत होता. खरतर चिडलीच होती ती. घर संसार हे प्रकरण इतक्यात नको होत पण.... काय करणार आलीया भोगासी आणि असावे सादर ह्या उक्तीप्रमाणे बळेच तयार होऊन येणाऱ्या पाहुण्यांना सामोरी गेली. तो गोड हसत तिच्याकडेच बघत होता. त्याचे बोलके डोळे, जेल लावून थोडेसे स्पाइक केलेले केस, कमावलेली बॉडी आणि चार्मिंग स्माईल बघून ती हा कार्यक्रम आपल्या मनाविरुद्ध होतोय हेच विसरली. फिकट आकाशी कलरचा शर्ट असा खुलून दिसत होता त्याच्यावर..... 'आय हाय कोई तो रोक लो' उगाचच तिच्या डोक्यात डायलॉग चमकला. यथावकाश कांदेपोहे आणि मग काही दिवसात लग्न झालंही. अर्थात तिची ना नव्हती. त्याच्या पर्सन्यालीटीच्या प्रेमात होती ना. त्या नादात त्यांच्या वयातलं अंतर मात्र विसरली. कॉलेज अल्लड वयात मिस ची मिसेस झाली. आणि संसार सुरू झाला.

नव्या नवलाईचे दिवस होते. तिच्यासाठी तर काय सगळच गुलाबी होत... वय आणि वातावरण पण. तीच लाडाने रागावणं आणि त्याच समजुन घेणं सगळं कस एकदम परफेक्ट होत. मालदीवज मधला हनिमून तर कितीदा तिने फक्त स्वप्नात इमॅजिन केला होता. आपल स्वप्न अस इतक्या सुंदररित्या प्रत्यक्षात उतरेल हेच स्वप्न होतं.

रोजची पहाट त्याच्या उबदार मिठीत उमलायची. त्या उबदार बंधनातून तिला सुटायच नसायचं मग त्याच जवळ खेचून घेण तिला अजुनच सुखवायच. त्याची बोटं मग कित्येक वेळ तिच्या केसातुन रेंगळायची. तिच्या बटा सोडवता सोडवता तोच गुंतून जायचा. तिच्या अलगद बंद झालेल्या डोळ्यांवर तो अलगदपणे आपले ओठ टेकवायचा. त्याच्या त्या स्पर्शाने ती मोहरुन उठायची.अंगाअंगावर नाजुकसा शहारा उमलत जायचा. त्याची बोटं त्या उमटणाऱ्या शहाऱ्याचा पाठलाग करायची. पाठशिवणीच्या खेळात ती त्याच्यात हरवून जायची. ' स्स....' तिने दोन्ही हात स्वतःभोवती लपेटले. डोळ्यांसमोर थंडगार गुलाबी सकाळ पसरली होती. तिच्या तळहातांना अंगावर मोहरलेला काटा जाणवत होता. अचानक खांद्यावर झालेल्या झालेल्या अनोळखी स्पर्शाने तिने खाडकन डोळे उघडले. डोळ्यासमोर तरळत असलेली गुलाबी पहाट विरून गेली. तोच नेहमीचा डेस्क, लॅपटॉप आणि विखुरलेले पेपर्स...

" अग ए... बरं नाही वाटत आहे का?" कोणीतरी तिला हाका मारत होत. अजूनही ती तंद्रितून बाहेर आली नव्हती.

" अं..." तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं.

" अग अशी काय बघतेय मंद... काय होतंय...?" तिची कलिग तिला बोलावत होती.

"काही नाही.."

"ठीक आहे.. चला आता जेवायला..."

"नको.. राहुदे.... आज मूड नाहीये..." तिने हताशपणे मान खाली घातली. ह्या द्विधा मनस्थितीत तिला काही बोलायच नव्हतंच. बोटात बोटं गुंतवत उगाचच काहीतरी चाळा करत बसली."

"माझं ऐकशील थोड...?" पाठीवरचा तिचा स्पर्श आश्वासक होता. अगदी आईच्या स्पर्शासारखा प्रेमाने ओथंबलेला.
"विसर आता सगळं... झाल्या चुका आता त्या काही दुरुस्त होणाऱ्या नाहीयेत... पण म्हणून तू जगणं थांबवणार आहेस का..?"

तिच्या डोळ्याच्या कडा नकळत झिरपल्या. खूप अडवूनही एक टपोरा थेंब तिच्या गालावरून घरंगळलाच.

"नाही विसरू शकत त्याला ग.... मी स्वतःच..... " आतापर्यंत थोपवून ठेवलेले अश्रू बरसू लागले. दोन्ही हाताच्या ओंजळीत आपला चेहरा लपवून ती हमसून हमसून रडू लागली. तिला थांबवणं आता अशक्य होत. तिला तिचा वेळ देणं जास्त गरजेचं होत. तिचा पुढचा बराचसा वेळ भूतकाळाची उजळणी करण्यातच संपला.

काही महिन्यापूर्वी सतत हसत खेळत आणि फुलपाखरासारख्या बागडत असलेल्या तिला अस कोमेजलेल्या अवस्थेत बघून ऑफिसमधे सगळ्यांनाच तिची काळजी वाटत होती. पण उगाच धीर देण्याच्या नादात तिच्या जखमांवरची खपली काढायची नव्हती कोणाला. तिचा हसता खेळता संसार असा साधारण दोन वर्षांत कसा संपला कोणालाच नाही कळलं.... फक्त तिच्याशिवाय....

रोजच्या सारखं आजही तीच घरी जायचं मन नव्हतं. घरी पुन्हा त्याच्या आठवणी मनात पिंगा घालणार आणि त्याच्या आठवणीने ती रात्र पुन्हा छळणार.... रात्रभर ती आपल्या चुकांची मनोमन माफी मागत राहणार... ११.११ च्या ठोक्याला मागितलेली विश पूर्ण होते म्हणून डोळे ताणून जागणार आणि त्यालाच मागणार... किती वेड्यासारखी प्रेम करत होती.... नाही.... ती आता प्रेम करायला शिकली होती.... ' आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याला आपण कधी बंधनात ठेवत नाही.... मोकळं सोडून देतो...' तो नेहमी हेच बोलायचा. फक्त त्याच्या मिठीच्या बंधनाशिवाय दुसरं कसलं बंधन नव्हतंच. पण आता तेही मोकळं सोडलं त्याने.

विचारांच्या तंद्रीत ती घरी पोचलीदेखील. दरवाजा उघडताच सकाळी तिच्यावर हसलेले कपडे पुन्हा दात विचकून हसले. आधीच उतरलेला तिचा चेहरा रडवेला झाला. घरातील भयाण शांतता तिला असह्य होत होती. वैतागून थकलेल्या अवस्थेत तिने स्वतःला दानदिशी सोफ्यावर झोकून दिलं. मगाशी दात विचाकणाऱ्या कपड्यांची आता चांगलीच हाड खिळखिळी झाली असतील. स्वतःच्याच विचारावर ती खळखळून हसली... अगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत.... आता तो असता तर त्याने अलगद बोटांनी पाणी टिपलं असत आणि वर टपली मारून रडूबाई म्हणून चिडवल असत..... " अरे यार.... का आठवतेय मी त्याला..." नाईलाजाने तिने टीव्ही चालू केला.

' लग जा गले की फिर ये हसीन रात हो ना हो....' इंडियन आयडॉल मधे कोणीतरी गात होत. तिने डोळे बंद केले. हे गाणं म्हणजे तिचा विकपॉइंट होता आणि त्याचाही... ती रागावली आणि बोलत नसेल की तो नेहमी हेच फान गायचा. त्याचा सुर लावणं ऐकून तिला मात्र हसू फुटायच. आणि त्याच्या डोळ्यात गाण्यातल्या भावना उमटायच्या... रागावून किती रागावणार ती... शेवटी आपण होऊन त्याच्या मिठीत शिरायची.... त्याच्या आठवणीने नकळत तिच्या ओठावर पण शब्द आले. गाण संपल्यावरदेखील ती कितीतरी वेळ तेच गुणगुणत होती.

जेवण बनवायचा मूड नव्हताच तिचा. पण आपला राग कधी जेवणावर काढायचा नसतो... त्याच वाक्य आठवल आणि नाईलाजाने उठली ती. मोकळ्या सोडलेल्या केसांना रबर मधे आवळून घट्ट अंबाडा बांधला. झपझप चालत किचनमधे गेली. कसातरी खिचडीचा कुकर लावून पुन्हा हॉलमध्ये आली. रोजसारखच लॅपटॉप वर फेसबुक ओपन केलं. तिला चाळाच लागला होता. रोज त्याच प्रोफाइल चेक सर्च करायचं. ती ब्लॉक असणार हे माहीत असूनदेखील आताही तेच करत होती. सवयीप्राणे उगाचच देवाचं स्मरण करून त्याच नाव टाइप केलं.... स्क्रीनवर पूर्ण यादीच झळकली. तिचे श्वास मंदावले. डोळे ओळखीचा प्रोफाइल पिक्चर शोधू लागले. स्क्रोल करताना बोटं थरथरू लागली.... अचानक तिची नजर एका प्रोफाइल वर थांबली. अविश्र्वासाने तिने स्वतःलाच एक चिमटा काढला.... अस कस झाल...?... त्याने अनब्लॉक केलं....

कुकरच्या शिट्टीने ती भानावर आली. चार पाच तर नक्कीच होऊन गेल्या असतील. तिने अंदाज लावला. लॅपटॉप हातात घेऊनच किचन मधे जाऊन कुकर बंद केला. तिथेच कीचनच्या कट्ट्याला टेकून तिने त्याच प्रोफाइल वर क्लिक केलं. मागच्या वर्षभरात फार काही अपडेट नव्हते... माझ्यापासून दूर होऊन तो खूष असेल का...?... असेलच ना... त्रास तर मीच द्यायची त्याला... स्वतःच्याच हृदयाची धडधड तिला स्पष्ट ऐकू येत होती. भीतीने पोटात गोळा उठलेला. थरथरत तिने फ्रेंड रिक्वेस्ट सेंड केली. आणि लॅपटॉप पासून चार पावलं मागे सरकली. जणू तो लॅपटॉप मधूनच तिला ओरडेल. भीतीने ती नख चावत होती... तो बघेल का आपली रिक्वेस्ट... बघितली तरी स्वीकारेल का... जाऊदे... तिने लॅपटॉप तसाच बंद केला. कुकर चेक केला. थरथरत्या हातांनी खिचडी वाढून घेतली. आणि हॉल मधे उगाचच जेवायला बसली. अंग पूर्ण गार पडलेलं तीच. खिचडीची चव जाणवतच नव्हती. राहून राहून नजर फोन वर जात होती. लॅपटॉप बंद झाला तरी फोन मधे फेसबुक चालूच होत. एक आशा होती मनात तो रिक्वेस्ट अक्सेप्ट करेल... त्याच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायची ह्याची मनाशी तयारी चालू होती... रिक्वेस्ट चुकून सेंड झाली... नको... फ्रेंडने केली.... नको... अति वाटेल ते... मीच केली आठवण आली म्हणून... पण तो म्हणेल की माझी नाटक आहेत ही.... जाऊदे त्यापेक्षा विचारच नको आधी तो काय करतो ते तर बघते.... जर त्याने डिलीट केली तर.... शी.... यार... मी का सेंड केली.... मूर्ख आहे मी.... कॅन्सल करू का.... पण फेसबुक ओपन करायलाच भीती वाटतेय... शीट.. शीट....

उगाचच तिच्या मनातली भीती तिच्यावर तिच्यावर आरूढ व्हायला लागली. कधी नव्हे ती आज पांघरुणात जवळ जवळ लपलीच. घड्याळाचे फिरणारे काटे स्पष्ट ऐकू येत होते.कितीही डोळे गच्च मिटले तरी झोप काही तिच्यावर प्रसन्न होत नव्हती. नुसतं ह्या कुशीवरून त्या कुशीवर करत कशीतरी अर्धी रात्र सरली..... तो असता तर कस घट्ट मिठीत घेतलं असत... केसातुन हात फिरवत गाणं म्हणत राहिला असता झोप येईपर्यंत... ह्या आठवणी पण अशा असतात ना एकदा मागे लागल्या की सोडता सोडत नाही... काश... ह्या आठवणींसारखं तोपण बिलगून राहिला असता...विचार करून डोळे टक्क उघडेच होते. कितीक रात्री अशाच त्याच्या आठवणीत जागवल्या होत्या..

जरा डोळे बंद झाले की मोबाईलच्या रिंगच्या आवाजाचा भास व्हायचा मग झोप पूर्ण उघडायची. आताही असाच भास झाला आणि ती गडबडून उठली. नजरेचा तिरपा कटाक्ष मोबाईल कडे टाकला. नोटिफिकेशन लाईट ब्लींक होत होती. एखादा कंपनीचा मेसेज असेल म्हणून तिने दुर्लक्ष केला. पण तिच्या डोळ्याआड सारखी ती ब्लिंक होणारी लाईट खुणावत होती.... मन पण कस असत... एका गोष्टीवर अडलं की अडूनच बसत... आणि ती गोष्ट करेपर्यंत छळत बसत... थोड कंटाळून तिने फोन ऑन केला... तिचे डोळे विस्फारले. स्क्रीन वर त्याचा चक्क 'हाय' होता. झोप कधीच गुल झाली... त्याने स्वतःहून मेसेज केला.... अजुन जागा असेल का... मेसेज तर दहा मिनिट आधीचा आहे... त्याने नक्की मलाच मेसेज केला असेल ना... मेंदूला झिणझिण्या येत होत्या. पोटात फुलपाखरांचे थवे उडायला लागले. हे खर आहे की स्वप्न ह्याच्यावर तिचा विश्वास बसेना. स्वप्न असेल तर स्वप्नातच का होईना माझ्याशी बोलतोय तरी....

तिनेही ' हाय ' टाईप करून सेंड केला. ना टाईम जात होता ना झोप येत होती. हृदयाच्या धडाधडीने घड्याळाच्या टिकटिकवरही मात होती. एक दोन मिनिट असेच गेले. फोनचा डिस्प्ले ऑफ झाला... पच्च..नाही करणार तो रिप्लाय... कदाचित चुकून सेंड झाला असेल... येवढ्या रात्री तो अजुन कोणाशी चॅट करत असेल... मुव्ह ऑन झाला वाटत... अचानक पुन्हा नोटिफिकेशनची लाईट लुकलुकली. तिने झडपच घातली. आता मात्र तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं.

तो : अजुन झोपली नाहीस ?

ती : नाही...

तिला सुचतच नव्हतं आता काय बोलावं. अचानक त्याचा मेसेज बघून ती धक्क्यात गेली होती. त्याच्या चॅट बॉक्स वर टायपिंग दाखवत होत. पण बराच वेळ काहीच मेसेज दिसेना. बहुदा टाईप करून कॅन्सल करत असावा. तिचा जीव खालीवर होऊ लागला. ही शांतता तिला सहन होईना. न राहवून तिनेच मेसेज टाकला.

ती : झोप नाही येत.

अजूनही त्याच्या चॅट बॉक्स वर टायपिंग दाखवत होत... आता त्याचा मेसेज आल्याशिवाय मी मेसेज करणारच नाही.... थोड त्याला पण कळुदे.... सारखं मीच का तळमळत राहू...?..

तो : अच्छा...!!

बास्स.... अच्छा फक्त... तुझ्या आठवणीत जागी आहे मी... हुssह..

ती : ह्म्म्म..

पुन्हा तीच शांतता. तिच्या ह्म्म ने संवादच संपवला. आता तर त्याच टायपिंग पण दिसत नव्हतं... करावा का त्याला मेसेज.. नको ते कसं वाटेल.... ती विचारातच हरवलेली. प्रेम की ईगो... प्रेम आहे ठीक आहे पण इगो पण दुखावला ना कुठेतरी... त्याला खरंच आठवण येत असेल का... की आपल उगाचच चांगुलपणा दाखवायचा म्हणून.. छे.. आता पुढे काही बोलत का नाही हा.. बोल ना यार... तिच्या मनातला गोंधळ संपेपर्यंत त्याच्या नावापुढची हिरवी लाईट गायब झाली. तिने जोराने कपाळावर हात मारला.... निव्वळ मूर्खपणा.. तिने उगाचच गुड नाईट पाठवलं. त्याचा रिप्लाय येणार नाही माहीत होत. विचारांमध्ये पहाटे कधीतरी डोळा लागला.

त्याने तिला घट्ट मिठीत ओढून घेतलं. तिच्यावर मात्र अजूनही झोपेचा अंमल होता. झोपेतच तिचे त्याच्याकडे पाठ केली. त्याने पाठमोरच तिला जवळ घेतल. तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले. पाठभर एक हलकासा शहारा पसरला. तो तिला तसाच न्याहाळत होता. अंथरुणात खट्याळ पोराने उधळावे तसे विखुरलेले तिचे केस अलगद त्याच्या गालांशी चाळा करत होते. तिच्या केसातुन आपली बोट फिरवत तिला प्रेमभराने न्याहाळत बसणं हा रोजचाच छंद त्याचा. तिलाही आता त्याच्यापासून दूर सरकवेना. मिटल्या डोळ्यांनी ती त्याच्या दिशेने वळली आणि अलगद त्याच्या कुशीत शिरली. नाजूकपणे तिचा चेहरा आपल्या ओंजळीत पकडला. तिचे डोळे बंदच. तीच हे नाटकी झोपणं त्याला फार आवडायचं. झोपेत फारच निरागस दिसायची ती. तिच्या तशाही अवतारात तो अजुन प्रेमात पडायचा. तिच्या कपाळावर पसरलेल्या बटा त्याने हलकेच बाजूला सरल्या. ती अजूनच जवळ सरकली. का न व्हावा मोह... त्याच्या स्वप्नातील अप्सरा तर त्याच्या मिठीत होती. पहिल्या नजरेतल प्रेम आता आयुष्यभरासाठी त्याचच होत. त्याने आवेगाने तिला अजुनच जोराने कवटाळल. तिच्या कपाळावर आपल्या ओठांचा स्पर्श केला. तसाच कित्येक वेळ तो हरवून गेला तिच्यात....

पहाटेच्या अलार्मने ती जागी झाली. पहाट रोजचीच होती पण आज तिला एकदम ताजी आणि नवीन वाटत होती.... पहाट बघण्यापेक्षा आज त्याचा आलेला मेसेज तिला रिफ्रेश करणार होता. तिने फोन बघितला... नो मेसेज... इंटरनेट ऑन ऑफ केलं.. तरीही त्याच काहीच नोटिफिकेशन नाही. टवटवीत होऊ पाहणारा तिचा चेहरा कोमेजला... का नसेल केला त्याने मेसेज... तिने फेसबुक बंद करून वॉट्सऍप ओपन केलं. सगळ्यात आधी त्याचा नंबर अनब्लॉक केला... मागच्या वर्षभरात तिच्या इगोने तिच्या प्रेमाला ब्लॉक केलं होत... त्याचा लास्टसीन पाच मिनिट आधीचा.. म्हणजे हा ऑनलाइन होता तर पण मला रिप्लाय नाही केला.. त्याने फेसबुक बघितलच नसेल तर.. आणि बघितल असेल तर.. पण त्याला इग्नोर करायचं असत तर मेसेज केलाच नसता... तसापण मीच ब्लॉक केलेलं त्याला सगळीकडे मग तो मेसेज तरी कसा करणार... मग आता केलं ना अनब्लॉक आता तरी रिप्लाय कर ना.. मी करू का... तिने गुड मॉर्निंग टाईप करून पुढे स्मायलीज पाठवल्या. आणि सगळं आवरायला पळाली. खुशितच सगळं लवकर आवरलं गेलं कदाचित त्याच्याशी बोलण्याच्या ओढीने... व्हॉट्सअँपच्या रिंगटोनने तिची तंद्री भंग केली. आतल्या आत कस भरून आल तिला. डोळ्याच्या कडा उगाचच ओल्या झाल्या. जीव तर सगळा त्या फोन ओढला जात होता. तिने फोन बघितला.... पण ढीगभर पडलेल्या चॅटसमधे त्याचा एकही मेसेज नव्हता. ओलावल्या कडांवरून अलगद पाणी घरंगळल.

दिवसभर कामात तीच लक्ष नव्हतंच.. सततची चुळबुळ, सारखं व्हॉट्सअँप ओपन करून बघणं, कुठेतरी तंद्रीत हरवण आणि अचानक दचकन... तिच्या बेस्ट फ्रेंडने तिला ह्यावरून विचारलं पण.. उत्तर द्यायला काहीच नव्हतं तिच्याकडे... फक्त एक बळजबरीची स्माईल देऊन तिने विषय तेवढ्यावरच संपवला. त्याच्या विचारांपासून दूर पळायचं तर कामात गुंतवून घेणं हा एकच पर्याय होता. कामाच्या रहाटगाड्यात तिने मुद्दामच फोनकडे दुर्लक्ष केला... तसाही तो काही मेसेज करणार नाही तर का उगाच स्वतःचा मूड खराब करून घ्यायचा.... जरा जास्तच नाही का मी विचार करत त्याचा... खूप जास्त... जाऊदे त्याच प्रेम असेल तर करेल तो रिप्लाय... हुssह....

घरी येऊन सोफ्यावर पडल्यावर तिच्या डोक्यात पुन्हा त्याच्या विचारांनी गर्दी केली. दिवसभर दुर्लक्षित केलेल्या फोनला आता हातात घ्यावच लागलं. कोलांट्या मारणाऱ्या विचारांना सारून तिने हळूच ड्रॉपडाऊन मधूनच बघितल... शिट्... त्याचे मेसेजेस...
तो : आता बोलावंसं वाटलं का..?
- बोल ना..
- ब्लॉक करून नंबर पण डिलीट केला वाटतं...
- अग ए आहेस का..?
- बिझी आहेस ?
- ठीक आहे नसेल बोलायचं तर जाऊदे... मी नाही तुला पुन्हा डिस्टर्ब करणार..


शिट्.. आय एम सो सो स्टूपिड... शिट्... आता त्याने ब्लॉक केलं होत. तिचा जीव गुदमरला. फोनकडे दुर्लक्ष केलं म्हणून तिने स्वतःलाच शिव्या घातल्या.... का अस वागते मी त्याच्यासोबत... आताही दुर्लक्ष केलं मी... मूर्ख.. का नाही समजुन घेता येत मला.. एक वर्ष होत येईल आता वेगळं होऊन... तेव्हाही तशीच हट्टाने वेगळी झाली मी.. फक्त मी.. माझ्या प्रायोरिटीज... माझी स्वप्न.. कधीच त्याला सामावून नाही घेतल... आजही तो स्वतःहून आला तर माझा मीच समज करून घेतला आणि दुर्लक्ष केलं... माझं फोन वेड माहितेय त्याला... तिने लगबगीने डोळे पुसत त्याचा नंबर डायल केला. रिंग वाजून कट झाली. ती पुन्हा पुन्हा डायल करत होती. पण पलीकडून काहीच रिस्पॉन्स नाही... तो दुखावलाय माझ्या वागण्याने... रागात असेल.. तिने सॉरी चे टेक्स्ट मेसेज पाठवले.... पण अजूनही काहीच रिप्लाय नाही.

"प्लीज यार नको ना उठवू मला..." ती आळसावलेली तशीच स्वतःभोवती पांघरून लपेटून घेत त्याला ओरडली.

"उठ ना... सूर्योदय बघुया ना.." त्याचा अजूनही तिला उठवायचा प्रयत्न चाललेला.

"काय फालतुगिरी आहे तुझी.. जा ना तू एकटाच.. मला झोपू दे.." ती वैतागली.

"चल ना बच्चा... तुला बघितल्याशिवाय पहाट कशी बघू " तो अजुनही लाडातच होता.

"जा ना.." ती खूप जोरात किंचाळली. तिच्या ओरडण्याने तो बावरला. घाबरून तो आता दबकतच तिच्यापासून थोडा दूर सरकला. ती अशी अचानक आक्रमक का झाली काही कळेना त्याला. तेव्हाच पहिली ठिणगी पडली.

त्या दिवसापासून मग नेहमीच ह्या ना त्या कारणावरून खटके उडत गेले. कधी कधी तर काहीही कारण नसताना भांडण विकोपाला जायची. शेवटी शेवटी तो ही समंजसपणा घ्यायला वैतागायचा. दोघांच्याही दिशेने ताणून शेवटी त्यांचं नात तुटलच.

तिने अलगद आसू टिपले. भूतकाळाच्या आठवणीने पुन्हा चेहऱ्यावर उदासी दाटली.... काश त्या दिवशी मी निशाच्या बोलण्यात आली नसती तर आज.... पुन्हा तिच्या मनात भूतकाळाचे तरंग उमटू लागले.

लग्नानंतरच्या एका महिन्यात तिच्या ऑफिस मधे निशा बदलून आली. एकतर निशा तिच्याच वयाची त्यातही नवीन मग अर्थात तिचा मैत्रीचा हात पुढे झाला. निशाच्या बडबड्या स्वभावामुळे काही दिवसांची ओळख घट्ट मैत्रीत कधी बदलली कळलं देखील नाही. मागाहून बोलता बोलता तिला कळलं की निशा आणि तो एकाच कॉलेजात होते. त्यानंतर त्याच्या कॉलेज मधल्या भरपूर गोष्टी तिला कळायला लागल्या. आधी त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या तिच्या मनात त्याचा भूतकाळ घोंघावू लागला. विचार करून करून साध्या विचारांनी कधी भीषण रूप धारण केलं कळलंच नाही.

त्या दिवशी सकाळी तिच्या मनात अशीच कोणतीतरी गोष्ट घोळत होती. आणि त्याच रागात त्याच्यावर ओरडली. नंतर नंतर निशाचे सांगितलेल्या गोष्टी तिच्यावर गारूड घालू लागल्या. हळू हळू त्याच्या वरच प्रेम आटतच गेलं आणि नंतर घटस्फोटाचा शिक्काच बसला.

येवढं आठवूनही तिच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला.... आपण निशाच्या बोलण्यात गुंतत गेलो. खर काय खोटं काय ते विचारायची देखील तसदी घेतली नाही... काय काय त्रास दिला त्याला.... अपमान.. त्याचा तर पत्ताच नाही... कस सहन केलं असेल त्याने.. आणि अजूनही तो आपल्यावर प्रेम करतोय... वाट बघतोय... आणि मी मात्र अजूनही त्याला टाळतेय... असच वाटत असेल त्याला....

आज जेवण पण घश्याखाली जाईना. त्याच्याच
आठवणीत आसू वाहत राहिले. पुन्हा पुन्हा त्याच दुरुस्त न होणाऱ्या चुका... त्याच्याच स्वप्नात सकाळ व्हायची. पण आताची सकाळ तिला सवय म्हणून देखील नकोशी वाटायला लागली. उगवतीचे रंग सगळे मनावर मळभ भरून साचत होते. एका दिवसात तिच्या आततायीपणाने तिच्या जवळ आलेलं तीच प्रेम पुन्हा दूर निघून गेले.... अगदी कायमसाठी.

एक नात कायमच तुटल्यावर त्या नात्याची जाणीव होण आणि पुन्हा ते नात जुळेल अस वाटत असताना परिस्थितीच्या बलाढ्य लाटेने त्या नात्याचे भुसभुशीत इमले क्षणार्धात कोसळून टाकावे... माणसाचं मन किती वेड असत.. एखादी गोष्ट त्याची असते तेव्हा ती नको असते आणि दूर गेल्यावर मात्र तीच हवीहवीशी वाटते.. पण मग ती गोष्ट जवळ असतानाच का नाही तेवढी ओढ लावत... ओढ जाणवायला दूरच जायला पाहिजे का... अर्ध्या तासापासून देवापुढे हात जोडून बसलेल्या तिच्या डोक्यात उलट सुलट विचार उड्या मारत होते. आजकाल त्याच्या स्वप्नात रमून रडून रडून देवापुढे त्यालाच मागणं रोजचच झाल होत. त्याच्या ब्लॉक केल्यानंतर तीच वागणं पूर्णपणे बदललं होत. त्याच्या विरहात ती वेडी होत होती. प्रेम पण कायच्या काय बदलून टाकत माणसाला... कधी तिचा तर कधी त्याचा इगो....

मोबाईलच्या रिंगने ती विचारांतून थोडी बाहेर आली. स्क्रीनवर आईच नाव झळकत होत. आता आईचा फोन उचलला तर ती पुन्हा लग्नाचा विषय काढणार त्यापेक्षा नकोच... फोन वाजून वाजून बंद झाला.... आईची तरी काय चूक.. आईच मन आहे ते... काळजी तर वाटणारच ना.. आता वेडावून सोडणाऱ्या प्रेमातल काहीच कसं वाटल नाही त्यावेळी... मनाला कसच काही का नाही वाटलं.. ही तीव्र ओढ त्यावेळी जाणवली असती तर आज कदाचित एकत्र असतो आम्ही... आईला देखील हे उगाचच टेन्शन नसत.. दुर्मुखलेल्या चेहऱ्याने ती स्वतःवरच हसली. नकळत तिच्या डोळ्यातून एक आसू रुंदावलेल्या गालावर ओघळलाच.

सवयीप्रमाणे झोपताना तिने त्याच प्रोफाइल चेक केलं. त्याने ब्लॉक केलेलं असूनही त्याचा न दिसणारा डीपी बघितल्याशिवाय तिला चैन पडायची नाही. जवळपास गेल्या काही महिन्यात हाच एक नवीन छंद जडला होता. दिवसातून कितीक वेळा ती त्याचा नंबर चेक करायची तीच तिलाच माहीत. आताही तिचा तोच चाळा चालू होता. बेडवर पडल्यापासून कमीत कमी वीस वेळा तरी तिने त्याचा डिपी बघितला असेल. अजूनही मन काही भरल नव्हतं तीच.... अजुन एकदा... शेवटचच.... मग पक्का झोपायच.. स्वतःच्या मनाला समजावत थरथरत्या हातांनी तिने व्हॉट्सअँप चालू केलं. आज त्याचा डीपी दिसला पण त्यानेच तिच्या काळजात आग लागली. कुठल्यातरी मुलीसोबतचा फोटो होता. आता तीच मन साहजिकच त्याच्या विचारापासून ती कोण ह्या विचारात भरकटल... आधीच मनात आग खदखदत होती आणि तिच्या फोटोने त्यात पेट्रोल ओतलं. बास्स... मग काय जो भडका उडायचा होता तो उडाला. डोक्यात विचारांचा स्फोट होत होता. कधी एकदा त्याला सगळ्याचा जाब विचारते अस झालं. पण विचारणार तरी कस..?? त्याच आयुष्य त्याने ठरवायचं ना.... पण माझ्या प्रेमाचं काय... आता इगो गेला खड्ड्यात... जे काही असेल ते संपवायचं आता.... रोज रोजची मनाची कुचंबणा नको आता... बघतेच त्याला... डिव्होर्स झाला तर काय झालं... प्रेम तर नाही ना संपत... मला काही माहीत नाही.... बास्स मला बोलायचं त्याच्याशी... आत्ताच्या आत्ता... तडफडत उसळणाऱ्या लाह्यांसारखी तीदेखील तडफडत होती... आता तो तिच्यापासून खूप दूर गेल्यासारखा भासायला लागला तिला. जोपर्यंत तो सिंगल होता तोपर्यंत तिचा इगो ठीक होता पण आता तो दुसऱ्या मुलीसोबत.... नाही... अशक्य... वैतागून ती रूम मधे फेऱ्या मारत होती. ह्यावेळी नक्की काय करावं हे सुचेना तिला. मन भरून आल आणि काळजात कळा मारू लागल्या. डोळे काठोकाठ भरून आले. तिला काहीच समजेनास झाल. हृदयाची धडधड कानांना स्पष्ट ऐकू येत होती. आजची रात्र वाट बघू का...?.. पण आजची रात्र गेलीच नसती. तिने थरथरत्या हातांनी त्याचा नंबर डायल केला. हातासोबत फोनही थरथरत होता. फोन कानाला लावायची हिंमत होईना. तिने स्पीकर ऑन केला. पहिली रिंग वाजून संपली. समोरून काहीच उत्तर नाही. डोळ्यातील आसव गालावर उतरली. नाकपुड्या लाल झाल्या. पोटातला भीतीचा गोळा छातीपर्यंत पोचला. कानाशिल तापली. भोवताली केवळ काळाशार अंधार पसरल्या सारखं वाटल. किती क्षण अश्या अवस्थेत गेले कुणास ठावूक... कशाचा तरी आवाज आला.. ती भानावर आली. फोन वाजत होता... त्याचाच कॉल.. तिची हिम्मत होईना.. हातात गोळे आले... बोटांमधली ताकदच गेली. कसातरी शेवटच्या रिंगला तिने फोन उचलला.

"ह.. हॅलो ...."

"बोल"

शांतता.... कोणीच बोलत नव्हतं. तिचे ओठ थरथरत होते. त्यातून शब्द उच्चारन्याची ताकद संपून गेली होती. मुसमुसनार तीच नाक फक्त तिच्या परिस्थितीची पुसटशी कल्पना देऊ शकल असत.

"काय झालं बोल" पुन्हा तोच

अजूनही शांतता.. आणि सोबतीला तिचे अस्फुट हुंदके.

"रडतेयस का?" तो.

"ह्म्म.."

आता काही अश्रू तिला जुमानत नव्हते. कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरीही ते घरंगळलेच. अजूनही ओळखतो मला ' त्याही परिस्थितीत तिच्या मनात येऊन गेलं. उगाचच तिच्या वेड्या मनाचं समाधान.

"भेटायचंय तुला" ती मुसमुसत उत्तरली.

"उद्या भेटूया" तो निर्विकार होता.

तिच्या काळजात उगाच धडकी भरली.

"उद्या नाही आत्ता." तिच्यात धीर नव्हता.

"का?" तो अजूनही निर्विकारच.

तिचा मात्र संयम तुटला. रडू आवरण अशक्य होत.... आता नाही सांगितलं तर कधीच जमणार नाही.

" आय एम सॉरी... मी खूप वाईट वागली तुझ्याशी. पण आता मला कळलं..."

" काय ?" त्याचा गंभीर आवाज तिच्या काळजात घाव घालत होता.

"आय लव यू " थरथरत्या ओठांनी ती कसबस बोलली.

" आर यू ओके...." तो जवळ जवळ किंचाळलाच.

"हो.... पूर्ण शुद्धीत आहे..."

"आपला डिव्होर्स झालाय..... तुला हे प्रेम वगैरे आता सुचतंय..."

ती खूपच ओशाळली. मनातून ती तयार होती ह्या उत्तराला पण प्रत्यक्षात त्याच्याकडून ऐकून मात्र पोटात ढवळून आल. कान सुन्न पडले. हात पाय कापत होते. तो पुढे काय बोलत होता तिच्या काहीही कानात शिरत नव्हते. डोळ्यासमोर अंधारी आली आणि फोन हातातून कधी गळून पडला तिलाच कळलं नाही..... संपलं सगळं..जी शेवटची काही आशा होती ती ही संपली... तसही आता त्याच्याकडून साधी आपुलकीदेखील अपेक्षित नव्हती. का आपुलकी दाखवेल तो. मी तर साधी माणुसकी पण दाखवली नव्हती.....

स्वतःच्या वागण्यावर पश्चात्ताप करण्याव्यतिरिक्त ती आता काहीच करू शकत नव्हती. तिच्या आलिशान बेड वर अंधारातच ती रात्रभर कुस बदलत राहिली. त्याच्या आठवणी तिचा पिच्छा काही केल्या सोडत नव्हत्या. सततच्या विचाराने तीच डोकं भाणाणून सोडलं होतं. पहाटे कुठेतरी विचारातच तिचा डोळा लागला....तोच डोरबेलचा कर्णकर्कश्य आवाज घुमला. त्या आवाजाने तिची नुकतीच जवळ येऊ पाहणारी झोप उडून गेली.... ' ह्या वेळी कोण असेल....आणि का..?'... डोळे चोळत तिने दरवाजा उघडला.

" गुड मॉर्निंग "

समोर ' तो ' तीच त्याची चार्मिंग स्माईल घेऊन उभा होता.... पुन्हा स्वप्न... ती वैतागली. काहीच रिअॅक्शन न देता ती तशीच दरवाजाला टेकून उभी राहिली. तिच्यात आता ताकद नव्हती अजुन स्वप्न बघायची.

" अग ए...." चुटकीच्या आवाजाने ती भानावर आली. डोळ्यात भरलेली झोप भराभर उतरू लागली. आपल्याला काहीतरी बोलायचय ह्याच तिला भानच नव्हत.

" तू....???" ती अक्षरशः किंचाळलीच. " तू खरच आलायस..." अजूनही तिचा विश्वासच बसत नव्हता. कित्येक दिवस तिने हेच स्वप्न बघितल होतं आणि आज तो प्रत्यक्षात समोर होता तर ते स्वप्न आहे की सत्य ह्याच्यावर विश्वास ठेवता येत नव्हता.

" मी जाऊ का...?" शेवटी तोच वैतागून बोलला.

तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. त्याच वाक्य मेंदूपर्यंत पोचताच क्षणी तिने त्याचा हात घट्ट पकडून त्याला घरात खेचलं..." नाही... नको".. नक्की काय चाललंय हेच कळेनासं झालं होत. ताण सहन न होऊन ती त्याच्याच मिठीत कोसळली. तीच थरथरत अंग त्याच्या बाहूमधे शांत झालं. तिच्या हृदयाची धडधड त्याच्या कानाना ऐकू येत होती. नकळत त्याचा हात तिच्या केसातुन फिरू लागला. इतक्या दिवसाची तडफड अश्रूवाटे बाहेर पडत होती. तोही स्तब्ध उभा होता तिला आपल्या मिठीत जखडून. जणूकाही तो ही तडफडला होता इतके दिवस.

हा क्षण जणू थांबून राहिला होता. त्याच्या मिठीत विसावलेली ती कित्येक जन्म त्याच्या स्पर्शासाठी आसुसल्यासारखी घट्ट बिलगत होती. बऱ्याच काळानंतर तिला त्याचा आसरा मिळाला होता. आता बोलण्यासाठी कोणत्याच शब्दांची गरज नव्हती. नात्यातला इगो दुराव्यासमोर विरघळून गेला होता.

" किती वाट बघितली मी तुझी." त्याची मिठी घट्ट करत ती बोलली.

" मी ही...." भरलेल्या स्वरात तो उद्गारला.

तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं.... म्हणजे हा... अजूनही... मनातच तिच्या मोर नाचू लागले.

" तुला गमावल्यानंतर.... खूप उशिरा कळलं मला प्रेम काय असत ते....." तिलाही भरून आलं होत. का कोण जाणे तो जवळ असून पण तिला शब्दांसाठी चाचपडाव लागत होत. किती वेगळं होत आधी आयुष्य... जे मनात येईल ते बोलायची ती त्याच्याशी... आणि आता त्याच्यासाठीच जीव झुरतो तर बोलताही येत नाहीये.

" म्हणूनच तर दूर होतो....." तिच्या डोळ्यात बघत तो बोलला. ह्या गहिऱ्या डोळ्यांमध्ये तो कित्येकदा हरवला होता. " तुला प्रेम कधी कळतंय त्याची वाट बघत होतो. "

ती काही एक न बोलता अजुनच त्याला बिलगली. तिचे प्रश्न, त्याची उत्तरं सगळं संभाषण मुक्यानेच एकमेकांच्या डोळ्यात पाहत चालू होत. इतक्या दिवसांचा राग, दुराव्याच दुःख, भेटीची तडफड, मिलनाची ओढ....सगळं काही होत त्या मिठीत.तिच्या डोळ्यात उमटणाऱ्या सगळ्या वेदनांना त्याने आपल्या मिठीत सामावून घेतलं...आजची सकाळ खरच प्रसन्न होती.

" आता मी रोज पहाट तुझ्या सोबतच अनुभवेन.." तिच्या रडून लाल झालेल्या चेहऱ्यावर गुलाबी हसू उमटलं.

"अ हं...." त्याने हळूच आपले ओठ तिच्या गुलाबी गालांवर टेकवले. तीच गुलाबी हसू अजुनच रुंदावल. " तू जवळ असताना पहाट काय बघायची..त्यापेक्षा आपण मस्त अस मिठीत राहू ना..."

तिच्या पोटात हजारो फुलपाखरांचा थवा उडाला. गालांवर गुलाब उमलले. आनंदाने आणि लाजून ती त्याच्याच मिठीत आसरा शोधत राहीली. तिला अस पाहून त्याच्याही चेहऱ्यावर मिस्किल हसू उमटलं. अख्खं जग जिंकल्याच समाधान त्याच्या चेहऱ्यावर पसरत होत. आजही पुन्हा प्रेम जिंकल होत.


समाप्त