Ek patra digital indias books and stories free download online pdf in Marathi

एक पत्र डिजिटल इंडियास





-------------------------------*एक पत्र डिजिटल इंडियास!* ---------------------- नागेश सू. शेवाळकर,
थेरगाव, पुणे. ४११०३३
अतिप्रिय डिजिटल इंडिया,
हाय! हाऊ आर यू ?
खरे तर 'डिजिटल इंडिया ....डिजिटल इंडिया...'असा होणारा जयघोष ऐकून तुला इंग्रजी भाषेत पत्र लिहावे असा एक विचार केला होता परंतु त्यामुळे तुझ्यापेक्षा माझ्या इंग्रजीचा जास्त गवगवा होईल म्हणून मी तो मोह टाळला.
तू काय मोहिनी घातलीय आम्हा इंडियावासियांना ते न कळे. परंतु हळूहळू इंडिया तुझ्या छत्रछायेखाली येतोय हे नक्की. धार्मिक पुस्तकं, ग्रंथांंमधून अनेक युगांची माहिती आणि महती समजते. सध्या कलियुग चालू आहे असे म्हणतात. वास्तविक जीवनात तांत्रिक युग,मांत्रिक युग अशा अनेक युगांंचा अनुभव घेत असताना संगणक युगात प्रवेश केला आणि नकळत भ्रमणध्वनीच्या क्रांतीने आम्हाला वेडं केले आहे. ह्या आश्चर्यकारक युगाचा मनसोक्त आनंद लुटत असतानाच 'डिजिटल इंडिया' या एका वेगळ्याच नावाने, तुझ्या रुपात जणू महाक्रांतीच घडून आली आहे. विशेषतः नोटबंदीच्या निर्णयामुळे तुला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तू आता घरोघरी पोहोचला आहेस. सुरुवातीला तुला विरोध करणारे आता तुझे प्रचारक झाले आहेत. तुझ्या माध्यमातून ते सारे स्वतःचे आर्थिक व्यवहार घरी बसून करीत आहेत.
डिजिटल इंडिया, तू आलास आणि आम्हा मानवांचे जीवनच बदलून गेले. काही वर्षांंपूर्वीची आमची दयनीय अवस्था आम्हाला आजही आठवते. वर्षानुवर्षे आम्हाला 'रांग' या व्याधीने त्रस्त केले होते. रांग या व्यवस्थेची आम्हाला केवढी सवय झाली होती हे पुढील वास्तव विनोदावरून तुझ्या लक्षात येईल.... जीवनात आलेल्या कटकटी, संकटे यांना कंटाळून आत्महत्त्या करायला जावे तर तिथेही म्हणे प्रचंड गर्दी.. रांग लागलेली असे. या रांगांंमुळे आम्ही त्रस्त झालो होतो, कंटाळलो होतो. वैशाख मासाच्या भर दुपारच्या उन्हात मैलोनमैल चालत असताना अचानक एखादी पावसाची सर यावी अशी काहीशी अवस्था आम्हा भारतीयांची तुझ्या आगमनाने झाली. कुठे नव्हती रांग? यत्र-तत्र-सर्वत्र रांगच रांग! रोजच्या त्याच त्याच जीवनाला, सांसारिक त्राग्यांना कंटाळून साधा एखादा सिनेमा बघायला जावे म्हटले तरी तिथेही लांबचलांब रांगा असत. बरे, आम्हा भारतीयांना बेशिस्तपणा आजार कायम जडलेला. रांगेत शिस्त पाळली तर काहीही त्रास होत नाही. परंतु सिनेमाग्रुहाच्या आवारात असलेली, तिकीट देणारी खिडकी उघडली की त्या खिडकीच्या तळाशी असलेल्या आणि जेमतेम एका व्यक्तीच्या हाताचा पंजा जाऊ शकेल अशा मजबूत लोखंडी छिद्रातून एकाच वेळी चार-चार, पाच-पाच माणसांच्या हातांचे पंजे आत जाण्यासाठी खटपट करीत असत. त्या तशा पंजा लढविण्याच्या महाशर्यतीत जेंव्हा मिळालेले तिकीट घेऊन मनगट बाहेर येई त्यावेळी मनगटासह पंजा लालभडक झालेला असे, रक्ताळलेला असे. परंतु खरे सांगू का, त्या तशा दांडगाईतून लाल,हिरव्या, पिवळ्या, पांढऱ्या, निळ्या रंगांंची तिकिटे पाहिली ना की त्या रक्ताळलेल्या हाताकडे, झालेल्या त्रासाकडे लक्षच जात नसे.
बसस्थानक, रेल्वेस्थानक या ठिकाणी जाऊन आरक्षण करावे लागे किंवा तिकिटे काढावी लागायची. या ठिकाणी लांबलचक रांग असायची. तासनतास रांगेत उभे राहिल्यामुळे भूक, तहान, हातपायांना लागणारी कळ सारे विसरावे लागे, सोसावे लागे. असेच अनुभव विद्युत बिल, दूरध्वनी बिल भरताना येत असत. त्यामुळे रांगा आणि धक्काबुक्की, त्यातून होणारे वाद, भांडणे या गोष्टी आमच्या जीवनाच्या अविभाज्य अंग झाल्या होत्या. एवढेच कशाला बँकेत हक्काचे पैसे उचलताना, भरताना किंवा इतर कामासाठी रांगाचा डोंगर पार करावा लागे. तुझे आगमन झाले आणि जागोजागी असणाऱ्या रांगा जादू झाल्याप्रमाणे कमी झाल्या. घरी बसून भ्रमणध्वनी आणि संगणकाच्या सहकार्याने सारेच कसे सहजासहजी होते आहे. आरक्षण, तिकीट काढण्यासाठी लागणारा वेळ, पैसा, त्रास यांची बचत होऊ लागली आहे. धावपळ, धक्काबुक्की यांचेही प्रमाण कमी झाले आहे. पाकिटात पैसेच नसल्याने अथवा फार कमी असल्याने पाकिटमार मंडळी मात्र तुला शिव्यांची लाखोली वाहत असतील.
मोठ्या शहरांंमध्ये घरी बसल्या बसल्या किराणा, भाजी, औषधी , नाष्टा, जेवण, कपडे, वहाणा,इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल वस्तू इत्यादी अनेक गोष्टी मागवता येऊ लागल्या आहेत. खरे सांगू का , डिजिटल इंडिया, आम्ही कथा-पुराणात कल्पवृक्षाबाबत वाचले, ऐकले होते परंतु तुझ्यारुपाने तो अद्भुत व्रुक्ष आमच्या घरात काय अगदी आमच्या खिशात वास्तव्यास आला आहे. कुणी तुला अगदी हवे ते देणारा अल्लाउद्दीनचा दिवाही म्हणत असतील.
काही वर्षांंपूर्वी देशातील मोठमोठ्या देवस्थानी, प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी जाणे म्हणजे एक महाकठीण काम होते. परंतु तुझे आगमन झाले आणि देश-परदेशात जाणे - येणे सोपे झाले. कुठेही जायचे ठरवले की, घरबसल्या जाण्यायेण्याचे वाहनांचे आरक्षण तर करताच येते परंतु देवदर्शनाचा दिवस आणि वेळही तुझ्यामाध्यमातून आरक्षित करता येते. पूर्वी देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी बस, रेल्वे, विमान अशीच व्यवस्था होती. फारच झाले तर किरायाने घेतलेली खाजगी वाहने ! अशा खाजगी वाहनातून किंवा स्वतःच्या वाहनातून रस्त्याचा प्रश्न उपस्थित होत असे. एखादे शहर ओलांडून जाताना रस्ता चुकला, लक्षात आला नाही तर मग पन्नास-शंभर किलोमीटरची भ्रमंती करावी लागे. अशा हेलपाट्यांमुळे वेळ, पैसा, कष्ट सारे वाया जात असे. परंतु तू घडवून आणलेल्या क्रांतीमुळे भ्रमणध्वनीवर आणि वाहनांमध्ये असलेल्या नकाशांंमुळे आम्ही अगदी आपल्या इच्छित स्थळी कुणालाही न विचारता विनासायास जाऊ शकतो. शिवाय या नकाशाच्या माध्यमातून एक मधूर, मधाळ आवाज शेवटपर्यंत सोबत असतो ते वेगळेच.
या युगातील नागरिक आम्ही! खेळ... त्यातही क्रिकेट आमचा जीव की प्राण! दूरदर्शनसमोर आरामात बसून थेट प्रक्षेपण पाहण्याची मजा कुछ औरच! असे असले तरी कामानिमित्त, व्यवसायासाठी घराबाहेर असलो की, थेट प्रक्षेपण पाहायला मिळत नसे. पूर्वी आम्ही क्रिकेटप्रेमी बाहेरगावी जाताना रेडिओ बाळगत असू परंतु ही व्यवस्था अडचणीची ठरत असे. परंतु हे डिजिटल इंडिया, तू आलास आणि आमची ही अडचण दूर झाली. आजकाल भ्रमणध्वनीवर धावते समालोचन पाहायला मिळू लागले आहे. त्यामुळे प्रवासात, कुठे कुणाची प्रतिक्षा करताना आम्हाला आमच्या आवडत्या खेळाचा आनंद लुटता येतो. प्रवास हा अनेकांना कंटाळवाणा असतो तो सुसह्य करण्यासाठी पूर्वी आम्ही वर्तमानपत्र, मासिके, पुस्तकं यांना सोबत ठेवत असू. काही मानवप्राणी छोटा रेडिओसोबत घेऊन संगीताच्या सान्निध्यात प्रवास करीत असत. परंतु आजच्या तुझ्या... डिजिटल युगात भ्रमणध्वनीवर वर्तमानपत्र, मासिके, पुस्तके वाचायला मिळतात. त्याचबरोबर आवडीचे गाणे, हवा तो सिनेमा, नाटक आणि वाहिन्यांवर चुकलेला एखादा कार्यक्रम पाहू शकतो. केवढे हे बदल ?
डिजिटल मित्रा, तुझे आगमन झाले आणि एक फायदा झाला तो असा की, पूर्वी दुकानात जाऊन खरेदी करताना सुट्या नाण्यांंचा आणि नोटा यांचा प्रश्न फार सतावत असे. परंतु आजकाल ही समस्या तुझ्यामुळे बरीचशी आटोक्यात आली आहे. मोठी खरेदी करायची म्हणजे आधी बँकेतून पैसे काढावे लागायचे. मग ती रक्कम सांभाळत-सांभाळत कधी गावातील तर कधी शहरातील दुकानात खरेदीला जावे लागे. फार मोठे जोखमीचे काम होते ते. तू आलास आणि ही जोखीम मोठ्या प्रमाणावर कमी झाली. आजकाल काय ....'चालवले कार्ड, टाकला पासवर्ड, हाती आले सारे वर्ल्ड!' अशी अवस्था. रक्कम देताना-घेताना तीन-तीन वेळा मोजणी करण्याचे काम वाचले. नकळतपणे ग्राहकाचे नुकसान कसे होत होते ते ही लक्षात घे,दुकानदाराकडून दोन-तीन रूपये येणे असतील तर तो चक्क चॉकलेट, गोळ्या देऊन बोळवण करीत असे. आता तसे फार कमी ठिकाणी घडताना दिसते. एक रुपया जास्त देणे नाही की घेणे नाही. डिजिटल व्यवस्थेचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी असा कार्डद्वारे व्यवहार होतो ना तो सारा व्यवहार करपात्र ठरून दुकानदारास कर भरावा लागतो किमान हिशेब तरी सादर करावा लागतो . सारा व्यवहार पांढरा! ना काळा व्यवहार ना काळा पैसा ! त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असेल तर तोही एक फायदाच की!
हे डिजिटल इंडिया नामकयुगा, तू खरेच आमच्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे. क्रांती म्हटलं की, आठवतात सभा, उपोषणं, मोर्चे, मारामारी, बंदुकीच्या गोळ्या, पोलिसांनी केलेला लाठीहल्ला परंतु तुझ्यावेळी असे काही कुठे घडले नाही. सुधारणा, विकास, बदल हे मानवी जीवनात अत्यंत आवश्यक अशा गोष्टी. नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे नवीन होणाऱ्या बदलांना, सुधारणांनाही चांगल्या-वाईट अशा दोन बाजू असतात. तशाच तुझ्याही बाबतीत दोन बाजू आहेत. परंतु त्यात तुझी चूक नाही. काय घ्यावे, काय घेऊ नये, कोणत्या गोष्टीचा उपयोग नि उपभोग किती मर्यादेपर्यंत करावा हे उपभोग घेणाराने ठरवायचे असते, तसे वागायचे असते. आमच्यापैकी अनेक मानव हे जास्त महत्त्वाकांक्षी आहेत. सहज प्राप्त होणारी गोष्ट ते ओरबाडून, हिसकावून,प्रसंगी रक्तबंबाळ करून किंवा रक्तबंबाळ होऊन घ्यायचा प्रयत्न करतात. असो. ज्याचे त्याचे विचार, ज्याचे त्याचे संस्कार! एक मात्र निश्चित डिजिटल मित्रा, तू आमचे जीवन बदलून टाकले आहेस. धन्यवाद, मित्रा, धन्यवाद!
तुझाच,
एक, लाभधारक नागरिक.
----------------------------------------------------------------------------------------------

नागेश सू. शेवाळकर,
थेरगाव, पुणे ४११०३३.
************************************************************



इतर रसदार पर्याय