नागेश सू. शेवाळकर,
११०, वर्धमान वाटिका, फेज०१
क्रांतिवीरनगर, लेन ०२,
थेरगाव, पुणे ४११०३३
*****************दंगलताईस पत्र*****************
प्रिय दंगलताई,
सप्रेम नमस्कार.
इच्छा नसतानाही तुला प्रिय असे म्हणावेच लागते. काय करणार मजबुरी आहे. वास्तविक पाहता तुला पत्र लिहिण्याचे तसे विशेष कारण नाही. माहेरवाशीण माहेरी यावी आणि तिने नवऱ्यासोबतचे सारे संबंध तोडून टाकावेत अशीच तुझी अवस्था झाली आहे. कारण तू कायम प्रुथ्वीतलावर ठाण मांडून बसली आहेस, जणू माहेर असल्याप्रमाणे! दूरदर्शनवर कोणतीही बातम्या देणारी वाहिनी लावली की, तुझे हमखास दर्शन होते. तू घातलेल्या धुडगुसाची वर्णनं, द्रुश्यं पाहून माझ्यासारख्या सामान्य, शांतीप्रिय नागरिकाचे पित्त खवळून उठते. असे वाटते की, असेच उठावे. तू जिथे कुठे असशील तिथे तुला गाठावे आणि तुझ्या कानाखाली आवाज काढावा परंतु, तू सर्वव्यापी आहेस, तू दिसत नाहीस. त्यामुळे तुला शिक्षा करायचा विचार लुप्त होऊन जातो. शक्तीपात झाल्याप्रमाणे, विकलांग झाल्याप्रमाणे चरफडत, माझे काहीही नुकसान झालेले नसतानाही मनातल्या मनात आक्रंदत, टाहो फोडून बसून राहतो. फारच झाले तर माझ्यासारखे दोन चार मित्र जमवून कुणी ऐकणार नाही, कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी जाऊन तुझ्याबद्दलचा राग, संताप, चिड ओकून टाकताना स्वत:ची हतबलता, षंढपणाही लपवण्याचा प्रयत्न करतो.
तुला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूजाअर्चा, नवस सायास, जप तप, व्रत, नैवेद्य, धूपारती, यज्ञ-महायज्ञ, प्रार्थना, नमाज असे काहीही करायची गरज नसते. एखाद्या विशिष्ट स्थळी कुणी घाण टाकली, एखाद्या पुतळ्याला निषिद्ध वस्तुची घातलेली माळ, कुणी कुणाला दिलेली जातिवाचक शिवी,कशाची तरी झालेली विटंबना, कुणाचा विनयभंग, कुणावर तरी झालेला बलात्कार, कुणाचा तरी खून, डॉक्टरांचा तथाकथित निष्काळजीपणा, सरकारी कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा अशी किती तरी कारणे आहेत ज्यामुळे तुला आमंत्रण न देता, तुझा धावा, प्रार्थना न करता तू अवतार घेतेस. तुझा सर्वत्र संचार असतो. दिल्ली काय नि गल्ली काय सर्व भूमी तू व्यापून टाकतेस....जणू 'सब भूमी दंगल की..' याप्रमाणे! इतर कोणत्याही भयानक रोगापेक्षा तुझा संसर्ग भयानक आणि सर्वदूर आहे. एखाद्या आजाराने एखादी व्यक्ती, एखादे घर, एखादी चाळ फार तर एखादे शहर रोगग्रस्त होईल. परंतु, तुझ्या संसर्गाने काही क्षणात अख्खा देश आणि प्रसंगी विश्वही रोगग्रस्त, दंगलग्रस्त होते.
तुझ्या आवडीनिवडी तरी किती खास आहेत ना. तुला आवडते धावाधाव, पळापळ. तुला आवडतात जखमी माणसं, तुझी खास पसंती म्हणजे रक्ताने माखलेले जीव, जागोजागी पडलेली प्रेतं पाहून तुला आनंदाच्या उकळ्या फुटतात. जखमांमुळे विव्हळणारी माणसे, हातपाय तुटलेल्या व्यक्तिंना होणाऱ्या प्राणांतिक वेदना, आपला कुणीतरी जवळचा नातेवाईक मेला या जाणिवेतून आक्रोश करणाऱ्या माता-भगिनी, पिशाच्च डोक्यात शिरलेल्या अवस्थेत एकमेकांवर होणारे हल्ले ही अशी परिस्थिती तुझ्यासाठी जीव की प्राण! जाती-जातीत, धर्मा-धर्मात,पक्षा-पक्षात पेटलेले युद्ध म्हणजे तुझ्यासाठी आत्यंतिक आनंदाचा ठेवा! या अशा वातावरणासाठी तू आसुसलेली असतेस. दंगलीत सांडलेले रक्त पाहून तू हर्षोल्लासाने थुईथुई नाचू लागतेस. ती परिस्थिती निवळू नये, दिवसेंदिवस अधिक चिघळत जावी हा तुझा एक कलमी कार्यक्रम असतो. ज्या सामान्य माणसांना अशा वातावरणाशी काहीही घेणेदेणे नसते अशी माणसं जीवाच्या आकांताने, भीतीने सैरावैरा पळतात, रस्त्यात कुठेतरी जीव मुठीत धरून, थरथर कापत बसतात, स्वत:ला वाचवण्यासाठी वाट फुटेल तिकडे पळत सुटतात, पळताना पडले की, पुन्हा धडपडत उठतात, पाठीमागून कुणीतरी हातात काठी, चाकू, तलवार अशी शस्त्रं घेऊन एखाद्या मानवास गाठतो त्यावेळी तो गरीब, निष्पाप माणूस हात जोडून, पायावर डोके ठेवून जीवाची भीक मागतो अशी द्रुश्यं तुझ्यासाठी अतिप्रिय!
अशा वातावरणात तू एखाद्या सम्राज्ञीसारखी वातावरण पेटवत राहतेस. तुला रक्ताचा अभिषेक होत असताना तू एखाद्या राक्षसीनीप्रमाणे क्रुर , गडगडाटी हास्य करीत असतेस. करून सवरून नामानिराळे राहतेस. तू स्वतः एक स्त्री लिंगी आहेस परंतु अशा परिस्थितीत महिलांची होणारी विटंबना, तिच्या लज्जेची वेशीवर टांगल्या जाणारी लक्तरे पाहून तुला स्वर्ग दोन बोटं दूर असल्याप्रमाणे आनंद होतो. पीडित होणाऱ्या बायकांचा आक्रोश पाहून तुझ्या डोळ्यात आसवाचा टिपूसही येत नाही का ग? त्यांच्यासाठी तुझे ह्रदय स्त्रवत नाही का? तू आंधळी आहेस की बहिरी? तू भावनाशून्य अवस्थेत, मुर्दाड अवस्थेत का फिरत राहतेस? खरे सांगायचे तर तू या वातावरणाला चटावलीआहेस. अशा वातावरणाशिवाय तू जगू शकणार नाहीस. मला वाटते, एक दिवस केवळ एक दिवस अशी परिस्थिती निर्माण झाली की त्या दिवशी तुला कुणी पाचारण केले नाही तर तू कासावीस होत असशील, स्फूर्तीहिन, चैतन्यहिन होऊन एखाद्या पिसाटाप्रमाणे स्वतः चे केस उपटून टाकत असशील.
दंगलताई, तुला प्रुथ्वीतलावर राहणाऱ्या एकूण एक सामान्य माणसांच्या वतीने मी हात जोडून विनंती करतो, हे सुखहर्ती, दु:खकरती , विघ्ननिर्माती, रक्तपिपासू दंगलबाई एकदा केवळ एकदा तुझी भक्ती करणाऱ्या, तुला वारंवार पाचारण करणाऱ्या मुठभर लोकांच्या भक्तीला भुलून त्याच धरणीवर राहणाऱ्या माझ्यासारख्या करोडो लोकांचा जीव घेऊ नकोस. त्यांना आजन्म दिव्यांगतेचा शाप देऊ नकोस, चिल्ल्यापिल्ल्यांना अनाथ करू नकोस, सधवांना विधवेचा शाप देऊ नकोस, कुमारिकांना बलात्कारी दु:खाच्या महासागरात ढकलू नकोस, ज्येष्ठांची 'श्रावणबाळ'रुपी काठी हिसकावून त्यांना दरदर फिरायला लावू नकोस. हे दंगली, ना तुला कोणती जात आहे, ना तुझा कोणता धर्म आहे कारण कोणताही धर्म हिंसाचार, बलात्कार अशा गोष्टींना परवानगी देत नाही, प्रोत्साहन देत नाही. हे दंगलीताई, सोडून दे सारे, विसरून जा सारे, सोडून दे तुझी विध्वंसक व्रुत्ती, तिलांजली दे हिंसकतेला. करतील आमचे काही बांधव तुला पाचारण करतील, तुला प्रसन्न करून घेण्यासाठी नाना उपाय करतील. दुर्लक्ष कर त्यांच्याकडे. डोळ्यावर पट्टी बांध, कानात कापसाची बोळे घाल, ओठ घट्ट मिटून घे. ओरडतील, गळ घालतील, गयावया करतील, डोके आपटून घेतील. घेऊ दे. एकदा दोनदा करतील, कदाचित सारखे करत राहतील. पण काही झाले तरी त्यांना प्रतिसाद देऊ नकोस, त्यांच्या आंधळ्या भक्तीने भुलून जाऊ नकोस. हां एक कर तुझे लक्ष माझ्यासारख्या सामान्य माणसावर केंद्रित कर. एकदा डोळे उघडून आमचा संसार बघ. तुझी दहशत बघ, कमावता माणूस घरी येईपर्यंत कुटुंबातील सदस्यांच्या जीवात जीव नसतो. जसजशी संध्याकाळ होते तसे सारे कुटुंबातील लोक त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. घराबाहेर पडणारा जीव जणू घरावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडतो. अजून भयानक गोष्ट म्हणजे ती व्यक्ती जणू बायकोच्या कपाळावरील कुंकू मनोमन पुसून बाहेर पडतो. परिवारातील छोट्या छोट्या बालकांकडे डोळे उघडून बघ. शाळेत असताना कुठे तरी तुझे आगमन झाल्याची बातमी येते आणि आनंदाने बागडणाऱ्या त्या चिमुकल्यांचे चेहरे काळवंडतात. जीव भीतीने थरथर कापतो. काय चूक असते या चिमुकल्यांची? का हिरावतेस त्यांच्या डोक्यावरील मायेचे छत्र? का? का? का?
हे दंगले, एकदा आम्हा सामान्यांना पाव, तुझा आशीर्वाद एकदा आम्हालाही लाभू दे. आजवर तुझी जी स्वार्थी भक्त मंडळी आहे ना त्यांच्यावर असलेली माया पातळ करून त्या मायेचा आमच्यासारख्या सामान्य, निरपराध, निष्पाप लोकांवर वर्षाव कर. तुझ्या शापातून आम्हाला मुक्त कर. आमच्या जीवनात आनंद, सुख बहरू दे. तुला खात्री देतो, विश्वासाने सांगतो तुझा कृपाशीर्वाद लाभताच माझ्यासारखी सामान्य जनता तुला 'शांती देवी' मानतील. तुझी रोज पूजा करतील. तुला ह्रदयात स्थान देतील. तेंव्हा हे दंगलीताई , ऐक माझे. माझ्या हाकेला ओ दे. आम्हाला ही सुखशांतीचे जीवन जगू दे. ऐकशील एवढे? माझ्या प्रार्थनेला पावशील? बघ. तुला काय करता येईल? कसे करता येईल?.....
तुझाच,
नावडता कदाचित आवडता,
एक अति सामान्य नागरिक..
---------------------------------------------------------------------------
नागेश सू. शेवाळकर