राष्ट्रध्वजाचे पत्र Nagesh S Shewalkar द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

राष्ट्रध्वजाचे पत्र



* राष्ट्रध्वजाचे पत्र! *
प्रति,
प्राणप्रिय राष्ट्रभक्तांनो,
जयहिंद।
किती छान वाटतेय तुमच्याशी संवाद साधताना. किती नशिबवान आहे ना मी. तुम्ही माझी राष्ट्रीय प्रतीक म्हणून निवड केली तेव्हा खूप खूप आनंदलो होतो मी. फार मोठा सन्मान आहे हा माझा! तुम्ही निवडलेले तीन रंग माझे सौंदर्य खुलवतात. माझ्या छातीवर असलेले अशोक चक्र माझा फार मोठा गौरव आहे असे मी मानतो. हे तुम्ही मला प्रदान केलेले रुप तुम्हाला तुमच्या जीवाहून प्रिय आहे हे मला माहिती आहे. किती प्रेम करता तुम्ही सारे माझ्यावर! केवढा अभिमान आहे, तुम्हा सर्वांना माझा! हे सारे मला शब्दात मांडायला जमणार नाही. राष्ट्राभिमानाने प्रेरित होऊन तुम्ही सकाळी सकाळी माझी प्राणप्रतिष्ठा करता, मंगलमय वातावरणात, स्फूर्तिदायी, चैतन्यमयी, आनंदीमय महोत्सवाच्या क्षणी तुम्ही मला किती उंचीवर नेऊन ठेवता ना तेव्हा मला कोण आनंद होतो म्हणून सांगू? मी आनंदाने डोलत राहतो, फडकत राहतो. आकाशाला गवसणी घातल्याचा तो क्षण माझ्यासाठीही अभिमानाचा असतो. त्यासोबतच तुमच्या चेहऱ्यावरील आनंद, डोळ्यातील अभिमान, राष्ट्राभिमानाने पेटलेले स्फुल्लिंग पाहताना माझ्या शरीरातही वेगळेच चैतन्य स्फुरते. माझाही उर देशाभिमानाने भरून येतो. एखाद्या महाराजाप्रमाणे, सम्राटाप्रमाणे माझी बडदास्त ठेवता तुम्ही. चिमुकल्या बालकांच्या तोंडातून सकाळी सकाळी होणाऱ्या राष्ट्रभक्तीच्या गर्जना, विविध नेत्यांचा जयजयकार, सोबतच माझाही होणारा जयघोष ऐकून मी तृप्त होते. वाजत-गाजत त्या बाळगोपाळांसह सारे नागरिक गल्लीबोळातून जयघोष करीत प्रभातफेरी काढता ना ते सारे क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय असतात. त्या चिमुरड्यांचा जोश, जोम,स्फूर्ती, आनंद, अभिमान इत्यादी सारे पाहून मन भरून येते. वाटते, ही पिढी, ही बालके, ही आबालवृद्ध माणसे माझ्याभोवती आहेत तोपर्यंत माझ्याकडे कुणी वाकडा कटाक्ष टाकू शकणार नाही. त्या प्रत्येक बालकाच्या हातामध्ये जेव्हा मी स्थिरावलेला असतो, माझ्या छोट्या रुपाला ती बालके उंचच उंच नेऊन भारतमातेसह माझाही जयघोष करतात ना तेव्हा मला आठवतो माझा सैनिक! तो शूर शिपाई सीमेवर डोळ्यात तेल घालून, शरीरावर नानाविध शस्त्रांचे ओझे वागवत माझ्यासह सीमेचे रक्षण करतो, तेव्हा वाटते हा शूर जवान, जाँबाज सैनिक आहे म्हणून मी मोठ्या रुबाबाने फडकत राहतो, फडकत राहणार आहे. सीमेपलीकडे फडकणाऱ्या शत्रूच्या ध्वजाला मी नेहमी खिजवतो, डिवचतो! त्या ध्वजाला चिडवण्यासाठी म्हणतो,
'हे शत्रुराष्ट्राच्या ध्वजा, तुझा तोरा तिकडेच मिरव. माझ्याभोवती हे बहादूर बांधव उभे आहेत ना,ते कोणत्याही वेळी माझे आणि भारतमातेचे रक्षण करण्यासाठी समर्थ आहेत, सज्ज आहेत. तुझे सैनिक माझ्या सावलीपर्यंतही पोहोचू शकणार नाहीत.' असेच शूर, धाडसी, नीडर, धैर्यवान, ताकदवान, चतुर सैनिक मी या देशाच्या बालकांमध्ये बघतो आहे. या बालकांमध्ये भरभरून वाहणारा जोश पाहून मला वाटते, 'उद्या चालून ही बालके मोठी होतील, तरुण होतील. त्यावेळी यातील काही बालके सैन्यात भरती होऊन भारतमातेचे संरक्षण करण्यासाठी सज्ज होतील, नव्या जोमाने पुढे येतील. हे भारतमाते, आपण किती भाग्यवान आहोत, आपल्या रक्षणासाठी हजारो सैनिक स्वतःच्या जीवाचे दान करायला एका पायावर अर्ध्या रात्रीही तयार असतात.'
मित्रांनो, माझ्यासाठी खरा आनंदाचा, समाधानाचा परंतु मन हेलावून टाकणारा, प्रसंगी ओक्साबोक्शी रडायला लावणारा क्षण कोणता असेल तर माझ्या संरक्षणासाठी कोसळणारा सैनिक! स्वतःच्या जीवनातील अंतिम क्षण समोर दिसत असतानाही त्याला ना आठवण येते त्याच्या जन्मदात्याची, त्याला ना स्मरण होते त्याच्या नवविवाहित पत्नीचे!त्याला फक्त आणि फक्त एकच माहिती असते, जीव गेला तरी बेहत्तर, भारतमातेच्या उदरी कोसळलो तरी चालेल परंतु हातातील तिरंगा झुकला नाही पाहिजे, त्याचा अपमान झाला नाही पाहिजे. महाभारतातील एका प्रसंगी अर्जुनाला केवळ त्याच्या डोक्यावर फिरणाऱ्या माशाचा डोळा दिसत होता. त्याप्रमाणे भूमातेच्या कवेत जाणाऱ्या माझ्या सैनिकाला फक्त मीच दिसतो. पडताना, कोसळताना, श्वास थांबण्यापूर्वी किंवा शुद्ध हरपण्यापूर्वी, प्राणांतिक वेदनांनी तडफडणारा, शरीरातून रक्ताचे पाट वाहणारा तो सैनिक मला कुण्या तरी दुसऱ्या सैनिक मित्राच्या हाती देतो आणि मगच भारतमातेच्या कुशीत शिरतो. त्या मित्राच्या हातात स्थिरावलेला मी त्याच्या वेदना पाहून, रक्ताळलेली काया पाहून मीही तडफडत असतो. धाय मोकलून रडत असतो. परंतु मित्रांनो, कंठाशी प्राण आलेल्या त्या जखमी सैनिकास वाटते की, मी नेहमीप्रमाणे डौलाने फडकतोय. मला तसे फडकताना पाहून तो स्वतःच्या वेदना, अवस्था, स्वतःचे कुटुंबीय सारे काही विसरून त्या शेवटच्या क्षणीही मला आणि भारतमातेला शेवटचा 'सॅल्युट' ठोकून या जगातून निघून जातो. त्यावेळी माझी अवस्था माझेच प्राण कुणीतरी हिरावल्याप्रमाणे होते. त्या सैनिकाच्या बलिदानाच्या अतीव वेदना होत असतानाच मला या गोष्टीचे दुःख जास्त होते की,ज्याने माझ्यासाठी प्राणार्पण केले त्या माझ्या नीडर मित्राला मी शेवटच्या क्षणी आसरा देऊ शकलो नाही, वाचवू शकलो नाही. त्याच्या जखमेतून भळभळ वाहणारे रक्त थांबवू शकलो नाही ही बोचणी मला कायम सतावत असते. मित्रांनो, वातावरण अश्रूंनी दाटलेले असताना, दुःखाने परिसीमा गाठलेली असताना माझ्यासाठी गौरवाची, अभिमानाची बाब असते की, शहीद झालेल्या सैनिकाच्या शरीराभोवती आच्छादन म्हणून माझा उपयोग होतो. अमर झालेल्या सैनिकाला जणू मी आधार देत असतो. त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र आणि असंख्य देशप्रेमी नागरिक त्या सुपुत्राच्या अंत्यदर्शनासाठी आणि नंतर त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेले असतात. पण हे सारे त्याच्यापासून, त्याच्या शरीरापासून योग्य अंतरावर असतात. दुःखाचा प्रचंड आवेग असतो, अश्रूंचा महापूर दाटलेला असताना शेवटचे काही क्षण अगदीच जवळचे नातेवाईक त्याच्याजवळ येऊन त्याला कवटाळतात परंतु त्याच्या अगदी जवळ, कदाचित त्याच्या ह्रदयाजवळ मी असतो... त्याचा लाडका राष्ट्रध्वज! त्याला चितेवर ठेवण्यापूर्वी मलाही त्याच्यापासून दूर केल्या जाते. त्यावेळी असे वाटते की, मला माझ्या बालकापासून दूर केल्या जात आहे. पण नाइलाज असतो. जड झालेल्या, भरलेल्या अंतःकरणाने शेवटी अगदी शेवटच्या क्षणी मला माझ्या बाळाचा निरोप घ्यावाच लागतो. त्यावेळी जमलेल्या लोकांनी दिलेल्या घोषणा, केलेल्या जयघोषांनी आसमंत दुमदुमून जातो. ते ऐकून माझी छाती अभिमानाने भरून येते.
परंतु राष्ट्रभक्तांनो, हे सारे असले, तुमचे माझ्यावर जीवापाड प्रेम असले तरीही मला एक शंका नेहमी सतावते, भंडावून सोडते ती म्हणजे तुमचे माझ्यावर असलेले प्रेम खरेखुरे आहे का? अर्थात काही व्यक्तींच्या आततायीपणा, जोशपूर्ण वागण्यावरून मला ही शंका येत असावी. स्पष्टपणे सांगू का, तर आजकाल कोणत्याही दोन देशांमध्ये खेळाचे विशेषतः क्रिकेटचे सामने असले म्हणजे स्वतःचे देशप्रेम दाखवण्यासाठी म्हणून राष्ट्राचे प्रतीक म्हणजे मला मैदानावर नेण्याची प्रथा सुरू झाली आहे. ते पाहून मलाही खूप खूप आनंद होतो. आपल्या देशाचा संघ जेव्हा विजयपथावर दौडत असतो, त्यावेळी प्रेक्षकांच्या हातात असलेले राष्ट्रध्वज उंच भरारी घेत असतात. त्यावेळी खेळाडूंनी घातलेल्या हेल्मेटवर मला मिळालेले स्थान पाहून माझाही आनंद गगनात मावत नाही. परंतु मित्रांनो, दुसऱ्या क्षणी परिस्थिती बदलते. ज्याच्या हाती जिंकण्याची दोर असते तोच दोर प्रतिस्पर्धी कापून टाकतात, त्या खेळाडूला बाद करतात. किंवा असेही घडते की, आपला एखादा गोलंदाज टिच्चून गोलंदाजी करत असताना त्याच्या एखाद्या षटकात धावांची लयलूट होते. एखादा नामांकित क्षेत्ररक्षक एकदम सोपा झेल टाकतो किंवा धावबाद करण्याची संधी गमावून बसतो. अशा एखाद्या अनपेक्षित घटनेमुळे आपल्या हातातोंडाशी आलेला विजय हिरावल्या जातो. मैदानावरील आपल्या खेळाडूंचे 'खांदे' पडतात. पवेलीयनमध्ये सुतकी कळा पसरते. मैदानावर उपस्थित असणारे प्रेक्षक नाराज होतात, रागावतात, चिडतात. त्यावेळी मी म्हणजे तुमचा लाडका राष्ट्रीयध्वज कुठे असतो? त्या क्षणापर्यंत उंच डौलाने फडकणाऱ्या तुमच्या आवडत्या ध्वजाची काय अवस्था होते? कुणी स्वतःचा दुःखावेग आवरताना स्वतःचा चेहरा झाकण्यासाठी माझा उपयोग करतात ना? कुणी डोळे पुसतात, कुणी घाम पुसतात, कुणी मला रागारागाने मांडीवर फेकताना हे पाहतात काय की, माझा काही भाग त्यांच्या पायातील वहाणेवर किंवा त्याखाली गेलेला असतो का? एखाद्याचा राग एवढा अनावर होतो की, मला चक्क मैदानात फेकून देतात. यावेळी कुठे जाते त्यांची राष्ट्रभक्ती? कुठे जातो त्यांचा राष्ट्राभिमान? संघ हरतोय किंवा हरला तर त्यात माझा काय दोष? अरे, मानवांनो माझ्या देशाचा पराभव माझ्यासाठीही दुःखदायक असतो. मलाही भावना आहेत, अगदी पराकोटीच्या आहेत पण म्हणून मी तसे वागत नाही ना.
अजून एक बाब तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे, ती अशी की, मैदानावर खेळ पाहताना आनंदाच्या भरामध्ये मला उंच नेताना तुमच्या हे लक्षात येत नाही की, माझ्या शरीराचा कोणता भाग खाली आहे नि कोणता भाग वर आहे? विशिष्ट दिवशी मला... ध्वजाला उलटे फडकावले म्हणून अनेक कर्मचाऱ्यांना शिक्षा होते. परंतु मैदानात मला उलटे धरले म्हणून का कुणाला सजा होत नाही? शेवटी अपमान तो अपमान? तो कुठेही होवो!
असे आहे राष्ट्रभक्तांनो. जाऊ देत. मी सकारात्मक आहे. एखाद्या-दुसऱ्या, कळत-नकळतपणे, जाणते-अजाणतेपणी घडणाऱ्या घटनांकडे मी दुर्लक्ष करतो. तुमच्यासारख्या सव्वाशे कोटी (वजा फार तर चार पाचशे लोक) जनतेचे माझ्यावरील प्रेम पाहून मलाही आनंदाने डोलायला मजा येते.
जयहिंद! जय भारत!
तुमचाच लाडका,
राष्ट्रीय ध्वज !


नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका, फेज ०१,
क्रांतिवीरनगर, लेन०२,
हॉटेल जय मल्हारच्या जवळ,
थेरगाव, पुणे ४११०३३
९४२३१३९०७१