वाहिनीवाल्यांना पत्र Nagesh S Shewalkar द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वाहिनीवाल्यांना पत्र



****************** वाहिनीवाल्यांना पत्र ! **************
प्रति,
मराठी वाहिनी मालिका निर्माते,
स. न. वि. वि.
वास्तविक पाहता गेली बारा-पंधरा वर्षे झाली आहेत, विविध वाहिन्यांंचे जाळे घरोघरी पोहोचले आहे. हळूहळू वाहिन्यांवरील कार्यक्रमांनी आणि विशेषतः त्यावरील मालिकांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली, एक प्रकारे मोहित केले. सिनेमागृहात जाऊन, प्रचंड धक्काबुक्की सहन करून जे आम्हाला बघायला मिळत होते ते गेली अनेक वर्षे आम्हाला घरबसल्या सहकुटुंब पाहायला मिळते आहे. सिनेमा, नाटक यापेक्षा निराळे माध्यम म्हणजे तुम्ही प्रसारित करीत असलेल्या मालिका! एका अर्थाने जे सिनेमागृहाच्या पडद्यावर पाहायला मिळत नाही किंवा दोन अडीच तासात जे तिथे अत्यंत त्रोटक, धावत्या समालोचनाप्रमाणे पाहायला मिळते ते सविस्तरपणे, बारीकसारीकरितीने चार भिंतीच्या आत घरी बसून वर्षानुवर्षे पाहायला मिळते. तसे पाहिले तर मनोरंजन क्षेत्रात ही एक क्रांतीच म्हणावी लागेल. या क्रांतीचे आम्ही जनक नसलो तरी साक्षीदार, प्रेक्षक आहोत ह्याचा आम्हाला अभिमान आहे. एकच मालिका दहा-दहा वर्षे बघण्याचा पराक्रम आम्ही केला ही बाब नक्कीच सुखावणारी आहे.
साधारणपणे वीस-पंचवीस वर्षांपूर्वी शतकानुशतके अस्तित्वात असलेली आणि आजही काही ठिकाणी तग धरुन असलेली 'एकत्र कुटुंब' पद्धती आज जवळपास सर्वच मालिकांमध्ये पाहावयास मिळते आहे. सध्याच्या 'हम दो हमारे दो, माँ-बाप व्रुद्धाश्रममे' अशी परिस्थिती येत असताना, अनेक ठिकाणी आलेली असताना तुम्ही मात्र मालिकांंमधून एकाच कुटुंबात दोन-तीन भाऊ, त्यांच्या बायका, त्यांची मुले, आजोबा-आजी, एखादी मावशी किंवा आत्या असा गोतावळा दाखवून एकत्रित कुटुंबाची कास धरीत असल्याचे पाहून आनंद होत असे. परंतु एकत्र कुटुंबाची भलावण करताना तुमच्या मालिकांमधून कौटुंबिक कलहाचे दर्शन मोठ्या मार्मिकपणे आणि पुढे जाऊन सांगायचे तर मोठ्या विक्रुततेने दाखवल्या जात आहे. मालिकांमधून एकत्रित कुटुंब पद्धतीचे फायदे दाखवताना परंपरागत दुष्टपणा का दाखवावा लागतो? समाजात आज जी काही थोड्या प्रमाणात एकत्र कुटुंब नांदत आहेत, त्या कुटुंबातील सदस्यांना नात्यांच्या परंपरागत छळवादी संस्कृतीकडे नेण्याचा हा प्रयत्न आहे असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरू नये. मराठी-हिंदी सिनेमातून नात्यातील जी भांडणे, जो छळवाद, द्वेषाचा जो उद्रेक दाखवला जातो तोच तुम्ही दाखवत आहात.
आज घराघरातून कपटी सासवा नाहीत पण ज्या काही कुटुंबात सासू आहे ती आज बऱ्याच ठिकाणी सुधारलेली, नाविन्याची कास धरलेली आहे, सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारलेली आहे. एखादा-दुसरा अपवाद वगळता आजच्या सासू-सूनांमध्ये आई-मुलीचे प्रेमाचे, जिव्हाळ्याचे नाते घट्ट रुजत असल्याचे दिसून येत आहे. जाच करणारी, छळवादी सासू हे रूप आजकाल कालबाह्य ठरत असताना आपण पन्नास वर्षांपूर्वीची अतोनात छळ करणारी, कपटी, दुष्ट सासू दाखवत आहात हे कशाचे लक्षण आहे? तसेच आजच्या अनेक कुटुंबातील वहिनी-नणंद हे नातेही घट्ट मैत्रीमध्ये विणल्या गेल्याचे पाहावयास मिळते आहे किंबहूना अनेक कुटुंबात बहिणी-बहिणींप्रमाणे वागणाऱ्या स्त्रिया असताना आपण त्या नात्यातील ताणतणाव, दुश्मनी दाखवून काय साध्य करू पाहत आहात? दोन सख्खे भाऊ एकाच कुटुंबात राहात असल्याचे चित्र आज फार कमी कुटुंबात बघायला मिळत आहे. एक्का-दुक्का ठिकाणी एकाच छताखाली राहणाऱ्या दोन भावांच्या बायका जावा-जावा न राहता मैत्रिणीच्या किंवा बहिणीच्या नात्याने राहात असल्याचे दिसते आहे. पुर्वीच्या काळात नवऱ्याने सोडून दिलेली किंवा विधवा झालेली स्त्री माहेरी येऊन राहात असे. माहेरी आल्यानंतर त्या कुटुंबातील तिच्या भावजयीला मिळणारे सुख, समाधान आपल्या नशिबात नाही या जाणिवेने त्या माहेरवाशिणीचा जळफळाट, संताप, चिडचिड होत असे आणि मग ती स्त्री नाना कुरापती करून आपल्या भावजयीला बदनाम करून तिचा छळ करीत असे. आज एक तर प्रत्येक स्त्री स्वतंत्र आहे, विशिष्ट विचाराची आहे, महत्त्वाचे म्हणजे ती स्वतःच्या पायावर उभी आहे, कुणावर किमान आर्थिक बाबतीत अवलंबून नाही. त्यामुळे दुर्दैवाने एखाद्या महिलेला सासर सोडावे लागले, तिला नवऱ्याचा, सासरचा आधार नसला तरी अशी महिला माहेरच्या आसऱ्याला येत नाही. एखादी महिला माहेरी येऊन राहिली तरीही ती कुणाच्या छळाच्या, भांडणाच्या वादात पडत नाही. त्यामुळे अशा कपटी स्वभावाच्या स्त्रीया आणि त्यांची कारस्थानं दाखवून आपण समाजाला कोणती दिशा दाखवत आहात हे कळत नाही.
जे कौटुंबिक वातावरण, संवाद, संबंध, नात्यातील व्यक्तींंनी एकमेकांचा घेतलेला बदला, केलेला छळ, मारपीट, तीव्र शब्दांनी केलेले एकमेकांचे अपमान हे सारे 'सुपातले आणि जात्यातले' याप्रमाणे गरगरत राहते. वास्तविक पाहता मालिकांमधून वाईट तेवढे दाखविण्याची कुप्रथा मोडीत काढून समाजाला सुपंथावर नेण्याचे काम मालिकांमधून होणे गरजेचे आहे. परंतु तसे होते का हे आपण सर्वांनीच एकदा तपासून पाहिले पाहिजे. विवाहबाह्य संबंध आणि त्यामुळे होणारे घटस्फोट हा आजच्या मालिकांंचा गाभा आहे की काय हे प्रकर्षाने वाटू लागले आहे. का व्हावे असे? समाजात काही कुटुंबातील व्यक्ती विवाहबाह्य संबंध ठेवत असतील परंतु त्यामध्ये मालमसाला भरून त्याचे उदात्तीकरण करण्यात काय हशील आहे ते न कळे. या संबंधांमुळे होणारे नुकसान, कौटुंबिक उद्ध्वस्तता दाखवून अशा संबंधांंचा तिटकारा येऊन असे संबंध प्रस्थापित होऊच नयेत असे कथानक का असू नयेत? सध्याच्या कथानकामुळे, विवाहबाह्य संबंधांचे जोरकसपणे प्रदर्शन झाल्याने छोटेमोठे वाद असणारे पतीपत्नी विवाहबाह्य संबधाकडे आकर्षित होऊन पुढे घटस्फोटासाठी प्रव्रुत्त झाले तर त्यात दोष कुणाचा? 'तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना ' ही विचारसरणी 'तुझे माझे जमेना, न्यायालयात जाऊया ना ' अशी बदलत असेल तर त्यास मालिका जबाबदार नाहीत का? बरे, या विवाहबाह्य संबंधांची परिणाम, फलश्रुती काय तर मारामारी, खून, घटस्फोट ! इतर कोणताही मार्ग असूच शकत नाही का?
मालिकांमधून व्यसनाधीनता सर्रास, राजरोसपणे दाखवली जाते. असली द्रुष्ये दाखवताना एक ओळ टाकली की जबाबदारी संपली का ? पडद्यावर जिवंत प्रसंग, व्यसनं आणि त्यामुळे रंगणारे नाटक धडधडीत दिसत असताना त्या छोट्या ओळीकडे कुणाचे लक्ष जाणार? एखाद्या व्यक्तीला व्यसनापासून पराव्रुत्त करण्याचे सामर्थ्य त्या ओळीत असते का? जिवंत देखावा अधिक परिणामकारक होऊ शकतो की निर्जीव असणारे शब्द परिणाम साधणारे ठरु शकतील? ह्याचा विचार कोण करणार?
वेशभुषा! मालिकेतील खास, चित्ताकर्षक बाब! अनेक मालिकांमधून विशेषतः खलनायिकेची वेशभुषा काय दर्शवते? एका मराठी मालिकेतील एक खलनायिका कायम आखूड पेहराव करून सातत्याने वावरताना दिसते. तिचा तो पोशाख कुटुंबातील सदस्यांनी एकत्र बसून बघण्यासारखा असतो का? तिला तोकड्या कपड्यात दाखविण्याचा अट्टाहास कशासाठी? तोकडे कपडे घातले म्हणजेच का खलनायिका वाटते? पडद्यावरील एखाद्या स्त्रीचे हावभाव, वागणे, बोलणे, नेत्रकटाक्ष, चालण्याची पद्धत, केशरचना इत्यादी बाबींवरून आम्ही मराठी प्रेक्षक खलनायिका चांगल्या तर्हेने ओळखू शकतो. असे असताना मग घट्ट, तंग, आखूड कपड्यांचा दुराग्रह का? समाजातील अनेक घटक हे सिनेमा, नाटक आणि आता मालिकेतील अनेक बाबींचे अनुकरण करीत असतात. त्यामुळे खलनायिकेची वेशभुषा पाहून, ती संस्कृती पाहून समाजातील नवतरुणी तशाच पोशाखाचे अनुकरण करु लागल्या तर दोष कुणाचा? तशा पोशाखात वावरणाऱ्या मुलींवर अत्याचार झाले तर त्याला जबाबदार कोण?
हे झाले कौटुंबिक(?) मालिकांचे ! काही विनोदी मालिका ही आहेत परंतु त्यात निर्माण होणाऱ्या विनोदाचे काय हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. स्वतःच्याच विनोदावर सातमजली, गडगडाटी हास्य करणाऱ्या कलाकारांची किव करावी की काय अशी परिस्थिती निर्माण होते. सेलिब्रिटींंच्या आवाजाची नक्कल हा एक हमखास प्रकार ! पण हा विनोद होऊ शकतो का? सुरूवातीला हा प्रकार नवीन होता ती गोष्ट निराळी ! एक कला म्हणून तिकडे पाहणे वेगळे पण ज्यावेळी एखादी गोष्ट मग ती कला असली तरीही जर वारंवार माथी मारल्या जाते त्यावेळी कलेचेही विद्रुपीकरण होते आणि मग ते हास्यकारक न राहता हास्यास्पद होते. रसिकांना हसवणे एवढे सोपे नाही. स्टुडिओमध्ये असणारे रसिक एवढे खदखदून हसतात ना की, असे वाटते त्यांना विनोदाशी काही घेणेदेणे नाही. केवळ हसण्यासाठी उपस्थिती एवढेच त्यांचे काम ! 'सभा हसले म्हणून मर्कट हसले' असा प्रकार होऊ नये याची काळजी निर्मात्यांनी घेणे आवश्यक आहे. 'विनोदी कार्यक्रम' असा गाजावाजा झालेल्या कार्यक्रमातील एखादा विनोदवीर रडू लागला तरी त्याला विनोद समजून स्टुडिओत बसलेले प्रेक्षक सात मजली हसून त्याला साथ देतात ही परिस्थिती सामान्य रसिकांसाठी हसावे की रडावे अशी होते. ज्या विनोदी लेखकांनी दशकानुदशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले अनेक विनोदी लेखक आज लिहिताहेत त्यांच्या कथांवर मालिका आल्या तर निश्चितपणे मालिकांचा रसिकवर्ग वाढल्याशिवाय राहणार नाही.
एखाद्या वाहिनीवरील मालिका भरकटली आहे या विचाराने वाहिनी बदलली तर तिथे ही तेच. 'एकाला झाकावे, दुसऱ्याला उघडावे ' असा प्रकार! वाहिनी बदलली, मालिका बदलली, पात्रं बदलले तरी कथानकाचे काय? एखाद्या पुरूषाला स्त्रीत्व बहाल करणे हा प्रकार आजकाल सर्रास चालू आहे. असे द्रुष्ये सातत्याने रसिकांच्या माथी मारणे किती योग्य आहे? असले बटबटीत पात्र दाखवून आपण काय सिद्ध करू पाहता? रुप बदललेली व्यक्ती स्त्री आहे की पुरुषाने ते पात्र साकारले आहे अशी शंका यावी इतक्या बेमालूमपणे ते पुढे यावे. पण आजकाल अशा पात्राकडे पाहिले की शिसारी यावी अशी परिस्थिती होते आहे. आज आपल्या चित्रनगरीत काम करणारांची संख्या कमी नाही, एकापेक्षा एक सुंदर, अभिनय कौशल्य असणाऱ्या मुली असताना वारंवार असा प्रकार का थोपत आहात? चार-सहा महिन्याला, अगदीच कथानकाची आत्यंतिक गरज म्हणून असे पात्र पडद्यावर यावे हे समजण्यासारखे आहे परंतु आताची परिस्थिती समजण्याच्या पलीकडची आहे.
निर्मात्यांनो, एक विनंती आहे, जरा विचार करून, सामाजिक हिताला प्राधान्य देऊन तोचतोच छळवाद, नात्यातील परंपरागत कलह, व्यसनाधीनता, विवाहबाह्य संबंध, खून, मारामारी इत्यादी सारे थांबवून अस्सल विनोदी, ऐतिहासिक, संत-महात्म्यांचे, समाजसुधारकांचे, समाजासाठी खऱ्याखुऱ्या आदर्शांचे कार्यक्रम दाखवून सामाजिक सौख्य, ऐक्य कसे वाढेल हे बघायला हवे. लागेल, थोडा वेळ लागेल, सध्याच्या मोहपाशात अडकलेला रसिक बाहेर पडायला, नवीन कार्यक्रमांकडे आकर्षित होण्यासाठी बराच वेळ लागेल परंतु सध्याची जी स्थिती आहे, 'जे दिसते ते पाहावेच लागते...' या भूमिकेतून नवीन कार्यक्रमांकडेही रसिक आकर्षित होतील हे नक्कीच ! शेवटी बदल हे स्विकारावेच लागतात, स्विकारले जातात.....
तुमचाच,
मालिका आवडीने पाहणारा, एक रसिक
नागेश सू. शेवाळकर,
११०, वर्धमान वाटिका फेज ०१,
क्रांतिवीरनगर, लेन ०२, संचेती शाळेजवळ,
थेरगाव, पुणे ४११०३३. (९४२३१३९०७१)