मी आहे....... तुमची लाडकी!
मा. वाचक,
खंदे पुरस्कर्ते आणि
कट्टर विरोधक,
सर्वांना नमस्कार. लोकशाहीच्या या अत्यंत पवित्र, मंगलमय महोत्सवात मी आपले मनापासून स्वागत करते. त्याचबरोबरीने असेही आवाहन करते की, या लवकर या. सर्वांनी माझ्याशी हस्तांदोलन करा. मी तुमच्याशी हस्तांदोलन करायला उतावीळ झाले आहे. तुम्हाला बघितले की, भेटले की, मला या जगातील सर्वात प्रिय अशा व्यक्तीला भेटल्याची जाणीव होते. माझे तुमच्यावर अतिशय पवित्र असे प्रेम आहे. नाही ओळखले? माझा वीट, कंटाळा तर आला नाही ना? मला ओळखले नसणार कारण कुणी कितीही बोटे मोडो, नाक मुरुडो, कपाळावर आठ्या पाडो, इतकेच काय माझ्या नावाने शिमगा करो पण मी माझे पवित्र कार्य सोडणार नाही, कारण मी पवित्र आहे. भलेही कुणी शिव्याशाप देवोत, न्यायालयात जावोत माझ्याशिवाय सध्या तरी तुमच्या जवळ दुसरा कोणताही पर्याय नाही. नाही ओळखले? कमाल आहे तुमची. ठीक आहे देतेच माझा परिचय.... मी आहे ईव्हीएम मशीन! अहो, असे दचकलात का? मी काही भूतप्रेत, तांत्रिक-मांत्रिक असे कुणी नाही की मी समोर येताच तुम्ही दचकावे, घामाघूम व्हावे. अरेरे! काही जण तर चक्क रागाने लालभडक झाले आहेत. बघा. बघा. कपाळावरील शिर कशी तडतड करते आहे, मला खाऊ की गिळू अशा नजरेने पाहात आहेत, काही जणांच्या मनात असाही विचार येत आहे की, एक भला मोठा दगड उचलून माझ्या डोक्यात घालावा आणि माझा कपाळमोक्ष करावा. पण असा अविचार लोकशाहीच्या या पवित्र मंदिरात करु नका. काही जणांना तर वाटत आहे की, माझे चक्क अपहरण करावे आणि मला पार कुठे तरी नेऊन फेकावे पण तसे करता येत नाही. बरे, कुणी माझ्या बद्दल मनात आलेला कुविचार अंमलात आणायचा जरी विचार केला तर उगीच तुमच्या अंगलट येईल हो. मी धमकी देत नाही हो कारण मी पडले स्त्रीलिंगी! आता बघा, तुम्हीच कायदे करून आम्हाला विशेष असे कायद्याने संरक्षण दिलेले असल्याने काय कुणाची ताकद आहे मला छेडण्याची, माझ्या अंगलट यायची. तुमच्या भाषेत सांगायचे तर कुणाची माय व्यायली आहे माझ्या वाटेला यायला. माझ्या अंगचटीला यायचे तर सोडा पण कुणी वाकडा डोळा करून माझ्याकडे पाहू शकणार नाही.
तुम्हीच मला जन्म दिलाय. जेव्हा माझा जन्म झाला. गावोगावी माझी अनेक मतदान केंद्रावर स्थापना झाली त्यावेळी नवजात बालकाला पाहायला येणारांच्या डोळ्यात जसे कौतुक असते, प्रेम असते, औत्सुक्य असते तसेच माझ्याही बाबतीत अनेक ठिकाणी घडले होते. काही मतदान केंद्रावर तर चक्क माझी पूजा करून मला हार घालून पेढे वाढले होते. इतक्यात ते प्रेम, तो जिव्हाळा कसा काय आटला? ते कौतुक पराकोटीच्या द्वेषभावनेत कसे काय परावर्तीत झाले? तुम्हीच माझे मायबाप आहात, माझे पालक आहात त्यामुळे मी तुमच्याशी कशी काय बेईमानी करु शकते? तुम्ही माझ्यावर केलेले संस्कार एवढे तकलादू आहेत का, की मी कुणाच्याही बोलण्याला फशी पडेल? कुणी मला बेईमानी करायला, अप्रामाणिक पणे वागायला सांगेन आणि मी तशी वागेन? माझ्यावर सोडा पण तुमचा तुमच्या संस्कारावर भरोसा नाही काय? एवढ्या प्रगत तंत्रज्ञानात फेरबदल करणे, त्याला हवे तसे वळवणे एवढे सोपे आहे काय की, कुणी ऐरागैरा यावा आणि माझा हवा तसा उपभोग घेऊन मोकळा व्हावा? तुम्हा मानवाचे एक ठरलेले आहे, दिसली स्त्रीलिंगी मग ती बाई असो की, मशीन असो लागले तिच्याशी लगट करायला, प्रसंगी छेडखानी करायला. पेट्रोल पंपावरची मशीन असो, ऑटो-टॅक्सीचे मीटर असो, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असो की, विद्युत मीटर असो या यंत्रणेशी छेडछाड करून तुम्ही तिला हवे तसे स्वतःच्या फायद्यासाठी वळवून घेता. मला सांगा दिसेल त्या बाईची तुम्हाला छेड काढता येते का? नाही ना. मग आम्हा मशीनचेही तसेच असते. सगळ्याच मशीनसोबत छेडखानी करता येत नाही. एटीएम मशीनशी छेडछाड करता येते का? नाही! तसेच ईव्हीएम मशीनशी म्हणजे माझ्यासोबतही छेडखानी करता येत नाही.
सगळ्यात जास्त वाईट कशाचे वाटते सांगू का, ज्यांनी मला जन्माला घातले, ज्यांनी मला बोट धरून चालणं शिकवलं, चालीरीती शिकवल्या अशी माणसेच जेव्हा माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात, माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहतात, मला तोंड दाखवू नको असे म्हणतात त्यावेळी खूप खूप वाईट वाटते. जीव नकोसा वाटतो. स्वतःच स्वतःला संपवून टाकावे अशी इच्छा होते. परंतु ते पलायन ठरेल, ती आत्महत्त्या ठरेल, ते पाप ठरेल पण मी असा पळपुटेपणा करणार नाही. मी हरणार नाही, भयभीत होणार नाही तर पूर्ण सामर्थ्याने साऱ्या आरोपांना सामोरी जाईल, माझे निरपराधत्व सिद्ध करेल, उजळ माथ्याने, पूर्ण आत्मविश्वासाने दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ग्रहण सुटल्यानंतर सूर्य ज्या तेजाने जगापुढे येतो त्याच तेजाने मी समोर येईल. विजय होईल, पराजय होईल. मी किंचितही भयभीत नाही. असेल कुणाचे सत्य, बोलेल असेल कुणी असत्यामागे असत्य पण मी भीक नाही मागणार. येईल त्या संकटाचा सामना मी करणार आहे. हरणार तर मुळीच नाही मी. आज जे माझे निंदक आहेत, माझ्यावर आरोपांच्या फैऱ्या झाडत आहेत त्यांना मी एकच विचारु इच्छित आहे की, ज्यावेळी माझे मालक, या लोकशाही नामक देवतेचे पुजारी (तुम्ही त्याला निवडणूक आयोग म्हणता) यांनी माझी छेडछाड होतेय हे सिद्ध करण्यासाठी बोलावले होते, संधी दिली होती, आवाहनरुपी आव्हान केले होते त्यावेळी पत्रकार परिषदेत, सभांमध्ये बेंबीच्या देठापासून ओरडणारे तिकडे फिरकलेच नाहीत, मूग गिळून बसले होते खरे तर त्याचवेळेस मी जिंकले होते. माझ्या मालकाचा फार मोठा विजय झाला होता परंतु 'गिरे तो भी टाँग उपर' अशी तुम्हा मानवांची अवस्था आहे. जेव्हा संधी होती, जेव्हा पुरावे देऊन स्वतःचे म्हणणे सिद्ध करण्याची अभूतपूर्व संधी मिळाली होती तेव्हा तुम्ही कपाळकरंट ठरलात. तुम्हीच लोक तुमच्या एखाद्या मित्राला म्हणता ना की, 'देव बुद्धी वाटत असताना तू रे कुठे गेला होतास.' किंवा कुणी तोंडाला येईल ते बोलत असताना तुम्ही त्याला सुनावता ना की,'डोक्यावर पडला होता का रे तू, काहीही बरळतोस?'
अशीच काहीशी अवस्था माझ्या 'छेडछाड' प्रकरणात तुमच्यापैकी काही व्यक्तींची झाली आहे. काही लोकांना उठता-बसता, खातापिता, झोपता, स्वप्नात एकमेव मी आणि मीच.... ईव्हीएम दिसते आहे. सध्या अनेकांच्या तोंडी एकच बकबक... ईव्हीएम हॅक! हॅक!! हॅक!!! या हॅक प्रकरणाचे वास्तव मला माहिती आहे. दचकू नका. तोंडात बोट घालू नका. वास्तव मला माहिती आहे याचा अर्थ ईव्हीएम हॅक होते असा लावून आनंदाने नाचायला सुरुवात करु नका. तुम्ही जे बटन दाबलेय त्यालाच शंभर टक्के मत पडते. हे त्रिवार सत्य आहे पण खरी गोम कोणती आहे, तर अनेक मतदार बाहेर छातीठोकपणे आम्ही अमुक उमेदवाराला मतदान करणार असे सांगतात. तशा शपथाही घेतात पण माझ्यासमोर आले, माझे पवित्र रुप पाहिले की, त्यांचे अंतर्मन जागे होते. मग ते अमुक उमेदवाराला मतदान करण्याऐवजी तमुक उमेदवाराच्या नावापुढले बटन दाबून मोकळे होतात आणि मग मतदान एकाच पक्षाला जातेय, ईव्हीएम हॅक होत आहे असा ठणाणा करतात.
कसे झाले माहिती आहे का, एकच गोष्ट वारंवार, कुठलाही ठोस पुरावा नसताना सांगत गेलो ना की, मग त्यातले नाविन्य निघून जाते. त्यातला पोकळपणा, असत्य वचन, गुळगुळीतपणा समोर येतो आणि मग अशी तीच तीच निराधार वक्तव्ये ऐकून कंटाळा, वीट येतो. ते सारे खोटारडे आहे असे जाणवू लागते. एक महत्त्वाची गोष्ट अशी की, अनेक जण तक्रार करतात की, ईव्हीएम हॅक झाले आहे. एका उमेदवाराचे बटन दाबले की, ते मत त्याला न जाता एका ठराविक उमेदवारालाच जाते. असे होत असेल तर मग झालेले सर्वच्या सर्व मते त्याच उमेदवाराला पडायला पाहिजेत. इतरांना भोपळा असायला हवा ना. दुसऱ्या कुण्याही उमेदवाराला एकही मत जाऊ नये पण असे होत नाही. याचा अर्थ माझ्यासोबत कोणतीही छेडखानी झाली नाही, होत नाही.
एक महत्त्वाचे सांगू का, मतदान केंद्रावर माझ्यासोबत छेडछाड होत आहे, झाली आहे हे सर्वात अगोदर कुणाला समजत असेल तर त्या मतदान केंद्रावर असलेले कर्मचारी आणि त्या केंद्रावर उपस्थित असलेले विविध पक्षाचे मतदान प्रतिनिधी अर्थातच पोलिंग एजंट! माझ्या माहिती नुसार जेव्हापासून माझा वापर सुरु झाला तेव्हापासून प्रत्येक मतदान केंद्रावर अभिरुप मतदान ही प्रक्रिया पार पाडावीच लागते. प्रत्यक्ष मतदान सुरु होण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर मतदान केंद्रावर असलेले कर्मचारी तिथे उपस्थित असलेल्या मतदान प्रतिनिधींच्या समक्ष आणि त्यांच्या सहाय्याने मशीन योग्य आहे किंवा नाही, केलेले मतदान त्याच उमेदवाराला जाते किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी मतदान करण्याची संधी देतात. प्रत्येकाने मतदान केल्यानंतर शेजारी ठेवलेल्या व्हीव्हीपॅटमधून एक कागद बाहेर पडतो त्याद्वारे आपण केलेले मतदान त्याच उमेदवारास झाले का नाही ते कळते. सोबतच झालेल्या अभिरुप मतदानाची मतमोजणीही त्याच ठिकाणी केली जाते. या गणनेतूनही माझी तंदुरुस्ती, विश्वासार्हता लक्षात येते. तद्नंतर झालेले अभिरुप मतदान नष्ट करून मतदान प्रतिनिधींसमोर मला पुन्हा सीलबंद करून प्रत्यक्ष मतदानासाठी मी सज्ज होते. मतदान सुरू असताना एखाद्या मतदारास शंका आली की, त्याने केलेले मतदान दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला पडले आहे तर तो तशी लेखी तक्रार संबंधित मतदान अधिकारी यांचेकडे नोंदवू शकतो. तो अधिकारी त्या मतदाराला पुन्हा मतदान करण्याची संधी देतो. मतदाराचा आक्षेप खरा ठरला तर त्या केंद्राचे मतदान थांबवण्यात येते आणि ताबडतोब वरिष्ठांना कळविण्यात येते. परंतु जर मतदाराच्या आक्षेपात काही तथ्य आढळले नाही तर मात्र त्या मतदारावर कार्यवाही होऊ शकते.
समजा माझ्या उदरात दडलेले विविध पक्षांचे आणि अपक्ष उमेदवार तुम्हाला पसंत नसतील तर 'नोटा' हे बटन आहे. पण त्याचा उपयोग काळजीपूर्वक करा. कुणाकडूनही नोटा स्वीकारु नका आणि नकारात्मक का होईना मला 'नोटा'चा आहेर करु नका. मानवाने कसे सकारात्मक असले पाहिजे. मी चांगल्या उमेदवाराला मत देईन असा विश्वास पाहिजे. अहो, जर आपलाच आपल्यावर विश्वास नसेल तर आपण योग्य माणसाची निवड कशी करु शकू? काही राज्यातील निवडणुकांचे निकाल बघा. निवडून आलेला उमेदवार आणि पराभूत झालेला उमेदवार यांच्या मतांमध्ये कुठे शे, कुठे दीडशे मतांचे अंतर होते आणि नोटा दाबलेल्यांची संख्या दोन उमेदवारांच्या अंतरापेक्षा जास्त होते. कदाचित पराभूत मतदार हा विजयी उमेदवारापेक्षा जास्त चांगला असेल तर आपण नोटा दाबल्यामुळे एक चांगला उमेदवार पराभूत झाल्याची खंत नोटा दाबणारांना असेल काय? म्हणून म्हणते माझ्यावर विश्वास ठेवा, भूतकाळात कधी माझ्यासोबत छेडखानी झाली नाही. वर्तमानात होत नाही आणि भविष्यात होणार नाही. नोटा हा सक्षम पर्याय नाही तर ते पलायन आहे. कारण मी योग्य उमेदवार निवडू शकत नाही असा त्यातून अर्थ जाऊ शकतो. जर मी केलेले मत कोणत्याही उमेदवारास मिळत नसेल तर ते व्यर्थ जाते असे तुम्हाला वाटत नाही का?
आता तर काय अनेक ठिकाणी असाही एक प्रयोग होतोय म्हणे की, माझ्यावर बहिष्कार टाकणार आहेत म्हणे. मग आणणार कुणाला तर त्या जुन्या, कळकट, मोजणीची दीर्घकाळ प्रक्रिया असलेल्या मतदान पत्रिका! किती कंटाळवाणी पद्धती आहे ना ती. एकीकडे चंद्रावर घर बांधण्याची, मंगळावर जाण्याची तयारी करायची, विज्ञानाची कास धरायची, प्रगत तंत्रज्ञानाचे पाईक व्हायचे आणि लोकशाहीच्या सर्वात मोठ्या प्रक्रियेसाठी मात्र शेकडो वर्षांपूर्वीच्या पद्धतीची कास धरायची? मला एक कळत नाही, ती पद्धती तरी निर्दोष होती काय? तुमच्यापैकी अनेकजण तर चक्क मतदान केंद्रावर हल्ला करून अख्ख्या मतदान पत्रिकांवर बलात्कार करायचे, मतदान पेट्यांचे चक्क हरण करायचे, पेट्या पळवून न्यायचे आणि मग तिथे चुंबन घेतलेल्या म्हणजे स्वतःला मतदान केलेल्या मतदान पेट्या नेऊन ठेवायचे. किती हा निर्लज्जपणा! माझ्या आगमनाने तुमचे हे सारे घाणेरडे खेळ बंद झाल्यामुळे तुम्ही तुमच्या जुन्या, घटस्फोट घेऊन जीवनातून उठवलेल्या, माझ्या सवतीला..... मतदान पत्रिकेला कवेत घेऊ पाहता आहात का? तर तो तुमचा फार मोठा पराजय असेल, पळपुटेपणा असेल, रणछोडदास वृत्ती असेल.
पूर्ण विचार करा. मतदानाचा हक्क बजवा. समोर जे उमेदवार आहेत त्यातल्या त्यात चांगला उमेदवार शोधा. आपले मत वाया जाऊ नये म्हणून एक सक्षम माणूस निवडा. त्यातच देशाचे हित आहे. मी गावोगावी, तांडा-वस्तीत पोहोचतेय. माझ्या उदरात अनेक अपत्ये आहेत.... पोटातील उमेदवार म्हणजे माझी मुलेच की हो. मुलं चांगले असेल-नसेल, कुरुप असेल, सुंदर असेल, मृदू स्वभावाचा असेल, खोडकर असेल, गुंड असेल कसेही असले तरी ते माझे अपत्य आहे. मला भेदभाव करता येणार नाही, करणार नाही. त्यामुळे चला उठा. मतदान करा. यापेक्षा जास्त काय बोलणार? शेवटी माणूस हा अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. त्याला मी काय समजवणार बरे? असो. थांबते. धन्यवाद.
तुमचीच लाडकी,
ईव्हीएम.
नागेश सू. शेवाळकर.
११०, वर्धमान वाटिका फेज ०१,
क्रांतिवीरनगर लेन ०२,
जय मल्हार हॉटेलच्या समोर,
थेरगाव, पुणे ४११०३३
(९४२३१३९०७१)....