प्यार मे.. कधी कधी (भाग-१) Aniket Samudra द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्यार मे.. कधी कधी (भाग-१)

“वेडी आहेस का तु?”, मी जवळ जवळ नेहावर ओरडतच म्हणालो.. “काय लावलं आहेस सकाळपासुन चल ना.. चल ना? जाऊ का मी घरी?”
“प्लिज जानू.. चल ना रेssss”, नेहा लाडीक हेल काढत म्हणाली.

“नाssssssही.. मी येणार नाही.. आणि प्लिज ते जानू जानू बंद कर.. एक तर ते कसलं फिल्मी आहे.. आणि त्यात मला ती सारखी ‘होणार सुन मी..’ मधली जान्हवी आठवते.. सो बोअरिंग..”

“एsss जान्हवीला काही बोलायचं नाही हं..”, नेहा गाल फुगवुन म्हणाली.
“बरं बरं.. सॉरी..”

खरं तर ना, मला नेहाने जानू म्हणलेलं खुप आवडायचं.. ती ज्या पध्दतीने लाडाने म्हणायची ना, मस्त वाटायचं ऐकायला. पण म्हणुनचं मुद्दाम मी आवडत नाही असं दाखवायचो.. आणि मी चिडतो… म्हणुन नेहा अजुन मुद्दाम मला जानू म्हणायची.

खरंच ह्या मुलींना उल्लु बनवायला कित्ती सोप्प असतं नाही??

“चलो.. माफ किया.. पण तुला माझ्या कॉलेजला यावंच लागेल.. अरे मी सांगीतलं आहे तु येशील म्हणुन.. आता तु आला नाहीस तर पोपट होईल माझा…”, नेहा

“अरे.. पण मीच का? तुम्हाला दुसरं कोणी मिळालं नाही का? असलं कसलं थिसीस तुमचं..”

नेहा आर्ट्सच्या सेकंड इयरला होती आणि सायकॉलॉजीमध्ये तिचं स्पेशलायझेशन होतं. त्याचाच एक भाग म्हणुन कसला तरी एक प्रयोग त्यांना करायचा होता जरनलमध्ये लिहायला. ह्या प्रयोगाअंतर्गत ते एखाद्या व्यक्तीला असे विवीध प्रश्न विचारणार, काही चित्र-विचीत्र आकृत्या दाखवणार आणि एकुण संवाद-परिसंवाद करुन त्या व्यक्तीची मानसिक अवस्था अभ्यासणार.. असा काहीसा तो प्रकार होता.

नेहाचं कॉलेज हे खरं तर फक्त मुलींच कॉलेज होतं आणि एकुणच शहराचं एक ‘प्रेक्षणीयं स्थळ’. नेहमी ह्या कॉलेजच्या अवती-भोवती अनेक मजनुंची गर्दी असायची. आणि कॉलेजमध्ये अर्थातच मुलांना प्रवेश निषध्द असल्याने आतमध्ये काय असेल ह्याचे एक कुतुहल सगळ्यांनाच असायचे. इतर वेळी.. माझ्याबरोबर अजुन कोणी असतं ना, तर ही संधी मी सोडलीच नसती. पण आत्ता त्या कॉलेजमध्ये मी एकुलता एक मुलगा आणि तो सुध्दा अनेकींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतानाचा विचार मला सहनच होत नव्हता.


“ते काहीही असो.. तु येणार म्हणजे येणार.. नाही तर आपलं ब्रेक-अप झालं असं समज आणि उद्यापासुन मला भेटु नकोस”, नेहा

नेहा ने एकदम इमोशनल ब्लॅकमेलच चालु केलं होतं. खरं तर, माझ्याकडे तसाही वेळ होता. मागच्या आठवड्यात डेडलाईन्स पाळण्याच्या प्रयत्नात आम्ही ऑफीसमध्ये दोन-तीन विकेंड्सना काम केलं होतं.. त्याची सुट्टी घेता येणार होती. आणि दुसरं म्हणजे.. तुम्हाला गर्लफ्रेंड असेल तर तुमच्याकडे फारसे पर्याय उरत नाहीत.. शेवटी ‘ती’ काय म्हणते ते ऐकावंच लागतं ना..

“बरं यार.. तु चिडु नको..येईन मी..”, सपशेल शरणागती पत्करत, शेवटी नाईलाजाने का होईना.. मी तयार झालो.
“ये हुई ना बात…”, पाठीला मिठी मारत नेहा म्हणाली.. “चल.. त्याबद्दल मी तुला ट्रीट देते..”

“हॅ.. मला नको तुझी फुस्की ट्रीट.. सारखं आपलं ते पेस्ट्री नाही तर दाबेली.. नाही तर गेला बाजार वडापाव..”, मी वैतागुन म्हणालो.
“बरं चल.. तु सांगशील ती ट्रीट.. बोल काय हवंय तुला?”, भुवया उंचावुन कमरेवर हात ठेवुन मान हलवत नेहा म्हणाली.

मला फ़ार मजा वाटायची नेहा असं बोलायची तेंव्हा.. तीचे पोनी बांधलेले केस असे एका बाजुने दुसर्‍या बाजुला हलताना पाहून मला उगाचच घोड्याच्या शेपटीची आठवण व्हायची.

“मला काय हवंय ते तुला चांगलच माहीती आहे..”, हिंदी खलनायक रणजीतच्या स्टाईलमध्ये ओठांवरुन अंगठा फिरवत मी म्हणालो..
“ए.. काय रे.. तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का? ऑल बॉईज आर द सेम..”, नेहा म्हणाली..
“ऑल बॉईज?? म्हणजे? अजुन पण कुणी तुला….”
“गप्प बस… मी माझं असं नाही म्हणते.. ती रुचा आहे ना क्लासमधली.. ती सांगत असते.. तिचा आहे ना ‘तो’.. तो पण सारखं असंच करत असतो..”.. बाईकवर बसत नेहा म्हणाली..

पुढचा अर्धा तास नेहा तिच्या मैत्रिणी आणि त्यांच्या अफ़ेअर्सबद्दल बोलत होती ज्याबद्दल मला काडीचाही इंटरेस्ट नव्हता..पण करणार काय??? प्यार किया तो निभाना पडेगा..

खरं तर ना.. नेहाला तिच्या थिसीससाठी दुसरं कुणीही मिळालं असतं.. तिच्या मैत्रिणी काय कमी आहेत का? पण तिनी उगाचच मला पकडलं होतं.. मला खात्री आहे तिला नक्की शो-ऑफ करायचा असणार. ह्या मुलींना काय आपला बॉयफ्रेंड इतरांना ‘दाखवायला’ आवडतो कुणास ठाऊक. माझ्या माहीतीत मी माझ्या एकाही मित्राला नेहाला असं मुद्दामहुन भेटवलं नव्हतं. किंवा असं मित्रांमध्ये सुध्दा आम्ही बोलताना ‘माझी गर्लफ्रेंड अशी’ असल्या पाचकंळ विषयांवर गप्पा मारलेल्या नव्हत्या. असो.. आता मागे फिरायला दुसरा मार्गच नव्हता.. जाणं भाग होतं.



त्या रात्री सुखद अशी झोप लागलीच नाही. रात्री उगाचच मी एखाद्या सुनसान गावातुन फिरतो आहे आणि अचानक कुठुनतरी काहीतरी अंगावर येत आहे किंवा तत्सम स्वप्न पडुन जाग येत राहीली. आणि मग जरा कुठे झोप लागत होती तोच नेहाचा व्हॉट्स-अ‍ॅप वर मी उठलो आहे की नाही हे पहायला मेसेज येऊन गेला.

मग चरफडतच उठलो आणि आवरुन कॉलेजपाशी नेहाची वाट पहात थांबलो होतो. मनात कुठेतरी वाटत होतं आज नेमकं लेक्चर कॅन्सल झालेलं असावं.. नेहाला बरं वाटत नसावं आणि ती येऊ नये कॉलेजला. पण कसलं काय.. ठरल्या वेळी मॅडम हजर झाल्या.

“ए.. वॉव.. मस्त हॅन्ड्सम दिसतो आहेस..”, नेहाने आल्या आल्या ग्रीट केलं.

अर्थात मला ते माहीती होतं.. व्हाईट डेनिम शर्ट आणि ब्ल्यु स्किन-फ़िट जीन्स माझा ऑलटाईम फ़ेव्हरेट ड्रेस कॉम्बो होता. फ़ास्ट्रॅकचा गॉगल आणि माझे क्रोकोडाईल शुज.. मलाच इतकं कंम्फर्टेबल वाटायचं कि ते नेहमी माझ्या चेहर्‍यावर दिसुन यायचंच..पण तरीही नेहाच्या कॉंम्प्लिमेंटमुळे थोडं बरं वाटलंच. शेवटी गर्ल्स कॉलेजमध्ये चाललो होतो.. बेस्ट दिसायलाच हवं होतं.

“थॅंक्यु मॅम..”, मुजरा स्टाईलमध्ये गुडघ्यात वाकुन सलाम करत मी म्हणालो.
“जाऊ या आत?”, नेहाने गेट कडे बोट दाखवत विचारलं
“बाय ऑल मिन्स..”, चेहर्‍यावर उसनं हास्य आणत मी म्हणालो..

मी एक दीर्घ श्वास घेतला आणि नेहा बरोबर पुढे निघालो. आम्ही बोलत बोलत पुढे चाललो होतो आणि माझ्या लक्षात आलं की कॉलेजच्या गेटची ती बॉर्डरलाईन पार करुन मी आत शिरलो आहे. थंड वार्‍याची एक झुळुक शरीरावर रोमांच फुलवुन गेली. मी उगाचच सतर्क झालो. नेहाची काही तरी बकबक चालु होती.. पण खरं तर माझं तिच्याकडे लक्षच नव्हतं. मी आजुबाजुला पहात होतो.

कॉलेज कॅम्पस मस्तच होतं. बांधकाम तसं जुनं होतं. साधारण १९३५ सालचं वगैरे.. पण दगडी आणि आकर्षक होतं. इतर् कॉलेजेस सारख्या भिंती प्रेमिकांच्या नावाने रंगवलेल्या नव्हत्या.. इतरत्र गुटखा.. तंबाखुच्या पुड्या, सिगारेट्सची थोटकं नव्हती. सर्वत्र डेरेदार वृक्ष, फुलांनी लगडलेली झाडं आणि बर्‍यापैकी शांतता होती…

शांतता रम्य असली तरीही मनावरचे एक अनामीक दडपण वाढत चालले होते.

एका झाडाखालच्या पारावर ५-६ मुलींचा घोळका उभा होता. नेमकी माझी आणि त्यांची नजरानजर झाली. मी पटकन दचकुन नजर दुसरीकडे वळवली. नजर दुसरीकडे वळवली खरी, पण त्याचबरोबर मनात भितीची अजुन एक लाट येऊन गेली. काही क्षणातच ‘ही’ बातमी सर्वत्र पसरली जाणार होती. मुलींच्या कॉलेजमध्ये ‘लांडोरा’ मुलगा आला होता.

मी एकदा मागे वळुन पाहीलं, गेट अजुनही तसं फारसं दुर नव्हतं. पळत सुटलो असतो तर २-३ मिनीटांमध्ये बाहेर पडलो असतो. वाटलं.. जावं असंच पळुन, ब्रेक-अप तर ब्रेक अप..

“ही आमची इकॉनॉमीक्सची लॅब.. ही अक्टीव्हीटी रुम.. इकडे बायोलॉजी…”, नेहा त्यांच कॉलेज मला दाखवत होती.

मी इकडे तिकडे बघणं सोडुन दिलं आणि नेहाच्या बोलण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करु लागलो.

काही अंतरावर पुढे एका नेव्ही-ब्ल्यू रंगाचा मिडी घातलेली एक मुलगी पुस्तक वाचत बसली होती. तिचे कुरळे केस खांद्यावर विसावले होते. फिक्कट तपकीरी रंगाच लिप्स्टीक तिचे पाकळीसारखे ओठ आकर्षक बनवत होते. अचानक तिने पुस्तकातुन डोकं काढुन वर बघीतलं.

माझी आणि तीची नजरानजर झाली. तिच्या डोळ्यांमध्ये एक विलक्षण ओढं होती, इच्छा असो किंवा नसो, मी तिच्यावरुन नजर हटवु शकलो नाही. मग तिने नेहाकडे बघीतलं आणि हात हलवला आणि परत माझ्याकडे एकदा कटाक्ष टाकुन तिने पुस्तकात आपलं डोकं खुपसलं.

“बीच..”, नेहा स्वतःशीच पुटपुटली.


आम्ही आता कॉलेजच्या अंतरंगात प्रवेशते झालो होतो. एव्हाना आजुबाजुला वर्दळ बर्‍यापैकी वाढली होती. प्रत्येकजण आडुन आडुन आमच्याकडेच बघत होते आणि कदाचीत काहीतरी एकमेकांना सांगत होते.

“काय सांगत असतील? काय बोलत असतील एकमेकींशी?.. कसायाच्या दुकानात आणल्या जात असलेल्या बोकडाला काही भावना असतात का? असल्याच तर तो काय विचार करत असेल?”, निरर्थक विचार माझ्या डोक्यात पिंगा घालत होते.

नेहाला मात्र ह्या सगळ्या गोष्टींची मजा वाटत होती. शी वॉज एन्जॉयींग द अ‍ॅटेंन्शन शी वॉज गेटींग…

मी पुढे पुढे जात होतो आणि अचानक माझी पावलं अडखळली. समोरुन आमच्या दिशेने दोन पोक्त बायका येताना दिसल्या. दोघींच्याही नजरा आमच्यावर.. किंबहुना माझ्यावरच रोखल्या होत्या.

दोघी आमच्या इथेच येऊन थांबल्या.

कपाळावर मोठ्ठ कुंकु लावलेल्या बाईने नेहाकडे ‘आय-कार्डची’ मागणी केली. नेहाने आय-कार्ड काढुन दिलं खरं. पण दोघींनाही त्यामध्ये फारसा उत्साह नव्हता. म्हणजे बघा ना, सिग्नल तोडुन पुढे गेलेल्या वाहनचालकाचं मामा जसं लायसन्स मागतो आणि परत करतो.. त्याला त्या लायसन्स मध्ये काडीचाही इंटरेस्ट नसतो.

“नेहा.. ” बिन कुंकूवाली मॅडम म्हणाली.. “धिस इज गर्ल्स कॉलेज..”
“आय नो मॅम.. माझ्याकडे परमीशन आहे.. अ‍ॅक्चुअली, आमचं आज सायकॉलॉजीचं थेसीस आहे.. त्यासाठी ऑब्जेक्ट हवं होतं..”

ओह.. सो मी एक ऑब्जेक्ट आहे तर.. गर्रर्र…

“विच टीचर?”, कुकुवाली बाईने विचारले..
“मॅम.. देसाई मॅमचा क्लास..”, नेहाने धिटाईने उत्तर दिले..
“तुमची सायकॉलॉजी लॅब तर मागे गेली.. इकडे कुठे चालला आहात?”, बिन कुकुवाली टीचर
“मॅम आज पुर्ण क्लासचेच प्रॅक्टीकल आहे, सो आज क्लासमध्येच…”, नेहा

“ऑलराईट यु मे गो..”…

“लायसन्स.. चेक.. पि.यु.सी.. चेक.. इंन्शोरंन्स पेपर्स.. चेक.. हवा, ऑइल, इंडीकेटर्स चेक…ऑलराईट.. यु मे गो…”

हुश्श.. त्या दोन मॅम गेल्यावर एकदम हायसं वाटलं.. नेहा वॉज कुल…ह्याचा बदला घ्यायचा झालाच तर नेहाला पुढच्या ऑफीसच्या आर्कीटेक्चर डिस्कशन मिटींगला न्हेउन ’क्यु अ‍ॅन्ड ए’ सेशनला अगदी पुढच्या सिटवर बसवायचं पक्क करुन मी पुढचा मार्ग चालु लागलो.

थोड्याच वेळात आम्ही नेहाच्या क्लासमध्ये जाऊन पोहोचलो. क्लास बर्‍यापैकी पॅक होता. सगळ्यांच चपडचपड चालु होतं. मला वाटलं मला पहाताच एकदम सन्नाटा पसरेल.. पण सुदैवाने तसं काहीच झालं नाही. माझ्या तिथे जाण्याची कुणीच दखल घेतली नाही. कदाचीत अश्या ‘ऑब्जेक्ट्सची’ ह्या क्लासला सवय असावी. यापुर्वी ‘उंदीर’, ‘बेडुक’, ‘ससा’, ‘घुबड’ वगैरेंवर प्रॅक्टीकल्स करुन झाल्यावर माणसामध्ये त्यांना फारसं नावीन्य उरलं नसावं असा विचार करुन मी नेहाने दाखवलेल्या ‘कोपर्‍यातल्या’ खुर्चीवर जाऊन बसलो.

पाचच मिनीटांमध्ये पहीली बेल झाली आणि ‘युवर ऑनर’ देसाई मॅडम वर्गात हजर झाल्या.

मॅडमना आत येताना पहाताच मी जागचा उठुन उभा राहीलो आणि वर्गात एकच खसखस पिकली. बहुदा मॅडम आल्यावर उठुन उभा रहाण्याचा कस्टम तेथे नसावा.. अर्थात मला त्याची कल्पना नसल्याने मी मुर्खासारखा एकटाच उठुन उभा राहीलो होतो.

मी हळुच एक चोरटा कटाक्ष नेहाकडे टाकला..”यु आर सो ओल्ड फॅशन्ड” किंवा तत्सम काहीतरी शब्दरचना दर्शवणारी ओठांची हालचाल करत तिने बॅगेतुन पुस्तक बाहेर काढली.

माझं उरलं-सुरलं अवसानही गळुन पडलं होतं. मानेपासुन पाठीच्या मणक्यापर्यंत घामाचा एक थेंब आरामात रेंगाळत फिरत गेला. घश्याला कोरड पडली होती. मी गप्पकन खाली बसलो.


[क्रमशः]