Sursenapati murarrav ghorpade books and stories free download online pdf in Marathi

शूरसेनापती मुरारराव घोरपडे

(इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन कथेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही चुका किंवा आक्षेपार्ह आढळल्यास आपल्या प्रतिक्रियांमध्ये सांगावे आणि मोठ्या मनाने माफ करावे हि विनंती.)

गरगर गर तलवार फिरे ही,
गनिमांचे निर्दालन करण्या l
सह्याद्रीचा मर्द मराठा,
रक्षण्या अभिमान झुंजला l

कर्नाटकातील पहिल्या स्वारीत माधवराव पेशव्यांनी सरदार पटवर्धन, सेनापती मुरारराव घोरपडे, सरदार विंचूरकर, नारो महादेव यांच्या साथीत हैदरचा दारुण पराभव केला. अनवडीच्या लढाईत घोरपड्यांनी पराक्रमाची शर्थ केली. हैदरच्या सैन्याची दाणादाण उडवली. मराठ्यांचा गनिमी कावा काय असतो आणि मराठे जेव्हा लढतात तेव्हा त्यांचा त्वेष, त्यांचा जोश आणि त्यांची जिद्द काय असते..! हे घोरपड्यांनी हैदरला पुन्हा एकदा दाखवून दिले. हैदर जिवंतच पकडता पण जंगलाचा आसरा घेतल्यामुळे वाचला. त्याने मराठ्यांशी तह करून सुटका करून घेतली. त्यानंतर मात्र मुरारराव घोरपड्यांचा दरारा, दबदबा निर्माण झाला. कर्नाटकात स्वबळावर त्यांनी आपली सत्ता स्थापन केली होती. गुत्तीचे साम्राज्य सांभाळले आणि वाढवलेही. वीस पंचवीस लाखांचा प्रांत त्यांच्या अधिपत्याखाली होता. स्वतःचे दहा हजारांचे घोडदळ, पाच हजारांच्या आसपास कवायती पलटण होती. त्यामुळे निजाम, इंग्रज अन हैदरही त्याला वचकूनच असत. त्यांचा पराक्रम, शौर्य जाणलं ते माधवराव पेशवे यांनी. घोरपड्यांसारखा पराक्रमी सरदार आपल्या मराठा साम्राज्यात असेल तरच कर्नाटकमध्ये आपले वर्चस्व कायम करता येईल. त्यांना साम्राज्यात सामील करून घेतले. सातारच्या छत्रपतींकडून सेनापतीपद मिळवून दिले. ताराबाईंपासून थोरले छ. शाहू, बाजीराव पेशवे, नानासाहेब अशा अनेक कारकिर्दी त्याने पाहिल्या होत्या.

साल १७६७. हैदरवर पेशव्यांची तिसरी मोहीम. पेशव्यांनी हैदरचा बहुतांशी प्रांत जिंकला होता. मराठे हैदरच्या बलाढ्य निजगलच्या किल्ल्याला वेढा देऊन बसले होते. कधीकाळी शत्रू मराठ्यांच्या किल्ल्यांना वेढा घालायचे. यावेळी मात्र मराठ्यांनीच शत्रूच्या किल्ल्याला वेढा देऊन शत्रूची कोंडी केली होती. किल्ला जिंकून हैदरची राजधानी श्रीरंगपट्टणम आणि बेदनूर या प्रांतांवर हल्ला करून हैदरचा पुरता बिमोड करायची माधवरावांची योजना होती. निजगल चा किल्ला विस्ताराने खुपमोठा, विशालकाय खडकांवर वसलेला. किल्ल्याची तटबंदीही खडक तासून बनवलेली होती. त्यामुळे सहजासहजी तोफ गोळे डागुन तटबंदी भेदने अशक्य. शिवाय, किल्ल्याखालून कितीही तोफ गोळे डागले तरी किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत सुद्धा पोहोचत नव्हते. गडावर पाण्याचे नैसर्गिक झरे असल्यामुळे पाण्याची कधीच कमतरता भासत नसे. कितीही दिवस गड लढवता येऊ शकत होता. मराठे किल्ला घेण्यासाठी येणार ही खबर लागताच किल्लेदाराने अगोदरच किल्ला दानादुण्याने, दारू कोठारे आणि शस्त्रांनी सज्ज ठेवला होता. किल्ला वर्षभर सहज लढवता येऊ शकेल अशी तजवीज करून ठेवली होती. गडाला वेढा देऊन दोन महिने उलटले होते. मराठ्यांच्या हल्ल्याला किल्लेदार चोख प्रत्युत्तर देत होता. झुंजत होता. पण शरण येण्यास वा तह करण्यास तयार नव्हता.

भर उन्हाळ्याचे दिवस. रात्रीचा दुसरा प्रहर. थंडगार वारा वाहत होता. दिवसभर उन्हाच्या काहिलीने हैराण झालेले जीव रात्रीच्या शीतल चांदण्यात सुखावत होते. तंबूंच्या बाहेर ठेवलेल्या मशाली फुरफुरत होत्या. गस्तीवरील पहारेकरी हातात मशाली घेऊन पहारा देत होते. पेशव्यांच्या भरजरी तंबूच्या शिखरावरचा भगवा हवेने फडफडत होता. तंबूमध्ये मधोमध खासे मंडळी बुद्धिबळ खेळण्यात दंग होती. चिरागदानांतील वाती मंद जळत होत्या. मधेच हवेच्या मंद झुळकेने डुलत होत्या. अटीतटीचा डाव चालू होता. बाजूला सरदार पटवर्धन, सेनापती मुरारराव घोरपडे, आदी सरदार मंडळी खेळ पाहण्यात रमून गेली होती. आपण इकडे रणमैदानात शत्रूच्या किल्ल्याला वेढा देऊन बसलो आहोत, याचेही भान कुणाला नव्हते. हसत खिदळत गप्पांना उत आला होता. मुरारराव घोरपडे लांबूनच खेळ पाहत होते. साठी पार केलेले मुरारराव पण अंगापिंडानं अजूनही मजबूत. पांढरी शुभ्र जाडसर पल्लेदार मिशा, सहा फूट उंच, डोक्यावर सेनापतीला साजेशी पगडी. डोळ्यांत कमालीची भेदकता. आवाज तर एवढा भारदस्त कि, त्यांच्याशी बोलायचं म्हटलं तरी समोरचा घाबरत असे. तंबू मध्ये बसून खाश्यांचा खेळ पाहण्यात त्यांना काडीचेही स्वारस्य नव्हते. बराच वेळ एकाच जागी बसून मुरारराव कंटाळले होते. त्यांना अशा मोहिमांची सवय नव्हती. गनिमी कावा, छापा, पळापळ अशा लढायांमध्ये त्यांचा हातखंडा. 'आपण शत्रूच्या मुलखात, शत्रुच्याच गडाला वेढा देऊन बसलोय. रणांगणामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. दोन एक मास झाले. गड सर होत नाही. आणि खासे मंडळी इकडे बिनधास्त डाव मांडून बसलेत. आपल्या अखत्यारीत लढाई असती तर स्वतःचे निर्णय स्वतः घेता आले असते. पण खुद्द श्रीमंतांनीच लढायीची सूत्रे हाती घेतलीत. त्यात भर उन्हाळा, शत्रूचा मुलुख. एकाच जागी एवढे दिवस रेंगाळत राहणं बरं नव्हे.' मोहीम लांबत चालली होती. अस्वस्थता वाढत चालली होती.अचानक किल्ल्याच्या परिसरात बंदुकीचा बार उडाल्याचा आवाज झाला. सैन्याला हे नित्याचेच होते. ज्या ठिकाणाहून आवाज आला. त्या आसपासचे पहारेकरी सावध झाले. अंदाज घेऊन आवाजाच्या दिशेने पाच दहा बंदुकींच्या फैरी उडवल्या गेल्या. मात्र, पुन्हा काहीच हालचाल झाली नाही. पेशव्यांच्या तंबूत मात्र पळापळ चालु झाली. बंदुकीच्या गोळीनं नारायण रावांच्या मांडीचा वेध घेतला होता. तंबूला असलेल्या कापडी जाळीदार खिडकीतून गोळी आली होती. निशाना माधवरावांवरच होता. पण नेमकं त्या वेळी ते पटावरून खाली पडलेली सोंगटी उचलायला वाकले अन गोळी नारायणरावांच्या मांडीला लागली.

"अरे, फक्त बघत काय बसलाय? वैद्यांना बोलवा जा...",

माधवराव आपल्या सरदारांवर जरा रागाच्या स्वरात बोलत होते. जखम खोल नव्हती. गोळी मांडीला चाटून गेली होती. नारायणराव वेदनेने व्हीवळत होते. वैद्यांनी ताबडतोब उपचार सुरु केले. मुराररावांना रहावले नाही.

समोर येत म्हणाले, "श्रीमंत... आपण शत्रूच्या किल्ल्याला वेढा देऊन बसलोय. दोन मास झाले. किल्ला हाती येत नाही. आपण खासे मंडळी पट लावून खेळत बसता. मग असे प्रसंग ओढवतात."

"हो का? म्हणजे आम्ही आतमध्ये खेळ मांडतो, हे खटकतं. मग तुम्ही बाहेर गडाखाली जो खेळ मांडलाय त्याचं काय?"

घडलेल्या प्रसंगामुळे माधवराव संतापले होते. रागाच्या भरात ते बोलून गेले. पण मुराररावांना शब्द चांगलेच झोम्बले. काय समजायचं ते समजून गेले. गर्रकन मागे वळाले. तंबूतून बाहेर जाता जाता म्हणाले,

"श्रीमंत... उद्या सूर्याचं दर्शन गडावरूनच घेईन. नाहीतर हा मुरारराव घोरपडा पुन्हा दर्शनासाठी येणार नाही."

आपली दमदार पावले टाकत घोरपडे तंबूतून बाहेर पडत अंधारात नाहीसे झाले. त्या रात्रीच घोरपड्यांच्या सेनेने तटबंदीला शिड्या लावून किल्ल्यात प्रवेश केला. बंदूकधारी आणि तिरकमान सैनिकांनी चोख कामगिरी बजावली. शे दोनशे लोकांनी किल्ल्यात घुसून कापाकापी करत मुख्य दरवाजापर्यंत धडक मारली. द्वारपाल, रक्षक कापून काढले. गडाखाली प्रवेशद्वारापाशी थांबलेली हजार दोन हजार सैन्य दरवाजा उघडताच भराभर बंदुकीच्या फैरी झाडत आतमध्ये घुसली. भयंकर रणकंदन माजले. अचानक किल्ल्यामध्ये घुसलेल्या टोळधाडीने एवढे जबरदस्त आक्रमण केले कि, शत्रूचा प्रतिकार कमी पडला. घोरपड्यांच्या सैन्याने पुन्हा एकदा अपूर्व विजय मिळवला. शब्द खरा केला. किल्लेदारासह पाचशे सैन्य कैद झाले. हजार दिड हजार शत्रू मारले गेले तर घोरपड्यांचे दोन चारशे लोक कामी आले.

मध्यरात्री गडावर प्रहरभर चाललेल्या धामधुमीमुळे छावणी जागीच होती. हळू हळू सोनेरी सूर्य किरणे रंगांची उधळण करत होती. सूर्याची तांबूस कोवळी किरणे छावणीवर पसरली होती. पांढऱ्या रंगांच्या तंबूंवर सोनेरी रंगांची छटा उमटली होती. आसपासच्या झाडाझुडपांवर पक्षांचा किलबिलाट चालू होता. रात्री झालेल्या प्रसंगामुळे आणि गडावरील हल्ल्यामुळे दोन तीन घटकाच आराम करता आला. माधवरावांचे डोळे लाल झाले होते. उठू वाटत नव्हते. चिकाचा पडदा बाजूला सारून माधवराव बाहेर आले. चेहऱ्यावर आनंदाची आणि अभिमानाची लकेर उमटली. समोर किल्ल्याच्या महादरवाजावर मराठ्यांचा भगवा डौलानं फडकत होता. माधवरावांच्या तोंडून आपसूक शब्द बाहेर पडले."मुरारराव शब्द खरा केलात."

मराठ्यांनी नंतर हैदरचा पराभव केला. त्याचा पुरता बिमोड करण्याचा डाव होता पण अचानक माधवरावांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे माघारी फिरावे लागले. हैदरला तहात मराठ्यांचे प्रांत तसेच खंडणी देऊन सुटका करून घ्यावी लागली.
*****

आता मुरारराव सत्तरीला पोहोचले होते. सततच्या धावपळीच्या लढाया, मोहिमा, राजकारण, ज्यानं ज्यानं हाक दिली त्याला मुराररावांनी मदत केली. आपलं वतन शाबूत ठेवलं. मुरारराव शिवरायांच्या गनिमी काव्याचं तंत्र पुरेपूर अवलंबत. पराभव क्वचित प्रसंगी झाला पण बहुतेक सर्व लढाया त्यांनी एकहाती जिंकल्या. शरीर आता वृद्धत्वाकडे झुकत चालले होते.

सन १७७७-७८, काळ धामधुमीचा होता. राघोबादादांनी पेशवेपदासाठी बंडखोरी केली होती. सैन्य संचय करायला सुरुवात केली होती. मराठा साम्राज्याचा सध्याचा सर्वात मोठा शत्रू इंग्रज. जे थोरले बाजीराव पेशवे याच्या कधी वाटेलाही गेले नाहीत. ज्यांनी नंतर भारतावर सुमारे दीडशे वर्षे राज्य केले. त्यांच्या आश्रयाला बाजीरावांच्या पुत्राने जावं. जे वर वर आपण मराठा साम्राज्याचे मित्र आहोत असे भासवत असले तरी संधी शोधत होते. इंग्रज, निजाम गुजरातचे गायकवाड यांच्याशी राघोबादादांनी संधान बांधले होते. त्यामुळे पेशव्यांचे बरेचसे सैन्य गुजरातच्या बाजूला राघोबादादांच्या कारवायांना पायाबंद घालण्यासाठी अडकून पडले होते. कारभारी पुरंदरावर इंग्रज वकीलाशी तह करण्यात गुंतले होते. नेमका याच संधीचा फायदा हैदरने घ्यायचं ठरवलं. आपलं मोठं सैन्य गुत्तीजवळ आणून ठेवलं. घोरपड्यांनी एवढी वर्षे आपल्याला हैराण करून सोडलं होतं. त्याचा बदला घ्यायची नेमकी वेळ हैदरने साधली होती. आपल्या इतर जहागिरीत खबरा पाठवून सैन्य जमवायचाही अवसर मुरररावांना मिळाला नाही. आपला कुटुंबकबिला दूर मडकशिऱ्यावर पाठवून दिला, जवळ फक्त तीन चार हजार निवडक सैन्य घेऊन गुत्तीच्या किल्ल्यावर थांबले. हैदरने किल्ल्यावर जोरदार हल्ले केले. मुराररावांनी तेवढ्याच शर्थीने हल्ले परतवून लावले. दोन महिने किल्ला नेटाने लढवला. रात्री बेरात्री हैदरच्या सैन्यावर छुपे हल्ले होत होते, लुटालूट होत होती. मराठ्यांच्या अशा छुप्या हल्ल्याने शत्रू सैन्य हैराण होऊन गेलं होतं. तरीही हैदरने वेढा आणि लढा नेटाने चालू ठेवला होता. वेढा उठायची चिन्हे दिसेनात. पेशव्यांकडे पुरंदरावर मदतीसाठी खलिते रवाना झाले. मात्र, काहीही उत्तर आले नाही वा मदतही आली नाही. मुराररावांची काळजी वाढू लागली. जेमतेम दोन आठवडे पुरेल एवढाच धान्य साठा शिल्लक होता.

रात्रीचा दुसरा प्रहर. एक दोन घटका झाल्या असतील. मुरारराव आपल्या सरदार मंडळींसह वाड्यात मसलती करत होते. महत्वाची चर्चा चालू होती. वाड्याबाहेर एक इसम मुरररावांना भेटण्यासाठी हट्ट करत होता. एक अनोळखी इसम एवढ्या रात्री गडावर कसा आला. बाहेरचे सैनिक त्याची चौकशी करत होते. बाहेर काय गडबड चालू आहे म्हणून मुरारराव लगबगीने बाहेर आले.

"काय रे? काय चाललंय? तिकडं तो आपला बाप गडाखाली लग्न लावायला बसलाय आणि तुम्ही घाला गोंधळ..."

"सरकार... म्या हानम्या... पटवर्धनांनी पाठीवलंय... ह्यो खलिता.."

मुराररावांनी भरभर खलिता वाचून काढला. आनंदानं त्यांचा चेहरा फुलून गेला.

"वाह रे बहाद्दरा... शाब्बास... खूप मोठं काम केलंस.."

सरदार पटवर्धन आठवड्याभरात कुमक अन रसद येऊन दाखल होणार होते. गडावर उत्साहाचं वातावरण होतं. मराठे आता त्वेषाने लढू लागले. नवा जोश, नवं चैतन्य, नवा उत्साह त्यांच्यात संचारला होता. हैदरही आश्चर्यचकित झाला. 'एवढे दिवस रडतखडत मराठे प्रतिकार करत होते. अचानक, त्यांना एव्हढे स्फुरण कसे काय आले?' गडावर शत्रूचे हल्ले होतच होते. आठवडा उलटला. दोन दिवस झाले. तिसरा दिवसही मावळला. पटवर्धनांकडून काहीही खबर आली आली नाही. सैन्याचा उत्साह मावळू लागला. मुरारराव निराश झाले. मराठ्यांचा प्रतिकार कमी पडू लागला. दिवसभर आग ओकून तोफा थंडावल्या होत्या. होता नव्हता सगळा दारू गोळा आज संपला. बंदुकीसाठी लागणारे ठासणीचे बारही संपले. कसाबसा एखाद दुसरा दिवस एक वेळचं खाऊन गुजारता येईल, एवढेच धान्य शिल्लक होतं. जनावरे ही पार खंगुन गेली होती. हैदरच्या सैन्याने आज जोरदार हल्ला चढवला होता. मराठ्यांचा प्रतिकार कमी पडला. शे दीडशे माणसं कामी आली. रोजच्या हल्ल्यात आजवर हजारांवर सैन्य कामी आलं होतं. आजची संख्या जास्त होती. मुरारराव जखमींची चौकशी करत होते. उपचार करता करता वैद्यांची धावपळ चालली होती. तेव्हढ्यात एक जखमी प्राण कंठाशी आणून हाक मारू लागला.

"सरकार ssss सरकार ssss"

"हानम्या ... तू? क्काय काय झालं?" मुरारराव धावत जाऊन त्याच्यापाशी बसले.

हनम्याची अवस्था खूपच बिकट होती. जखमा खूप झाल्या होत्या. रक्त खूप वाहून गेलं होतं. तो बोलायचा प्रयत्न करत होता. त्याच्या कंठातून शब्दही फुटतं नव्हते. कसंबसं तुटक्या मुटक्या शब्दांत तो बोलुन गेला.

"सरकार ... घ घा ss घात झाला... कोल्हा ss पूरच्या... म्हाराजांनी... पटवर्धनांच्या... छावणी... छावणी... हल्ला... सरकार ssss सरकार ss......."

हनम्याने डोळे पांढरे केले. शेवटचे दोन आचके देत तो शांत झाला.

"हानम्या ss हानम्या ss", मुराररावांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्याला पाणी पाजून उठवण्याचा प्रयत्न केला. पण हनम्याची प्राणज्योत केव्हाच मालवली होती.

वाड्यापासून दूरवर असलेल्या हानम्याची चिता जळत होती. ज्वाळा गगनाला भिडत होत्या. दिवस मावळला आणि मुराररावांच्या उरल्या सुरल्या आशाही. काहीतरी धाडसी निर्णय घेतला पाहिजे नाहीतर उपासमारीची वेळ येईल. मुरारराव वाड्याच्या सज्जाकोटीत चिंताग्रस्त बसले होते. 'उपाशी पोटी शत्रूशी मुकाबला करणे म्हणजे स्वतःहून आगीत उडी मारण्यासारखे!' नाना विचार मनात येत होते. विचारचक्र काही थांबेना. त्याच्या मनानं विचार पक्का केला. प्रमुख सरदारांना वाड्यावर बोलवण्यात आलं. रात्र चढू लागली. घोरपड्यांच्या वाड्यात महत्वाची मसलत चालू होती. मुरारराव त्वेषाने बोलत होते.

"माझ्या शूरवीर साथीदारांनो..! एवढी वर्षे आपण एकत्र राहिलो, लढलो. शत्रू कितीही मोठा असो..! परिस्थिती कितीही प्रतिकूल असो..! कधी हार मानली नाही. झुकलो नाही. वाकलो नाही. तुमच्या साथीने आपण प्रत्येक प्रसंगाचा धीराने सामना केला. आज प्रसंग खरेच बाका आहे. ज्या हैदरशी आपण शर्थीने झुंजलो. कधी काळी त्याला जीवानिशी सोडले. आज तोच आपल्या उरावर, नरडीचा घोट घ्यायला बसला आहे. आज तीन मास होत आले. पंधरा वीस हजाराची फौज घेऊन तो गडाखाली तळ ठोकून आहे. तहाची बोलणी हैदरने साफ धुडकावून लावली. मदतीच्या सगळ्या वाटा बंद झाल्या आहेत. धान्यही संपत आले आहे. दारू कोठरं रिकामी झाली आहेत. रणांगणावर अन्नाशिवाय उपाशी सैन्य कधीच शत्रूचा सामना करू शकत नाही. आपल्याकडे फक्त आता एकच मार्ग आहे. एक तर वेढा फोडून पलायन करणे किंवा लढता लढता मरून जाणं. आम्ही एक निर्णय घेतला आहे. तुमची साथ असेल तर आपण नक्कीच यशस्वी होऊ. आई भवानी आपल्या पाठीशी आहे. उत्तर बाजूचा वेढा थोडा ढिला आहे. आज रात्रीच आपण जोरदार हल्ला करून दोन कोसांवर असलेल्या जंगलात पसार व्हायचं. त्याच्यापुढे आणखी एक दोन कोसांवर आपलाच प्रांत आहे. एकदा तिकडे पोहोचलो की, पुन्हा नव्या उमेदीने झुंज देऊ."

"बोला आहात तय्यार", मुरारराव मोठ्याने गर्जले.

"तय्यार", सर्वांनी जोरदार होकार भरला.

मुराररावांनी आपल्या तलवार सपकन म्यानातून बाहेर काढली. अन हात उंचावत गर्जले.

"हर हर महादेव"

"जय भवानी"
सर्वांनी त्यांचे अनुकरण केले.

मध्यरात्र होती. टिप्पूर चांदणं पडलं होतं. चंद्राच्या शितल प्रकाशात धरती शांत निजली होती. खाली हैदरच्या छावणीतले पलिते नजरेस पडत होते. अंगाला गार वारा झोम्बत होता. दिड दोन हजार मराठा सैन्य झाडाझुडपांचा आसरा घेत गडावरून खाली उतरत होते. हेरांकडून आणलेल्या बातमीनुसार ज्या ठिकाणी तुरळक पहारा होता त्या दिशेने सर्व हळू हळू सरकत होते. छावणीतील तंबू, पहारेकरी आता स्पष्ट दिसत होते. हर हर महादेवच्या आरोळ्या ठोकत, मराठ्यांनी पहारेकऱ्यांच्या पथकावर धडक मारली. एकच हलकल्लोळ माजला. ढाल तलवारीचा जीवघेणा खेळ सुरू झाला. बंदुकांचे बार उडू लागले. मराठ्यांच्या अशा अचानक हल्ल्याची आता शत्रूला सवयच झाली होती. ते सावधच होते. तरीही मराठ्यांच्या जोरदार हल्ल्यापुढे गस्तीचे पथक कुचकामी ठरले. हैदरही सावध होता. गडाच्या सर्व बाजूंनी त्याने नेहमी तयार असलेले दोन दोन हजारांची पथके तैनात ठेवली होती. मराठयांच्या हल्ल्याची बातमी मिळताच हैदर अंबारीत रणमैदानावर हजर झाला. वेढा फोडून पुढे गेलेले मराठे जंगलाच्या दिशेने धावू लागले. हैदरने त्यांच्यावर हजारभर घोडदळ पाठवले. शत्रूंची संख्या वाढू लागली. शत्रूंचे बंदूकधारी एक एक मराठी सैनिकाला टिपत होते. अर्धे अधिक मराठे मारले गेले. जंगलाच्या दिशेने पळत सुटलेल्या मराठ्यांना जंगलात पोहोचायच्या आधीच शत्रूने गाठले. तिकडेही भयंकर रणकंदन माजले पण शत्रूची संख्या जास्त असल्यामुळे मराठे हतबल झाले आणि शेवटी सगळे कापले गेले. शे दोनशे मराठे आणि मुरारराव शत्रूच्या गराड्यात अजूनही तलवार फिरवत होते. सत्तरवर्षांचे मुरारराव एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी तलवार फिरवत होते. त्यांचा वार जर एखाद्याच्या तलवारीवर वा ढालीवर झाला तर जोराचा झटकाच बसायचा. कुणाची तलवार त्या तडाख्याने क्षणात गळून पडायची तर कुणाच्या ढाली. सावरायला सुद्दा वेळ मिळायचा नाही. कारण, दुसरा वार अंगावर झालेला असायचा. भळाभळा रक्त वाहायचं. अन व्हीवळतच तो खाली कोसळायचा. हैदर दुरूनच हे दृश्य पाहत होता. संतापत होता. आपल्या सरदारांवर ओरडत होता.

"जिंदा पकडो उस बुढढे को..। मरहटटोनसे ज्यादा तो इस काफर बुडढे ने हमे परेशान कर रख्खा था l"

शंभर सव्वाशे मराठे पकडले गेले. बाकी सगळे मारले गेले. लढून लढून मुरारराव थकून गेले होते. घामानं अन रक्तानं सारं अंग चिंब भिजलं होतं. हलचाली मंद झाल्या होत्या. पाठीमागून कुणीतरी भाला टोचवायचं. कुणी तलवार चालवायचं. मुरारराव दमलेल्या स्वरात पण जबऱ्या आवाजात एखादी शिवी हासडत.

"हरामखोरांनो... मागून काय वार करताय... *** दम आसंल तर या म्होरं..."

जागेवरूनच ते तलवार फिरवत होते. समोर कोण आलाच तर लागलीच तलवार फिरायची. प्रहर उलटला होता. अंगावर असंख्य जखमा झाल्या होत्या. शरीर थकले होते. समोर पलिते, तलवारी घेतलेले असंख्य शत्रू सैन्य उभं होतं. मुरररावांना भोवळ येऊ लागली. लाल दिवट्या गरगर फिरताना भासू लागल्या. सर्वत्र अंधार पसरला. शुद्ध हरपली.

घोरपड्यांचा शूर सेनानी कोसळला...
सह्याद्रीचा कडा ढासळला...
गुत्तीच्या अभेद्य किल्ला पडला...
सत्तर वर्षांपूर्वी असाच एक घोरपड्यांचा शूर सेनापती, संताजी घोरपडे यांची दगाबाजांनी हत्या केली...
आज सत्तर वर्षांचा घोरपड्यांचा सेनापती पुन्हा एकदा सत्तर वर्षांनंतर पडला...
घोरपड्यांचा सेनापती गनिमांच्या हाती सापडला...

हैदरच्या मनात घोरपड्यांबद्दल आत्यंतिक तीव्र राग होता. त्याने त्याचा पुरेपूर बदला घेतला. हत्तीच्या पायाला बांधतात अशा जाडसर साखळ्या बांधून मुराररावांची धिंड श्रीरंगपट्टणम मधून काढण्यात आली. कपालदुर्ग च्या अंधारकोठडीत मुराररावांना आणि शे दोनशे मराठ्यांना डांबण्यात आले. दहा बारा दिवस रोज मुराररावांवर अनन्वित अत्याचार होत होते. अन्न तर दूर पण धड प्यायला पाणीही देण्यात आलं नाही. उपासमारीने आणि अत्याचारांनी मुराररावांची प्रकृती खूपच खालावली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शे दोनशे मराठ्यांची अमानुष कत्तल करण्यात आली.

पुरंदरावर मुरारराव कैदेत सापडल्याची खबर मिळेपर्यंत हैदरने मुरारवांची हत्या केली होती. पेशव्यांचे कारभारी इंग्रजांबरोबर महत्वाच्या तहाची चर्चा करण्यात अडकून पडलेले. शिवाय, राघोबा दादांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी मसलती करण्यात व्यस्त. किंबहुना, हि सगळी पेशव्यांची गादी वाचवण्यासाठी चाललेली कारभाऱ्यांची धडपड. घोरपड्यांसारखा शूर सेनानी तिकडे गुत्तीवार पडला काय? किंवा जिंकला काय? यांना काय त्याचे सोयरे-सुतक.

आपल्या साऱ्या शत्रूंना पुरून उरणारे, जीवात जीव असे पर्यंत शत्रूच्या हाती मराठ्यांचे गुत्तीचे राज्य पडू नये म्हणून झुंजणारे मुरारराव घोरपडे हे मराठा साम्राज्याचे अखेरचे सेनापती. त्यांनी हैदरला दिलेली एकाकी झुंज ही मराठ्यांच्या इतिहासातील एक अतुलनीय शौर्य गाथा.
पेशव्यांची आपसातील दुफळी, फंदफितुरी आणि कारभाऱ्यांची चुकीची धोरणे घोरपड्यांच्या अस्ताला कारणीभूत झाली हीच काय ती मराठा साम्राज्याची शोकांतिका.

"जय भवानी"

"जय शिवाजी"

संदर्भ -
द्रोहपर्व - अजेय झनकर
स्वामी - रणजित देसाई
एक झुंज शर्थीची - मुरारराव यशवंतराव घोरपडे

माहिती -
मुरारराव घोरपडे हे स्वराज्याचे सेनापती संताजी घोरपडे यांचे बंधू बहिर्जी घोरपडे यांच्या मुलाचा(सिदोजी घोरपडे) मुलगा. स्वतःच्या बळावर त्यांनी आपली फौज वाढवली आणि प्रांतही. हैदर, निजाम, इंग्रज, फ्रेंच कधी यांच्या वाटेला जात नसत. अनेक वेळा घोरपड्यांनी हैदरचा पराभव केला. माधवराव पेशव्यांनी त्यांना मराठा साम्राज्यात सामील करून त्यांना सातारच्या छत्रपतींकरवी सेनापती पद मिळवून दिले. मात्र, गुत्तीच्या लढाईत मुरारराव हैदरच्या हाती जिवंत सापडले. हैदरने त्यांना कपालदुर्ग किल्ल्याच्या कैदेत ठेऊन त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. त्यातच त्यांना मृत्यू आला.


- ईश्वर त्रिम्बकराव आगम

वडगांव निंबाळकर, बारामती

- ९७६६९६४३९८

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED