Raajgadavar aagman - 5 books and stories free download online pdf in Marathi

राजगडावर आगमन - भाग ५

भाग ५ - राजगडावर आगमन

प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.

रात्रभर पारू शिवाच्या कुशीत मुसमुसत होती. पहाट होऊ लागली होती. पारूची मैत्रीण पलीकडच्या बांधावर असलेल्या दगडावर पेंगत होती. शिवाच्या बाहुपाशातून स्वतःला सोडवत पारू अलग झाली. दोघांचेही डोळे पाण्यानं डबडबले होते. एकमेकांशिवाय एक दिवसही न राहू शकणारे शिवा पारू, आता पुनःभेटीसाठी किती दिवस लागतील, या विचाराने व्यतिथ झाले होते. पारुने पुन्हा शिवाला मिठी मारली अन हमसाहमशी रडू लागली. शिवाने तिच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये पाहिलं.
हातांनी डोळे पुसले अन म्हणाला, "अगं वेडाबाई.. मी काय कायमचा न्हाय चाललो. मोहीम झाली की माघारा यीलचकी.."
शिवाने तिला समजावलं, "पारू.. तूच जर असा धीर सोडला तर मला जाता न्हाई यायचं. सवराज्यासाठी, शिवाजी राजांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून काम करायची चांगली संधी आलीय. आशीच कशी वाया घालवू. आन त्यो राजा आपल्यासाठी एवढं करतु. आपण नगं का त्याला साथ करायला.."
पारूला हुंदका अनावर झाला होता. रडतरडतच पारू म्हणाली, "न्हाय शिवा.. मी न्हाय राहू शकत तुझ्या शिवाय."
नाईकांनी दिलेला कमरेचा खंजीर उपसून शिवाने आपला उजवा अंगठा त्याच्या धारदार पात्यावरून हलकेच पुढे ओढला. अंगठ्यावर रक्ताची लकेर उमटली.
पारूच्या भाळावर अंगठा टेकवत शिवा म्हणाला, "मर्ढेश्वराची अन आपल्या प्रेमाची आण घेऊन सांगतु. ह्यो शिवा जसाच्या तसा माघारी यील."
शिवाकडून पुन्हा माघारी यायची शप्पथ घेऊन, पारू दुःखी अंतःकरणानं अन उदवीग्न मनानं घराकडे परतली. घरी आई आबांचा निरोप घेऊन काही महत्वाचं सामान घेऊन शिवा छावणीकडे चालू लागला.

दोन तीन दिवसांत शिवा नाईकांच्या छावणीबरोबर मजल दर मजल करत राजगडावर पोहोचला. शिवा पहिल्यांदा एखाद्या गडावर येत होता. गडाची भव्य तटबंदी, विशालकाय बुरुंज, त्यावर असलेल्या मोठं मोठ्या तोफा, हत्यारांनी सज्ज मावळ्यांचा पहारा, गडाचा महादरवाजा पाहून शिवा अचंबित झाला होता. उंच, अभेद्य अन बळकट असा बालेकिल्ला, त्यातील वाडे त्यावरील दगडी सुबक नक्षीकाम पाहून थक्क व्हायला होत होतं. राजवाड्याच्या सभोवती असलेली शिवबाग तर डोळ्यांचं पारणं फेडत होती. गडाला तीन माच्या होत्या, सुवेळा, संजीवनी अन पद्मावती. पद्मावती माचीवर असलेला पद्मावती तलाव तर चमत्कारच होता. तसेच पद्मावती माचीवर गडावरील अधिकाऱ्यांची अन मावळ्यांची घरेही बांधलेली होती. संजीवनी माची अन पद्मावती माची दोन्हीही दुहेरी तटबंदी करून मजबूत केल्या होत्या. शिवाय, तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुंज बांधलेले होते. गडाच्या पूर्व बाजूला सुवेळा माची होती. एवढा अभेद्य गड राजांनी करून ठेवला होता. उगाच स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला नाही हा गड..!

दोन दिवस आराम करून शिवाला येसाजी कंक यांच्या हाताखाली तयार होत असलेल्या मावळ्यांच्या तुकडीत सामील केले गेले. तलवारबाजी, भालाफेक, दांडपट्टा, घोडेस्वारी, बघता बघता शिवा शिकू लागला अन तरबेज होऊ लागला. आता कुस्तीचे असे एक से बढकर एक डाव येसाजी कंकांकडून शिकला होता की, त्याच्या पथकातील एकही मावळा त्याच्याशी मुकाबला करू शकत नव्हता. शिवाने खूपदा राजांना पद्मावती मंदिरामध्ये अन गडावर फिरताना पहिले होते. पण कधी प्रत्यक्षात समोरा समोर भेट झाली नव्हती. राजांची भेट घेणं वा राजांनी भेटीला बोलावणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. काहीतरी कर्तब दाखवल्या शिवाय राजांच्या नजरेत सहजासहजी कुणी भरत नसे. दिवस सरत होते. सराव जोमानं चालू होता. सराव अन मावळ्यांच्या संगतीत दिवस कसा जायचा कळायचही नाही. पण जस जशी रात्र होई, शिवाला पारूची आठवण बैचेन करून सोडी. इकडे पारुही एक एक दिवस शिवाच्या आठवणीत कसा बसा ढकलत होती. आलेली सगळी लग्नाची स्थळं तिने नाकारली होती. 'लग्न करिन तर शिवाशीच करिन नाहीतर जीव देईन.' अशी धमकीच तिने दिल्यामुळे पाटीलही हवालदिल झाले होते.

दोन मास सरले होते. उन्हाळ्याचे दिवस चालू होते. रमजानचा महिना सुरु व्हायला अजून अवधी होता. पुण्यात लालमहालात येऊन शास्ताखानाला आता तीन साडे तीन वर्षे उलटत आली होती. मुघलांच्या फौजेने स्वराज्यात धुमाकूळ घातला होता. गावेच्या गावे उध्वस्त झालेली होती. मनुष्य वस्ती दिसेल तिथे जाळपोळ अन लुटालूटीचे सत्र चालू होते. राजांनी जनतेला आवाहन करून सह्याद्रीचा आसरा घेण्यासाठी ग्वाही फिरवलेली होती.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED