Sankataanvar Maat - 9 books and stories free download online pdf in Marathi

संकटांवर मात - भाग ९

भाग ९ - संकटांवर मात

प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.

राजांच्या पायाला स्पर्श करणार तोच राजांनी त्याच्या खांद्याला पकडलं अन म्हणाले, "शिवा ss .. अरे कुठे होतास तू? अन अशाही अवस्थेत तू गड चढून आलास. कशी रे ??? कशी एवढी हिम्मत येते तुमच्यात.?"

राजांनी शिवाला घट्ट आलिंगन दिले. हातातलं सोनेरी कडं काढलं अन शिवाच्या उजव्या मनगटात घातलं.
"राजं... जन्माचं सार्थक झालं बगा माझ्या... तुमच्या हातून ह्यो मानमरातब. आन तुम्ही या गरीबाला छातीशी कवटाळलंत... आणखी काय पायजे आमास्नी... तुमच्यासाठी एक काय हजार येळा मराय अन गणिमाशी भिडाय, एका पायाव तयार हाय ह्यो शिवा.."
"शिवा.. या स्वराज्यासाठी, आपल्या लोकांच्या राज्यासाठी तुम्ही पोरं जीवावर उदार होऊन लढता. आमच्यासाठी फक्त मरणं महत्वाचं नाही तर स्वराज्यासाठी लढता लढता मरण आलं तरी मागे हटणार नाही, हि भावना, जिद्द, अन विश्वास महत्वाचा आहे. येसाजी... वैद्यांना शिवावर ताबडतोब उपचार करायला सांगा आणि यांच्या राहण्याची सोय करा. शिवा. आता विश्रांती घ्या. नंतर सविस्तर बोलूच." येसाजी कंकांना पाहताच शिवा त्यांच्याकडे वळला. नमस्कारासाठी खाली वाकायच्या आधीच येसाजींनी शिवाला भरलेल्या डोळ्यांनी आलिंगन दिले. येसाजींना त्याच्याशी बोलायला शब्द फुटत नव्हते."चला... आराम करा... नंतर बोलू..."

राजांनी शिवाला अन त्याच्या कुटुंबियांना शिवा पूर्णपणे ठणठणीत बरा होई पर्यंत गडावरच थांबण्यासाठी सांगितले. शिवाला वैद्यांच्या जवळच्या खोलीमध्ये ठेवलं होतं. काही तातडी लागलीच तर वैद्य जवळच असावेत म्हणून ही राजांनी खबरदारी घेतली होती. पारू शिवाजवळच थांबली होती. वैद्यांच्या मदतीने तिनेच शिवाच सगळं केलं. काय हवं? नको? तीच सगळं पाहत होती. रात्र रात्र शिवाच्या उशाला जागत बसून असायची. रात्रीच अचानक शिवा, "पारू... पारू.." म्हणत उठत असे. तेव्हा पारू त्याला आधार द्यायची, सावरायची. आठवड्याभरात शिवा चांगलाच बरा झाला होता. आता चालू फिरू शकत होता. येसाजी वरचेवर त्याची चौकशी करत होते, त्याला भेटून जात होते. यथावकाश शिवाने घडलेली हकीकत सगळ्यांना सांगितली.

'कात्रज घाटाकडे पळताना शत्रूच्या हाती शिवा सापडला होता. पाठीमागून येणाऱ्या मुघलांनी शिवावर वार केले. शिवानेही दोघांना यमसदनी पाठवले, मात्र एक निसटता वार शिवाच्या पाठीवर झाला अन दुसऱ्या त्याच्या छातीवर. भोवळ येऊन शिवा घोड्यावर खाली पडला. अन घरंगळत जाऊन खालील झुडपांमध्ये नाहीसा झाला. तो मेला असावा म्हणून अन अंधारी रात्र असल्याने मोगली सैन्य तसेच समोर धावणाऱ्या मावळ्यांचा पाठलाग करत निघून गेलं. अंगावर ठीक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. खरचटलं होत. अंग अंग ठणकत होत. जवळचं पाणी संपलं होतं. डाव्या पायालाही जबर मार बसला होता, त्यामुळे चालताही येत नव्हतं. कसं बसं लंगडत खुरडत एका झोपडीपाशी येऊन त्यानं आपलं अंग टाकलं. झोपडीत असणाऱ्या म्हाताऱ्या बाबांनी शिवाच्या जखमांवर लागलीच जंगली वनस्पतींचा वापर केल्यामुळे जखमा चिघळल्या नाहीत. बाबांनी केलेल्या सुश्रुतेमुळे शिवाला बरं वाटू लागलं. तीन चार दिवसांनी जरा बरं वाटायला लागल्यावर बाबांनी त्याला बैलगाडीने सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या मावळ्यांच्या छावणीत पोहोचतं केलं. चेहऱ्यावर अन डोक्यावरची जखम कपड्याने बांधलेली होती. त्यामुळे सहजा सहजी त्याला कोण ओळखू शकत नव्हतं. ओळख सांगितल्यावर मावळ्यांनी त्याला मजल दरमजल करत राजगडपर्यंत पोहोचतं केलं.'

जिजाऊंनीही शिवाचे कौतुक केले. राजांनी शिवाला येसाजींच्या पथकात मानाचं स्थान दिलं. गडावरचं स्वराज्यमय वातावरण, मावळ्यांचा राजांप्रति असलेला विश्वास, निष्ठा, प्रेम, त्याग, पराक्रम पाहून पाटील भारावून गेले होते. राजांसमोर पाटलांनी आपल्या चुकांची कबुली दिली अन चुकीच्या मार्गाने कमावलेले धन अन घोडे सरकार जमा केले. राजांनीही पाटलांना स्वतः चुकांची कबुली दिल्यामुळे माफ केले. शिवा अन पारू यांचा एकमेकांवर असलेला जीव पाहून राजांनी राजगडावरच त्यांचे लग्न लावून दिले. शिवा अन पारुने राजांचे, आऊसाहेबांचे आशीर्वाद घेऊन मुढाळ गावाकडे प्रस्थान केले.

"जय जिजाऊ"

"जय शिवराय"

"जय शंभूराजे"

स्वलिखित,
ईश्वर त्रिम्बकराव आगम
वडगांव निंबाळकर, बारामती
+91 9766964398

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED