भेट - भाग २ Ishwar Trimbak Agam द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भेट - भाग २

भाग २ - भेट

प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.

भापकर पाटील हा गावचा बडा आसामी. शिवरायांनी मंजूर केलेल्या सारा पट्टी पेक्षा जास्त सारा गावकाऱ्यांकडून वसूल करायचा. आसपासच्या चार पाच वाड्या वस्त्याही त्याच्या अमलात होत्या. खोटे दस्तावेज बनवून शेतकरी अन व्यापाऱ्यांकडून जास्त पट्टी वसूल करायचा. कुस्तीचा खूप नाद, चार पाच मल्ल त्याने पोसलेले. अन त्यासाठी स्वतःचा आखाडा बनवलेला. शिवरायांनी स्वराज्यात घालून दिलेल्या नियमानुसार कुणालाही स्वतःची घोडी वा फौज बाळगण्याची परवानगी नव्हती. तरीही पाटलांनी स्वतःची वीस पंचवीस घोड्यांची पागा ठेवलेली अन दहा एक माणसं हाताखाली संरक्षणासाठी ठेवलेले. गावात फक्त त्यांचीच अरेरावी, त्यामुळे त्यांच्या वाटेला सहजा सहजी कुणी जात नसे. अन जर गेलाच तर त्याला चांगलीच अद्दल घडत असे. पारू हि पाटलांची एकुलती एक पोर. लाडाकोडात वाढलेली. नुकत्याच यौवनात आलेली, पंधरा सोळा वर्षे वयाची. साडे पाच पाऊणे सहा फूट उंच. घरी दूध दुभती अन खाण्याची चंगळ त्यामुळे शरीरानं भरलेली. गव्हाळ रंग तिच्या उभ्या चेहऱ्याला साजेसा दिसायचा. रेखीव भुवया, सरळ नाक अन काळेभोर पाणीदार डोळे, कुणाचही चटकन लक्ष वेधून घेत असे. कानात सोनेरी साखळ्यांचे झुमके, काळ्या अन किंचित तांबड्या छटा असलेल्या केसांची एकच वेणी अन त्यावर माळलेली तीन चार मोगऱ्याची फुले खुलून दिसायची. अंगात तंग चोळी अन परकर.. तिचा कमनीय बांधा अन उभार जर कुणा पुरुषाच्या नजरेस पडला तर तो पुरता घायाळ होत असे. पाटील स्वभावानं जेवढा वाईट होता, तेवढीच पारू स्वभावानं कोमल होती. आपल्या बापाने अशी लबाडी करून संपत्ती मिळवू नये असे तिला नेहमी वाटत असे. अनेकदा आपल्या बापाशी यावरून तिचे वादही होत असत. पण पाटलांनी कधी तिच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही.

शिवाला जत्रेत पहिल्यापासून पारू खूपच बैचेन झाली होती. शिवाचं बलदंड शरीर, भारदस्त रुंद छाती, पिळदार मिशा, अन घाऱ्या डोळ्यांची पारुला भुरळ पडली होती. कधी एकदा आपण शिवाला भेटतोय, त्याच्याशी बोलतोय असं झालं होतं तिला. पारू आपल्या एक दोन मैत्रिणींना शिवावर पाळत ठेवायला सांगते. दुसऱ्या दिवशी पारू शंकरच्या देवळात पूजेचा निमित्त काढून शिवाला गाठते. मंदिराबाहेर बसण्यासाठी केलेल्या ओट्यावर शिवा बसलेला होता. हा त्याचा रोजचाच नित्यक्रम होता. पारू त्याच्याकडे पाहून हलकेच हसते. तो मात्र अचंबित होऊन विचार करू लागतो कि, पाटलाची पोर आपल्याकडे पाहून का बरं हसेल? तोपर्यंत पारू देवाच दर्शन घेऊन बाहेर आली अन त्याच्या समोरच उभी राहिली.
पूजेच्या ताटातील खडीसाखर शिवा समोर धरत, "प्रसाद घेणार???"
शिवा विचारतंद्रीतुन झटका बसावा असा अचानक जागा झाला. समोर पारुला पाहून त्याला धक्काच बसला. काय बोलावं काही कळत नव्हतं. असं परक्या बाई माणसानं त्याच्याही बोलावं हे त्याला अनपेक्षित होत. तो त त प प करू लागला.
"नगं बाईसायेब, तुम्हाला कुणी माझासंग बोलताना बघितलं तर अवघड हुईन."
तरीही पारू जरा पुढे सरकत त्याला खडी साखर देण्यासाठी हात समोर घेते. पटकन शिवा मागे सरकतो अन नको म्हणतो.
"ठीक आहे. मी इथे ओट्यावर पानात साखर ठेवते. मग तर घ्याल??"
"नगं जी, तुमी जावा आंदी."
त्याच्याकडे बघत मंद स्मित करत ओट्यावर पानसाखर ठेऊन पारू निघून गेली. ओट्यावर ठेवलेल्या पानातल्या खडी साखरेजवळ सरकत इकडे तिकडे कोणी बघत नाही ना याची खात्री करून त्याने पटकन खडी साखर पानासकट कमरेला खोवली.

आता रोजच पारू शिवाला मंदिरात भेटू लागली. कधी कधी आपल्या पागेतला घोडा घेऊन ती शिवा नेहमी बकऱ्या चरायला जात असलेल्या डोंगरावर जात असे. संध्याकाळच्या वेळी नदीच्या काठी तासंतास गप्पा मारू लागली. बोलता बोलता कधी रात्र व्हायची कळायचही नाही. भेटी वाढू लागल्या, सहवास हवा हवासा वाटू लागला, हळुवार प्रेम फुलू लागलं. अन कधी प्रेमाच्या आणाभाका झाल्या, एकमेकांसाठी जीव द्यायला तयार झाले, कळलंही नाही.

क्रमशः