कुस्ती - भाग ३ Ishwar Trimbak Agam द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कुस्ती - भाग ३

भाग ३ - कुस्ती

प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.

एका रात्री पारू या तिची जिवलग मैत्रीण चंदाला घेऊन शिवाच्या रानातील खोपटात रात्रीच त्याला भेटायला आली होती. बाहेर चंदाला लक्ष ठेवायला सांगून ती हळूच खोपटात शिरली. बाजेवर उघड्या अंगाचा शिवा, छताला पडलेल्या बिळातून चंद्राचा प्रकाश हातात घेत काहीतरी पुटपुटत होता. शिवाचं पिळदार सावळं रूप पारू डोळ्यांनीच पिऊ पाहत होती. ती त्याच्या डोक्याजवळ हळूच सरकली अन हातांनी शिवाचे डोळे झाकले. अचानक असा कोमल स्पर्श आपल्या डोळ्यांना कसा काय झाला म्हणून शिवा झटकन बाजेवरून उठला. एक क्षण समोर पारुला पाहून शिवा काहीसा भांबावला. शिवा काही म्हणायच्या आत तिने त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या स्पर्शाने शिवाच्या सर्वांगात वीज सळसळावी असा जबरदस्त झटका बसला. हृदय धडधडू लागलं. श्वासांची गती वाढू लागली. दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले, शरीरं कधी एक झाली दोघांनाही कळलं नाही. बाजेशेजारचा तेवत असलेला दिवा खिडकीतून आत येणाऱ्या थंड हवेच्या झुळुकेने केव्हा विजला कळलंही नाही. असेच दिवस जात होते. शिवा अन पारूच्या प्रेमाला उधाण आलं होतं. एक दिवसही असा जात नव्हता कि, दोघे भेटत नसत.

एक दिवस आपलं चुकलेलं मेंढरु शोधत असताना शिवा बहिर्जी नाईकांच्या लष्कराच्या छावणीत दाखल होतो. चुकून छावणीत आलेलं मेंढरु मावळ्यांनी बांधून ठेवलेलं होत. आज मटणाचा बेत करावा म्हणून, मावळे मनोमनी खुश झाले होते. तोच समोरून शिवाला त्यांच्या दिशेने येताना पाहून मावळे त्याला सामोरे जातात. आपल्या मेंढराची विचारपूस करत असताना, मावळ्यांशी शिवाची झटापट झाली. शिवाने त्यांना चांगलेच बुकलून काढले. आरडाओरडा ऐकून दोन चार धोडेस्वार तिथं दाखल झाले. झाला प्रकार लक्षात आला. शिवाच्या बलदंड शरीराकडे पाहत एक घोडेस्वार शिवाला कुस्तीच्या मैदानाकडे बोट दाखवत म्हणाला, 'त्यो ssss कुस्ती खेळत असलेला माणूस दिस्तुय का? त्याच्यासंग जर कुस्ती खेळला अन जिकला तर तुझं मेंढरु तुला परत मिळल."

"नगं जी. माफी असावी सरकार. पर मला माझी मेंढरु द्या अन घरला जाऊ द्या.."

"हे बघ, तुला मेंढरु पायजे असलं तर तिकडं कुस्तीच्या मैदानात यायचं.."

उगाच सैनिकांबरोबर वैर नको म्हणून शिवा माघारी फिरला. काही पावलं चालून जातो न जातो तोच त्याला त्या बकरीचं पिल्लू त्याच्या आईसाठी में में करताना डोळ्यांसमोर दिसू लागलं.

घरी गेल्यावर आबाला काय सांगणार कि बकरी कुठं गेली म्हणून?
आपल्या जिवापेक्षा जास्त सांभाळ करणारा, कोल्ह्यांच्या अन जंगली कुत्र्यांच्या तावडीतून आपल्या बकऱ्यांना सहीसलामत सोडवून आणणारा, हाच का तो शिवा?
आज फक्त लष्कराला घाबरून माघारी फिरणार?
अन ते पिल्लू जे आपल्या आईची आतुरतेने वाट बघतंय, त्याचं काय?
न्हाय... मला गेलंच पायजे...

शिवा पुन्हा माघारी फिरला. त्याला आता फक्त त्या पिल्लाच में में ऐकू येऊ लागलं. आपली दमदार पावलं टाकत कुस्तीच्या मैदानाकडे तो चालू लागला. त्याला इकडे येताना पाहून काही मावळे बाजूला झाले. आपली घोंगडी, काठी अन अंगरखा बाजूला काढून ठेवला अन हातात माती घेत तो मैदानात घुसला. त्याच्या समोर त्याच्या एवढाच अंगकाठीचा अन पिळदार शरीराचा मावळा उभा होता. त्याला आधीच सांगण्यात आलं होतं. त्यामुळे तो हि सावध पवित्रा घेऊन होता. बघता बघता शिवाने त्याच्यावर झेप घेतली. दोघांमध्ये झटापटी होऊ लागल्या. कधी मावळा शिवाला फिरवत होता तर कधी शिवा मावळ्याला. दोघेही हटायचं नाव घेईना. डाव प्रतिडाव चालू होते. शिवाला कुस्तीतले थोडेफार डाव माहित होते. मात्र, आपली एवढ्या वर्षांची कमावलेली शरीर संपदा अन चपळता यांच्या जोरावर तो मावळ्याच्या डावांना प्रत्युत्तर देत होता. डाव रंगून आता अर्धा घटका झाला होता. दोघेही दमले होते. अंग घामाघूम होऊन त्याला माती चिटकलेली होती तर चेहरा पूर्णपणे घामाने डबडबला होता. आसपासचा जमाव आता गर्दी करू लागला होता. मोठं मोठ्याने आरोळ्या ठोकत होते. आरडाओरडा चालू होता. पण कोणच हार मानायला तयार नव्हतं. शिवा अन मावळ्यात चार पाच हातांच अंतर होतं. मावळ्याने खाली वाकून ओंजळी मध्ये माती घेतली. शिवाला वाटलं, तो हातावर चोळायला घेतोय कि काय. म्हणून त्यानं तिकडं थोडं दुर्लक्ष केलं. पण दुसऱ्या क्षणी मावळ्याने ती माती दोघांच्या मध्ये वर फेकली. समोर धुरळा उडाला, शिवाला हे अनपेक्षित होतं. अन त्याच क्षणी....

क्रमशः