स्वराज्यकार्याची संधी - भाग ४ Ishwar Trimbak Agam द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वराज्यकार्याची संधी - भाग ४

भाग ४ - स्वराज्यकार्याची संधी

प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.

समोर धुरळा उडाला, शिवाला हे अनपेक्षित होतं. अन त्याच क्षणी त्याच्या कमरेला कुणीतरी विळखा घालून त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करू पाहत होतं. अन झालंही तसंच मावळ्याने शिवाला पायात पाय घालून जमिनीवर पालथा पाडला अन त्याच्या पाठीवर बसला. शिवाचे दोन्ही हात धरून त्याला पाठीवर कलवण्याचा प्रयत्न करू लागला. शिवाच्या नाका तोंडात माती जाऊ लागली. एक दोन वेळा मावळ्याने शिवाला फिरवण्याचा प्रयत्न केला. शिवाही जोर लावून त्याला प्रतिकार करत होता. त्याची पकड काही केल्या ढिली होईना. त्याने पुन्हा शिवाला पाठीवर पूर्ण ताकतीनिशी फिरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. कमरेची पकड ढिली झाली. याच संधीची वाट पाहत असलेल्या शिवाने गर्रकन पलटी घेतली अन मावळ्याला कमरेला धरून पाठीवर टाकलं अन धाडकन जमिनीवर आदळलं. पापणी लवायला अवकाश, शिवाने हि चाल केली होती.

मावळा खाली, "आय्या ssss ई गं ss मेलो मेलो...." म्हणून बोंबलु लागला.

"शाब्बास रे बहाद्दरा..! नाव काय तुझं?", मघाचा सरदार जवळ येऊन त्याला म्हणाला.

"शिवा... पांढरे धनगराचा."

"हम्... चांगलीच रग हाय तुझ्यात. कुठंन शिकला कुस्ती कराय?"

"मला कुटं अन कोण शिकीवणार? पाटलांच्या आखाड्यात खेळणाऱ्या पाहिलवानांना बघायचो झाडावं चढून. बाकी काय नाय."

"हम्... जा तुझी बकरी घेऊन."

"जी सरदार.", म्हणून त्याच्या समोर थोडी मान झुकवली.

"कुणाचं लस्कर म्हणायचं? शिवाजी राजाचं?", शिवाने सवाल केला.

"हम्..." चमकून त्या सरदाराने त्याच्याकडे पाहिलं अन सावरुन म्हणाला, "काय? तुला कशाला रे चौकशा? चल, निघ आता. अन पुन्हा फिरकू नको इकडे"

"जी. माफी असावी." म्हणत, मागे सरकत, शिवा आपले कपडे घेऊन, बकरीकडे जाऊ लागला.

बाजूच्या डेऱ्यातील खिडकीतून हे दृश्य पाहणाऱ्या नाइकांनी शिवाला बकरी घेऊन जाताना पाहिलं अन बाहेर उभ्या असलेल्या मावळ्याला त्याला आत बोलवायला सांगितलं. डेऱ्याला बाहेरून ठोकलेली मेख दिसताच शिवाने आपली बकरी तिथं बांधली आणि आपले कपडे सावरत डेऱ्यात जाऊ लागला. समोरच्या आसनावर बहिर्जी नाईक बसलेले होते. शिवाने कमरेत वाकून, मान लवून त्यांना नमस्कार केला.

"शिवा? शिवाच नाव ना तुझं? काय काम करतोस?"

"जी धनी. शिवा पांढरे. घरची मेंढरं हायीत पन्नास एक. आन थोडं रान हाय. पर तुम्ही?? आन हे लस्कर कुणाचं?"

"बाहेर कुणी सांगितलं नाही का?"

"न्हाय जी. म्या ईचारलं पर कोण सांगाय तयार न्हाय."

"हम्.. बहिर्जी नाईकांना ओळ्खतोस का?"

"त्यांना कोण न्हाय वळखत..! सवराज्यात त्यांना ओळखत नाही असं कवा हुईल का? हिथ हाइत का त्ये?"

"हम्..हायीत कि.. भेटायचंय का ?"

"क्काय ? म्हंजी हे शिवाजी राजांचं लस्कर ?? देवचं पावला म्हणायचं..!"

"मीच बहिर्जी नाईक. सवराज्याच्या लस्करात येशील का?" नाईकांनी एकाच वेळी दोन धक्के शिवाला दिले.
नाईकांना असं समोर बघून शिवा आ वासून त्यांच्याकडे पाहत होता. खूप दिवसांपासून त्यांना भेटायची इच्छा अशी अचानक पूर्ण होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं त्याला. पटकन जाऊन त्याने नाईकांचे पाय धरले. त्याच्या डोळ्यांत नंदाश्रू दाटले होते.

"अरे हे काय करतोयस? ", नाईक जरा मागे सरकत म्हणाले.

नाईकांनी त्याला शेजारच्या आसनावर बसवलं अन पाणी वगैरे दिलं. अर्धा घटका नाईक त्याच्याशी बोलत होते. स्वराज्य कार्यात मदत करण्यासाठी शिवरायांच्या लष्करामध्ये भरती होण्याची चांगली संधी शिवाकडे चालून आली होती.

आई आबांना कसं बसं समजावलं होतं. आता पारुला कसं समजवायच? असा प्रश्न शिवाला पडला होता. आज बोलू , उद्या बोलूया म्हणून दोन दिवस असेच वाया गेले होते. शेवटी मनाचा हिय्या करून त्याने ठरवलं की आज रात्री पारुला संगायचंच. कारण उद्या शेवटचा दिवस होता. उद्या दुपारपर्यंत नाईकांनी छावणी उठून राजगडाकडे कुच करणार होती. शिवा जेवण आटोपून आपल्या रानात बाहेर बाजेवर पहुडला होता. कधी एकदा पारू येतेय असं त्याला झालं होतं. एक एक पळ त्याला कठीण वाटू लागला होता.

क्रमशः