" हो ... आदल्या दिवशीच तर परीने या दोघांना बोलताना ऐकलं. "..... अनुजा
" थांब अनुजा ... मी सांगतो पुढे... हेमंतला एक लहान भाऊ आहे हे इथे फक्त चंदन , अवि आणि आता मला माहित आहे. पूर्ण ऑफिस मध्ये कोणालाच माहिती नाही याची. तो लहान आहे आणि सारखा आजारी असतो. हेमंत सुट्टीवर असतो कधीतरी त्याचे कारण तेच... त्यादिवशी सुद्धा , त्याकाळात हेमंत हॉस्पिटल मधेच होता. आधीच tension मध्ये, त्यात इकडचे celebration ची तयारी... तरी आलेला मीटिंगला. आता त्याचे आणखी एक surprise होते. ते अवि सांगेल. आणि हेमंत मिटिंग मध्ये काय बोलला ते सुद्धा सांगेल. " विनयने अविला बोलायला सांगितले.
" हेमंतला एक मुलगी आवडायची, त्याच्याच बिल्डिंग मध्ये राहणारी. आधी फक्त friendship होती. हि गोष्ट फक्त मला माहित होती. या विनयला कस कळलं माहीत नाही. तीच नाव " अनिता ", तिला तो ऑफिस मध्ये बोलावून सर्वा समोर propose करणार होता. " ,
" मग परी अशी का खोटं बोलली मला... ? " ....अनुजा.
" अवि... तो नेमका काय बोलला होता तेव्हा ते सांग... ".... विनय...
" हेमंत बोलला कि उद्या अनु ला लग्नाची मागणी घालणार... हेमंत अनिताला "अनु " बोलतो.. " ,
" कळलं असेल ... काय झालं नक्की ते... ".... विनय ...
" आणि मी सुद्धा बोललो कि बाहेरची व्यक्ती ऑफिस मध्ये येणार असेल तर HR ची permission घे... अनुजाला विचार.. " अवि मधेच बोलला.
" परीने एवढंच ऐकलं... कि हेमंत अनुला propose करणार आणि अनुजा मॅडम चे डोकं आधीच तापलेलं होते. त्यात हेमंतचे बोलणे कानावर पडले. आणखी खळवळल्या मॅडम.. असच झालं .. " विनय अनुजाकडे पाहत होता.
" हेमंत ला फक्त त्याच्या मित्रांसमोर तिला आणायचे होते... " ...विनय ...
" हेमंत.. नक्की काय बोललास अनुजाला... " चंदनने विचारलं.
" इतकंच ... मला काही महत्वाचे बोलायचे आहे तुझ्याशी... आणि तिने कानाखाली मारली सर्वासमोर... पुढे काय बोलणार.. आणि बोलूच शकलो नसतो.. ती किती मोठयाने बडबडत होती. लाज वाटली. तशीच बॅग घेतली माझी आणि हॉस्पिटल मध्ये गेलो भावाजवळ... " हेमंत शांतपणे सांगत होता.
" पुढेच मी सांगतो.. हेमंत आलेला परवानगी साठी. अनुजाला वाटले , propose साठी. ते झालं काहीतरी. हेमंत निघून गेला. अनुजा जागेवर येऊन बसली. हे झालं तेव्हा अवि नव्हता ऑफिस मध्ये. दिक्षा अनुजाचे सांत्वन करायला गेली , तर पुन्हा एक गैरसमज झाला दोघींमध्ये... दिक्षा हेमंतच्या बाजूने बोलते आहे असं वाटलं अनुजाला.. तर तिथे दोघींचे भांडण झाले. अवि आला. काय झालं ते कळलं, तापलं याचे डोके. अनुजाला जाब विचारायला निघाला तर दिक्षा समोर आली. दोघेही सुरु झाले.... स्वतःच्या Best Friend ची बाजू घेऊन... वाढता वाढता आवाजही वाढला आणि या दोघातला वाद सुद्धा... आता राहिले... अवि आणि हेमंत... हेमंतला वाटलं , अविने काहीतरी वेगळंच सांगितलं ऑफिसमध्ये... त्यामुळे जेव्हा हे दोघे भेटले तेव्हा परत भांडणं झाली. .. संपलं... गैरसमज वर गैरसमज... कोणीही समजून घेतलं नाही, काय झालं नक्की... एकदा बसून बोलूया , असं अजिबात वाटलं नाही कोणाला... सगळ्यांचे इगो आले ना समोर " विनयने सारे explain केले.
" पण त्याने तरी सांगायचे ना आधी.. नाहीतर नंतर बोलला असता तर... " अनुजा हेमंत कडे पाहत म्हणाली.
" कस सांगणार... सर्व ऑफिस समोर अपमान झालेला.. आणि ब्रेकअप झाल्यावर... " विनय बोलून गेला...
" ब्रेकअप ?? " दिक्षा खूप वेळाने बोलली.
" हो... ब्रेकअप ... माझी फॅमिली नाही , ती बोलते कशी... आपली फॅमिली कशी होईल मग. शुक्कल कारण दिलं तिने. " हेमंत इतकंच बोलला.
" म्हणून तो असाच राहतो ऑफिस मध्ये.. स्वतःच्या दुनियेत... इथे जे मित्र होते, ते दुरावले. घरी , लहान भाऊ सारखा आजारी.. बोलणार तरी कोणाशी हेमंत...".... विनय..
" मग ती परी .... " दिक्षा..
" परीचे मी सांगतो.. " आता चंदन बोलला.
" ती काही वेगळीच होती... लोकांमध्ये भांडण लावण्यात तिला खूप मज्जा यायची. कामात तर आळशीच होती. gossip करायला खूप आवडायचे तिला. मग सरांनीच काढून टाकलं तिला .. " चंदनला माहिती असायची सर्व.
" तर मला वाटते , आता सर्व गैरसमज दूर झाले असतील. " सर्वच एकमेकांकडे पाहू लागले. " काय झालं माहित आहे.. चुकीच्या वेळी चुकीची वाक्य ऐकून चुकीच्या माणसाबद्दल गैरसमज झाले. तुमची मैत्री हि पांढऱ्या शुभ्र नदी सारखी वाहत होती. त्यात काही गैरसमजांचे मोठे दगड टाकून त्यावर बांध घातला. वाहते पाणी नेहमीच निर्मळ असते. ते दगड काढलेत कि सर्व कसं सुंदर होईल. बघा... कसं ते.. बरं , सगळं एकदम बंद झालं नव्हतं. गेल्या वर्षभरात बोलत नाही तुम्ही एकमेकांशी. चंदन एकटा बोलतो सर्वांशी... तेही कामानिमित्त... बाकी सर्व लपून- छपून... " ,
" काय म्हणायचे आहे तुला... " दिक्षा बोलली.
" हेमंतचा भाऊ आजारी असला कि अवि गुपचुप त्याला बघून येतो. हेमंतचे ठरलेलं हॉस्पिटल आहे. तो ऑफिस मध्ये आला नाही कि अविला कळते. जाऊन येतो हेमंत तिथे नसला कि. हा हेमंत , याच्याकडे पूर्ण ऑफिसचे काम असते. तरी तुमच्या तिघांपैकी कोणाचे काम आले ना, बाकी काम ठेवून तुमचे पहिले पूर्ण करतो. दिक्षा सोबत बोलत नसली तरी काही नवीन वस्तू दिसली कि अनुजा खरेदी करून ठेवते दिक्षा साठी. दिक्षा, तुला खोटं वाटतं असेल ना तर आताही , अनुजाच्या PC खाली जे छोटे कपाट आहे ना त्यात बघू शकतेस... तू सुद्धा रोज तिची चौकशी करत असते... तिच्या शेजारी बसणाऱ्या मुलीकडे. म्हणजे सगळयांना अजूनही काळजी आहे एकमेकांची.. दाखवत नाही इतकंच, सोडून द्या सर्व... एकत्र या.. पुन्हा ते जुने दिवस येऊ दे, celebration होऊ दे.. infact , सण सुरु झाले आहेत.. त्यासाठी तरी एकत्र या.. मी काय नवीन आहे.. मला नवीन मित्र बनवायला आवडतात.. तुम्ही तर खूप आधी पासून जवळचे आहात. आणि अनुजा.... तुला सांगतो.. मला एकदा बोलली होतीस.. माणसं आवडत नाहीत... म्हणून दूर पळते सर्वापासून. माणसं वाईट नसतात, त्याकडे बघण्याचा दृष्टीकोण वाईट असतो. सगळेच वाईट असते तर हेमंत , अवि , चंदन , दिक्षा .. या सारखी चांगली माणसं तुझ्या life मध्ये आली असती का... तर, थोडा ... अगदी थोडा दृष्टीकोण बदल तुझा... आयुष्य खरंच किती छान आहे, हे तुम्हा सगळ्याकडे बघून वाटते.... चला, माझं बोलणं झालं... मी निघतो.. तुम्ही आणखी थोडावेळ बसा... एकमेकांशी बोलतात तर अजून छान... " विनय बाहेर आला.
विनय कामाला लागला तरी त्याचे लक्ष त्या मिटिंग रूमकडेच होते. तो बाहेर आल्या नंतर, जवळपास एक तासाने सगळे बाहेर आले. चंदन त्याच्या शेजारी येऊन बसला. चुपचाप काम सुरु केले त्याने. विनयने काही विचारलं नाही त्याला. तरी विनयला जाणून घेयाचे होते, पुढे काय झालं ते. लंच टाईम पर्यंत चंदन गप्पच. शेवटी न राहवून विनयने विचारलं.
" अरे तू काहीच बोलला नाहीस.. काय बोलणे झाले तुमच्यात... " यावर चंदनने त्याच्याकडे रागात पाहिलं.
" चल... काय गोंधळ घातला आहेस ना ते बघ... " चंदनचा चढलेला आवाज ऐकून विनय घाबरला.
" काय झालं नक्की ... " विनय विचारत होता...
" तुझा जेवणाचा डब्बा घे.. आणि चल... स्वतःच बघ.. " चंदन अजूनही रागात. विनयचा हात पकडला आणि त्याला ओढतच लंच टेबल जवळ घेऊन आला.
" बघ... बघ काय करून ठेवलं आहेस ते... " बघतो तर हे चौघे , एकमेकांशी गप्पा मारत बसलेले.
" बघितलंस... ऑफिस मधले चार महत्वाची माणस... सकाळपासून काही काम न करता ... नुसते गप्पा मारत बसले आहेत... काम कोणी करायची... त्यात बघ... एक टेबल सुद्धा अडवून बसले आहेत कधीचे... जेवायचे कुठे... " विनयला काही कळेना... नक्की काय चुकते आहे यात... मात्र थोड्यावेळाने समजलं, चंदन हसत होता मागे...
" यार !! ..... करून दाखवलंस तू... पुन्हा एकत्र आणलं त्यांना... खूप खूप छान वाटते आहे... " चंदनने मिठी मारली विनयला.
-------------------------- क्रमश: ------------------