रातराणी.... (भाग १६) Vinit Rajaram Dhanawade द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रातराणी.... (भाग १६)

असाच एक दिवस... जोराचा पाऊस होता. ऑफिसमध्ये त्यावेळी फक्त चंदन आणि हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच माणसं... अश्या पावसात विनय आलेला ऑफिस मध्ये. पण चंदनला नेहमी पेक्षा वेगळा वाटला. आला तोच खुर्चीवर बसला पट्कन. केवढा दम लागलेला त्याला. १०-१५ मिनिटे झाली तरी श्वासावर नियंत्रण आले नव्हते. काम सुरु केले विनयने त्याचे. आणखी काही मिनिटे गेली. " चंदन ... चंदन !! " विनयने चंदनला जोरात हाक मारली. जोरा -जोराने श्वास घेत होता विनय. " काय..... काय झालं विनय.... विनय... " चंदन घाबरला. काही बोलायच्या आतच विनय बसल्या जागी बेशुद्ध झाला.


धावपळ करत चंदन आणि काही सहकाऱ्यांनी विनयला त्याच हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. सगळे घाबरलेले.... चंदनने मोठ्या सरांना फोन लावला. बाकीच्या जमलेल्या पैकी कोणी अवि ,अनुजाला कॉल केले. पुढच्या अर्ध्या तासात बरीच गर्दी झाली. विनयला लगेच I.C.U. मध्ये घेऊन गेले. एवढी गर्दी... विनय होताच तसा लाडका सर्वांचा. तरी गर्दी कमी करण्यासाठी मोठ्या सरांनी बाकीच्या लोकांना जायला सांगितले.


" काय झालंय नक्की विनयला .... " अनुजा डॉक्टरला विचारत होती.
" बेशुद्ध कसा काय झाला... काय झालं त्याला... आणि एवढ्याश्या कारणासाठी...I.C.U. मध्ये .... चंदन.... सांग... काय चाललंय ते... " दिक्षा चंदनला विचारत होती. अवि, हेमंत विनयला बाहेरूनच बघत होते. चंदनला काही सुचत नव्हतं. तोही थरथरत होता. शेवटी, तो मोठया सरांजवळ आला.


" सर...प्लिज.. सांगा आता खरं काय ते ... मला माहित झालं होते,, तेही थोडेच.. पण आता वेळ आली आहे सांगायची... खूप जवळचा मित्र आहे ना तो... सांगा सर... " त्यांनी या सर्वाकडे पाहिलं.
" ठीक आहे... चला त्या रूम मध्ये... तिथे विनयचे डॉक्टर सुद्धा आहेत... तेच सांगतील. "


हे पाच जणं , सर आणि डॉक्टर असे जमले. " विनयला मी लहानपणापासून ओळखतो. त्यांचे घर माझ्या गावच्या घराशेजारी. त्याचे वडील माझे मित्र. छान , चुणचुणीत मुलगा... अभ्यासात हुशार... गाणी म्हणायची सवय तेव्हापासून. वडिलांपेक्षा आईवर जास्त जीव त्याचा..... तिच्या सोबतच सारखा... वासरू कस असते गाईला बिलगून ... अगदी तसाच. पण त्याची आई... त्याच्या लहानपणीच गेली. त्याची आई दिसायला खूप सुंदर होती. ' राणी ' नावं तिचं. आणि विनयचे वडील ... लाडाने तिला ' रातराणी ' म्हणायचे. दोघांमध्ये प्रेम सुद्धा खूप होते. लहानग्या विनयला रातराणी म्हणजे आपली आईच... हेच माहीत. तेव्हापासून आवडते त्याला रातराणी. त्याची आई गेली तेव्हा सुद्धा त्याच्या घराशेजारी रातराणीचे झाड होते.. त्यालाच बिलगून बसला होता. असा विनय... कमाल बघा ... आईवर इतकं प्रेम करणारा ..... त्याला हा आजार , त्याच्या आई कडूनच मिळला...... डॉक्टर , तुम्ही सांगता का पुढे.... " डॉक्टर तयार होते सांगायला.

" cystic fibrosis.... हा आजार ... जो विनयला झाला आहे, भारतात जास्त आढळत नाही. आई-वडील ... दोघांनाही असला तरच मुलाला होऊ शकतो. विनयची आई त्यामुळेच गेली. आणि वडील सुद्धा. हा आजार ठीक होत नाही. परंतु, योग्य आहार, औषध घेतली तर पेशंट ५० वर्ष तरी जगतो, विनय मुंबईत आला तेव्हा already खूप उशीर झालेला. गेल्या वर्षभरात खूप try केले आम्ही. तरी.... " डॉक्टर बोलताना थांबले.
" कसा त्रास होतो याचा... या आजाराचा... " चंदनने धीर करून विचारलं.
" श्वसनाचा आजार आहे हा... जस वय वाढते तस शरीरभर पसरतो. धाप लागते, श्वास घेताना त्रास होतो... हे तर आहेच, पण रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. जेलीसारखं पदार्थ तयार होतात रक्तात. मग त्याचा परिणाम किडनीवर होतो, आतडयांवर होतो, शेवटी heart वर तणाव येतो... "


" विनयचे वडील वारले तेव्हा त्यांच्या सोबत विनयचा सुद्धा उपचार सुरु होता गावात. आई-वडील शिवाय कोणी नव्हतं याचं. मलाच बघवलं नाही. त्याला जॉबची गरज होतीच... औषधांसाठी... म्हणून आपल्या ऑफिस मध्ये ठेवलं. वडील गेले , त्याच्या ३ दिवसांनी तो आपल्या ऑफिसमध्ये जॉईन झालेला, वाटले शहरात तरी चांगले उपचार मिळतील पण मलाच उशीर झाला त्याला घेऊन यायला. " सरांच्या डोळ्यात पाणी आलं. साऱ्यांना एकप्रकारचा मानसिक धक्का बसला होता. काय झालं हे... इतके सारे आनंदाचे क्षण आणि अचानक मोठ्ठा धक्का ... कसं सावरावे यातून...


========================================================


एक तो दिवस होता , आणि एक आजचा दिवस... तेव्हाही रिपोर्ट्स वाईटच होते आणि आताही. चंदनच्या डोळ्यासमोर होते सर्व. विनयच्या शेजारीच बसला होता तो. विनयला जाग आली. चंदनला पाहिलं.
" Good morning मित्रा... " चंदनला हाक मारली त्याने.
" दुपार झाली आहे .... morning नाही... आज खूप झोपलास असं वाटते... " चंदनने हसत विचारलं.
" नाही रे .. रात्री ते स्वप्न पडलं तेव्हा ४ वाजले होते ... पण पहाटे ६ पर्यंत तरी जागा होतो... आताच झोप लागली पुन्हा... तेच स्वप्न का पडते कळत नाही... काय संबंध तेही कळत नाही. " त्याला चंदनच्या हातात रिपोर्ट्स दिसले.
" अरे व्वा !! काय आहे रिपोर्ट्स मध्ये ... सांग .... " चंदनने त्याला गप्प केलं.
" कशाला रे.... काय करायचे आहेत रिपोर्ट्स तुला... बरा आहेस तू... लवकरच घरी सोडणार आहेत तुला.. हे आहे लिहिलेलं .. झालं समाधान... " चंदन एवढं बोलून निघून गेला रागातच.


======================================================


खरं तर हल्ली विनयची तब्येत पार ढासळली होती. त्यालाही कळत होते ते. तरी सगळेच प्रयत्न करत होते विनय चांगला , ठीकठाक व्हावा म्हणून. रोज कोण ना कोणी असायचे त्याच्या सोबत. ऑफिसमधलं काम सांभाळून जायचे त्याच्याशी गप्पा मारायला. पावसाळा संपून हिवाळा सुरु झालेला. रातराणीचे छोटे रोपटे आता मोठे झाले होते. पण विनयचं नव्हता तिला बघायला तिथे.


अश्याच एका दिवशी, विनयची तब्येत एकदम ढासळली. डॉक्टर सुद्धा प्रयत्न करत होते तरी त्यांना कळलेलं बहुदा. हिवाळ्यातली संध्याकाळ... कातरवेळ.... बोचरी थंड हवा... तेव्हा हेमंत होता सोबतीला.... हेमंतला सुद्धा जाणीव झाली. त्याने बाकीच्यांना बोलावून घेतलं. सर्व येई पर्यंत रात्रीचे ८ वाजले. विनय या ५ जणांचीच वाट बघत होता जणू. दिक्षा , अनुजा , हेमंत , चंदन , अविनाश.. सर्व त्याला घेरून बसले होते. दिक्षा त्याचा हात हातात घेऊन बसली होती.


" विनय ... आलो आहोत आम्ही सर्व.. अनुजा .... अवि ... चंदन ... हेमंत ... सगळे आहेत... " विनय घाबरा-घुबरा झालेला. त्याला दिक्षा धीर देत होती.
" दिक्षा ... सोबत रहा माझ्या... बोलत रहा माझ्याशी... मला भीती वाटते आहे.... सर्व सोडून गेलात तर मला ... नाही जाणार ना... " ,
" नाही नाही ... कोणी नाही जात.... " अनुजा बोलली.
" अव्या .... अव्या ... कुठे गेला ... " विनय त्याला शोधत होता.
" आहे ... मी आहे इथेच .... नाही जात आहे कोणी कुठे ... मी दरवाजाच लावून घेतो .... " अविच्या डोळ्यात पाणी.
" बोल ना माझ्याशी दिक्षा ... का बोलत नाहीस .... रागावली आहेस का .... तुझी smile खूप दिवस बघितली नाही .... हस ना एकदा ... ".... विनय


यात कस हसणार... दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यात हसणार तरी कसं .... इतका वेळ अश्रू थांबवून ठेवले होते दिक्षाने , विनयचं बोलणं ऐकलं आणि रडू लागली ती.


" रडू नकोस गं .... मी नाही जात आहे कुठे .. आणि तू हसताना किती छान दिसतेस .... रडू नकोस .... माहित आहे ना ..... मला किती आवडते तुझी smile ... " दिक्षा रडतच होती.


डॉक्टरने त्याचे प्रयत्न चालूच ठेवले होते. दर अर्ध्या तासाने कसलेसे injection देतं होते. विनयचा त्रास कमी करण्यासाठी. पण किती प्रयत्न करणार आणखी. " आजची रात्र काढली तरी.. " डॉक्टर बोलून निघून गेले. हेमंत सुद्धा एका कोपऱ्यात उभा... विन्यासारखा मित्र कुठे भेटणार... .... काय करू मी तरी...


" हेमंत ... !! " विनयने बोलवलं त्याला. हेमंत आला त्याच्याजवळ ....
" गिटार वाजवतोस का ... " विनयने हळू आवाजात म्हंटल. विनय हॉस्पिटल मध्ये आल्यापासून त्याची गिटार त्याच्या बेडशेजारीच असायची. हेमंतने हातात घेतली गिटार. विनयकडूनच शिकलेला तो.. हेमंतला भरून आलं , तरी विनय साठी त्याने गिटार वाजवायला सुरु केली. विनयच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. मध्यरात्र झालेली. विनयची तब्येत आणखी खालावली. हेमंत गिटार वाजवतच होता. मधेच विनयशी गप्पा सुरू होत्या. तणावाचे वातावरण ... कोणालाच झोप नाही.


बघता बघता पहाटेचे ५ वाजले. विनयला श्वास घेताना प्रचंड कष्ट पडत होते. " अनु.. .. जा .... अनुजा ..... !! " त्याने कसबसं तिला हाक मारली.
" आहे मी इथेच ... बोल .... काय ... " अनुजा भरलेल्या डोळ्यांनी विनयला पाहत होती.
" एक ....... एक ...... कवी ....... ता .... " पुढे बोलूच शकला नाही तो. अनुजाला नाही बघवल विनयला तस. हुंदके देऊन रडू लागली. तरी विनय बोलला म्हणून तिने डोळे पुसले. आणि एक कविता सुरु केली.


" तु आहे अशी देवाची सुंदर निर्मिती...
सोबत हवीशी वाटणारी आकृती...
परिसस्पर्श आहे तुझ्या हातांचा...
साद जणू त्या निळ्या सागरी लाटांचा...
गहरे आहेत बंध, घट्ट आहेत गाठी...
स्वर्गातून बनलोय आपण एकमेकांसाठी...
माझ्यासाठी आहे तु सावली...
दिग्मुढ अनुभव प्रेमाचे आहेत पावलोपावली...
हास्य आणि अश्रूंचा होतो कायम संगम...
जेव्हा होते तुझ्या आठवणींचे आगमन...
शितल अशी तुझी फुंकर...
काळोख्या वाटेचा मार्ग करतोय सुकर...
मनाचे कारंजे होतेय माझे...
हासू पाहतो माझ्यासाठी जे तुझे...
सीमेपलीकडचे प्रेम शिकवलेस तु मला...
हास्याच्या सुखद अश्रूंनी...
पाहते तुला...
जगते तुला..."


विनय हसला त्यावर . डोळ्यातून पाणी वाहत होते त्याच्या. दिक्षाचा हात घट्ट पकडून ठेवला त्याने. वेळ जात होती तसा अधिक तळमळत होता विनय. एका क्षणाला त्याने अविला हाताने खूण करून बोलावलं.


" बोल ... विन्या... काय पाहिजे... बोल ... काहीही माग ... आणून देतो .. " विनयच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते , फक्त ओठांची हालचाल. अविने त्याचे कान विनयच्या ओठांजवळ नेले.


" रा ......... त ........ रा ...... णी .... " इतकंच ऐकू आलं अविला. तरी अविला कळलं ... " आलोच !!!! "


अविनाश निघाला धावतच... खाली bike होतीच त्याची. सुरु केली आणि निघाला सुसाट... रातराणीची फुले कुठे भेटणार आता, एक फुल मार्केट होते. त्याला माहीत होते. तरी एवढ्या पहाटे फुले मिळतील का तिथे... ते माहित नव्हतं त्याला. पुढच्याच १० मिनिटात तो पोहोचला. पहाटेचे ६ वाजत होते.अजूनही ते फुल मार्केट सुरु होयाचे होते. काही फुल विक्रेते होते. अविनाश शिरला आतमध्ये. जे होते त्याकडे रातराणीच्या फुलांची मागणी करू लागला. " साहेब ... तुम्हाला दिसते का इथे कुठे... शिवाय ती फुलं नसतात इथे. एवढीशी तर फुलं... वास चांगला असला तरी नाही विचारत कोणी जास्त तिला. तरी एक काम करा.. तुमचा नंबर देऊन ठेवा. नंतर कोणी आणली कि तर तुम्हाला कळवतो. " एक जण बोलला.


" आता गरज आहे... " अविनाश रागात बोलला. आणि त्याच्या bike वर येऊन बसला. कुठे जाऊ आता.. अचानक त्याला आठवलं. ऑफिसच्या बागेत तर आहे. कसं विसरलो मी... मूर्ख.. तशीच वळवली गाडी आणि पुन्हा सुसाट निघाला. आजूबाजूच्या गाड्याची पर्वा न करता. पुढच्या १५ मिनिटांत ऑफिस बाहेर पोहोचला. गेट बंद आणि वेगळ्याच watchman ची ड्युटी. गेट उघडायला तयारच नाही. त्यात अविकडे ऑफिसचे I-card नव्हते. ते बॅगेत आणि बॅग हॉस्पिटल मध्ये.


" उघड ना गेट साल्या... " अवि कधी पासून ओरडत होता.
" साहेब ... शिवी देऊ नका हा... तुम्हाला आत जायचे असेल तर आधी कार्ड दाखवा. नसेल तर नाही जाऊ देणार... " अविनाशला घाई झालेली. पण रागावून चालणार नाही... तिथे विनय वाट बघतो आहे.


" प्लिज ... प्लिज ... यार ... तुझ्या पाया पडतो.. सोड ना आतमध्ये... १० मिनिट फक्त... " अविनाशला पुढे बोलवेना. कंठ दाटून आलेला ना. खरोखरच तो त्याच्या पाया पडत होता.


" अहो .. साहेब.. काय हे.. पाया काय पडता.. तुमच्याकडे कार्ड नाही... मी तुम्हाला ओळखत नाही... कसा सोडू आत... माझी नोकरी जाईल ना... " त्याचे बोलणे बरोबर होते. अविनाश गुडग्यावर बसून रडू लागला. इतक्यात मागून नेहमीचा watchman आला.


" अहो अवि साहेब... रडता का.. " ,
" तुम्ही ओळखता यांना... .." त्या नवीन watchman ने विचारलं.
" हो.. काय झालं.. " ,
" सॉरी सॉरी ... यांना आता जायचे होते. मी ओळखत नाही ना, शिवाय यांकडे कार्ड नाही ऑफिसचे.. थांबवलं तर रडायला लागले. " त्याने लगेच गेट उघडला.


अविनाश उभा राहिला आणि धावतच बागेत गेला. छान थंड हवा वाहत होती. त्या वाऱ्यासोबत रातराणी डोलत होती. सळसळत होती. विनयची रातराणी नुसती फुलून आलेली. कितीतरी फुले... आणि काय तो सुगंध दरवळत होता. सडा पडला होता रातराणीचा. अविने डोळे पुसले. एक एक फुल उचलून घेऊ लागला. किती घेऊ.. अविला सुचेना. ओजंळ भरली तरी. त्यात अविला विनयचे वाक्य आठवलं. " जीव आहे त्यात माझा ... " जास्त घेऊन जाऊ.. असा विचार केला आणि आजूबाजूला काही मिळते का ते बघू लागला. काहीच नाही तर अंगातले शर्ट काढला त्याने. एक प्रकारची गाठ मारली आणि पिशवी सारखं बनवलं. भरभर त्यात रातराणीची फुलं जमवू लागला. जेवढी होती तेवढी जमवली. धावतच bike जवळ आला, सुरु केली आणि भरधाव निघाला हॉस्पिटलच्या दिशेने.


पोहोचला देखील. bike उभी न करताच , तशीच खाली टाकून धावत निघाला विनयच्या रूमकडे. हातात शर्टची पिशवी आणि त्यात रातराणीची फुलं. धावता धावता सगळीकडे सांडत जात होता. आणि रातराणीचा सुगंध दरवळत होता. विनयच्या रुमजवळ पोहोचला, एव्हाना बरीचशी फूल मागे पडली होती. जी होती ती हातात घेतली अविने आणि विनय जवळ आला. बाकीचे चेहरे पाहिले त्याने. हेमंत ,चंदन, अनुजा ... सारेच रडत होते. दिक्षा विनयच्या बेड शेजारी बसलेली आणि आता त्याशेजारी असलेल्या खिडकीतून बाहेर पाहत होती. शांत बसून होती. आणि विनय ......


विनय शांत झोपला होता. अविनाश आला त्याच्याजवळ. डॉक्टरने थांबवलं त्याला. " नाही राहिला तुमचा मित्र ... गेला सोडून ... उशीर केलास .. " अवि थांबला तिथेच... डोळे आधीच लाल झालेले रडून ... पुन्हा पाणी आलं. डॉक्टरचा हात झटकला त्याने.


" असा कसा जाईल... उठ रे भावा.. हे बघ ... तुझी रातराणी आणली आहे.. हे बघ... " अविनाश त्याच्या शेजारी जाऊन बसला. हातातली सगळी फुले ... रुमभर पसरली होती.


" उठ ना रे साल्या .... किती नाटक करणार अजून.... उठ ना रे... वाजव ती गिटार ... तुझं गाणं ऐकायचे आहे मला.. उठ ना विन्या .... प्लिज ..... उठ ना रे साल्या.... प्लिज ... उठ ना ..... एकदा तरी .... " अविनाश त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागला. दिक्षा अजूनही खिडकी बाहेरच बघत होती. तिच्या त्या गोबऱ्या गालावरून अश्रू ओघळत होते आता. पूर्ण रुमभर रातराणीचा सुगंध दरवळत होता. रातराणीचा सडाच पडला होता जणू तिथे.


==========================================================


समुद्रच्या लाटांचा धीर-गंभीर आवाज.. विनयने हळूच डोळे उघडले. समोर अथांग पसरलेला समुद्र... विनय उठून बसला. अंगावर पांढरा शुभ्र सदरा. शेजारी आणि आजूबाजूला मऊशार वाळू. विनय उभा राहिला. छान थंडगार वारा वाहत होता. चालू लागला. थोडासा चालला असेल तो... काही अंतरावर त्याला त्याचे सवंगडी दिसले.... चंदन , हेमंत , अविनाश , अनुजा आणि हो... दिक्षा... त्यांनीही पांढरी शुभ्र वस्त्र परिधान केली होती. विनयला बघून तेही जवळ आले. निरोप घेतला सर्वानी. दिक्षा आणखी पुढे चालत आली त्याच्या सोबत.


" निघालास ?? " दिक्षाने विचारलं.
" हो... पण जरा उशीरच झाला निघायला.. " विनयचे लक्ष समुद्राकडे गेले. " माझा आठवणी बघ,.... कश्या तरंगत आहेत समुद्राच्या लाटांवर.. या हवेत सुद्धा माझ्या आठवणींचा गंध आहेच... विसरणार नाही ना कधी मला ... " विनयने दिक्षाला विचारलं. तिने त्याचा हात हातात घेतला.


" कधीच नाही आणि तुला कधीही विसरू देणार नाही आठवणी तुझ्या... " विनयने दिक्षाचा निरोप घेतला.


चालता चालता पुन्हा त्याला रातराणीचा सुगंध आला. पुन्हा तेच मोठ्ठ रातराणीचे झाडं त्याला दिसू लागले. आज ती अदृश्य भिंत नव्हती त्याला अडवायला. विनयने मागे वळून पाहिलं. हे सर्व जणं, त्याला दुरूनच पाहत होते.त्यांना बघून छान हसू आले त्याच्या चेहऱ्यावर. पुढे आला. त्या झाडाजवळ आला तो. झाडाखाली त्याला व्यक्ती दिसायची ना कोणी. जवळ जाऊन पाहिलं. त्याची आईच होती ती. खूप आनंद झाला विनयला.
" आलास बाळा ... बस .. " आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला विनय.
" खूप उशीर झाला ना मला आई... ते सोडतच नव्हते मला. किती प्रेम दिले सर्वांनी.. " ,
" जास्त त्रास झाला का येताना ... " ,
" हो ग आई ... त्यांना सोडून येताना जास्त वाईट वाटलं. खूप दमलो आहे आता... तुझी आठवण रोज यायची. आता नाही जाणार ना सोडून मला... " आईने मायेने हात फिरवला त्याच्या केसातून...
" नाही जाणार कुठे आता मी... झोप शांत ... आराम कर... " विनय हसतच आईच्या मांडीवर शांत झोपी गेला.


विनय तर कधीच गेलेला सोडून तरी त्याने लावलेली रातराणी ... आज कमालीची बहरून आलेली. कदाचित विनयचं तिच्या रूपाने तिथे आलेला होता. कितीतरी कळ्या ... पुन्हा रात्रीची वाट पाहत होत्या.... फुलायचं होते ना त्यांना.. सर्वांना मोहवून जवळ करायचे होते... पुन्हा एकदा... कदाचित सदैव.. शेवटी रातराणीच ती... फुलणार आणि प्रेमात पडणार पुन्हा ... ...


========================= The End ======================