विक्टर; सर्वांच्या दृष्टीकोनातून जनार्दन सारंग यांचा मेड रोबोट! त्यामुळे तो कोणाला इजा करणे शक्य नाही, पण तरी त्याने आपल्याच एम्प्लॉयरला जीवे मारले होते! का...? कोणालाच माहीत नाही!
प्राथमिक चौकशीत विक्टरने काहीच सांगण्यास नकार दिला होता. आणि कायदाने त्याला तसा अधिकार दिल्याने कोणी त्याला सत्य सांगण्यास बाध्य करू शकत नव्हतं आणि म्हणून त्याला सरळ कोर्टासमोर उभा करण्यात आलं होतं... पोलिसांनी त्यांच्याकडील फुटेजच्या आधारे ही केस उभी करण्याचा प्रयत्न केला होता. पण तसेही काही होताना दिसत नव्हते!
इथेही कायदा आडवा येतच होता. विक्टरची मेमरी व्हिज्युअल रुपात पाहिली, तर सत्य समोर येणार होते. पण सरळ होतं, की विक्टर तशी परवानगी देणार नव्हता!
विक्टर... हे नांव जनार्दन सारंग यांनीच त्या रोबोटला दिले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी एका ऑन-लाईन स्टोअरमधून तो विकत घेतला होता.
विक्टरच्या येण्याने जनार्दन सारंग यांचा एकटेपणा दूर झाला होता. त्यांचे विस्कळीत झालेले रुटीन त्यांनी नव्याने तयार केलेलं होते.
विशेष म्हणजे दोघांच्या आवडी निवडी खूप जुळत होत्या म्हणूनच जनार्दन सारंग यांच्या तो खूप आवडीचा झाला होता. दोघांमध्ये खूप चांगली व घट्ट मैत्री झाली होती. या रोबोटच्या येण्याने जनार्दन सारंग यांच्या आयुष्यात आनंद परत आला होता, म्हणून त्यांनीच या रोबोटला विक्टर हे नांव दिलं होतं...
विक्टर; दि विक्टरी ऑफ जॉय... जनार्दन्स विक्टरी ऑफ जॉय...! खूप वर्षांनंतर...
पण त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येणाऱ्या या विक्टरनेच त्यांना जीवे मारले होते... का...? माहीत नाही...
तो काही 'वॉर रोबोट' नाही! आणि जरी असता, तरी पण वॉर रोबोटला सुद्धा माणसांना किंवा इतर रोबोट्सना मारण्याचा अधिकार नाही! वस्तुतः अलीकडे युद्ध बंदच झाली आहेत... शेवटचं युद्ध होऊन काहीशे वर्षं होऊन गेली आहेत... त्यामुळे जी काही युद्ध रोबोट्स बनवली जात आहेत, ती फक्त देशांच्या सीमा सुरक्षेसाठी! मास डिस्ट्रक्शनसाठी रोबोट्स प्रोडक्शनवर पिस क्रिएटिंग युनियन कौन्सिलने कधीच बंदी घातली आहे. आणि म्हणूनच कोणत्याच रोबोटला कोणालाही मारणं शक्य नाही. त्यांना तसं बनवलंच जात नाही...!
रोबोटिक्सचे हे नियम व कायदे तसेच आहेत जसे आपले संविधान असते. रोबोट्सना त्याचा अधिकार आहे तसेच काही कर्तव्यं आणि जबाबदाऱ्याही आहेत.
हे 'रोबोट कॉस्टिट्युशन' सर आयझॅक असिमोव्ह यांच्या तीन लॉजचा आधार घेऊन बनवले गेले आहेत...
Isaac Asimov's "Three Laws of Robotics"
1) A robot may not injure a human being or, through inaction, allow a human being to come to harm.
2) A robot must obey orders given it by human beings except where such orders would conflict with the First Law.
3) A robot must protect its own existence as long as such protection does not conflict with the First or Second Law.
अनुवाद -
आयझॅक असिमोव्हचे "रोबोटिक्सचे तीन नियम"
१) एखादा रोबोट एखाद्या माणसाला इजा पोहोचवू शकत नाही किंवा त्याच्या निष्क्रियतेद्वारे माणसाला इजा होऊ देऊ शकत नाही.
२) रोबोटने मनुष्यांनी दिलेल्या ऑर्डरचे पालन केले पाहिजे जिथे अशा ऑर्डरचा प्रथम कायद्याशी विरोध नाही.
३) जोपर्यंत प्रथम किंवा द्वितीय कायद्याशी असे संरक्षण येत नाही तोपर्यंत रोबोटने स्वतःच्या अस्तित्वाचे रक्षण केले पाहिजे.
म्हणजे मग काय जनार्दन सारंग यांच्याकडून विक्टरला काही धोका होता का? पण अशा परिस्थितीत देखील तो जनार्दन सारंग यांना मारण्याची परवानगी त्याचं संविधान त्याला देत नाही... मग त्यानं जनार्दन सारंग यांना का व कशासाठी मारले?
जो कायदा विक्टरला अधिकार देत होता, तोच कायदा हे देखील म्हणत होता, की "Ignorance of law is no excuse."
म्हणजे जर तुमच्यावर अन्याय झाला असेल आणि तरी तुम्ही गप्प बसलात, आणि गरज पडल्यावर वेळाने आपण आपल्यावर अन्याय झालाय अशी तक्रार केली, तर कायदा तुम्हाला न्याय मिळवून देण्यात काही मदत करत नाही! याला 'स्टेच्युट ऑफ लिमिटेशन्स' म्हणतात. भारतात खूनासारख्या गुन्ह्यात हा लॉ वर्क करत नाही. पण ही केस भारतात नाही, तर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस हाताळत होते. त्यामुळे कदाचित ही गोष्ट कुणाला दहा - बारा वर्षांनी समजली असती आणि मग कोणी विक्टर विरुद्ध गुन्हा दाखल केला असता, तर त्याला काहीच शिक्षा न्यायालयाकडून केली गेली नसती. आणि तो गुन्हा करूनही सुखरूपच सुटला असता.