तू माझा सांगाती...! - 8

विक्टर बद्दल त्या थ्री-डी होलोग्राम मधील व्यक्तीला जनार्दन सारंग यांनी माहिती दिली. विक्टरला स्माईल देऊन ती व्यक्ती बोलू लागली ती नाराजीतच...
"साल्या जण्या, माझ्या अंत्यसंस्कारासाठी नाही ते नाही माझ्या मातीला पण आला नाहीस होय?" ती व्यक्ती नाराजीने बोलली.
"मरून पण जिवंत आहेसच की लेका. मग शोक कशाचा करणार होतो?" त्या व्यक्तीची चेष्टा करण्यासाठी जनार्दन सारंग म्हणाले,
"आणि काय तो तुझा वाढदिवस होता होय, की मी आवर्जून यायलाच हवं होतं? बरं ते जाऊ दे; मला आधी हे सांग, की मी तेथे नव्हतो, हे तुला सांगितलं कोणी?"
"नलिनीने!" होलोग्राम मधील व्यक्तीने खुलासा केला.
"वाटलंच! तुझ्या बायकोला सवयच आहे भांडणं लावायची!" जनार्दन सारंग त्या व्यक्तीला चिडवण्यासाठी बोलले.
"च्यायला हे आपलं बरं आहे! इथं आम्ही फुगायसाठी कॉन्टॅक्ट केलाय आणि तुम्हीच फुगताय!" ती होलोग्राफीक व्यक्ती लटक्या नाराजीने बोलली.
तसे जनार्दन सारंग हसले.
"हसा! आमच्या मरणावर हसताय! हसा! मला रोबोटिक बॉडी मिळू दे. तिथं येऊन चटणी करतो का नाही बघ तुझी!" ती इमेज अदृश्य झाली. 
"ते कोण होते?" विक्टरने कुतूहलाने विचारले.
"नंदकेश. माझा लहानपणीचा मित्र होता!" जनार्दन सारंग म्हणाले.
"ते आता...?" गोंधळलेल्या विक्टरने जनार्दन सारंग यांना प्रश्न केला.
"मेलाय तो! आठवडा झाला." जनार्दन सारंग यांनी खुलासा केला. 
जनार्दन सारंग यांचं उत्तर ऐकून रोबोट असणारा विक्टर देखील चक्रावला.
"मग त्यांनी तुम्हाला कॉल कसा केला?" अधिकच गोंधळून त्याने पुन्हा जनार्दन सारंग यांना प्रश्न केला.
"नॅशनल हेरिटेज अँड प्रिजरवेशन ऑर्गनायझेशनकडून त्याच्या मेमरीजचा वापर करून त्याला पुन्हा रिवाईव्ह केलंय." जनार्दन सारंग यांनी विकटरच्या प्रश्नाचे निराकरण केलं.
"ते कसं?" आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलप होत असलेल्या विक्टरला हे माहिती करून घेण्याची उत्सुकता लागली. त्या उत्सुकतेपोटी त्याचे आता प्रश्न चालले.
"त्यासाठी एप्लाय केलं, की आपली मेमरी त्यांच्या मेगा सर्वरला अपलोड होऊ लागते. त्यासाठी ते लोक ब्रेन मॅपिंग डिव्हाईस प्रोवाईड करतात. माणूस मेला, की या मेमरीजच्या आधारे त्या माणसाला जीवनात स्वरूपात रहायला ही ऑर्गनायझेशन्स मदत करतात. ज्यांना बॉडी हवी आहे त्यांच्यासाठी मग रोबोटीक बॉडीज तयार करून त्याच्यात या मेमरीज इन्सर्ट केल्या जातात."
जनार्दन सारंग यांचं बोलणं पूर्ण होत असतानाच नंदकेश यांची होलोग्राफीक इमेज पुन्हा दृश्य झाली. 
"बोला." जनार्दन सारंग म्हणाले.
"अरे, एक गोष्ट सांगायची राहून गेली. मी माझं डीएनए सॅम्पल सुध्दा नॅशनल हेरिटेज अँड प्रिजरवेशन ऑर्गनायझेशनकडे देऊन ठेवलंय. चर्चा होती, की कदाचित क्लोनिंग वरची बंदी उठेल. तसं झालं, तर मला पुन्हा जन्म घेता येईल." नंदकेश म्हणाले.
"ते खरं, पण त्याचात तुझे फक्त दूर्गुण असतील..."
"ए!" नंदकेश चिडून ओरडले.
"म्हणजे तुझे गुण असतील. तुझी मेमरी त्याच्यात नसल्याने तो तू कसा असशील? या अर्थी ती पूर्ण वेगळीच व्यक्ती नसेल का?" जनार्दन सारंग यांनी आपली मुद्दाम केलेली चूक सुधारून प्रश्न विचारला.
"हो. पण ती काळजी नाही. माझ्या मेमरीज त्याला दाखवल्या की झालं. होय की नाही?!"
"हं!" नंदकेशच्या बोलण्यावर जनार्दन सारंग यांनी गंभीरपणे एवढंच उत्तर दिलं.
"काय झालं जनू? कसला विचार करतोयस?" नंदकेश यांनी जनार्दन सारंग यांना विचारलं.
"नाही रे. एक चिंता सतावतेय. तू रोबोटीक बॉडी मिळाल्यावर मला मारायचं म्हणतोयस. मग तुला त्याचवेळी डिसमेंटल केलं जाईल. मग तूझे क्लोनिंग कसे होईल?" 
"कर! कट कर!" चिडून नंदकेश म्हणाले आणि नंदकेश  यांची होलोग्राफीक इमेज अदृश्य झाली.
पण यावेळी जनार्दन सारंग हसले नाहीत. 
"मला माहित आहे बाबा. तुमची चिंता काही वेगळी आहे. काय आहे ती?" विक्टरनेही चिंतीत होऊन विचारलं.
"कितीही जगलं, तरी माणसाची जगण्याची भूक काही संपत नाही!" जनार्दन सारंग गंभीरपणे म्हणाले.
"पण त्यात गैर काय आहे? तुम्ही ही एप्लाय करा ना नॅशनल हेरिटेज अँड प्रिजरवेशन ऑर्गनायझेशनमध्ये. म्हणजे आपल्याला कायम एकत्र राहता येईल."
विक्टरच्या या बोलण्यावर मात्र जनार्दन सारंग हसले. 

***

रेट करा आणि टिप्पणी द्या

Prashant Vyawhare

Prashant Vyawhare 9 महिना पूर्वी