प्रीतीची 'प्रेम'कथा - 3 Nitin More द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रीतीची 'प्रेम'कथा - 3

पुढे काय?

अर्थात

वो कौन है?

प्रेम म्हणतो शिक्षण आपल्याकडे जीवनाभिमुख नाही. जीवनाभिमुख म्हणे!म्हणजे काय कोणास ठाऊक. त्याला विचारले तर वर्ग घेतल्यासारखा लेक्चर देईल. त्यापेक्षा जाऊ देत. नसेल जीवनाभिमुख तर त्याला मी तरी काय करणार? पण एक आहे, तसे म्हणत ही त्याने घेतलेच ना ते शिक्षण तसे जीवनाभिमुख नसूनही. मग कशाला उगाच बडबडतो कोणाला ठाऊक. मी मात्र ते तसे नाही हे आधीच समजून उमजून जास्त शिक्षणाच्या वाटेलाच गेली नाही. उगाच जीवनाभिमुख की काय नसलेले शिक्षण कशाला? त्यापेक्षा मला व्यवहारी ज्ञान जास्त आहे. जगाच्या पाठीवर कुठेही ते उपयोगी पडेल.. हो की नाही? तर प्रेमला अशा खूप गोष्टी शिकायच्या बाकी आहेत. उगाच उच्चशिक्षित असल्याच्या गमजा मारतो! पण हे सारे नंतरचे. म्हणजे आधी त्यादिवशी त्याला पाहिले आणि आता त्याची नि माझी जोडी.. छे.. लाज वाटते मला.. पण मधल्या काळात कितीतरी काहीतरी घडले.

.. घडले म्हणू की घडवले म्हणू?

त्यादिवशी तो आणि तात्या गेले. कसला आगा न पीछा ठाऊक मला. सुतावरून स्वर्ग गाठायला ते सूत तर हवेच.. आणि त्याच्याशी सूत जुळायला हा कोण नि कोणाचा सुत हे तरी ठाऊक हवे नाही का? पण सगळीच बोंब इथे. तात्या त्यादिवशी उशिरा आले. मी डोळे फाडफाडून जागी होती काही माहिती मिळेल म्हणून. पण तोवर आईच झोपून गेलेली. तात्या आले नि म्हणाले, "झोप लवकर आता." चोराच्या मनात चांदणे म्हणतात ते मला तेव्हा जाणवलेच. एरव्ही दुसऱ्या कुण्या पाव्हण्याबद्दल काही न काही गप्पा झाल्याच असत्या. पण इकडे 'हम आज कहीं दिल खो बैठे' होऊन बसलेले. त्यात मी मुद्दाम विषय कसा काढणार होते? उगाच संशय. ती रात्र तशीच गेली. उगाच हिंदी सिनेमातली विरहगीते मनात म्हणत पडून राहिली मी.. आजा रे अब मेरा दिल पुकारा.. पासून सुरूवात केली.. अकेले हैं चले आअो.. तुझ बिन जियरा उदास रे.. अशी विरहाग्नीतली की काय म्हणतात ना ती गाणी बोलली मी.. काही वेळात पुढचे गाणे सुचेना.. मग म्हणाली मी..बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है.. बालमा? कसला बलम नि बालमा.. निनावी अन् अनोळखी! सिनेमात बरे असते, त्यांना हवी तशी हवी तेव्हा गाणी सुचत राहतात. पाठून म्युझिकसकट! आणि पुढे काहीना काही व्हायची सोय असतेच स्टोरीत. त्यामुळे हिराॅइन टेन्शनमध्ये असली तरी नि विरहगीत गात असली तरी बहुतेक वेळी सुखांत होणार हे ठाऊकच असते. पण आयुष्य म्हणजे सिनेमा नाही! अय्या! आई मला हेच सांगत असते नेहमी. म्हणजे सिनेमाचे वेड आहे मला. मी त्यातली गाणी गुणगुणत असते.. ओ मेरे राजकुमार.. तेरे बिन रहा न जाय वगैरे!

मग आई म्हणते, "अगं आयुष्य म्हणजे सिनेमा नाही.. राजकुमार काय नि राजकन्या काय.. नि त्यांच्या गोष्टी काय.. सिनेमात ठीक. नाहीतर तेच खरे समजून चालशील."

आई म्हणते ते खरेय. पण अर्धेच. म्हणजे बाकी ठीक की सिनेमासारखे सगळे होत नाही, पण राजकुमार? तो तर आलाच ना! अगदी परिकथेतला म्हणावा असा. घोड्यावर नसेल आला पण आज घोडे आहेतच कुठे? अबलख वारू नसतील पण अबलख रिक्शेत बसून आला माझा राजकुमार! आणि स्वप्नात नाही, तर थेट सत्यात! इथे माझ्यासमोर बसून गेला आणि मी वाढलेल्या पुऱ्याही खाऊन गेला! थोडक्यात 'काल रात्री स्वप्नामधे एक राजा आला पुऱ्या खाऊन गेला!' सिनेमात सगळेच काही मनचे दाखवतात असे नाही .. म्हणजे? बाकी त्याची माझी भेट होणारच? नशिबात तोच असेल तर दुनियाकी कोई ताकद कशी रोक सकेगी? असे म्हणतातच ते सिनेमावाले. खोटे कसे असेल ते?

माझ्या मनाला इतके सांत्वन पुरेसे होते तेव्हा! पहाटे डोळा लागला माझा. स्वप्न पडले. तो आणि मी. धुवांधार पाऊस. एका छत्रीत गाणे म्हणत चाललोय आम्ही. 'एक छतरी और हम दोनों.. फिर क्या हो..' मग छत्रीच उडून गेली. मी भिजत होती. आणि त्या स्वप्नातही शिंकत होती. लहानपणापासून मी तशी नाजूकच. इतक्यात आई आली, ओरडत.. "मने, पावसात नको भिजूस.. सर्दी होईल!"

आई असलीच आहे. नको तेव्हा स्वप्नात पण येते नि असले अरसिक सल्ले देते. या मनीला स्वतःच्या मनचे काही करताच येणार नाही का? आणि सिनेमातल्या आया हल्ली बऱ्या वागतात मुलींशी. मैत्रिणीसारख्या. आईला दाखवायला हवेत ते. नाहीतर माझी आई. सर्दी म्हणे! स्वप्न मोडायला ते पुरेसे होते. अर्धवट जागी झाले तर आई आणि तात्या काहीतरी बोलत होते. स्वर्ग गाठायला काही सूत मिळतेय का वाटून मी टक्क जागी झाली.. आणि कुणाला मी जागीच आहे हे कळू नये म्हणून डोळे गच्च मिटून डोक्यावर पांघरूण घेऊन गाढ झोपण्याचे नाटक करत पडून राहिली. प्रेम म्हटले की चोरटेपणा आपोआप असा येत असेल अशी कल्पना नव्हती मला. पण चोरटेपणा चोरपावलांनी आलाच! आणि चोरटेपणा आला म्हणजे .. 'हे प्रेम नव्हे तर काय आहे मेरे मन!' कुठल्याशा सिनेमातल्या या डायलाॅगनी मी स्वतःवरच खुश झाली आणि कान टवकारून ऐकायला लागली..

आईला फाफटपसारा लावायची भलतीच सवय आहे. मूळ मुद्द्यास थेट येईल तर ती आई कसली! गवई लोक असे हळूहळू समेवर येतात म्हणे! तशी आई तात्यांशी भांडताना तर असा धोबीपछाड घालते! कितीतरी वेळ तर भांडण्याच्या मूळ मुद्द्याला हातच घालत नाही! पण आज भांडणबिंडण काही नव्हते. पण आई इकडतिकडच्या गप्पा मारत बसलेली! अगदी तांदूळ कुठल्या दुकानातला चांगला ते सोन्याचे भाव कडाडताहेत पर्यत! त्यातल्यात्यात एकदा म्हणाली ती, "मनीच्या लग्नासाठी साठवायला हवे सोने.."

पण तात्या म्हणाले, "लहान आहे अजून!"

आता पुढे त्या अजनबी इन्सान बरोबर जुळेल तेव्हा मला लहान न समजले म्हणजे झाले! काही करून त्या कालच्या राजकुमाराबद्दल काहीच बोलत नाहीत म्हणजे काय? असा राजबिंडा जावई शोधूनही सापडणार नाही आणि उगाच आटे दाल का भाव बघत बसलेत! किती वेळ गेला कुणास ठाऊक पण आवाज बंद झाला यायचा नि मी डोक्यावरून पांघरूण हटवून उठून बसली. वो कौन था? अजूनही सस्पेन्स कायम त्या सिनेमातल्या सारखा! काल त्याच्याकडे पाहताना सारे कान, नाक, डोळे .. नाही डोळे सोडून सारे.. बंद केलेली मी. त्यामुळे त्यातून काही माहिती मिळाली असती.. किमान नावबिव तरी. मनातल्या मनात मी स्वतःवर चिडली. पुढच्या वेळेस सावध रहायला हवे म्हणून मनाशी पक्की खूणगाठ मारून बसली मी. फक्त ती वेळ कधी येईल .. की येणारच नाही कुणास ठाऊक!

इथे मला ते पू.स्वामी अरपितानंद आठवले. ते म्हणतात, 'सकारात्मक विचारांचा प्रभाव मोठा बरे! शोधल्यास भगवान पण मिळतात .. सकारात्मक शोध घ्या. ह्या जगात नामुमकिन काही नाही वत्स!'

अरपितानंद स्वामी म्हणजे डायरेक्ट देवाशी हाॅटलाईन असणारे! नाही, तुम्हाला वाटेल मी त्यांचाकडे गेली. ते तसे काही नाही काही. मी फक्त ते विचार मंथन करत बसली. किती ग्रेट वाटले सांगू. मंथन वगैरे म्हटले की काहीतरी मोठे केल्यासारखे वाटते की नाही? तो शब्द स्वामींचाच! मी आता सकारात्मक विचार करणार .. सकारात्मकच विचार करणार .. सकारात्मक विचारच करणार.. नाही, सकारात्मक विचार करणारच! म्हणजे काय करावे? स्वप्नातले एक छतरीवाले गाणे म्हणजे सकारात्मक विचारांचा परमोच्च बिंदू नव्हे का? पण तो पुरेसा नसावा. अजून विचार करायला हवा!

मधे काही दिवस असेच गेले.

विचार आणि विचार!

मी अधूनमधून अशी विचारांत गुंग दिसू लागली की आई विचारायची "कसला गं विचार करतेयस मने?"

मी काय ताकास तूर लागू देतेय?

मी कसला विचार करत होती मला माहितीय..

काय ते.. ते काय म्हणतात ना.. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी.. बस तू ही तू! सकारात्मक अगदी!

जय स्वामी अरपितानंदजीकी!

जय हो!