जयंता
पांडुरंग सदाशिव साने
२. श्रमणारी लक्ष्मी
“बये, नको जाऊ कामाला. तू घरीच राहा आज. राहतेस का?” लहान बाबू म्हणाला.
“जायला हवं मला. कांडण आहे. न जाऊन कसे चालेल? मी दुपारची येऊन जाईन हा. तू पडून राहा. दादाक़डून येताना भात, लोणचे घेऊन येईन. पडून राहा. बाहेर जाऊ नकोस” लक्ष्मी बाबूच्या डोक्यावरुन हात फिरवीत म्हणाली.
“बाबा कुठे गेले ?”
“कुठे गेले देवाला माहीत. आले घरी तर बसतील तुझ्याजवळ. कामाला जायला ते आजारी असतात. गप्पा मारायला, चिलमी ओढायला नसते आजारपण. काय करायचे ? तू पडून राहा हं,” ती त्याच्या अंगावर पांघरुण घालून म्हणाली.
ते केवढे लहानसे घर होते. लक्ष्मी आणि तिचा नवरा रामजी तेथे राहत. लक्ष्मीला तीन मुले. मोठा मुलगा सात वर्षांचा. दुसरी मुलगी आणि तिसरा हा बाबू. मोठ्या मुलाचे नाव विठू. मुलीचे नाव काशी. विठू शेण गोळा करायला गेला होता. काशी ‘आई येणार आहे कांडायला ’ असा निरोप सांगायाला गेली होती. लहानगा बाबू तापाने दोन दिवस आजारी होता. लक्ष्मीचा पाय घरातून बाहेर पडत नव्हता. परंतु कामाला न जाईल तर पोटाला काय ? संसार कसा चालवायला ? लक्ष्मीचा नवरा रामजी दमेकरी झाला होता आणि जरा पांगळाही झाला होता. तो उंच झाडावर चढणारा. उंच उंच आंब्याच्या झाडांवर चढून तो आंबे काढायचा. तसेच झाडे तोडण्यात हुशार. झाड ज्या बाजूला पडायला हवे असेल, त्या बाजूला पाडायचा. गावोगावची त्याला बोलावणी यायची. परंतु रामजी एकदा झाडावरुन खाली पडला. त्या दिवशी लक्ष्मी दादांकडे दळीत होती आणि बातमी आली. तशीच ती धावत गेली. माणसे जमली होती. रामजीला डोलीत घालून घरी नेण्यात आले. किती तरी उपाय केल्यावर तो थोडा बरा झाला. परंतु तेव्हापासून तो कामाला निरुपयोगी झाला. त्याचे पाय दुखत. मैल अर्धा मैल चालणेही होत नसे. आणि दम्याचीही व्यथा जडली. रामजीला सुतारकाम येत होते. ते बसून करता येण्यासारखे. परंतु आजारपणापासून तो आळशी बनला होता. तो कामाला जात नसे. लक्ष्मी अधूनमधून त्याला बोले. एकदा तो तिच्या अंगावर धावून गेला. तेव्हापासून लक्ष्मी बोलत नसे. रामजीला कामासाठी चालवत नसे. परंतु गप्पा मारायला गावभर जाई. चिलमी ओढी. मग खोकत घरी येई. रामजीचा लहान भाऊ हरी मात्र कोठे कामाला जाई. मध्यंतरी मुंबईलाही गेला. गिरणीत कामाला लागला. परंतु संपात नोकरी गेली. तो परत घरी आला. मुंबई नको म्हणे. गावातच एका चहाच्या दुकानात तो आता कामाला होता. परंतु पगार मिळे तो सारा घरी नसे आणून देत. आपल्या लग्नासाठी त्यातून तो शिल्लक ठेवी. लक्ष्मीला काही पैसे आणून देई. लक्ष्मी बोलत नसे. दिराचा थोडा तरी आधार आहे असे तिला वाटे.
‘घरी आणतील तर सारे पैसे संपतील. उद्या लगीन तर व्हायला हवं. मी कोठून आणू चार दिडक्या? तिकडे नारायणरावांकडे नेऊन ठेवतात तेच बेश. त्यांचा संसार आज ना उद्या हवाच मांडायला.’ लक्ष्मी म्हणायची.
असा तो गरिबांचा जीवनक्रम चालला होता. वहिनी आजारी होती म्हणून मी घरी गेलो होतो. वहिनीची मुलगी लहान. असेल चार-पाच वर्षांची. ही लक्ष्मी तिचे सारे करी. ती तिची वेणी घाली. तिचे नाव सुधा. आणि सुधाच्या आईचेही तीच सारे काम करी. ते करुन इतर ठिकाणी पुन्हा कामाला जाई. कोठे मोलमजुरीला जाई. कधी तिचे घरचे काम. लहानसे शेत ती व तिचा दीर हरी मिळून मक्त्याने करीत. त्या शेताच्याच बाजुला त्यांनी ते लहानसे झोपडे बांधले होते. मालकाला मक्ता घालीत आणि तेथे राहत.
“बय कांडायला येणार आहे.” काशी येऊन म्हणाली.
“काय गं काशी, तुझ्या भावाचा ताप कसा आहे ?” मी विचारले.
“ताप आहे.” असे म्हणून ती पोर पळाली. वहिनी क्षयरोगाने आजारी होती. बरी होणे कठीण. दादाही अशक्त व थकलेले. सुधा लहान जीव. हसे, खेळे, फुले आणी. आजारी आईला ती फुले आणून द्यायची. आईचा हात तिच्या केसांवरुन फिरे. मीच घरात स्वयंपाक वगैरे करीत असे. सुधासाठी सकाळी थोडा गुरगु-या भात मी करीत असे. वहिनीला आवडेल ती थोडी भाजी करावी असे चालले होते.
लक्ष्मी कांडायला आली. तिने भात काढून घेतले. मध्येच कांडण थांबवून तिने वहिनीच्या अंगाला तेल लावले. वहिनीला दुसरे लुगडे तिने नेसवले. नंतर सुधाची वेणी घातली आणि पुन्हा कांडू लागली.
दुपारची जेवणे झाली. मी मुद्दामच भात जास्त करीत असे. लक्ष्मीला द्यायला होई. तिने भांडी घासली.
“लक्ष्मी, हा भात आहे. खाऊन घेतेस ?” मी म्हटले.
“मी घरी घेऊन जाते. लवकरच परत येईन.” ती म्हणाली.
आजारी मुलासाठी ती तो भात घेऊन जात होती. मी लोणचे दिले. लक्ष्मी गेली.
रामजी, हरी, विठू, विशी भाकर खात होती. लक्ष्मीने सकाळी करुन ठेवली होती. तो ती गेली.
“बय, आलीस ? बाबू म्हणाला.”
“होय, बाळ.” ती त्याच्याजवळ बसून म्हणाली. तिने सर्वांना थोडेथोडे लोणचे वाढले. तेथे दोनचार हिरव्या मिरच्या होत्या. रामजीने कोठून तरी आणल्या होत्या.
“उठ, बाबू. जेव थोडे.” लक्ष्मी म्हणाली.
“तूच भरव.” तो म्हणाला.
लक्ष्मीने त्याला भरवले. नंतर उरलीसुरली भाकर खाऊन ती पुन्हा कामाला आली.
कांडण आटोपून, कण्या, धापट, थोडे तांदूळ घेऊन ती सायंकाळी घरी परत गेली. असे दिवस जात होते.
एके दिवशी लक्ष्मीबरोबर दुसरी एक बाई आली.
“लक्ष्मी, ही कोण ?” मी विचारले.
“हा नणंद. करंजणीस असते. आता दिवाळी आहे म्हणून माहेरी आली आहे. माघारपण नको करायला ?” लक्ष्मी म्हणाली.
“माघारपण का तू करणार ?” मी विचारले.
“हो, तिची आई नाही. मग मीच करायला हवं. राहील दोन दिवस नि जाईल. म्हणाली, मी पण येते दादांकडे दळायला. नको सांगितले. आलीस माघारपणाला तर विसावा घे म्हटले, तर ऐकेना.” लक्ष्मी कौतुकाने सांगत होती.
“तुझ्या नणंदेचे नाव काय ?”
“त्यांचे नाव चंद्रा.”
त्या दोघी दळत होत्या. मधून हसत होत्या. नणंदाभावजयांचे ते प्रेम पाहून मला आनंद वाटला. लक्ष्मी गरीब, घरी खायची पंचाईत, नवरा बेकार नि आळशी ; परंतु नणंदेला दोन दिवस माघारपणाला लक्ष्मीने आणले. त्या गरिबीतही ती कर्तव्यदक्ष होती, उदार होती, प्रेमळ होती.
मी विहिरीवर गेलो होतो. कपडे धूत होतो. तो लक्ष्मी आली. ती तेथे उभी होती.
“काय ग लक्ष्मी ?”
“दादा, अदमण भात द्याल ? हरी येईल, त्याच्याबरोबर द्या. आम्ही पुढे पैसे फेडू. मोलमजुरी करुन पैसे वारुन टाकू !”
“लक्ष्मी, तू आमच्याकडे किती काम करतेस ! वहिनीची लुगडी धुतेस, ती थुंकीची भांडी घासतेस, सारे मनापासून करतेस ; लहान सुधाची तू जणू आई बनली आहेस. तिची वेणी घालतेस, तिच्या केसांत शेवंतीची फुले घालतेस. तुझा हक्कच आहे. तू घंरातलीच आहेस. दादांना विचारीन नि देईन हो भात. तुझी नणंदही आली आहे. दोन दिवस पोटभर जेवा.” मी म्हटले.
लक्ष्मी गेली. थोड्या वेळाने हरी आला. त्याला मी अदमण भात दिले. गेले काही दिवस. त्या दिवशी लक्ष्मी जरा उशीराने आली. मी वाट बघत होतो.
“का ग लक्ष्मी, उशीरसा ?” मी विचारले.
“दादा, रात्रभर जागरण. उजाडता डोळा लागला.”
“मुलगा तर बरा आहे ना ?”
“हो. परंतु काल मोठे संकट टळले. घरात दोन साप निघाले. मी चुलीजवळ होते. तो आला. मी घाबरले. हरीने येऊन मारला. आम्ही रातची सारी निजलो. मला झोप येत नव्हती. तो माझ्या पायाला काही गार लागले. मी एकदम उठले. दिवा लावला. पोरांना बाजूला केले. तो दुसरा साप. त्यालाही मारले. मग मात्र झोप येईना. दिवा तसाच ठेवला. आधीच तेल मिळत नाही. परंतु भय वाटले. आणखी साप येणार की काय असे वाटले. पोरेही घाबरली. असा गोंधळ. रानात घर. परंतु असे दोन साप नाही कधी घरात आले. काय करायचे ?”
लक्ष्मी कामाला लागली. तो तिचा दीर हरी चहाच्या दुकानातून आला. तो संतापून आला होता. काय होती भानगड ?
“वहिनी-”
“काय ?”
“चहाचा मालक माझ्यावर चोरीचा आळ घेतो. म्हणाला, येथले चार आणे घेतलेस ? मी कशाला घेऊ त्याचे चार आणे ! चालता हो, म्हणाला. वाटेल त्या शिव्या दिल्या त्याने.”
“आम्ही काय गरिब म्हणून चोर ? मरु ; चोरी नाही करणार. चल ; मी येते.” असे म्हणून लक्ष्मी तणतणत गेली. तो चहाचा दुकानवाला पान खात होता.
“तू माझ्या दिराला बोललास ? गरीब पाहून का वाटेल ते बोलावे ? उपाशी मरु पण दुस-याच्या वस्तूला आम्ही हात लावणार नाही. कशाला घेईल तो तुझे चार आणे ? त्या चार आण्यांनी का आम्हाला माड्या बांधता येणार आहेत ? तो नाही पीत विडी, नाही खात सुपारी. कशाला घेईल तुमचे चार आणे ?”
“अगं, पण येथले गेले कोठे ?”
“ते शोधा तुम्ही.”
इतक्यात तेथे एक लहान मुलगा होता. तो इकडेतिकडे बघत होता.
“अहो, ते पाहा चार आणे. कुडाजवळ पडले आहेत.” तो मुलगा म्हणाला.
चार आणे सापडले.
“बघा आणि गरिबावर चोरीचा आळ.”
“मग, म्हटले म्हणून काय झाले ? त्याला कोठे काम मिळत नव्हते. मुंबईत त्याला रोजगार भेटेना. तेथून आला भीक मागत परत. मी म्हणून कपबशा विसळायला तरी ठेवले. नाही दिसले चार आणे म्हणून म्हटले. आजवर नाही म्हटले ते. एवढी मिजास असेल, तर येऊ नको कामाला. कामाला वाटेल तेवढी दुसरी पोरे मिळतील.” मालक म्हणाला.
“नाहीच येत कामाला.” हरी म्हणाला.
“हो चालता.” मालक गर्जला.
“माझा पगार द्या.”
“महिनाअखेर ये. असा मध्येच नाही मिळत.” हरी निघून गेला. लक्ष्मी गेली. परंतु दिराची नोकरी गेली म्हणून तिला वाईट वाटले. आणि आणखी संकटे येऊ लागली. यंदा तिने मळणी काढली. भात फार झाले नाही. कोठून घालणार मक्ता ? आदल्या वर्षींचीही दोन मण बाकी होती. मालकाने सांगितले, “सारे भात घाला. मागील वर्षाचे नि यंदाचे. नाही तर शेत काढून घेऊन दुस-यास देतो.’ काय करायचे ? शेताचा थो़डा आधार होता आणि शेत काढून घेतले म्हणजे राहायचे कुठे ? ते शेत ती मक्त्याने करीत म्हणून तेथेच झोपडीत राहत. लक्ष्मी संचित झाली.
“तुम्ही तुमचे पैसे आणता मागून ? नारायणरावांकडे तुमची किती रक्कम आहे ?” लक्ष्मी दिराला म्हणाली.
“मी उद्या मुंबईला जातो. मला हवेत ते पैसे. त्यातले देऊन मी काय करु ?” हरी म्हणाला.
“शेताच्या मालकाला देऊ .”
“मी मुंबईला कसा जाऊ ? या गावात राहणे नको. मी नि माझे नशीब. कधी काही मिळाले तर तुम्हाला पाठवीन. नारायणरावांकडे पंचवीसतीस रुपये असतील ; त्यातून किती देणार? मला काय उरणार ?”
लक्ष्मी बोलली नाही. एके दिवशी हरी मुंबईला जातो सांगून निघून गेला.
त्या दिवशी वहिनीचे अधिक होते. आम्ही सारे दुःखी होतो. सायंकाळची वेळ. मी तुळशीच्या अंगणात उभा होतो आणि लक्ष्मी मजकडे आली.
“झाले ना काम ? जो हो.” वहिनी उद्या असेल की नाही, देव जाणे. माझ्या डोळ्यांत पाणी आले. लक्ष्मी बोलली नाही. तिचेही डोळे भरुन आले.
“सुधा लहान” एवढे लक्ष्मी म्हणाली. परंतु ती जाईना. तिला का काही हवे होते ?
“लक्ष्मी, का घुटमळतेस ?”
“तुम्ही मला वीस रुपये द्या. शेताच्या मालकाला द्यायला हवेत. नाही तर शेत काढून घेईन म्हणतो. आम्ही कुठे जाऊ ? तीन पोरे. ते पायाने पांगळे. मी दिवसभर राबते. लहान पोरेही काम करतात. कसे दिवस काढायचे ? भात झो़डले. दाणाही फार मला झाला नाही. तुम्ही दुःखात आहात. सांजच्या वेळेस मागू नये. परंतु काय करु ?”
मी वीस रुपये तिला आणून दिले.
“पुढे देईन कधी तरी.” ती म्हणाली.
“परत नकोत. तू वहिनीची सेवा केली आहेस. तिची का पैशात किंमत करायची ? जा घरी. पोरे वाट बघत असतील !”
ती गेली. रात्री आम्ही वहिनीजवळ बसलो होतो. सकाळ झाली आणि वहिनीचे डोळे तेजस्वी दिसले.
“किती छान उजाडले आहे, किती छान !” ती म्हणाली.
आम्हाला वाटले वहिनीस बरे वाटत असावे. परंतु तिला अनंत जीवन दिसत होते. ज्या जगात सारे सुंदर, ते तिला दिसत होते. “किती छान !” हेच तिचे शेवटचे शब्द ! वहिनी गेली.
दुःखशोक गिळून आम्ही होतो. आम्ही सारी तेथून निघून जाणार होतो. लक्ष्मी आली. तिची मुले आली. वहिनीची लुगडी लक्ष्मीला दिली. मुलांना खाऊला पैसे दिले.
“तुम्ही सारी जाणार. आम्हाला कोण ? पोरे दोन दिवस उपाशी आहेत. हे तुम्ही दिलेले पैसे चार दिवस होतील. तुमचा आधार होता. सुधाच्या आईचा, दादांचा आधार होता. कधी लागले तर मागावे, दादांनी नाही म्हटले नाही. तुम्ही येथून जाणार. आम्ही कोठे जाऊ ? ही पोरे घेऊन कोठे जाऊ ? हरीही गेला. त्याचा कांगद नाही. दादा, अण्णा, तुम्ही आम्हाला विसरु नका. आम्ही दिवसभऱ राबतो. परंतु उपाशी राहण्याची पाळी येते. शेत यंदा तरी राहिले. पुढच्या सालचे देवाला माहीत !” लक्ष्मी रडू लागली.
“नको रडू, लक्ष्मी. हरी तिकडे मिळवता होईल. तुझी मुले मोठी होतील. जातील हे दिवस. तुझी आठवण आम्हाला राहील.” मी म्हटले.
आणि आम्ही निघून गेलो. तिकडे लक्ष्मी धडपडत होती.
एके दिवशी तिच्या नव-याने गंमत केली. त्यांच्या घराजवळ एक दगड होता. त्या दगडाला मध्ये जरा शंकराच्या पिंडीसारखा उंचवटा होता. रामजीच्या मनात आले, ‘स्वयंभू देव सापडला अशी मारवी बात.’ आणि त्याने तसे केले. त्याने त्या दगडावर फुले आणून वाहिली आणि लोकांची गर्दी जमू लागली. कोणी दिडकी ठेवी, कोणी नारळ, परंतु लक्ष्मीला ते आवडले नाही.
“तुम्ही लोकांना फसवता. पोरे त्या दगडावर सारी घाण करीत त्याचा तुम्ही देव केलात! काय म्हणेल तो देव ! तुम्हाला काम करायला नको. बसल्याबसल्या का सुतारकाम नाही करता येणार ? हे हरामचे पैसे कशाला ? मी उद्या त्या दगडावर थाबडे घालते. म्हणे स्वयंभू देव आला !” असे लक्ष्मी रात्री नव-याला म्हणाली.
रामजी हसला. तो काही बोलला नाही आणि लक्ष्मी पहाटे उठली. तिने तेथील पूजाअर्चा दूर केली आणि दगडावर शेणाची रास आणून ओतली.
कोणी लोक बघायाल आले तो देव दिसेना. ‘कोठे आहे स्वयंभू पिंडी ?’ लोकांनी विचारले.
“ती आली तशी गेली !” लक्ष्मी म्हणाली. लोक माघारी गेले. रामजीचे दोन दिवसांचे वैभव गेले. परंतु तो बायकोला बोलला नाही. तेथे बसे, चिलीम ओढी, मिळे तुकडा तो खाई.
आणि काही वर्षे गेली. काँग्रेसच्या निवडणुकीसाठी मीही दौ-यावर होतो आणि या लक्ष्मीच्या गावी तीन वाजता सभा होती. मला फार वेळ नव्हता. एका गावची सभा आटपून या गावी आलो होतो. ही संपवून दुस-या गावी जायचे होते. सभेला सर्व प्रकारचे लोक होते, हरिजन होते. आश्चर्य म्हणजे काही शेतकरी आय़ाबायाही होत्या.
“उद्या स्वराज्यात तुम्हाला शेती मिळेल. प्रत्येकाला थोडी तरी स्वतःची जमीन होईल. एकेकाजवळ वाटेल तेवढी जमीन राहणार नाही. अधिक असेल त्याची काढून ज्याला नाही त्याला देऊ. ते खरे स्वराज्य. ती बघा लक्ष्मी तिकडे बसली आहे. तिची दशा मला आठवते. तिची मुले उपाशी असत. ती कष्ट करणारी. जरा मक्ता थकताच मालक शेत काढून घेऊ म्हणत. कोठे जाईल ती ? स्वराज्यात तिला मालकीचे शेत मिळेल. कष्ट करील, स्वाभिमानी जगेल.” असे मी पुष्कळ बोललो. सभा संपली.
मी मोटरजवळ गेलो. तो दूर लक्ष्मी उभी होती. मी तिच्याकडे गेलो. तिला प्रमाण केला.
“मग बेश आहे ना ? दादा, वसंता दोघे देवाकडे गेले.”
“अण्णा, तुम्ही बेश आहांत ना ?” ती म्हणाली. त्या श्रमणा-या लक्ष्मीने चौकशी केला! माझे डोळे भरुन आले. मी खिशातून काही काढून तिला देऊन म्हटले, “मुलांना खाऊला घे. हरी कोठे आहे ?”
“त्याचा कागद नाही. कुठेही खुशाल असो. अण्णा, तुमचे स्वराज्य लौकर आणा. मला मालकीचे शेत द्या. लहानसे पुरे. हक्काने तेथे राहू, तेथे राबू. कधी येईल हे स्वराज ?”
“येईल, लक्ष्मी, येईल. तुम्ही सुखी व्हाल.” आमची मोटर गेली. पुन्हा दुस-या गावी सभा आणि पुढे निवडणुका झाल्या. लढा न होता स्वातंत्र्यही आले. परंतु गरिबांचे आले का ? सरकार म्हणते, ज्यांच्याजवळ अधिक जमीन आहे ती काढून ज्यांना नाही त्यांना देऊ. परंतु त्यांनी विकत घ्यावी. परंतु ही लक्ष्मी कधी शिल्लक टाकील हजार, दोन हजार रुपये आणि कधी मिळवील मालकीची शेती ? लक्ष्मी डोळ्यांसमोर येते आणि मी बैचेन होतो. समाजवादाशिवाय सारे फोल आहे.
***