Pyar mein.. kadhi kadhi - 16 books and stories free download online pdf in Marathi

प्यार मे.. कधी कधी (भाग-१६)

“संध्याकाळी काय करतो आहेस आज?”, परत येताना प्रितीने विचारले
“आजचीच काय, ह्यापुढची प्रत्येक सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र फक्त आणि फक्त तुमचीच मॅडम.. तुम्ही सांगा, आम्ही ऐकु..”
“बास आता फ्लर्टींग, झालेय ना तुझीच..”, प्रिती हसत म्हणाली
“बरं बोल, संध्याकाळचं काय म्हणत होतीस..”

“हम्म, संध्याकाळी ७.३० ला घरी ये माझ्या.. तुझी आईशी ओळख करुन देते. बाबा नाहीयेत घरी, पण आई आहे..ओके?”

प्रितीला पण आई-वडील आहे हे मी विसरुनच गेलो होतो.
“पण आईने विचारलं मी कोण? कुठे भेटलो वगैरे तर?”
“माझी आई नाही मला असले प्रश्न विचारत, माझा मित्र आहे म्हणलं तरी खूप आहे..”, प्रिती म्हणाली

“ओके देन.. नक्की येईन..”, मी क्षणाचाही विलंब न करता म्हणालो.


संध्याकाळी ठरल्या वेळी मी प्रितीच्या घरी पोहोचलो.
तिच्या आईनेच दार उघडले.. प्रितीची आई म्हणजे अगदी टीपकल पंजाबी बाई होती. गुलाबी रंगाचा पंजाबी कुर्ता, कानाम्ध्ये इअर-रिंग्ज, लांबसडक केस, गोराप्पान चेहरा..

“हाय तरुण..” मी ओळख करुन द्यायच्या आधीच तीची आई म्हणाली..
“हाय ऑन्टी.. प्रिती आहे नं घरी..”, सोफ्यावर बसत मी म्हणालो..
“आहे आहे.. ती बेडरुममध्ये आहे तिच्या बॉयफ्रेंडबरोबर.. बस, मी बोलावते..”, तिची आई कॅज्युअली म्हणाली.
“कुणाबरोबर???”, मी अर्धवट सोफ्यातुन उठत म्हणालो

तेवढ्यात प्रिती तिच्या खोलीतुन बाहेर आली.

“हाय तरुण.. वेलकम होम….”
प्रितीची आई स्वयंपाकघरात निघुन गेली..

प्रिती पट्कन माझ्या जवळ आली आणि ह्ळुच माझ्या कानात म्हणाली, “हाऊ इज युअर मदर-इन-लॉ?”
“मदर-इन-लॉच नंतर बोलु, तु आधी सांग, तु बेडरुममध्ये कुणाबरोबर होतीस?”
“कुणाबरोबर म्हणजे..? आकाश, माझा बॉयफ़्रेंड..”, प्रिती खिदळत म्हणाली…

“काय चाल्लय काय? मी तुझा बॉयफ्रेंड आहे नं.. मग?”
प्रितीने आकाशला हाक मारली आणि तिच्या बेडरुममधुन एक ६ वर्षाचा छोटा मुलगा धावत धावत आला आणि प्रितीला बिलगला.

“मीट आकाश, आवर नेबर अ‍ॅन्ड माय बॉयफ्रेंड”, आकाशच्या गालावर ओठ टेकवत प्रिती म्हणाली
“व्वा, तुमच्या घरी बॉय-फ्रेंड्स ना हे पण सगळं मिळतं का?” माझ्या ओठांवर हात ठेवत मी म्हणालो..

प्रितीने डोळे मोठ्ठे करुन माझ्याकडे बघीतलं..

“मी पण बॉयफ्रेंडच ना तुझा.. मग? मला नाही मिळणार का?”, मी शक्य तितक्या हळु आवाजात म्हणालो..
“नो..”, प्रितीने ओठांचा चंबु करुन सांगीतलं..

मी माझं दोन्ही हात जोडून प्लिज.. म्हणत नुसते ओठ हलवले..

स्वयंपाकघरातुन भांड्यांचा आवाज येत होता.

प्रिती मान हलवुन ‘नाही नाही’ म्हणत होती. तिचे मोकळे सोडलेले केस मानेच्या हलण्याने डावीकडुन उजवीकडे, उजवीकडुन डावीकडे उडत होते.

मी वैतागुन सोफ्यावरुन उठलो आणि प्रितीकडे जायला लागलो, पण तेवढ्यात आमच्या होणार्‍या सासुबाई स्वयंपाकघरातुन गरमागरम आलु-पराठा आणि बटरचे बाऊल घेऊन बाहेर आल्या.

मला काय करावं तेच कळेना, मग मी पट्कन सेंटर टेबलवर ठेवलेले मॅगझीन्स उचलले आणि परत जागेवर येऊन बसलो.

“चं चं चं” प्रिती हळुच माझ्याकडे बघुन म्हणाली.. “पुअर बॉय..”

प्लेट्स टेबलावर मांडून सासुबाई आतमध्ये निघुन गेल्या.

आकाश हॉलमध्ये हातामध्ये विमान घेऊन खेळत होता.. “व्ह्रुम्मssssss”
प्रितीने त्याला जवळ बोलावुन घेतलं, त्याला गालावर एक किस्स केलं आणि मग आपले केस एका हाताने कानामागे सारत त्याच्या कानात काहीतरी सांगीतलं.

माझा जळफळाट होत होता.. तिचा खरा खुरा बॉय-फ्रेंड इथे तडफडत बसला होता आणि ह्या दुसर्‍या ज्युनियरला मात्र एकावर एक किस् मिळत होते..

व्ह्रुम्म्मssss.. आकाशचे प्लेन परत सुरु झालं.. हॉलमध्ये एक राऊंड मारुन तो माझ्या जवळ आला आणि बोटाने खुण करुन मला खाली वाकायची खुण केली. मला वाटलं त्याला काहीतरी कानात सांगायचं आहे म्हणुन मी खाली वाकलो तसं त्याने मला गालावर एक किस् दिला आणि परत तो खेळायला निघुन गेला.

“हॅप्पी?”, प्रितीने लांबुनच हळु आवाजात विचारलं.
“हे असं? दुसर्‍याकडुन मिळुन काय उपयोग..”, निराश चेहर्‍याने मी हात हवेत उडवले आणि टेबलावरची प्लेट घेऊन खायला सुरुवात केली.


सासुबाई आज खायला घालण्याच्या थांबण्याच्या मुड मध्येच नव्हत्या.. एकामागुन एक गरमागरम पराठे प्लेट मध्ये पडत होते..
“ऑन्टी प्लिज.. खरंच बास..” मी सोफ्यातुन उठत म्हणालो..
“व्हॉट इज धिस? यु जस्ट हॅड थ्री..! हॅव सम मोर..”, असं म्हणुन त्यांनी अजुन एक पराठा आणि त्यावर बटरचा मोठ्ठा गोळा प्लेटमध्ये वाढला.

“यार अजुन किती खायचं मी म्हणजे तुझी आई बास्स करेल?” मी हळुच प्रितीला विचारलं..
“अंम्म.. कमऑन.. ६ तरी खायला हवेस तु..”, हसत हसत प्रिती म्हणाली.
“तु रोज एव्हढं बटर खाऊन.. अशी स्लिम कशी काय रहातेस…?”, मी आश्चर्याने विचारले आणि त्यावर प्रितीने फक्त खांदे उडवुन “काय माहीत” अशी खूण केली..

“ऑन्टी नो मोर प्लिज.. आय एम डन..”, कसा बसा प्लेटमधला पराठा संपवल्यावर मी ओरडुनच सांगीतलं

त्यांना माझी दया आली असावी, तसं थोड्यावेळाने त्या बाहेर आल्या आणि मग प्रितीबरोबर सगळ्या प्लेट्स उचलुन स्वयंपाकघरात घेऊन गेल्या.

प्रितीची आई दिसायला तशी स्मार्ट होती.. विदाऊट दोज एक्स्ट्रॉ फॅट्स, अर्ली थर्टीज मध्ये एकदम रॅव्हीशींग वगैरे दिसल्या असणार.

चाळीशीत गेल्यावर माझी प्रिती पण अश्शीच दिसेल का? ऑर विल शी कॅरी हर ग्रेस थ्रु-आऊट.., मनात एक विचार येऊन गेला, एव्हढ्यात तिची आई लस्सीचा एक मोठ्ठा ग्लास घेऊन बाहेर आल्या..

मी एक दीर्घ श्वास घेतला.. “नॉट अगेन..”

मी त्यांना विचारणारच होतो की आता हे किती ग्लास मी प्यायचे एव्हढ्यात आतला फोन वाजला तसं ग्लास ठेवुन त्या आत निघुन गेल्या.

मी हेल्पलेसली त्या मोठ्या लस्सीच्या ग्लासकडे बघत होतो.

“यु वॉन्ट मी टू हेल्प?”, प्रितीने विचारलं.
“..अ‍ॅन्ड हाऊ आर यु गोईंग टु हेल्प मी विथ धिस?”, टेबलावरचा ग्लास उचलत मी म्हणालो

प्रितीने आजुबाजुला बघीतलं. आईचा फोनवर बोलण्याचा आवाज आतुन येत होता. प्रिती माझ्याजवळ आली, हातातुन ग्लास काढुन घेतला.. आणि अर्धा ग्लास लस्सी पिउन ग्लास पट्कन टेबलावर आपटुन ती पुन्हा जागेवर जाऊन बसली.

लस्सीचे ओघळ पुन्हा ग्लासच्या तळाशी साठत होते. प्रितीच्या लिप्स्टीक्सचे हलके मार्क्स ग्लासच्या कडांवर उमटले होते. मी ग्लासची ती बाजु माझ्या ओठांना लावली आणि लस्सी एका दमात संपवुन टाकली.

प्रिती त्यावेळी कपाळावर हात मारुन घेत.. मान हलवत होती.

फोन संपल्यावर आई पुन्हा बाहेर आल्या..

“ऑन्टी, लस्सी मस्त होती..”, प्रितीकडे अर्थपुर्ण कटाक्ष टाकत मी म्हणालो..
“आवडली नं..”
“हो.. मला गोड गोष्टीच जास्त आवडता…”
“अरे बेटा, बट ये तो सॉल्टीवाली बनायी थी.. स्विट कहा थी लस्सी..”, प्रश्नार्थक नजरेने तिच्या आईने विचारलं..

ह्यावेळीस मात्र प्रितीला तिचं हासु आवरलं नाही…

आता त्यांना कुठं सांगु त्यांच्या गोड मुलीच्या ओठाच्या स्पर्शाने ती सॉल्टी लस्सी सुध्दा साखरेच्या पाकासारखी गोड झाली होती म्हणुन..


पुढची १५-२० मिनीटं आम्ही जनरल गप्पा मारल्या. घरी कोण कोण असतं, कुठे काम करतो वगैरे.

घड्याळात ९ वाजत आले तसं मी जायला उठलो..”ओके ऑन्टी, निघतो मी, येइन परत कधी तरी…”
“शुअर बेटा, जरुर आना, नेक्स्ट टाइम सरसों का साग बनाऊंगी..”
प्रिती आईच्या मागुन मला मान खाली वर करुन काही तरी सांगत होती. बराच वेळ माझ्या लक्षात येत नव्हतं ती काय म्हणतेय.. नंतर कळलं ती काय म्हणतेय ते. मी लगेच खाली वाकुन सासुबाईंच्या पाया पडलो..

“जित्ते रेह पुत्तर…”, पाठीवर हात ठेवत त्या म्हणाल्या..

मी शुज घातले आणि बाहेर पडलो. जिन्यात सॉल्लीड अंधार होता…

“संभलके जाना बेटा.. लाईट्स आर ऑफ़..”, तिच्या आईचा आवाज कानावर आला.. परंतु तो पर्यंत मी अर्ध्या जिन्यात पोहोचलो होतो.

सर्वत्र अंधाराचे साम्राज्य होते, जिना नवीन असल्याने पायर्‍यांचाही अंदाज येत नव्हता. मी भिंत आणि कठड्याला धरत एक एक पायरी उतरतच होतो इतक्यात माझ्या हाताला उबदार हातांचा स्पर्श झाला. प्रितीने माझा भिंतीवरचा हात सोडवुन तिच्या हातात धरला होता. तिच्या हातांची बोटं माझ्या हातांमध्ये गुंफली होती. तिचा हात थरथरत होता.. तिचा गरम श्वासोत्छास माझ्या मानेला स्पर्श करत होता.

तिचं मन न ओळखण्याइतपत मी मुर्ख नक्कीच नव्हतो.

मी मागे वळलो आणि प्रितीला माझ्या घट्ट मिठीमध्ये ओढुन घेतलं.

तिचा चेहरा माझ्या चेहर्‍याच्या अगदी जवळ होता. रस्त्यावरुन जाणार्‍या कारच्या दिव्यांचा प्रकाश जिन्याच्या भिंतीला असलेल्या छोट्या झडपांमधुन प्रितीच्या चेहर्‍यावर पडला.

प्रितीचे डोळे बंद होते.. तिचे सिल्की स्मुथ केस चेहर्‍यावर अस्ताव्यस्त विखुरले होते. वेगाने होणार्‍या श्वासोत्व्छासाने तिच्या गळ्यातले पेंडंट वेगाने वरखाली होतं होते.

क्षणभर मला वाटलं.. आदीकाळी, जेंव्हा अ‍ॅडमने इव्हला कुठल्याश्या अंधारलेल्या गुहेत पहील्यांदा पाहीलं असेल, तेंव्हा त्याला ती इव्ह कदाचीत अश्शीच.. इतकीच सुंदर भासली असेल.. कदाचीत.. सफरचंद तर एक निमीत्त होतं..

मी हलक्याच हाताने चेहर्‍यावर पसरलेले तिचे केसे तिच्या कानामागे सरकवले. प्रितीच्या शरीराची हलकीशी हालचाल तिच्या शरीरावर उमललेल्या रोमांचाचीच ग्वाही होती.

खुपच इंटेन्स क्षण होता तो. प्रितीच्या घरापासुन आम्ही फक्त काही पायर्‍या दुर होतो. तिच्या घरातुन कोणीही बाहेर येऊ शकलं असतं, किंवा तिच्याघरी जाणार्‍या कुणीही आम्हाला पाहीलं असतं. पण आम्हा लव्ह-बर्ड्स ना कसलीच चिंता नव्हती, कश्याचेच भान नव्हते.

मी माझा चेहरा तिच्या चेहर्‍याच्या अजुन जवळ न्हेला. इतक्या जवळ की तिच्या डोळ्यांची होणारी हालचाल मला जाणवत होती, तिच्या ओठांवरच्या लिप्स्टीकचा सुगंध मला मोहवत होता. मला कसलीच घाई करायची नव्हती.

आय वॉन्टेड टु फिल धिस मोमेंट फॉरेव्हर, आय वॉन्टेड टु फिल द वे शी हॅड सरेंडर्ड हरसेल्फ…

किती क्षण उलटुन गेले कुणास ठाऊक, कदाचीत फक्त १ सेकंद कदाचीत कितीतरी मिनिट्स.. शेवटी तो वेट सहनशक्तीच्या पार गेला, कुणी कुणाला पहील्यांदा किस केलं माहीत नाही, पण पुढेचे कित्तेक क्षण आम्ही एकमेकांवर चुंबनांचा वर्षाव करत राहीलो…

[क्रमशः]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED