Pyar mein.. kadhi kadhi - 20 books and stories free download online pdf in Marathi

प्यार मे.. कधी कधी (भाग-२०)

पाहुण्या-रावळ्यांनी आज घर अगदी भरुन गेले होते. बारश्यासाठी मावशीकडे आलेले अनेक नातेवाईक ‘लगे-हाथ’ मला भेटायला आले होते. अनेक जणांना प्लॅस्टरवर सह्या करण्यात आणि ‘गेट-वेल-सुन’ मेसेजेस लिहीण्यातच जास्त उत्साह होता.

१२.४५ला प्रिती आली तेंव्हा घरी इतके सारे अनपेक्षीत लोकं बघुन ती काही क्षण दचकलीच.

“ओह.. हेच का ते.. अ‍ॅस्कीडेंटचं कारण?”, विमला मावशी डोळे मिचकावत म्हणाली..
“तरुण दादा, क्युट आहे तुझी मैत्रीण”, नुकतंच कॉलेज जॉईन केलेली माझी कझीन म्ह्णाली
“ओह तु.. मी ओळखते तुला..”, माझी दुसरी एक मावशी अचानकपणे म्हणाली..,”तु सिटी-लायब्ररीमध्ये काम करतेस ना?”
“हो..”, प्रिती तीची हॅन्डबॅग ठेवत म्हणाली..

“तुला सांगते विमल..मला एकदा एक पुस्तक काही केल्या मिळत नव्हतं.. हिने मिळवुन दिलंन.. ते कंम्य्पुटरवर नाव नोंदवुन ठेवलं आणि आल्यावर लग्गेच फोन केला मला.. मला जायला दोन दिवस उशीरच झाला, पण हिनं आठवणीने ठेवुन दिलं होतं माझ्यासाठी..”

ऑन्टी.. तुम्ही मला सांगीतलं असतंत तुम्ही तरुणच्या मावशी आहात तर मी पुस्तक तुम्हाला घरी आणुन दिलं असतं…
यावरचे भाव न बदलता केवळ डोळ्यांनी ही भाषा बोलता येते.. आणि आम्ही ह्यामध्ये अगदी एस्पर्ट झालो होतो.

मी प्रितीची सगळ्यांना ओळख करुन दिली..

“नुसतीच मैत्रीण का? का आणखी काही?” मावशी म्हणाली..
“का ते चेतन भगत सारखं हाल्फ गर्ल्फ्रेंड..?”, दुसरा एक कझीन म्हणाला..

सगळे नुसते आमची मज्जा घेत होते.. आणि फ्रॅन्कली मला आणि प्रितीला ते सर्व आवडतंच होते..

“काय गं विमला तु पण..”, मध्येच आई म्हणाली.. “अगं.. मैत्रीण असु शकत नाही का नुसती.. आणि ती तर पंजाबी आहे.. उगाच काय आपलं तुम्ही काहीही नाती जोडताय..”

“मग? काय झालं.. आपल्या अविने तर स्पॅनीश मुलीशी लग्न केलं.. ते आवडलं न तुम्हाला.. मग ही तर भारतीय आहे.. त्यात काय एव्हढं.. अगं जग कुठे चालले आहे..”

मावशीच्या त्या उत्तराने आई निरुत्तर झाली.


समहाऊ आईला अजुनही प्रिती थोडीफार का होईना, खट्कत होती.. तेथे बाबा मात्र प्रितीशी मस्त अ‍ॅडजस्ट झाले होते. बारश्याच्या दोन दिवस आधीच बाबांनी रविवारला जोडुन सुट्टी टाकली होती. आई अर्थात मावशीकडे असल्याने घरी आम्ही तिघंच असायचो. मला घरी असलो तरी ऑफीसचे काम काही चुकले नव्हते. त्यामुळे बाबा आणि प्रिती मात्र मस्त गप्पा ठोकत बसत. कधी चेस, तर कधी टी.व्ही.वरचा कुठलासा सिनेमा. एकदा तर आई घरी नसल्याचे निमीत्त साधुन आम्ही चक्क घरी चिकन मागवलं होतं. आईला कळलं असतं तर तिघांना फाडुन खाल्ल असतं. पण काहीही असो, बाबांनी जितक्या सहजतेने प्रितीशी जुळवुन घेतलं ते मला नक्कीच सुखावणारं होतं.


दुसर्‍या दिवशी रिक्षाचालकांनी कुठल्याश्या कारणावरुन अचानक संप पुकारला होता. आईला सिटीमध्ये जाणं मस्ट होतं. बरंच सामान आणायचं होतं, आणि तुडूंब भरुन वाहणार्‍या बसेसमधुन जाणं केवळ अशक्य होतं.

मी हळूच प्रितीला खुण केली.

“ऑन्टीजी.. तुम्ही म्हणत असाल तर आपण गाडीवरुन जाऊ यात का? माझ्याकडे टु-व्हिलर आहे..”, प्रिती
“अगं पण बरंच सामान घ्यायचं आहे, नाही जमायचं..”
“जमेल.. मला सवय आहे, मोठ्ठ्या बॅगा वगैरे गाडीवरुन आणायची..”, माझ्याकडे बघत प्रिती म्हणाली.

मी ऑफीस ट्रिपवरुन आलो होतो तेंव्हा प्रितीने मला एअरपोर्टवर रिसीव्ह केलं होतं आणि त्यानंतर माझी ट्रॅव्हल-बॅग सांभाळत आम्ही तिच्या गाडीवरुनच तर आलो होतो. त्याचा संदर्भ देत प्रिती म्हणत होती.

मला हसु आवरेना.. मी पट्कन लॅपटॉपमध्ये डोकं खुपसले.

नंतर दिवसभर आई आणि प्रिती बाहेरचं होत्या. संध्याकाळी दोघीही घरी आल्या तेंव्हा खुपच दमलेल्या होत्या, पण चेहर्‍यावरुन तो मनासारख्या शॉपींगचा आनंद ओसंडुन वाहात होता.

आई आनंदाने सगळं शॉपींग मला आणि बाबांना दाखवत होती..

“थॅंक्यु प्रिती..”, प्रिती घरी जायला निघाली तसं आई म्हणाली..”आज खरंच शॉपींगला मजा आली.. कधी कधी एकटीला खरंच कंटाळा येतो जायचा.. आणि तुझी ती स्कुटी.. फारच मदत झाली आज तिची..”, आई हसत हसत म्हणाली.

“नो प्रॉब्लेम ऑन्टीजी.. मला पण शॉपींग खुप आवडतं. पुढच्या वेळी तुम्हाला कंटाळा आला असेल तर मला नक्की फोन करा, आपण दोघी मिळुन जाऊ..”

“चहा घेऊन जातेस का थोडा..?”, आईने अचानक विचारलं..
“नाही.. जाते मी घरी.. परत कधी..”, बाय करुन प्रिती गेली

मी लॅपटॉप परत चालु करतच होतो इतक्यात प्रितीचा एस.एम.एस. आला.

“त्या बॅगेत एक ब्ल्यु-टेक्स्चर्ड शर्ट आहे, आईने तुझ्या एका कझीन साठी घेतला आहे, मला खुप आवडलाय तो, आणि तुला पण मस्त दिसेल.. कझीनला आपण दुसरा पण देऊ शकतो ना? ”

नो निड टु टेल, तो शर्ट मी लगेच ढापला होता..


सर्व काही सुरळीत चालले होते.. पण त्या दिवशी..

प्रिती दुपारी घरी आली.. एकदा घरात कुणी नाही ह्याची खात्री केल्यावर माझ्याजवळ आली आणि म्हणाली..
“तरुण.. हे बघ.. नोज रिंग..” नाकाकडे बोट दाखवत ती म्हणाली.. “कशी दिसतेय?”
मी काही बोलणार इतक्यात बाहेर ढगांचा गडगडाट झाला..

“सांग ना? कशी दिसतेय..? फार राऊडी नाही ना वाटंत?”
“राउडी नाही.. सेक्सी..”, मी हसत म्हणालो..

बाहेर चांगलंच अंधारुन आलं होतं.. ढगांचा गडगडाट वाढत गेला आणि काही वेळातच टपोरे थेंब पडायला लागले..

“हॅप्पी फर्स्ट रेन स्विटी..”, प्रिती उड्या मारत म्हणाली.. “फर्स्ट रेन ऑफ आवर ब्युटीफुल रिलेशन्शीप..”
“थॅंक्यु.. अ‍ॅन्ड सेम टू यु..”

“आय विश वुई वेअर इन दॅट रेन टुगेदर.. हॅंन्गिंग टु इच आदर..”, प्रिती म्हणाली.
“लेट्स गो देन..”, लॅपटॉप बाजुला ठेवत मी म्हणालो..

“वेडा आहेस का? तुझं प्लॅस्टर काय वॉटरप्रुफ़ नाहीये”
“मग काय झालं.. प्लॅस्टर काढुन दुसरं घालता येईल.. पहीला पाऊस परत परत येत नाही ना…? चल..”
“अरे पण..”
“अरे पण काय? आता मी समजा चेक-अपला वगैरे बाहेर गेलो असतो आणि पाऊस आला असता तर भिजलो असतोच ना? मग.. डोन्ट वरी चल.. काही नाही होतं..”

मी प्रितीचा हात धरुन लंगडत लंगडत टेरेसवर गेलो. पावसाचे टपोरे थेंब वेग पकडत होते. प्रत्येक थेंब अंगावर रोमांच फुलवत होता.

प्रितीने माझा हात सरळ केला आणि पावसांच्या थेंबांनी हातावर “आय लव्ह यु” लिहीलं..
मला माहीत नाही मुलींना असल्या गोष्टी करण्यात काय मज्जा वाटते, पण खरंच.. त्याने खुप्प स्पेशल वाटतं हे मात्र नक्की.

काही वेळातच पाऊस जोरात कोसळायला लागला. मी आणि प्रिती त्या पावसात चिंब भिजुन गेलो. बर्फासारखं थंडगार पावसाचं पाणी आणि प्रितीच्या शरीराचा उबदार स्पर्श.. फारच डेडली कॉम्बीनेशन होतं ते..पंधरा मिनीटं पाऊस कोसळला आणि मगच थांबला.

“मी टी-शर्ट बदलुन येतो..”, हॉलमध्ये येत मी प्रितीला म्हणालो..
“इथंच बदल कि.. का लाजतोस का मला?”, प्रिती हसत म्हणाली..
“ओके! यु विश्ड फ़ॉर ईट.. डोन्ट ब्लेम मी..”, असं म्हणुन मी टी-शर्ट काढला आणि प्रितीच्या अंगावर फेकला.

प्रिती काही बोलणार इतक्यात दार कट्कन उघडल्याचा आवाज आला आणि आई आतमध्ये आली.

मी उघडा, प्रिती चिंब भिजलेली.. माझा टी-शर्ट तिच्या हातामध्ये.. फारच ऑकवर्ड सिन होता तो.

प्रितीने काही नं बोलता टी-शर्ट सोफ्यावर ठेवला, आपली बॅग उचलली आणि काही न बोलता घरी निघुन गेली.


दुपारी एकटाच जाऊन पहील्यांदा प्लॅस्टर बदलुन आलो. संध्याकाळी आईने डाईनिंग टेबलवर विषयाला हात घातला.

“तरुण.. प्रिती तुझी फक्त मैत्रिण आहे? की आणखी काही…”
“आई.. बाबा.. प्रिती आणि मी एकमेकांवर प्रेम करतो..”
“प्रेम? त्या कॉलेजमध्ये जाणार्‍या मुलीला काय कळतंय प्रेम? तिला साधी मॅच्युरीटी नाही, तुझ्या पायाला प्लॅस्टर असताना, दुपारी..”
“आई प्लिज.. दुपारी तिची चुक नव्हती.. उलट ती मला थांबवत होती पावसात जाऊ नको म्हणुन.. मी तिला घेऊन गेलो पावसात. आणि तो अपघात पण फक्त आणि फक्त माझ्यामुळेच झाला होता हे ही मी दहा वेळा सांगीतलंय. आणि मॅच्युरीटीचं म्हणशील तर ती तिच्या वयापेक्षा अधीक पटीने मॅच्युअर आहे..”

“हे बघ तरुण.. उगाच वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. तुला माहीती आहे, आपण इंटर-कास्ट लग्नाच्या विरोधात आहोत. तुझी बायको आपल्याच..”
“बरोबर आहे तुझं..”, बाबा आईला थांबवत म्हणाले.. “परंतु आय अ‍ॅग्री विथ तरुण. प्रिती इज सेन्सीबल गर्ल, तिला मॅच्युरीटी नक्कीच आहे. तुझ्या अनुपस्थीतीत तिने जमेल तसं किचेन नक्कीच सांभाळलं होतं. एखाद्या नविन घरात, नविन लोकांमध्ये किती पट्कन सेट झाली होती ती. आणि इंटर-कास्टचं म्हणशील तर.. जर आपल्या चाली-रिती, संस्कृती ह्यांचा ती आदर करणार असेल, त्या पाळणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे?”

आई शॉक लागल्यासारखं बाबांकडे बघत होती आणि मी? मला तर काय बोलावं काहीच सुचत नव्हतं.

“हे बघ, आपल्याला वाटायचं आपली सुन आपल्या जाती-धर्माची नसेल तर कदाचीत आपल्याला घरात अवघडल्यासारखं होईल, जे देव-धर्म आपण पाळत आलो, जे सण-समारंभ आपण गोंजारले ते कदाचीत बंद होतील आणि म्हणुनच तर आपण विरोध करत होतो ना? पण मला वाटत नाही, प्रिती तसं काही करेल. खरंच खुप गोड मुलगी आहे. इतक्या कमी दिवसांत मला तर ती आपल्या घरातलीच वाटायला लागली आहे. जग बदलत आहे आणि आता आपण सुध्दा बदलायला हवं.”

“हे बघा..”, आई वैतागुन म्हणाली, “माझं घर हेच माझं जग आहे आणि, मला तरी माझं जग बदलताना दिसत नाहीए

“कमॉन आई, काय वाईट आहे प्रितीमध्ये, कधी ती तुझ्याशी वाईट वागली आहे, इतक्या दिवसांत कधी तरी तिने तुला दुखावलं आहे? माझ्या अपघाताबद्दल तु तिला जबाबदार धरलस, पण एका शब्दाने ती काही बोलली नाही. कुणाशीही लग्न करुन आपलं घरातंल वातावरण बिघडुन टाकावं असं मला तरी वाटेल का?

हे बघ.. तु एकदा फक्त प्रितीच्या आई-वडीलांना भेट. खुप चांगली लोकं आहेत ती. आणि मग आपण ठरवु ओके?

“मला पटतंय हे..”, बाबा
“ठिके.. मग मला विचारायची फॉर्मालिटी कश्याला? तु आणि तुझ्या बाबांनी ठरवुनच टाकलं असेल तर..”, असं म्हणुन आई टेबलावरुन उठली.

रात्री लग्गेच प्रितीला मेसेज करुन टाकला. प्रिती सॉल्लीड खुश झाली होती. आम्ही लग्गेच येत्या रविवारचा प्लॅन करुन टाकला. एक तर रविवार सुट्टीचा दिवस असल्याने प्लॅन कॅन्सल व्हायची शक्यता कमी होती आणि दुसरं म्हणजे, त्या दिवशी भारत-ऑस्ट्रेलिया मॅच होती. निदान बाबा लोकांना गप्पा मारायला एक विषय मिळत होता.


दुसर्‍या दिवशी मला पुन्हा डॉक्टरांकडे जावं लागलं. प्लॅस्टर निट बसलं नव्हतं, ते काढुन पुन्हा नविन घालायचं होतं. ऑटो करुन मी बाहेर पडलो.
लिटील आय नो, की त्याच वेळी नेहा आईला भेटायला आमच्या बिल्डींगचे जिने चढुन माझ्या घराकडे जात होती…

[क्रमशः]

पुढे काय होणार? नेहा पुन्हा कश्याला आली असेल? जमत आलेल्या गोष्टी पुन्हा बिघडणार का? प्रिती-तरुणचं लग्न होणार का? आई लग्नाला तयार होणार का? अनेक प्रश्नांची उत्तर मिळतील पुढच्या आणि शेवटच्या भागात..

वाचत रहा.. प्यार मे.. कधी कधी..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED