प्रीतीची 'प्रेम'कथा - 8 Nitin More द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रीतीची 'प्रेम'कथा - 8

काकुची मशाल

अर्थात

वन्ही तो चेतलाचि!

हे सगळे झाले म्हणजे पुढे सारे पटपट घडले असे वाटत असेल तर तसे नाही ते. तसा मला त्यादिवशी प्रेमचा नंबर, म्हणजे फोन नंबर मिळाला. माझा नंबर मी त्याला दिला. आमचे भेटून त्याच्या पुस्तकातील प्रकरणाबद्दल चर्चा करण्याचे ठरले. तात्यांच्या आॅफिसातून निघाले मी.. मला जणू गगनच ठेंगणे झाले. आता फक्त तीन चारदा भेटलो की काम तमाम!

घरी आली मी ती तरंगतच. हवेतच उडत आली मी जणू.. आज मैं उपर .. आसमां नीचे गात! तात्या पण माझ्यावर खूश होते.

.. पण आम्हा दोघांच्या खूश होण्याची कारणे मात्र वेगळी होती..

दोनचार दिवस गेले. मी त्याच्या फोनची वाट पाहायला लागली. हाती फोन घेऊनच बसायची मी. आता येईल तेव्हा येईल फोन.. पण छे! फोनचा पत्ता नाही! मी कंटाळली. अजून दोन तीन दिवसांत मात्र माझा संयम संपला. मी त्याला फोन लावलाच! त्याच्या फोनची रिंग वाज वाज वाजली नि वाजतच राहिली. कितीही वेळा फोन केला तरीही. आता पुढे काय? काय करणार मी? आजवर मार्ग निघाला तसा आताही निघेल! खरेतर तो एका महिन्यानी पहिले प्रकरण लिहून फोन करेन म्हणालेला. त्यानंतर झालेत फक्त चार दिवस. पण नंतर ही फोन केलाच नाही त्याने तर?

स्वामीजींची आठवण काढत बसली मी. आजवर इथपर्यंत पोचली आता पुढेही दाखवा मार्ग म्हणून! त्याचा फक्त नंबर घेतलेला मी. पत्ता नाही. त्याच्यापर्यंत पोहोचायचा आता कुठला शोधू मार्ग? उदास नि निराश व्हायला हे कारण पुरेसे होते. पण मला ती शिकवण आठवली.. जो चोच देतो तोच चाराही देईल! तर ज्याने त्याला भेटवले.. तोच पुढचाही मार्ग दाखवेल. नियतीचा संकेत हाच असावा की नाही? त्यानुसारच सारे होते तसे हे देखील होईलच.

कितीही मनाची समजूत घातली ना तरीही हे असेच होईल याची खात्री नसते ते होईस्तोवर. आता आठवून गंमत वाटत असेल भलेही पण प्रत्यक्षात एकेक क्षण जीवघेणा.. तात्यांना विचारायचे ठरवले मी. पण तात्या काय म्हणणार..? आधीच तात्यांना तो जास्तच भावखाऊ वाटत होता. त्यावर आता हे कळले तर? त्यांचे इंप्रेशन खराब झाले तर पुढे मागे ते नाही म्हणायचे. त्यापेक्षा त्यांना सध्या न विचारणेच योग्य. झाकली मूठ सव्वा लाखाची राहिल. अगदीच जर नाही जमले काही तर इमर्जन्सी प्लॅन म्हणून रिझर्व्ह ठेवू त्यांना आणि काय!

काय दिवस होते सांगू. हुरहुर मनात. भेटण्याची ओढ दुसरीकडे. परत परत डोळ्यासमोर त्यादिवशी समोर बसलेला प्रेम. आणि अनिमीष का काय म्हणतात मराठी गोष्टींत तशा नजरेने पाहात बसलेली मी! आणि त्यानंतर? पुढे कशाचा कशाला पत्ता नाही! कसे पोहोचावे त्याच्यापर्यंत? असे किती दिवस गेले सांगू? कंटाळली मी. कंटाळली म्हणण्यापेक्षा अधांतरी भविष्याने चिंतीत झाली. स्वामीजी झाले तरी प्रत्येक सिच्युएशनसाठी कुठून आणणार नवनवीन उपदेश? शेवटी तूच आहेस तुझ्या चिंतेला जबाबदार हे समजून मी स्वामींवर भार टाकणे सोडून दिले. आणि जे जे होईल ते ते पहावेच्या तयारीला लागली.

एवढी मानसिक तयारी मात्र एकाच दिवसात वाया गेली. माझी ती मैत्रीण .. तीच तात्यांना फोन करणार होती ती.. काकु.. आता काफा! कालिंदी कुरतडकर! लग्नानंतर कालिंदी फातर्फेकर! तिला अजूनही आम्ही काकुच म्हणतो.. तर ही काकु माझ्यासमोर येऊन उभी ठाकली!

काकु माझ्यासमोर उभी ठाकली तेव्हा मी डोक्यावर हात लावून बसलेली. काकुचा फोन तात्यांना लागला नाही त्यादिवशी हे खरे, पण त्यातून मी सहीसलामत निभावून गेलेली. काकु त्यानंतर शंभरदा फोनवर 'साॅरी' बोललेली. तेव्हा फोन बंद असण्यात काकुचा दोष तो काय? पण तरीही तिला वाईट वाटायचे ते

वाटलेच. अर्थात तिच्या आयुष्यातला 'योग्य जोड्या जुळवा' हा प्रश्न ज्या शिताफीने नि चातुर्याने सोडवलेला मी, ते पाहून तिला खात्री होती, यातून पण मी काहीतरी आयडिया काढेनच!

काकु आली आणि पहिल्यांदा तिने माझा डोक्यावरचा हात हटवला. नि गदागदा हलवत म्हणाली,

"प्री, तू ही अशी? इश्कने निकम्मा किया.. पर हाय गालिब.. नहीं तो तुमभी थी कुछ काम की!"

काकु असलीच बोलते भाषा. तरी बरे असली भाषा असूनही ती आणि मिलिंदा, म्हणजे आता तिचा नवरा, दोघांची जोडी जमवायला मी आणि अजून एक दोघी 'अकाव्य' जणीच मदतीस धावून आलेलो. अकाव्य म्हणजे असली काव्यमय भाषा न बोलणाऱ्या! नाहीतर काही खरे नव्हते तिचे! ती कथा सांगत नाही आता नाहीतर मूळ माझी गोष्ट मागे पडायची!

"अगं, आपले ते इंग्रजीचे भाटिया सर म्हणायचे ते आठवते.. देअर इज नो लाइट ॲट द दंड आॅफ द टनेल! अंध:कारमय जीवन माझे! माझ्या जीवनाच्या सुरनळीच्या टोकाला अंधारच अंधार!"

मी टनेलचे सुरनळी म्हणून भाषांतर केलेले पाहून एरव्ही काकु खो खो हसली असती. पण प्रसंगाचे गांभीर्य पाहून ती गप्प राहिली असावी.

"अगं, हिंमत जिसने हारी समझो वो खत्म हुवा .. कोणी म्हटलेय ते.. माहिती नाही बुवा! असे गाळशील हातपाय तर हाती तुझ्या लागेल काय? तेव्हा झाडून टाक तो निरूत्साह! आणि लाग कामाला. आठव ते दिवस जेव्हा तू न मी मिळूनी बनवलेल्या योजना काॅलेजच्या कट्टयावर बसून. तू अन तुझा गनिमी कावा.. पकडले मिलिंदा तेव्हा वाजवीत होता पावा. प्रीतीराणीचे काय ते योजना बनवणे, प्रीतीराणीचा आठवावा प्रताप.. आठवावे रूप! कैसे ते धारिष्ट प्रीतीचे असे! आणि असली ती प्रीती उभी गाळून हात न पाय! अरे हे चाललेय काय?"

"काकु.. तुला ठाऊक नसेल माझ्या मनची व्यथा अन वेदना.. जी मजला सहन होईना. अगं आठवडा उलटून गेला गं. तो भेटला.. आता फोनही उचलत नाही तो माझा. कसे होईल गं. मला त काहीच सुचत नाही."

"सुचत नाही? तुझ्या सुपीक डोक्यातल्या सर्व कल्पना वाळून का गेल्यात गं? की उडून गेल्या कापरासारख्या? अशा आपत्तीप्रसंगी उपयोगी न येई ते शहाणपण काय बरे कामाचे? अशी बसू नकोस उदास अन् निराश.. लेंगे हम तुम्हारे प्रेम को तलाश!

आता जरा हंस दे तू.. लब्ज खुशी के बोल दे तू.."

"हसली असती गं.. एक त्याचा पत्ता मिळाला तर पुढे काहीही करता येईल! मग मी हसेन.. तू म्हणशील ते करेन! त्याचे नाव शोधण्यापासून सुरूवात झालीय.. आता ते माहितीय तर गाव शोधावे लागेल त्याचे! गाव शोधल्यावर अजून काय शोधावे लागेल कुणास ठाऊक!"

"कुळ! कुळ शोध त्याचे! तो काय ऋषी नाही, कुळ शोधू शकतो आपण! पण मी काय म्हणते, बघ हां पटतंय तर.. एवढी शोधाशोध करण्यापेक्षा.. म्हणजे तसा चांगलाच असणार तो. पण आता नाही समजत कोण कुठला तो दादू तर चल आता दुसरा कुणी शोधू.."

"वा गं! विसरलीस वाटते स्वतःचे ते दिवस? मिलिंदाऐवजी चालला असता गोविंदा.. नगास नग? हा नसेल तर रिप्लेसमेंट? कसे बोलवते तुला हे?"

"अगं गंमत.. मला माहितीय एक बार दी गई वस्तू किसीभी हालत में परत नहीं घेते तुम लोग.. तर दिलकी बात तर काय! काहीतरी मार्ग काढू आपण. फक्त त्याचा हवाय पत्ता! ॲड्रेस! शोधून आणू घालून कुठलाही ड्रेस! फिक्र नाॅट.. म्हणजे वरी नाॅट!"

काकुच्या असल्या बोलण्याने तो प्रेमाग्नी परत न चेतता तर नवल! मोठ्या कष्टाने मी त्या निखाऱ्यांना राखेने झाकून टाकलेले आणि ही फुंकर मारून तो वन्ही तो चेतवावा करतेय? काकु ने आपल्या मशालीने परत दिलमें आग लगाई आणि त्या खाईत लोटली गेली मी पुन्हा! कुणी म्हटले ना म्हणे.. ये इश्क नहीं आसान.. इतना तो समझ लीजे.. एक आग का दरिया है.. और डूबते जाना है.. समजलीच मी आता!

माझा तसा गोरा नि काळा अशा रंगांवर विश्वास नाही. गोरेपण यावे म्हणून काही चोपडावे असले काही पटत नाही मला. तर मी तशी गोऱ्या जणींत मोडली जाते. तरीही स्वतःला बोलली मी, 'अब तेरा क्या होगा कालिये?' आणि ही गोरी कालिया अंगअंग शहारली. पुन्हा पेटलेला तो प्रेमाग्नी अन् त्या प्रेमात प्रेमचा अभाव.. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर उमटलेले भाव. तात्या म्हणाले ही एकदा, "मने, लक्ष नाही दिसत तुझे कुठे आजकाल?" अन् आई त्यांची री ओढत म्हणाली, "लक्ष नाही .. लक्षण ठीक नाही हिचे!"

मला वाटले कुठे यांना सगळे कळले की काय? प्रेम आणि चोरटेपणा एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात. कल्पना करा हां.. सारे काही उघड बोलण्याची व्यवस्था आहे.. तो.. त्यादिवशी आलाय घरी. मला तो आवडला! मी पुरी वाढता वाढता

त्याला म्हणतेय.. "अय्या! ऐका ना गडे.. माझे तुझ्यावर प्रथम दर्शनीच बसले प्रेम! तुझे कळेल का नाव माझ्या प्रेमा? अगदी ह्या श्रीखंडासारखा आहेस तू. तुझे नाव सांगितलंस तर बरे होईल नाहीतर मी फुगेन या पुरीसारखी."

आई नि तात्या समोर आहेत.. माझ्या स्पष्टवक्तेपणावर खूश आहेत!

आई म्हणते, "आमची मनी अशीच आहे.. मनात काही ठेवत नाही. आवडला तुला हा ना? घेऊन टाक!"

मग प्रेम म्हणाला असता, "वा! आवडली मला ही ह्या कोशिंबीरीसारखी! आम्ही लग्न करू. आम्हाला आशीर्वाद द्या!"

मग तसाच उठेल तो. खरकट्या हातानी.. मी देखील एका हातात पुरीचे ताट घेऊन.. दोघे वाकून नमस्कार करू! किती सोपे सारे. उगाच चोरटेपणामुळे किती मुश्किल करून ठेवलेय हे काम आपणच आपल्यासाठी! पण नाही. जालीम दुनियेची हीच रीत. 'जालीम' शब्द माझा नाही .. काकुचा! कुठल्या तरी काव्यमय बोलण्यात आलेला. थोडक्यात काय तर असे काही होणे नाही अन् विरहाग्नीत जळणे टळणे नाही!