१६
प्रेम वि. पूर्णा
अर्थात
उज्ज्वल परवासाठी!
आजचा दिवस महत्त्वाचा! संध्याकाळी कळेल, तो तोच आहे की तो तो नव्हेच ते! असेल ते असो.. सकारात्मक की नकारात्मक विचार करण्याची प्रक्रिया सध्या बंद केलेली बरी! जे जे होईल ते ते पहावे आणि काय!
पण सकाळी काकुचा फोन आला. म्हणाली, "कुठून तरी भिंदिला नंबर मिळाला माझा.."
"मग?"
"मग काय.. बोलली मी त्या चॅनेलला दिलेय रेकॉर्डिंग.."
"संपला विषय मग!"
"नाही. विषय संपतोय कुठे इथे.. इथेच तर सुरू होतोय.."
"म्हणजे?"
"तो विचारत होता.. जुळ्या बहिणीचे खरे नाव काय?"
"मग तू काय सांगितलेस?"
"काहीच नाही.. तू मालिनी ठेवलेलेस.. खोट्या बहिणीचे.. ते खोटे की खरे.. की अजून काही खरे नाव त्या खोट्या बहिणीचे?"
"खोट्या बहिणीचे खरे नाव मंदाकिनी! लक्षात ठेव खरे नाव मंदाकिनी .. नि खोटे नाव मालिनी नि तिचा नवरा.. धर्मेंद्र! आणि तू आणि ती यांचा आहे छत्तीसचा आकडा!"
"आता सांगून काय उपयोग? पण ऐक.. अगं भिंदि त्या चॅनेलच्या बाॅसेसना ओळखतो.. आता त्याने तिकडे जाऊन गोंधळ घातला तर? मिलिंदा उगाच गोत्यात न येवो.."
"काही नाही .. तू बोललीस मिलिंदाला?"
"नाही अजून. आताच तर भिंदिचा फोन आला.."
"मला पण वाईट वाटतेय.. उगाच ह्या प्रकरणाचा मिलिंदाला त्रास नको व्हायला .."
"तू चिंता नको करूस.. मी बोलते मिलिंदाशी. अजून पुढे प्रगती काय?"
"काय प्रगती? मी संध्याकाळी कदाचित प्रेमला बघेन.. नि तो मला बघेल.."
"म्हणजे? बघून घ्याल एकमेकांना?"
"तसं नाही गं.. "
मग मी तिला ते सारे प्रकरण उलगडून सांगितले.
'आॅल द बेस्ट' म्हणत तिने फोन ठेवला.
आता पुढे या भिंदीचे काय होणार?
अस्वस्थ होऊन मी मिलिंदाला फोन लावला. तो बिझी होता. थोडक्यात त्याला सांगितले तर तो म्हणाला, "डोन्ट वरी. माझ्यावर सोडून दे!"
उगाच डोक्यात किडा सोडून दिलाय भिंदिनी. कुठल्याही गोष्टीत असा खलनायक असायलाच हवा का? पण पुढची गोष्ट आताच सांगते.. दोन तीन दिवसांनी मिलिंदानी फोन केला मला. म्हणाला, "ते भिंगारदिवे प्रकरण मिटले.."
"म्हणजे?"
"म्हणजे दोन गोष्टी.. एक तर ती मुलाखत आम्ही खरंच दाखवतो आहोत.. तुझा प्रेम आता टीव्हीवर येईल. तुमचे ते मोबाईल रेकॉर्डिंग चांगले झालेय.. मन लावून केलस वाटते प्रेमचे होते म्हणून!"
इथे मी आपोआप लाजली..
"आणि दुसरे, आमचा बाॅस मोठा दिलदार आहे. पारशी बावा. फिरोज मंचरजी. तो ओळखतो भिंगारदिवेला. त्याला खरी गोष्ट सांगितली.."
"खरी म्हणजे ..?"
"म्हणजे हेच.. तू आणि प्रेम.. दोघांचे प्रेम.. आणि प्रेमासाठी वाट्टेल ते! त्यावर बावा खूश झाला. चोक्कस डिक्रा म्हणून हसला. एका अटीवर सगळे माफ करीन म्हणाला.."
"अट?"
"हुं.. अगं बावाला ते पारसी डेरीचे पेढे आवडतात.. म्हणाला एकदा सारे ठीक झाले की एक किलो त्याला द्यायचे.. बावा पावला त्याला नैवेद्य म्हणून!"
"एवढेच?"
"मी म्हणालेलो तुला, डोन्ट वरी.. मला माहितीय माझा बाॅस!"
"हुं.. तुझ्या नि कालिंदीच्या वेळचा अनुभव दिसतोय!"
"खरंय.. तुझी कृपा आणि काय.."
थोडक्यात हे भिंदि प्रकरण खरेच संपले इथे आणि माझा प्रेम एकदा टीव्हीवरही आला! स्वतःच्याच पुस्तकावर बोलत होता. फक्त त्याचे ते लग्नाबद्दलचे ज्वालाग्राही विचार ज्वालाग्राही चॅनेलने कापून टाकलेले! नशीब माझे! हे सारे नंतर झाले. आई तात्यांनी ते ऐकले असते तर?
ही सारी पुढची गोष्ट! खरी गोष्ट आज व्हायची ती होणार. आर या पार..
संध्याकाळी तो क्षण आला. मागच्या वेळेच्या अनुभवातून सारे काही आधीच सज्ज करून ठेवलेले. अगदी पोह्यांवर पिळायला पातळ सालांचे लिंबूही शोधून आणलेले आईने. थोडक्यात, तयारी जय्यत होती! आणि मी मरून साडीच नेसली होती परत!
थोड्याच वेळात भिंदि आला. त्याला आमच्या घरचे पोहे फारच आवडतात की काय? मग जगदाळे आले. पाठोपाठ मुलगा. तात्यांनी तोंड भरून स्वागत केले. दोघे आत आले! हे सारे मी आतल्या खिडकीतून पाहात होती. मुलगा मला नीट दिसत नव्हता पण अंगकाठी नि उंची प्रेमइतकीच. तो काही बोलला.. त्याचा आवाजही प्रेमसारखाच. उत्सुकतेने माझ्या छातीत धडधडू लागले. कहीं ये वोच तो नहीं? बाहेर बोलणे चालू होते. माझी ती स्वतःत हरवून जायची सवय महागात पडणार मला. कितीतरी डिटेल्स सुटत होते. कळले ते एकच.. त्या मुलाला एक जुळा भाऊ आहे! बाकी त्याचे नावही मी ऐकू नये?
पोहे घेऊन मी बाहेर आली, तर समोर प्रेम! त्याला पाहून तीन ताड उडायची बाकी होती. फक्त केसबिस कापून आलेला तो. मुलगी बघायला येणार तर अस्ताव्यस्त केस कसे चालतील? तो माझ्याकडे पाहून मंद हसला. कालच तर त्याच्याशी बोललेली मी. इतक्यात जगदाळे म्हणाले, "बरे का पूर्णानंदा, ह्या घोरपडेसाहेबांना मदत करतात त्यांच्या प्रकाशनात. आपल्या प्रेमानंदाचे दुसरे पुस्तक छापणार आहेत हे!"
माझा चेहरा काळवंडला असावा. भिंदि म्हणाला, "मुली बरं नाही वाटत का तुला? त्या दिवशी जुळ्या बहिणी पाहिल्यास .. अाज खरेखुरे जुळे भाऊ बघ!"
म्हणजे.. हा तो नव्हेच! वर माझा प्रेम याचाच जुळा भाऊ निघावा? आणि याने पसंत केले तर.. याच्याविरूद्धच लढाई ती ही याचीच वहिनी बनून! काय आहे स्वामींच्या मनात कुणास ठाऊक. आता एकच केले पाहिजे .. ध्यान देऊन काय काय बोलणे सुरू आहे हे ऐकायला हवे. पुढचा रस्ता यातच दिसेल मला. लक्ष देऊन मी ऐकू लागले नि काही मुद्दयांची नोंद केली :
१. पूर्णानंद आणि प्रेमानंद दोघे जुळे भाऊ आहेत. पण दोघांच्या स्वभावात जमीन अस्मानाचा फरक आहे. दोघांच्या केसासारखा असावा! स्वभावातला फरक हा माझा निष्कर्ष!
२. पूर्णानंद जळगावातल्या अॅग्रो फर्ममध्ये नोकरीला आहे. प्रेमानंद मुंबईतच आहे नोकरीस पण एका ठिकाणी टिकण्याची गॅरंटी नाही त्याची.
३. प्रेमानंदास लग्नच करायचे नाही. इतक्यात असे नाही .. तर कधीच नाही. हे मी देखील ऐकले होते आधी. त्याच्याच तोंडून.
४. पूर्णानंद आणि प्रेम स्वभावाने वेगळे असले तरी एकमेकांचे लाडके आहेत. प्रेमच्या स्वभावात हे बसत नसले तरी!
अजूनही काही धागेदोरे हाती आले! असे म्हटले की काहीतरी पेपरातली बातमी वाचल्यासारखे वाटते. पण धागेदोरेच म्हणावेत! सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रेमला कुठल्याही गोष्टीस तयार करणे.. मुश्किलही नहीं.. नामुमकिन! म्हणजे माझे काम किती कठीण याचा अंदाज आला मला!
थोड्याच वेळात पोहे खाऊन नि चहा पिऊन निघून गेले सारे. आठवड्यात कळवतो म्हणून! दोन दिवस भिंदिकडे राहतील म्हणे नि मग परत जळगावी! हिंदीत 'दिमाग का दही की छास' होणे म्हणतात तसे झाले माझे. काय करणार आहे मी आता? याला नाही म्हणू तर कसे नि प्रेमला पटवू तर तेही कसे?
रात्री अगदी इमर्जन्सी म्हणून मी काकुकडे गेली. मिलिंदा तेव्हाच आलेला. सगळी गोष्ट ऐकून काकु म्हणाली, "करावे तसे पुढच्या जन्मी भरावे म्हणतात.. पण तुला याच जन्मी.. अगदी दोनचार दिवसात भरावे लागलेले दिसतेय.. मला आणतेय जुळी बहीण! घे एक खराखुरा जुळा!"
मी रडवेली झालेली पाहून मिलिंदा म्हणाला, "काही मार्ग काढू आपण. थोडा विचार करू देत."
"अाणि जमल्यास तूही कर!" काकु म्हणाली.
हे चांगलेय.. हिच्या लग्नातले सारे डावपेच माझेच होते. आता बोलतेय कशी? पण माझे ग्रहमान खराब दिसतेय. म्हणून गप्प बसली.
रात्री परत मग प्रेप्रीप्रीबंस ची बैठक झाली. मिलिंदा होताच अध्यक्षस्थानी. त्याने सुरूवात केली, "असा पेचप्रसंग कधी न आला, न येईल आणि तो सोडवण्यातच आपले कौशल्य आहे. आणि हे आव्हान आपल्याला पेललेच पाहिजे. कसे त्याचा विचार करण्यास ही मीटिंग बोलवण्यात आली आहे. आपल्या सर्वांना ग्राऊंड रियालिटी ठाऊक आहे. त्यामुळे त्याची पुनरूक्ती न करता पुढे जाऊ.. कालिंदीताई.. नाही बाई.. तुमचे काय मत आहे?"
"माझे मत असे आहे की कठीण काम आहे हे.. काही सुचत नाही."
"सुचत नाही तेव्हा समिती काय करते?"
"आपल्या रिवाजानुसार कडक काॅफी पिते! आणि ती काॅफी जिच्यासाठी मीटिंग बोलावली तिने बनवायची असते!"
"हुं.. तुझ्या वेळी किती काॅफी बनवलीस काकु? तुला सांगू मिलिंदा.."
"चूप.. बोलू नकोस. सीक्रेट आहे सारे आणि चुपचाप काँफी बनव! नाहीतर आता तात्यांना करते फोन.."
काॅफीत काहीतरी जादू असावी. एक कप काॅफी आणि आयडिया ढेर साऱ्या!
मिलिंदा म्हणाला, "आता आपल्याला दोन गोष्टी हव्यात .. एक म्हणजे तो पूर्णानंद पूर्णपणे नकार देईल आणि दुसरा .. प्रेमला लायनीत आणावे कसे?"
"परफेक्ट!" काकु म्हणाली.
"आता पहिला भाग. पूर्णानंद.. त्याने नकार दिला तर एक मोठा प्रश्न सुटेल."
"पण त्याने तसे नाही केले तर?"
"तो चाॅईस त्याला .. एक मिनिट .. तुला तो कसा वाटला प्रीती?"
"कसा म्हणजे .. मी नाही प्रेमला सोडायची .."
"हो ग बाळ.. उगी उगी.. तुला मिळेल हो तुझा प्रेम. पण सांग स्वभावाने कसा आहे तो?"
"चांगला वाटतो. मनमिळावू वगैरे विशेषणे वापरता यावीत .."
"आणि तो आता जळगावात आहे.. राईट?"
"आता.. नाही. दोन दिवस तो इथेच आहे!"
"इथे म्हणजे?"
"भिंदिच्या घरी!"
"भिंदि! बापरे!"
"काकु.. घाबरू नकोस .. मी तुझ्या पुढेच आहे!
पण तुला काय म्हणायचेय मिलिंदा?"
"हेच.. डायरेक्ट ॲप्रोच! टू पूर्णा! त्याला वस्तुस्थिती सांगून टाकायची.."
"म्हणजे? या प्रीतीचे बाहेर लफडे आहे म्हणून?"
"काकु.. काहीतरी बोलू नकोस.. लफडे काय? दिव्य प्रेम आहे ते!"
"ठीक.. काहीतरी भानगड नाहीतर प्रकरण आहे असे सांगू!"
"नाही! पूर्णाला सांगू की ही जी आहे ती तुझ्या भावावर मरतेय! तू तिला नकार दे. पुढचे पुढे. अर्धा प्राॅब्लेम तर सुटेल."
"गुड आयडिया. आणि कदाचित पूर्णा आपल्याला त्या प्रेमबद्दल माहिती देऊन मदतही करेल!"
"वाॅव!"
"पण एक छोटासा पाॅईंट..भिंदि नामक वाघाच्या गुहेत त्या पूर्णाला एकट्याने गाठायचे कसे?"
"हा प्रश्न जटिल खरा. पण काहीतरी करू. आता झोप येतेय."
"मला देखील .." जांभई आवरत काकु.
"मी हा प्रश्न झोपेत सोडवेन!"
"म्हणजे?"
"अगं हा झोपताना प्रश्न घेऊन झोपतो. सकाळी उत्तर सुचते त्याला .. म्हणे!"
"सुचते म्हणजे सुचतेच!"
रात्री घरी आली. एक ठरलेले.. पूर्णानंदाची मदत घेऊन कमीतकमी एक प्रश्न तर सोडवावा. दुसरा कठीण प्रश्न नंतर. शाळेत बाई सांगायच्या ना, पेपरातले जे प्रश्न नीट सुटतात ते आधी सोडवा. बाकीचे शेवटी! शाळेत शिकवकेले असे उपयोगी पडेल असे वाटले नव्हते! नशीब आई नि तात्यांनी काहीच विचारले नाही. आता उद्या महत्त्वाचा .. उज्जवल परवासाठी!
झोपली मी. स्वप्नात प्रेम.. आरशासमोर. समोर आरशात पूर्णा. दोघे तलवार घेऊन लढाई करताहेत. मी बाजूला उभी. हातात वरमाला घेऊन. पूर्णानंद ताकदवान दिसतोय .. लढाई प्रेम हरताना दिसायला लागला.. पाठून मिलिंदा आला.. आरशातल्या पूर्णाला गुदगुल्या करून हसवायला लागला .. प्रेमने मोका शोधून हल्ला चढवला.. आणि मी उठून बसली.. तेव्हा पहाटेचे पाच वाजलेले! म्हणजे खरे होणार तर स्वप्न!