अपूर्ण बदला ( भाग ४ ) Dipak Ringe ।बोलका स्पर्श। द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपूर्ण बदला ( भाग ४ )

दुपार झालेली, आत्ता मात्र त्यांना कंटाळा आलेला. त्यांच बरेचस खेळूनही झाल होत. भूक लागली म्हणून सगळे दुपारचे जेवण करून वापस रव्याच्या घरी परतले. काय करायचे कुणालाच काय सुचत नव्हते? खेळायचं म्हटलं तर भर दुपारच बाहेर कोण खेळेल, ते म्हणजे चुलीत हात घातल्यासारख होतं.कारण बाहेर सूर्यदेव एवढे तापले होते कि जस ते कोणावर त्यांचा राग बाहेर काढत आहेत. जस शंकराने तिसरा डोळा उघडला कि पुढे जे काही आहे ते जळून खाक होई तसे उन्हात गेल्यावर त्वचा जळत होती.

तेवढ्यात रव्याच्या मनात एक कल्पना झळकली. आणि तो स्वतः हसला. त्याला राहावल नाही म्हणून लगेच व्यक्तही केली. सर्वाना कल्पना आवडली पण तरीही त्यामध्ये "पण" निघाला.

कारण त्यांच्या आई-वडीलाना समजल तर कपडे काढून चाबकाचे फटके पडले असते. तरीसुद्धा त्यांनी आगेकूच केली. ठरलं नदीवर पोहायला जायचं. तसही गरमही खूप होत होत. आणि थंड तर होयला पाहिजेच होतं. लगेच साबण टोवेल घेतल आणि नदीवर पोहचले. इंद्रदेवाची कृपाही चांगली होती गावावर त्यांना पाण्याची कमी नव्हती. पावसाच्या बाबतीत वरदान भेटलेले. त्यामुळे नदीलाही बारा महिने पाणी स्वच्छ आणि थंडगार होतं.


सर्वांची थंड आणि तजेलदार पाण्याने अंघोळी झाली आणि सगळे बाहेर आले. समोरच्या आंब्याच्या झाडावरच्या कैऱ्या बघून गोट्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने उशीर न करता आंब्याच्या झाडावर जायचं सुचवलं. पण आत्ता इथेपण "पण" होताच. हरीच्या वडिलांनी टाकलेल्या भीतीमुळे रव्या चांगलाच घाबरला होता. त्यामूळे तो त्यांना म्हणाला आपल्याला नको जायला तसही हरीच्या बाबाने आपल्याला बजावलंय.

अरे पण त्यांना कोण सांगणार आहे ? गोट्या,रम्या आणि श्याम तावातावात म्हणाले.

अरे पण! रव्या मधेच अडखळला आणि पाचही जण पुढे चालू लागले. जसे कोणत्या लढाईला जायचं आहे आणि ती आता जिंकायचीच आहे. तशी ती त्यांच्यासाठी एक लढाईच होती, कारण आईवडलांच्या विरोधात जाऊन कोण अशी करामत करणार आहे, ते त्यांच्या घटनास्थळी पोहचले. रव्या मात्र खूपच घाबरलेला त्याला काही सुचत नव्हते त्याला हरीच्या बाबांचे ते भीतीदायक शब्द आठवू लागले “ तुम्ही तिथे गेलात तर भूत घेऊन जाईल."

मला नाही वाटत हे आंब्याचं झाड आपल्यामध्ये कुणाच्याने चढवेल? त्यासाठी रव्या दगडगोटे जमा करा. गोटयाच्या आवाजाने रव्या भानावर आला. लगेच रव्या रम्याला सोबत घेऊन दगडधोंडे जमा करायला गेला.

अचानक आलेली चक्रीवादळ पाहून रव्याच्या पोटात गोळा आला. त्याला काहीच समजत नव्हते तो पूर्णपणे घामाघूम झाला, जसे संकट येण्यापूर्वी नियती कोणती ना कोणती सूचना देते, तशीच ती सूचना रव्याला वाटू लागली. त्याचं मन भीतीच्या पोटी धडधडू लागले. हृदयतील ठोके एवढे वाढू लागले जसा कोणी नगारा पिटत आहे. आणि त्यात नवल म्हणजे अचानक आंब्याच्या वरच्या टोकाला कसलीतरी हालचाल होऊ लागली.रव्या पूर्ण थंड पडला. त्याच्या मनामध्ये एक वेगळीच भीती जाणवू लागली.त्याला सारख सारख भासायला लागलं कुणीतरी आपल्यावर वाईट नजर ठेऊन बघत आहे.

रव्या फार घाबरला त्याने रम्याला हलक्या आवाजात बोलू लागला. मला काही खास वाटत नाही आहे? आपण इथून जाऊया.

अरे एवढा कुठे घाबरतोय? झाड हवेमुळे हलतंय .आणि चक्रीवादळाच बोलशील तर विज्ञानमध्ये आपण शिकलोय कि चारही बाजूने जेव्हा हवेचा प्रवाह वाढतो, तेव्हा चक्रीवादळ निर्माण होत. त्यामुळे असं समजू नकोस की ते चक्रीवादळ आपल्याला घेऊन जायला आलय. झालं रम्याने पण विज्ञानाचे भाषण दिलं.

रम्याला खात्रीनिशी वाटत होत. कि झाड हवेच्या प्रवाहामुळे नाही हळल.

अरे तुम्हारे पत्थर तो आज हमे नही मिळणे वाले है. तो क्यो ना जो हमने हमारे बळपे निकाले हुये आम चस लेते है.- गोट्या हसत आणि दोघांची खिल्ली उडवत बोलला. तसे श्याम, हरी आणि गोट्या तीघेही हसू लागले.

रव्या आणि रम्या दगड जमा करत होते, तेव्हा रम्याची नजर आंब्याखाली गेली, आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. थोडा वेळ तो सुन्न झाला. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. समोर एक काळीभोर सावली विचित्र आकाराची काळीकुट आकृती रव्याकडे घृणास्पद पाहत होती. आणि मधेच हलकेच मंद हसत होती , रव्या रम्याला खुणेने सूचना करू लागला, पण तो दगड जमा करण्यात मग्न होता आणि अचानक ती काळी भयाण दिसणारी आकृती हवेमध्ये दिसेनाशी झाली.

ते सगळेजण घरी जाण्यासाठी परतले मात्र रव्याच्या मनामध्ये अजूनही तोच विचार होता. घरी जाता जाता तो सारखे मागे पुढे बघत होता.त्याला सारख वाटत होत की त्याचा कोणी तरी पाठलाग करतय.

रव्याच्या घरी चटणी मीठ लाऊन कच्च्या कैर्यांचा आंबट-तिकट स्वाद सर्वाना आवडला. रव्याला मात्र तोच विचार मनामध्ये घर करून बसलेला. त्याच डोक विचाराने फुटण्याच्या आशेवर आलेलं. कोण होती ती काळी आकृती ? ती आपल्याकडे अशी घृणास्पद का बघत होती ? आणि आपल्याकडेच का बघत होती? का मला हरीच्या बाबांच्या विचाराने भास झाला ? काहीच कळायला मागत नव्हते .

क्रमशः