वैरण भाग-II Subhash Mandale द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वैरण भाग-II

वैरण
भाग-II

बादलीतून पाणी घेऊन तो म्हशींच्या जवळ आला.त्यांना पाणी पाजले.पुन्हा डोक्याला हात लावून विचार करत बसला.विचाराचा एकच प्रश्न 'वैरण'.काही सुचत नव्हते.डोक्यात विचारांचं काहूर माजले होते.डोकं फुटायची वेळ आली.तानाजीने एक मोठा श्र्वास घेऊन सुस्कारा सोडला आणि उठून घरी गेला.घरात येऊन कॉटवर आराम करण्यासाठी पडला.पण विचार चालूच होते.विचार करता करता संध्याकाळचे सहा कधी वाजले समजलेच नाही.जसजसा वेळ जात होता तसतसा तो अजून बेचैन होत होता.त्याला बिना वैरणीची दावण,भूकेलेल्या म्हशी, त्यांची वैरणीसाठीची तरफड डोळ्यासमोर दिसत होती.तानाजीचं मन तळमळत होतं.त्याला ना भूक लागत होती ना झोप.वेळ जात होता, सहा,सात,आठ..., रात्रीचे दोन वाजले.त्याने आदल्या दिवशी रात्री जेवण केले होते, त्यानंतर तो जेवला नव्हता.वैरणीच्या प्रश्र्नाने त्याची भूकच काय तर झोपही उडवली होती.त्याने ठरवले होते की पहिल्यांदा म्हशींना वैरण आणीन मगच जेवण करेन.तो कॉटवर या कुशीवरून त्या कुशीवर होत होता.त्याची वैरणीची तळमळ झोपू देत नव्हती.शेवटी खूप विचार करून निर्णय घेतला,
'चोरी करायची'......,
होय होय चोरीच.
वैरणीची चोरी.
कधी स्वप्नातही विचार आला नसता,तो प्रत्यक्षात आणायचा.
असे ठरवून तो कॉटवरून उठला आणि तडक पाटलांच्या ऊसाच्या शेताकडे गेला.रात्रीचे तीन वाजले होते.पाटीलांच्या शेताकडेला येऊन त्याने ठरवले, 'चोरी करायची,पण पाटीलांच नुकसान न करता',
कारण मागच्या वेळी ऊसाच्या पाचटसोबत ऊसाचं वाडंही मोडून घेतले होते.तो पटकन ऊसात शिरला आणि बेभान होवून ऊसाची पाचट दोन्ही हाताने ओढू लागला.तासाभरात भाराभर पाचट काढली आणि जमा करत ऊसातून बाहेर आला. दोन हातांच्या कवळ्यात येईल तेवढं कमीच वाटत होते.तरीही एक मोठा कवळा घालून वैरण उचलून खांद्यावर घेतली आणि घराचा रस्ता चालायला सुरुवात केली पण दोन दिवस उपाशी असल्यामुळे त्याला गरगरायला लागले.चक्कर आल्यामुळे अंगावर वैरणीचा भारा घेऊन तसाच पडला.

सकाळपर्यंत तो तसाच पडून होता.सकाळी शेतात फेरफटका मारायला गेलेल्या एका माणसाने त्याला पाहिले.आणि जवळ जाऊन उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठला नाही.ऊसाची पाचट कापल्यामुळे हातापायातून रक्त येत होते.पायात चप्पल नव्हती.हा त्याचा अवतार बघून त्या माणसाला वाटले की कुणीतरी याला मार दिला असेल.तो घाबरुन गेला.त्याने हॉस्पिटलला फोन करून गाडी मागवून घेतली आणि गावातच सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे थोड्याच वेळात गाडी तेथे आली. तानाजीला गाडीमध्ये घालून हॉस्पिटलला पाठवले त्यानंतर तानाजी च्या घरी जाऊन त्याच्या आईला हा निरोप पाठवला, 'की तुमच्या मुलग्याला कोणीतरी मारून रस्त्यावर टाकले होते.तो बेशुद्धावस्थेत होता‌.त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले आहे. हे ऐकताच तानाजीच्या आईला काही सुचले नाही.हातपाय कापायला लागले.तिला तानाजीचे वडिल हॉस्पिटलला घेऊन गेले. तेथे गेल्यावर पाहताच क्षणी तानाजीची आई रडायला लागली.
तानाजीला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी सांगितलं होतं,की दोन दिवस शुद्ध येणार नाही त्यामुळे तानाजीची आई हॉस्पिटलमध्ये त्याला शुद्ध येईपर्यंत तशीच बसून होती.तानाजी जेवण करत नव्हता मात्र त्याच्या आईसाठी त्याचे वडील घरी जाऊन डबा बनवून घेऊन येत होते.
त्यांचे कुठे लक्ष लागत नव्हते.आपला मुलगा लवकर बरा व्हावा ही एकच इच्छा.
तानाजीच्या काळजीने दोन दिवस आई आणि बाबा हेही विसरले होते,की घरी दावणीला म्हशी आहेत.
वैरण,पाणी नसल्यामुळे म्हशींचा हंबरडा फोडून जीव काकुळतीला आला होता.
तिसऱ्या दिवशी सकाळी तानाजीची आवडती म्हैस 'परी' हिने भुकेनं व्याकुळ होऊन जीव सोडला.
तानाजीच्या घरी कोणी नव्हतं त्यामुळे तिला गावातून बाहेर माळरानावर पुरण्याची व्यवस्था त्याच्या मित्रांनी केली.
त्यांनी म्हशीला माळरानावर पुरल्यानंतर घरी येऊन तानाजीच्या वडीलांना याबाबत सांगितलं.त्यादिवशी दुपारी तानाजी शुद्धीवर आला.शुद्धीवर आल्यानंतर त्याने पहिला प्रश्र्न विचारला,
"वैरण कुठे आहे?आपल्या म्हशींना वैरण घातली का?"
कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी तानाजीच्या वडीलांना हुंदका आवरता आला नाही.ते रडतच बोलू लागले,
"आपली परी आपल्याला सोडून गेली."
"कसं शक्य आहे,माझी परी मला सोडून जाऊ शकत नाही",
असे म्हणून तो पटकन स्ट्रेचरवरून उठला आणि परी...परी...असा आवाज देत तो म्हैशीला पुरले होते तेथे आला आणि येऊन डोकं आपटून आपटून रडू लागला.
'मी तुझ्यासाठी वैरण आणली होती अन् तू बिना खाताच गेलीस.अजून थोडावेळ धीर धरता आला नाही तुला, मी तुझा अपराधी आहे. मी तुझा अपराधी आहे",
असे म्हणून तो रडतच राहीला.दोन तास कधी निघून गेले समजलेच नाही.इतक्यात तानाजीची आई तानाजीला आवाज देत त्याच्याजवळ आली.
"आरं पोरा,तू इथं काय करतोयस, तुझ्या बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत"

"का? काय झालं बाबांना?", तानाजीने उठत उठत प्रश्र्न विचारला.

"तू इकडं येऊन बसलास,डुचकीला(ती म्हैस अवखळ होती म्हणून तीचे आईने नाव 'डुचकी' ठेवले होते) वैरण पाणी कोण घालणार? म्हणून तुझे बाबा पांडुरंग पाटलांच्या ऊसात पाचट काढायला गेले होते.तिथे त्यांना साप चावला.गणपा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आहे.लोक म्हणत होते,की 'साप विषारी नाही,काळजी करण्यासारखे काही नाही' म्हणून मी तिकडे न जाता तुला शोधायला आली, चल, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे.तू आधी म्हशीच्या वैरणीचं बघून घे."
असे म्हणून तानाजीच्या आईने घराची वाट धरली.

तानाजी वैरणीचा विचार करत होता, त्याला आठवले,त्या दिवशीच्या रात्री तीन दिवसांपूर्वी काढलेली वैरण रस्त्यातच पडून असेल.तो तिकडे गेला, वैरण तशीच पडली होती.ती वाळलेली वैरण उचलून खांद्यावर घेतली आणि ती घेऊन तो घरी आला.म्हशीला पाणी पाजले नंतर वैरण घालून मागे वळून पाहिले तर हॉस्पिटलची गाडी घराकडे येताना दिसली.गाडी घराजवळ येऊन थांबली.आणि गाडीतून बाबांना स्ट्रेचरवरून खाली काढले.अंगावर पांढऱ्या रंगाचं कापड टाकलं होतं.हे बघून तानाजीची आई डोक्याला हात आपटून आपटून रडू लागली.ती आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता.तानाजीने उभ्या उभ्या अंग सोडून दिले.तो भिंतीला टेकून बसला.तो हे सगळं पाहत होता.त्याला ना रडता येत होते ना आईला सावरता येत होते.तो तसाच एकटक डोक्याला हात लावून पहात बसला.
गावातील लोकांनी तानाजीच्या बाबांची अंत्यसंस्काराची व्यवस्था केली.लोक त्यांना घेऊन गेल्यानंतर तानाजीच्या आईच्या तोंडून शब्द फुटले,"माझा देव गेलाsss.माझा देव गेलाsss आता कुणाच्या पाया पडू?sssमाझा देव गेला..."
सारं इतकं झटपट झाले होते की हे सत्य आहे याच्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.हा सगळा भास आहे असे त्याला वाटतं होतं.
दिवस गेला.रात्र झाली.जेवण बनवले नव्हते पण शेजारीपाजारऱ्यांनी जेवण आणून दिले.तोंडात घास जात नव्हता पण पोटाला आधार म्हणून तानाजीने थोडं खाऊन घेतलं.आई मात्र उपाशीच झोपली.
दुसऱ्या दिवशी सकाळी तानाजी लवकर उठला.त्याला वैरणीचे व्यसनच लागले होते. अंघोळ आटोपली आणि थेट गणपाच्या घरी गेला.तानाजीला आपल्या घरी येताना पाहून गणपाला आश्चर्य वाटले.इतक्या लवकर तानाजी आपल्या घरी कसा काय म्हणून त्याने तानाजी ला विचारले त्यावर तानाजी म्हणाला,"कालपर्यंतच ठीक आहे.काल वैरण मिळाली पण आज पासून काय करायच?रोज कुठं चोरी करता येणार नाही किंवा कोणी मागून करून देणार नाही. काही तरी उपाय सांग".
"आम्ही चार पाच जणांनी यावर उपाय काढला आहे आज दुपारीच आम्ही सांगली जिल्ह्यातील कृष्णा वारणा नदीच्या काठी काही दिवसासाठी जाणार आहे एवढा उन्हाळा संपला की चार सहा महिन्यानंतर पुन्हा माघारी येऊ."

"राहण्याची खाण्याची व्यवस्था?",
तानाजीने विचारले.

"रहायला पालं ठोकायची.तेथील शेतकरऱ्यांच्या शेतात खतासाठी रात्री शेळ्या मेंढ्या, जनावरं बसवली की ते त्याबदल्यात आपल्याला भाकरीला पिठ आणि तेला मिठाला चार पैसे देतात."
"तेथील लोक चार सहा महिने एका गावात राहू देतील का?"
"चार आठ दिवसांनी गाव बदलायचं.त्यांनाही त्रास नाही आणि आपल्याला ही त्रास नाही."
गणपाकडे तानाजीच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर होते.कारण तो याच्या अगोदर अनेकदा तिकडे गेला होता.
"तुम्ही जाणार आहे ते, मला का नाही सांगितले?",तानाजीने आशेने विचारले.

"तानाजी,तुझ्याकडे इनमीन एक म्हैस.त्यासाठी कशाला येतोय इतक्या लांब इथेच काहीतरी व्यवस्था कर."

"तू नाही म्हटलं तरी मी येणारच." तानाजीने त्यांच्याबरोबर जाण्याचा पक्का निर्धार केला होता.
"ठीक आहे चल आमच्या बरोबर"असे गणपा म्हणताच तानाजीने "हुं, लगेच आटोपून येतो"असे म्हणून घराची वाट धरली. घरी आला.घरातून दोन रिकाम्या बादल्या घेतल्या आणि आडावर गेला आडातून पाणी काढले आणि म्हशींच्या दावणी जवळ आला.पण पाहतो तर काय,त्याची राहिलेली एक म्हैस तिथे नव्हती त्याचा जीव कासावीस झाला. भीतीने अंग कापू लागले. त्याच्या मनात नको नको ते विचार यायला लागले.

"परी प्रमाणे....? नाही नाही".

त्याचा श्वास वाढला. हृदयाची धडकन वाढली.तो धावत आपल्या घरात गेला आणि आईला विचारले,

"आई आपली डुचकी?...."

त्याने घरात इकडे तिकडे पाहिले पण आई घरात नव्हती.भितीचं सावट अजून घट्ट होत होतं,मन कासाविस झालं, तो परीला पुरले होते तेथे गेला पण तिथेही आई किंवा डुचकी दिसल्या नाहीत.तो जीव रडकुंडीला येऊन सैरभैर पळत होता.त्याला वेड्या सारखा पळताना पाहून आबाकाकांनी ओळखले की हा आईला शोधत आहे,त्यांनी लांबून आवाज दिला,
"तानाजीsss, तुझ्या आईला स्मशानभूमीत जाताना पाहिलंय"
तसा तानाजी अजून वेगाने धावत स्मशानभूमीकडे गेला.तिथे आई गुडघ्यावर कोपर टेकवून डोक्याला हात लावून बसली होती.तानाजी जवळ गेला.हळूच गुडघ्यावर बसला.आईच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून,"आई...,सावर स्वतःला."
तसं आईने त्याच्या पोटाला मिठी मारून हुंदके देत रडायला सुरुवात केली.थोड्यावेळाने त्याने आईच्या हाताला धरून उठवले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून आधार देत तो घरी येत होता.पण डोक्यात एक प्रश्न होता, 'डुचकी'? त्याला माहित होते की ही वेळ डुचकीबद्दल विचारायची नव्हती पण विचारणं गरजेचं होतं.तो अजूनही बेचैन होता.शेवटी न राहून त्याने आईला विचारले,
"आई आपली 'डुचकी'?"

"सकाळीच देऊन टाकली आबाकाकांना."

"आई हे तू काय केलंस, एकदा मला विचारायचं तरी" तानाजी हिरमुसलेला चेहरा करून म्हणाला.

"तुला काय विचारायचं?,कुठून आणणार आहेस रोज वैरण?,दुष्काळ पडल्याने मोठ्या मोठ्यांचं हाल होतात तर तुझं काय घेऊन बसलास.या म्हशीला वैरणीसाठी मरताना मी नाही बघू शकत.तेव्हा ही म्हैस मी आबाकाकांना घेऊन जायला सांगितले"

"अगं आई,मी आत्ताच गणपा कडून जाऊन आलो. तो कृष्णा वारणा नदीच्या काठाला गावं आहेत तिकडे जाणार आहे, मी ही त्याच्या सोबत जाणार आहे, माझ्यावर विश्वास ठेव."

"काय करायचा विश्वास?या विश्वासामुळे तू दोन दोन जीव घेतलेस, आता मी उरली आहे, तिलाही खपव म्हणजे तुझं समाधान होईल.म्हशीच्या वैरणीच्या नादापाई तू तुझ्या बाबांचा आणि एका म्हशीचा जीव घेतलास तरी तुझी हाऊस फिटली नाही का?",आई रडत रडतच चिडून बोलली.

"आई,मी काय करावं असे तुला वाटते?"तानाजी काकुळतीला येऊन बोलला.

यावर तानाजीच्या आईने उत्तर न देता ती शांत बसली.थोडावेळ निरवशांतता पसरली.तानाजीच्या डोळ्यासमोर अंधार दाटला होता उर भरून आला होता.काय करु? कुणाला सांगू? सारा मायेचा पाझर आटला होता.डुचकीसाठी हृदय तीळ तीळ तुटत होते.त्याला एकाच दिवशी दोन मोठ्या धक्यांना सामोरं जावं लागलं होतं.त्याला परीची आठवण गप्प बसून देत नव्हती.तो भान हरपून परी म्हशीला जिथं पुरले होते तेथे गेला आणि तिथं बसून रडू लागला.
आबाकाका तेथून म्हशींच्या तबेल्याकडे जात होते.त्यांनी तानाजीला पाहिले.तानाजीची ही अवस्था पाहून न राहून ते त्याच्याजवळ आले आणि डोक्यावरून हात फिरवत म्हणाले,
"बाळ,तुझी आणि तुझ्या आईची अवस्था मला बघवत नाही.म्हशी पाळ,पण वैरणीची व्यवस्था झाल्यावर...'काल गावात आमदार साहेबांची सभा झाली, ते म्हणाले,'गावात वर्षभरात टेंभू योजनेचे पाणी येईल.लोकांनी वैरणीच्या पिकांची लागवड करावी.वैरणीची बियाणे सरकारकडून मोफत मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहेत'."
"आबाकाका,म्हैस नसल्यावर काय उपयोग त्याचा"
"तू म्हशी पाळ,पण वर्षभर कुठलातरी कामधंदा करून पैसे मिळव. तु गावात राहिलास तर परी म्हैस आणि तुझे बाबा यांच्या आठवणीने कधी तू तर कधी तुझी आई सारखं सारखं
स्मशानभूमीकडे याल.तुम्हाला वेड लागेल.तुमच्या दोघांची ही अवस्था पाहून असं वाटतंय की तुझं किंवा तुझ्या आईचं काहीतरी बरंवाईट होईल.त्यापेक्षा तु पुण्याला जा.माझा मित्र पुण्यात प्लेसमेंट ऑफिस चालवतो,तो कामाला लावतो.त्या बदल्यात पहिल्या पगारातील अर्धा पगार कापून घेतो.मी सांगितले तर तो तुला मोफत काम लावेल.तिथे पैसे जमा कर.त्या जमा झालेल्या पैशाने वैरणीची व्यवस्था होईल"
तानाजीचे मन गाव सोडायला तयार नव्हते.पण करणार काय, बघितलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण धुळीस मिळाल्या होत्या.शिवाय कमावणारे हात गमावले होते.बाबा गेल्यानंतर दोन दिवस शेजारच्या लोकांनी जेवण पुरवलं.त्यानंतर स्वत:च्या घराची काळजी सत:च करावी लागते. आईच्या काळजीखातर नाईलाजाने तो गाव सोडायला तयार झाला.

कथेचा पुढचा भाग-III
_सुभाष आनंदा मंडले
(9923124251)