Pratibimb - The Reflection - 3 books and stories free download online pdf in Marathi

प्रतिबिंब - 3

प्रतिबिंब

भाग ३सकाळी यशला जाग आली तेव्हा जाई शेजारी नव्हती. बाथरूममधे असेल असा विचार करून तो कूस बदलून झोपला. पण मग त्याला परत जाग आली. बाथरूमचं दार उघडंच होतं. त्याने दिवाणखान्यात येऊन पाहिलं, स्वैपाकघरात पाहिलं. जाई कुठेच नव्हती. मग त्याला अचानक वरचा आरसा आठवला. तो धावत वर आला. पाहतो तर, जाई आरशावर मान टेकून, जमिनीवर बसल्याजागी झोपली होती. त्याने घाबरून, तिला जागे करण्यासाठी, हलवायला सुरवात केली तशी हळूहळू तिने डोळे उघडले. अनोळखी चेहऱ्याने तिने यशकडे पाहिले आणि ती सावरून उठून बसली.

"अगं इथे काय करतेस? किती घाबरलो मी. कधीपासून आहेस इथे? आणि अशी काय अवघडून झोपलीस? " जाई काहीच न बोलता हळूहळू उठून खाली आली. पाठोपाठ यश.

"आपण आजच्या आज परत जातोय". यश निर्णय घेऊन मोकळा झाला.

"चालेल, पण तो आरसा न्यायचा."

"अगं वेड लागलय का तुला? ते एवढं मोठं ड्रेसिंग टेबल ठेवणार कुठे? "

"टेबल नाही नुसता आरसा. भिवा सुताराला बोलवून घ्या. तो देईल सुटं करून. त्याला माहीत आहे सगळं".

काल मॅडमनी शिवाकडून सगळी माहिती आधीच काढून ठेवलेली दिसते. यशच्या मनात विचार आला. शिवा आल्यावर त्याने सुताराला बोलावून घ्यायला सांगितले. तो चंद्रुला घेऊन आला. चंद्रुने टेबल मागून पुढून पाहण्यास सुरवात केली. यश आणि शिवा त्या दोघाना वर सोडून गाडीची सोय बघायला गेले. मग जाईने त्याला टेबलाचा खालचा ड्रॉवर काढायला सांगितला. तो काढल्यावर बिजागऱ्या दिसल्या आरशाला जोडणाऱ्या. चंद्रूने खिळे काढताच आरसा टेबलापासून सुटा झाला. चंद्रूने सावकाश आरसा मोकळा करून जाईने सांगितल्याप्रमाणे गादीवर ठेवला. "हातासरशी गादी बांधूनच टाक आरशाला" तिने बजावले. गादीसह आरसा शहरी जाण्यास तयार झाला. मोठा टेम्पो आणून, त्यात कागदपत्रं, आरसा आणि इतर काही सामान भरलं. सगळी कुलूपं लावून मंडळी बाहेर आली. यशने सरकारी कागदपत्रांवर सह्या करून झाल्याच होत्या. आता ग्राहक शोधण्याचे काम वकिलावर सोपवून दोघे निघाले. जाईला खरंतर आरशाबरोबर टेम्पोनेच जावेसे वाटत होते पण यश भडकला असता म्हणून टेम्पोच्या ड्रायव्हरला तिने आपल्या पुढे राहण्यास बजावले. यश आपल्या पत्नीकडे पहात होता. म्हटलं तर वेगळं काहीच नाही पण काहीतरी खटकत होतं खास. सामानासह दोघे शहरी आपल्या घरी पोहोचले. यशची कामे त्याची वाटच पहात होती. खरंतर जाईचीही. पण ती आरशासोबत बसून राहिली. यश कामात पूर्ण बुडाला. तिने दुसऱ्याच दिवशी सकाळी फर्निचरवाल्याला बोलावले. त्याच्याशी बोलून आरशासाठी जागा ठरवून टाकली. तिने तिच्या स्टडीच्या दाराला, जिथे तिचा बराचसा वेळ जायचा आणि ती एकटीच तिथे असायची, त्या दाराच्या आतल्या बाजुने आरसा बसवून घेतला. आता तिच्या जीवात जीव आला. कारण आरसा म्हणजे अस्तित्वाचा प्रश्न होता.

तिच्याही आणि जाईच्याही!

यशच्या येण्याची वेळ होत आली होती. ती आरशासमोर उभी राहिली आणि सरळ चालत पलीकडे दिसेनाशी झाली. जाई अलगद मागच्या खूर्चीत कोसळली. यश आला तेव्हा त्याला ती अशीच दिसली. खुर्चीतच झोपून गेलेली.

यश चिंतेत पडला. त्याने जाईला हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला, पण ती ग्लानीत होती. अंगात भरपूर ताप भरला होता. मग त्याने तिला पाणी पाजले तेव्हा जरा तिला हुशारी आली. त्याने तिला बेडरूममधे आणून झोपवले आणि डॉक्टरांना फोन केला. त्यांनी रात्री बघून जातो, ताप जास्त वाढला तर गोळी देण्यास सांगितले. तो तिच्याजवळ बसून राहिला. गोळीने ताप बराच उतरला.

हळूहळू जाईला एकेक गोष्ट आठवू लागली. जे घडलं होतं ते अतर्क्य होतं. घडलं होतं की नाही? पुरावा काय? केवळ आपल्याला झालेली ती जाणीव. पण आपण खरंच तर अडकलो होतो. आपल्यासाठी ते सगळं खरंच घडत होतं ना?पण यशच्या दृष्टीने आपण इथेच होतो. त्याला खरं वाटेल? शक्यच नाही. आपल्याला खरं वाटतंय पूर्णपणे?

त्या रात्री ती बाई तिच्या हाताला धरून आरशाच्या आरपार घेऊन गेली. नंतर मात्र तिने जाईचा हात झटकून टाकला. ती मागे वळून आरशातून पलिकडे परत गेली. जाई मात्र त्या थंडगार, हिरवट, बुळबुळीत अंधारात, चाचपडत, कितीतरी काळ धडपडत राहिली. ना तिला काही दिसत होते, ना कळत होते. तिला फक्त एकच जाणवत होते ते हे की आपण काही झालं तरी हार मानायची नाहीय. काय वाट्टेल ते झालं तरी. आणि या एका जिद्दीवर ती परत येऊ शकली होती. पण किती दिवस ती तग धरू शकेल हे तिला कळत नव्हतं. तिला एक मात्र नक्की कळलं की हे जे काही सगळं होत होतं, ते फक्त मनाच्या पातळीवर होतं, तिच्या शरीराचा त्यात कुठेच सहभाग नव्हता.

त्या बाईलाही इतका वेळ माझ्या शरीरात वास करून राहणं जडच गेलं असावं. नाहीतर तिने माझी सुटका केली नसती. तिचं मन जसं माझ्या मनावर हावी झालं होतं, तसंच माझं मन जे निकराचा प्रयत्न करत होतं सुटकेचा, त्याला पेलवणं तिलाही जाड झालं असेल का?

बिनउत्तरांचे अनेक प्रश्न. जाई थकून गेली. तिला ग्लानी आली.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED