Pratibimb -The Reflection - 5 books and stories free download online pdf in Marathi

प्रतिबिंब - 5

प्रतिबिंब

भाग ५

दुसऱ्या दिवशी यशच्या महत्वाच्या मिटींग्ज होत्या. जाईने त्याला आग्रहाने जायला लावले. मी बेडवरून उठणारच नाही असा निर्वाळाही दिला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच नवरानवरीस देवदर्शनास नेले. साताठ तासांचा प्रवास होता. मंडळी मुक्काम करून तिसऱ्या दिवशी परतणार होती. भाऊसाहेबांनी प्रकृती अस्वास्थ्याचे निमित्त पुढे केले. सगळ्यांना धाडले. त्यात घरात राबणारे, नुकतेच लग्न झालेले, शिवाचे आजा-आजीही होते. तुम्हाला तरी देवदर्शन कधी होणार, असे म्हणत आग्रहाने धाडले. मालकाच्या दानतेने ती दोघे सुखावली. सगळे गेल्यावर भाऊसाहेबांनी शेवंताचे शव ओढत नेत वाड्याच्या छतावरून मागच्या दरीत फेकून दिले. आरशाच्या कपाटाच्या बिजागऱ्या तोडल्या, मग भिवास बोलावून नवे कपाट बनवून त्यावर या आरशाचे दार लावण्यास सांगितले. जुने कपाटाचे लाकूड सरपणात वापर असेही सांगितले. भिवा डोक्यावरून कपाट घेऊन आला. त्याने कपाट मोकळे केले. नवे कपाट बनवण्यास घेतले.

काम करताना त्याची नजर वर गेली तर त्याला शेवंता दिसली.

तो ओरडलाच तिच्यावर "अगं शेवंते कुटं व्हतीस काल तू? तुजी आय किती सोदायली तुला? कवा गेलिस मंग घरला? जा आता सरळ घरी." असं म्हणून त्याने परत कामाला सुरवात केली.

भिवाला रोज छटाक चढवूनच काम करायची सवय, त्यामुळे त्याने नंतर ती कुठे गेली, वगैरे पाठपुरावा केला नाही. शेवंता अजूनही बेपत्ताच आहे आणि कलावंतीण अजून शेवंताला शोधतेय असं कळल्यावर तो ओरडलाच. "काय यड्या का खुळ्या गं मायलेकी तुमी? आगं कालच न्हवं काय माज्या झोपडीवरून गेली. रागं बी भरलो म्या तिला न् सरळ घरला जाया सांगितलं".

मग शेवंताचा शोध सुरू राहिला. पण संशयाची सुई, वाड्याच्या दिशेने फिरली नाही, कारण भिवाला ती वाड्यावरच्या कार्यक्रमानंतर दिसली होती.

चित्रपट पहावा तसे चलचित्र जाई आरशात पाहत होती. तुकड्यातुकड्यातून रोज नवे काही कळत होते. तिची सर्व शक्ती यांत कामी येत होती. ना धड जेवत होती, ना झोपत होती. ताप कमी होता, पण डोळे खोल गेले होते. वजन घटत चालले होते. मग यश परत तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला. पुन्हा सर्व तपासण्या झाल्या. यशला जरा बाजूला घेऊन, त्यांनी मानसोपचारतज्ञांकडे जायला सांगितले. नंतर जाईला म्हणाले "तू सुशिक्षित आहेस, जेव्हा शरीर निरोगी असूनही रोग बरा होत नाही, तेव्हा मनाची तपासणी करणे योग्य. मी तुला माझ्याच एका चांगल्या मित्राकडे पाठवतोय. तो नक्की बरी करेल तुला." जाई फिकट हसली. यशच्या समाधानासाठी तिने जायचे ठरवले. जाईच्या काळजीने, यशचे लक्ष सगळ्यातूनच उडाले होते.

शेवंताने, सुरवातीला तिचे मन जरी संपूर्ण आपल्या ताब्यात घेतले तरी, लवकरच जाई तिच्या कह्यातून बाहेर आली होती. ती स्वत:च्या मनाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. पण हे करताना तिची सर्व शक्ती कामी येत होती.

यशने ठरल्याप्रमाणे मानसिक रोगतज्ञांची भेट ठरवली. दोघे त्यांना भेटून आले. जाईने आरसा प्रकरणाचा मागमूसही लागू दिला नाही. ताप आल्या दिवसानंतर यशला जाई परत कधीच फारशी आरशाजवळ दिसली नव्हती. त्यामुळे त्यालाही ती बाब महत्त्वाची वाटली नाही. मग डॉक्टरांनी काही अजून प्रश्न विचारून काही गोळ्या लिहून दिल्या. मनातून ते ही बुचकळ्यात पडले. जाईच्या बोलण्यावागण्यात एवढी सुसुत्रता होती की, निदान हेच होते की, काहीच रोग नाही. मग जरा शांत झोप लागण्याच्या, सौम्य गोळ्या देऊन, त्यांनी त्या दोघांची पाठवणी केली. केवळ जाईच जाणून होती की शेवंताला तिच्या मनावर हावी न होवू देण्यासाठी, किती निकराने तिला लढावे लागणार होते. पण यशला विनाकारण काळजीत टाकण्यात अर्थ नव्हता. शिवाय त्याचा विश्वास बसणं त्याहून शक्य नव्हतं. काही दिवसांपूर्वी आपल्याला कोणी काही असं सांगितलं असतं, तर आपण किती वेड्यात काढलं असतं, या विचाराने जाई अस्वस्थ झाली. आता तिला अतिशय विचारपूर्वक पावलं उचलावी लागणार होती. दोघे घरी आले. यश, डॉक्टरकडूनच जाईला बरं वाटेल म्हणून, तिच्या आवडीच्या उपहारगृहात घेऊन गेला. तिच्या आवडीचे सर्व पदार्थ मागवले. इकडच्या तिकडच्या, गमतीच्या, गोष्टी सांगून तिचे मन रमवण्याचा प्रयत्न करू लागला. जाईचे मन भरून आले. यशच्या कुशीत शिरून, सर्व त्याला सांगून टाकावे, असा मोह तिला झाला. पण विचारपूर्वक तिने स्वत:ला सावरले. तिने आपण सर्व गोष्टींचा आनंद घेतोय हे यशला जाणवावे म्हणून खास प्रयत्न केले. त्याचा योग्य तो परिणाम झाला.

घरी आल्यावर यश म्हणाला "मी जरा कामं संपवू का? तुला बरं वाटतय ना? नाहीतर बसतो तुझ्याजवळ".

"नाही नाही. तू निर्धास्त कर काम. मी डॉक्टरांची गोळी घेते आणि झोपून टाकते. आज मला खूपच बरं वाटतय". ती यशकडे पाहून हसली, तसा तो खूपच मोकळा झाल्यासारखा वाटला.

मग मात्र तो घरातच बनवलेल्या, छोट्याशा, ऑफिसमधे जाऊन बसला. जाईने डॉक्टरांनी दिलेली गोळी हातात घेतली आणि बेसिनमधे टाकून दिली. पाणी मात्र प्याली. लॅपटॉप उघडून तिने "मृतात्मे" या विषयावरील माहिती वाचायला सुरुवात केली.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED