प्रतिबिंब
भाग ६
जाई एकदा एखाद्या विषयाच्या अभ्यासाला लागली की, इतकी एकाग्र होत असे की मग बाकी कोणतीच गोष्ट तिचे चित्त विचलित करू शकत नसे. तिने याच गोष्टीचा, शेवंताला आपल्या मनापासून दूर ठेवण्यासाठी वापर करण्याचे ठरवले. थोड्या वेळाने तिने मन एकाग्र करण्याच्या अनेक पद्धतींपैकी एकीचा वापर करत, डोळे मिटून स्वस्थ पडून मन एकाग्रतेच्या सरावास सुरवात केली.
काही वेळाने तिचा मनातल्या मनात प्लॅनही ठरला. या सर्व गोष्टींच्या असं आहारी जाऊन चालणार नव्हतं. आत्ता प्राथमिकता ही होती की लढायचं असेल तर शरीर, मन दोन्ही निरोगी आणि सुदृढ हवं. त्यासाठी व्यवस्थित दिनक्रम आखून घ्यावा लागणार होता.
मंडळी देवदर्शनाहून परतली. नवी नवरानवरी आनंदात दिसत होती. भाऊसाहेब मात्र एकदम थकल्यासारखे दिसू लागले. सतत पडून राहू लागले. धड जेवेनात. झोप तर पार उडालीच होती. एक दिवस अप्पासाहेब म्हणाला "चला तुम्हाला छतावर घेऊन जातो, मोकळ्या हवेत बरं वाटेल." भाऊसाहेब एकदम दचकले, नको नको म्हणू लागले. मग त्यानेही नाद सोडला.
भिवाने नवे कपाट, वर आरसा,खाली ड्रॉवर, असे आधुनिक रचनेचे बनवून आणले. नव्या नवरीला ते फार आवडले. तिने ते स्वत:च्या खोलीत ठेवून घेतले. काही दिवसांनी नव्याची नवलाई सरली आणि अप्पासाहेबाने नेहमीच्या बग्गीवाल्यास बोलावणे पाठवले. तिजोरीतून एक भारी भक्कम सोन्याचा दागिना उचलला. बग्गीवाला आला, पण शेवंताकडे जायचे म्हंटल्यावर वेड्यागत पाहत राहिला तोंडाकडे. मग त्याने शेवंता नाहीशी झाल्याचा सर्व वृतांत सांगितला. अप्पासाहेब जरा दचकल्यागत झाला पण त्याने बग्गी कलावंतिणीच्या कोठीवर नेण्यास सांगितले. याला पाहून ती बिचारी रडू लागली. दागिना तिच्या हातात देवून त्याने तिच्याच पाठीवर हात ठेवला. ती प्रथम दचकली मग त्याला घेवून आतल्या खोलीत गेली. तिच्या कोठीतील कंदील मंद झाले. बग्गीवाला एक सणसणीत शिवी घालत पचकन थुंकला.
जाईलाही पोटात डचमळून आले. आपल्याला नक्की उलटी होणार असे वाटून ती बाथरूम मधे आली. मनुष्यप्राण्यात, शेवटी ‘प्राणी’ शब्द येतो तो उगाच नाही असे तिला वाटले. कदाचित प्राण्यांना कळत असते तर त्यांना ही शिवीच वाटली असती असेही वाटले.
भाऊसाहेब दिवसेंदिवस खंगत चालले. कधीकधी भ्रमिष्टासारखे असंबद्ध बोलत, हातवारे करत. त्यांच्या हातून घडलेल्या अक्षम्य अपराधाचे सावट त्यांना जगूही देत नव्हते आणि मृत्यूही कृपा करत नव्हता. अप्पासाहेबाने मांत्रिकास बोलावले. त्याने सांगितले ते सर्व उपाय करून झाले. एक दिवस भाऊसाहेब तरातरा उठले. छतावर गेले आणि मागून येणाऱ्या शिवाच्या आजोबांना काही कळण्यापूर्वीच त्यांनी दरीत उडी घेतली.
जाईचा हातही क्षणभर पुढे झाला, अभावितपणे, त्यांना थांबवण्यासाठी. तेवढ्यात तिला शेवंता दिसली आरशात, खुनशी डोळ्यांनी पहात होती भाऊसाहेबांनी उडी मारलेल्या दिशेने.
भाऊसाहेबांचे शव काढण्यास माणसे दरीत उतरली तेव्हा त्यांना दोन शवे मिळाली. एक भाऊसाहेबांचे आणि दुसरे कुजलेले, गिधाडांनी टोची मारूनमारून अस्थीपंजर केलेले, ओळखूही येवू नये असे, शेवंताचे शव. पण हातातल्या हाडांवरची काकणं आणि पायातल्या पट्टयांनी ओळख पटली. कलावंतिणीने केलेला आक्रोश ऐकून जाई ढसाढसा रडली. पुढचे काही दिवस तिला, घरातच कोणाचा तरी मृत्यू झाल्यावर पडावे तसे सावट मनावर पडल्यासारखे वाटत राहिले.
तिला वाचनातून नवे नवे संदर्भ मिळत होते. मृतात्म्यांचं एक वेगळं जग, आपल्या या सर्वसाधारण जगातच सामावलेलं आहे याची जाणीव तिला व्हायला लागली. मांजरीला रात्रीच्या अंधारात दिसतं म्हणे पण आपले डोळे अंधारात पाहू शकत नाहीत. पण अंधार पडला म्हणून आसपासचं जग नाहीसं नाही ना होत, तसंच या जगाचं आहे. आपल्यात आणि त्यांच्यात कम्युनिकेशनचा मार्ग नाही, म्हणून हे जग आपल्याला कळत नाही. म्हणजे ते नाहीच असं कसं म्हणता येईल. असे उलटसुलट मतप्रवाह तिच्याच मनात सुरू असत.
तिचा दिवस पूर्वीपेक्षा कित्येक पटींनी व्यस्त झाला होता. सकाळ पूर्णपणे यशची असे. तो गेला की मन:शक्ती वाढवण्याचे, एकाग्रता वाढवण्याचे, सराव ती करे. मग स्टडीमधील काळ. ज्यात नवनवे संदर्भ समोर येत. त्यानंतरचा वेळ त्या दिवशी समजलेल्या नव्या माहितीची टिपणे. मग वाचन. महत्वाचे संदर्भ साठवून ठेवणे वगैरे. यश यायच्या काही काळ आधी ती ध्यानास बसे. त्यामुळे दिवसभराचा मानसिक ताण नाहीसा करण्यात काही अंशी का होईना तिला यश मिळे. त्यानंतर जेवणे होईपर्यंत ती यशबरोबर ऑफिस मधील गोष्टी बोले. मग त्याचे काम असे, ते तो संपवी. जाईला विश्रांती घेण्यास सांगे. त्याला ती अजूनही अशक्तच दिसत होती.
उच्च शिक्षण पुरे करत असताना वापरलेले अभ्यासाचे सर्व नुस्खे ती इथे वापरत होती. वाचन, मनन, चिंतन, स्वाध्याय, सर्व शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होतं. फरक एवढाच होता की तेव्हा, एक साधी परीक्षा होती, जिथे विचारले जाणारे प्रश्न, बऱ्यापैकी माहीत होते. परीक्षेमधे मिळणारे गुण, एवढीच जोखीम होती. इथे मात्र परीक्षा कधी होणार, कशी होणार, काहीही माहीत नव्हतं आणि जोखीम होती तिच्या संपूर्ण अस्तित्वाची.
भाऊसाहेबांच्या मृत्यूनंतर, शेवंताचा मृतदेह मिळाल्यानंतर, अप्पासाहेबाच्या वागणुकीत बराच फरक पडला. एक तर, उत्पन्नाची सर्व जबाबदारी अंगावर पडल्यामुळे बराच वेळ त्यातच जाऊ लागला. त्यातून पत्नीस दिवस गेले. तो जबाबदारीने वागू लागला. कलावंतीणही गांव सोडून गेली.
एक दिवस त्याची पत्नी आपल्याच खोलीत आरशासमोर अचानक बेशुद्ध पडलेली आढळली. वैद्यांना बोलावणे केले. त्यांनी काही चाटणे दिली. काही दिवस संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. ती शुद्धीवर आली पण तिच्या वागण्याबोलण्यात फरक पडला. ती अचानक भडक लुगडी नेसू लागली. डोळ्यात भरपूर काजळ घालू लागली. हावभाव, हसणं, बोलणं, सगळ्यातच एक प्रकारचा भडकपणा जाणवू लागला. अप्पासाहेब बिथरलाच हे पाहून. बरंच सांगून पाहिलं, पण काही उपयोग होईना. एक दिवस संतापाने भडकून त्याने तिच्यावर हात टाकला. तेव्हा डोळे रागारागाने गरागरा फिरवत,
"पूर्वी मी केलेलं चालत होतं, आता बायको करते तर पटत नाही काय ?"
असा सवाल पत्नीच्या मनावर पूर्ण ताबा मिळवलेल्या शेवंताने केला आणि वीजेचा धक्का बसावा तसा तो मागे हटला.
बायकोच्या माहेरी कुणकुण लागलीच होती. आईवडिल बाळंतपणासाठी म्हणून जरा आधीच घेऊन गेले. तिकडे गेल्यावर तिचे भडक वागणे कमी झाले पण मन अधूच राहिले. आठव्या महिन्यातच, मुलाला जन्म देताना, तिचा मृत्यू झाला. आप्पासाहेबांनी दुसरा विवाह केला नाही. तो तंत्रमंत्राच्या सहाय्याने आपली भीती जोपासत जगत राहिला. दादासाहेब आजोळीच राहिला. तिथेच विसावं लागतंय तोच आजाने लग्नही लावून दिले. पोर मोठी चुणचुणीत होती. अवघी पंधरा वर्षांची, पण कामाचा उरक असा, की भल्या भल्यांनी पहात रहावं. आजा-आजी नातसूनेवर खुश होते. दादासाहेबासही, कामकाजाची उपजत जाण होती. परंतु मामाच्या मुलाला दादासाहेबाने त्याच्या उत्पन्नात वाटेकरी होणं आवडेना.
एक दिवस बोललाच "तुझ्या वडिलांची एवढी मोठी मालमत्ता आहे, ती जाऊन सांभाळत का नाहीस?"
दादासाहेब बायकोस घेऊन वाड्यावर पोहोचला.