प्रतिबिंब - 9 Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रतिबिंब - 9

प्रतिबिंब

भाग ९


रोज नव्याने, मृतात्म्यांविषयीचे तिचे ज्ञान वाढतच होते. मृतात्म्यास इतर कोणासमोर यायचे असेल, तर प्रचंड कष्ट पडतात. त्याच व्यक्तीच्या शरीरद्रव्यांचा वापर करत त्याला आपली छबी निर्माण करावी लागते. मृत्यूसमयीची तीव्र भावना, इच्छा, याच त्यांच्या दीर्घकाल अस्तित्वास कारणीभूत ठरतात. जितकी भावना तीव्र, तितका तो अहम, त्या भावनेस चिकटतो. कालानुसार तो अधिकाधिक चिवट बनत जातो. ते मन, त्या तीव्र भावनेस घट्ट धरून ठेवते. कारण त्याचे संपूर्ण अस्तित्व त्यावरच अवलंबून असते. मग न संपणारे नरकयातनेचे हे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी निकराची धडपड सुरू राहते.

जाईला मनुष्यस्वभावात आणि यांच्यात अधिकाधिक साम्य दिसू लागले. अहमच्या अस्तित्वाची धडपडच माणसाचे अख्खे आयुष्य व्यापून उरते.

दादासाहेब प्रचंड खुशीत होता. पत्नीचा सहवास त्याला सर्व बाजूंनी सुखावत होता. एक दिवस तो तिला म्हणाला की बग्गी मागवतो, मग भवानीमातेच्या दर्शनास जाऊ. ती बरं म्हणाली. तयार होण्यास वर खोलीत आली. लुगडी कपाटाच्या वर ट्रंकेत होती. ती उंच मेजावर चढली. ट्रंक घेऊन उतरू लागली. शेवंताने मेजास धक्का दिला. ती वरून ट्रंकेसकट खाली कोसळली. ट्रंकेचा वर्मी घाव बसला. जागीच जीव गेला. आवाज ऐकून सगळे धावत आले. दादासाहेब वेडापिसा झाला. कसाबसा शिवाच्या आईबापांनी सावरला. मग त्याने रावसाहेबास शिक्षणासाठी शहरी ठेवले. आपण जाऊन येऊन राहिला. केवळ पुत्रप्रेमाने त्यास जीवंत ठेवले. मुलगा मोठा होताच त्याचे लग्न लावून दिले पण त्यांनी शहरीच राहावे असे सुचवले. बरीच वर्षे मंडळी शहरीच राहिली. रावसाहेब येऊन जाऊन असे, पण पत्नी मुलगा सगळे शहरीच. यशचा जन्मही शहरातलाच. तो बराच मोठा होईपर्यंत वाडा पाहिलाच नाही त्याने. पण मग दादासाहेब वृद्धापकाळाने परावलंबी झाले तेव्हा यशसह मंडळी वाड्यात राहण्यास आली. दादासाहेबांनी विरोध दर्शवला. परंतु त्यांची शारीरिक स्थिती पाहता त्यांना एकटे सोडणे शक्यच नव्हते. लवकरच त्यांचे निधन झाले. वाड्यात दादासाहेबाखेरीज फारसे कोणी राहत नसल्याने आपोआपच शेवंताचा विषय मधली काही वर्षे मागे पडला. गावात अजूनही ओटी प्रथा सुरू असली, तरी तिच्याविषयीच्या आख्यायिका सांगणारी मंडळी एक एक करून काळाच्या पडद्याआड गेली. वाड्यावर आपलेच राज्य, या विचारात तिचा मृतात्माही बहुधा त्या नरकयोनीतही काही काळ सुखावला. रावसाहेब आणि त्यांची पत्नी नेहमीच शहरात वाढलेले, नवीन पिढीतले, त्यामुळे त्या दोघांचा यावर विश्वास नव्हताच. यशला शिक्षणाच्या दृष्टीने गावात ठेवणे त्यांना योग्य वाटेना. मग यशने आणि त्याच्या आईने शहरी रहावे, रावसाहेबांनी येऊन जाऊन असावे असे ठरले. अशीही काही वर्ष गेली. शेवंताला कसलीच आडकाठी उरली नाही. तिचे आता सारे लक्ष रावसाहेबावर केंद्रीत होते. घरचा प्रत्येक पुरूष तिच्या दृष्टीने प्रेमपात्रच होता. त्यामुळेच भाऊसाहेब आणि अप्पासाहेब वगळता इतर कोणाला ती दिसली नव्हती, ना तिच्यापासून काही धोका निर्माण झाला होता. मग एके वर्षी यश, त्याची आई, सुटीत वाड्यावर राहाण्यास आले. यशचे पुढील शिक्षण सुरू होणार होते. काही दिवस तिघे मिळून राहू या विचाराने ती दोघे आली होती. अर्थातच आल्यावर वाड्यात बरेच बदल करावेत असं यशच्या आईला वाटू लागलं. ‘रंगरंगोटी, नवं मॉडर्न फर्नीचर, थोडी रचनाही बदलूया,’ ती म्हणाली. रंगारी, सुतार, सगळ्यांना बोलावणं गेलं. तिने काढून टाकण्याच्या फर्नीचरमधे वरच्या ड्रेसींग टेबलचा नंबर सर्वात वर टाकला. सगळ्यांना कामं समजावून झाली. पुढच्या आठवड्यात यश होस्टेलला गेल्यावर काम सुरू करायचं ठरलं. त्याच संध्याकाळी तिघे बग्गीराईडला बाहेर पडले. बग्गीवाल्याला गावाभोवती मोठी चक्कर मारायला सांगितले. बग्गी फिरत फिरत कलावंतिणीच्या पडीक कोठीजवळ आली. पडीक कोठी आणि जवळ कण्हेरीच्या फुलांनी सजवलेली शेवंताची मठी! सगळे उतरून पाहूया म्हणाले. बग्गीवाल्याने बग्गी बाजूला घेतली. सगळे उतरून मठीजवळ आले. यशने, हे काय आहे असे विचारताच, बग्गीवाल्याने ऐकीव कथा सांगितली. यशची आई जोरजोरात हसू लागली.

"अरे कुठल्या जमान्यात वावरताय? कुणाची मालकी आहे या जागेवर?"

"आपल्याच ताब्यात आहे," रावसाहेब म्हणाले.

"अरे वा, मग छानच की. हे सगळं पाडून मस्त एक हॉटेल बांधू इथे. हायवे लवकरच जायचाय इथून. उत्तम चालेल".

रावसाहेबांनाही ही कल्पना पटली. बग्गीवाला मात्र मनातून घाबरला. पण तो बापडा काय बोलणार? सगळे घरी आले. शेवंता नामक नागिणीच्या शेपटीवरच पाय दिला होता या मालकिणीने. ती धुमसत होती. फुत्कारत होती. बदल्याची आग तिच्या मनमानसाला जाळत होती. जेवण करून रावसाहेब आणि पत्नी वर आले. कपडे बदलून पलंगावर आडवे झाले.

"हे ड्रेसींग टेबल, बाहेरचे ओव्हल टेबल, अॅंटीक म्हणून भरपूर पैसे मिळवून देतील, मला खात्री आहे. मी लवकरच माझ्या या क्षेत्रातल्या काही जाणकार मित्रमैत्रिणींना बोलावून घेते." पत्नी म्हणाली.

शेवंता पलंगाच्या अगदी जवळ उभी होती. आत्ता हिची मुंडी मुरगाळून टाकावी असा संतापी विचार तिच्या मनी येत होता. पण आपलं अस्तित्वच नाहीसं करायला निघालेल्या या अवदसेला अशी सहजासहजी नाही मरू द्यायची. झिजवून झिजवून मारीन. शेवंताने पणच केला.

जाईच्या अंगावर सरसरून काटा आला. प्रथमच, हे सगळं घडून गेलंय हे ती क्षणभर विसरली. कसं थांबवावं हे, हा विचार मनी आला. नेमकी तेव्हाच तिची नजर शेवंतावर पडली. असूरी आनंद या शब्दाचा शब्दश: अर्थ तिचे काळीज थरकापून गेला. यशच्या आईबरोबरच ती जाईच्या ‘स्व’ला मारण्याचा प्रयत्न करत होती. जाईची अगतिकता तिला तिच्यावर नियंत्रण मिळवून देणार होती. जाई क्षणात सावध झाली. तिने मोठ्या पराकाष्ठेने मन अलिप्त केले.

चार दिवसांनी रावसाहेब यशला सोडायला शहरी गेले. यशची आई वर ड्रेसींग टेबलची पाहणी करायला गेली. तिने खोलीत प्रवेश करताच तिला कसली तरी प्रचंड दुर्गंधी जाणवली. काहीतरी भयंकर कुजले होते. एखादा प्राणी वगैरे मेलाय का? पण कालतर काहीच वास नव्हता. बाहेरून येत असेल कदाचित. असं म्हणून तिने दारे खिडक्या घट्ट बंद करून घेतली. मग तिने ड्रेसिंग टेबल नीट पाहायला सुरवात केली. साधारण दोन अडीचशे वर्ष तरी नक्कीच झाली असतील. तिने कयास बांधला. मग नीट निरखून पाहताना तिच्या लक्षात आलं की, आरशाची बांधणी, नक्षीकाम, लाकडाचा प्रकार हे उत्तम फिनीशिंगचे होते तर बाकीचे ड्रॉवर वगैरेचे काम ओबडधोबड वाटत होते. तिने, आरशामागचे कपाट उघडायला खाच होती, त्यात हात घातला तर तिच्या हाताला चिकट, बुळबुळीत असा द्राव लागला. तिने पटकन कपाट उघडले तसे शेवंताचे प्रचंड कुजलेले शव तिच्या अंगावर पडले. ती जोरात किंचाळली पण दारे खिडक्या बंद असल्याने आवाज बाहेर गेलाच नाही. ते शव एकदम अंगावर आल्याने तिचा तोल गेला. ती खाली आणि तिच्यावर शेवंताचे कुजलेले शव. भयातिशयाने ती बेशुद्ध पडली. बराच वेळ झाला तरी वैनीसाब कुठे दिसेनात म्हणून मग शिवा वर आला तर दरवाजा आतून बंद. “झोपल्या असत्याल, जरा येळानं येत्याल खाली” असं वाटलं त्याला. पण बराच वेळ झाला तरी त्या बाहेर येईनात तेव्हा मात्र तो घाबरला. त्याने दार वाजवले, हाका मारल्या, पण काहीच उत्तर नाही. मग मोठं टेबल आणून वर चढवलं बायकोला आणि म्हणाला “दाराच्या वर बारीक खिडकी हाय त्यातून बग काय दिसायलंय.” ती चढली. बघते तो वैनीसाबांचे पाय फक्त दिसायले वरून. “जमिनीवर झोपल्या काय जनू?” आता मात्र शिवा घाबरला. त्याने दोघा तिघांना बोलावून आणले. दरवाजा जोरजोरात ढकलून बिजागरी तोडल्या. दार उघडून आत आले सगळे. वैनीसाब आरशासमोर जमिनीवर पडलेल्या. अंग चेहरा संपूर्ण आक्रसलेला. शिवाच्या बायकोने पाणी मारून उठवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. मग उचलून पलंगावर ठेवले सर्वांनी तर अंग पार लुळं पडलेलं. अंग निखाऱ्याप्रमाणे भाजत होतं. रावसाहेब आले तोवर काही फरक नव्हता. गावचा डॉक्टर त्यांना बघून शहरात न्यायला लागेल म्हणाला. अती ताणाने डोक्यात रक्तस्त्राव झाला असावा असे त्याला वाटत होते. शहरातून डॉक्टरांना बोलावले पण अर्ध्या रस्त्यात गाडी बंद पडून ते पोहचूच शकले नाहीत. इकडे बायकोची ही अवस्था. मग आपणच गाडी घेवून निघावं असा विचार करून गावातील ड्रायव्हरला बोलावणे पाठवले तेव्हा तो शहरातच अडकला आहे कारण गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर झाडं पडून रस्ता बंद झालाय असं कळालं. पत्नी म्हणजे मांसाचा नुसता गोळा. काल जिच्याशी रत झालो ती ही? रावसाहेबास आयुष्यात इतके असहाय कधीच वाटले नव्हते. गावातील डॉक्टर, वैद्य, शिवाच्या सांगण्यावरून मांत्रिकसुद्धा बोलावला. शिवाच्या बायकोने गुपचुप ओटी नेऊन ठेवली. पण नागिणीने डंख मारून झाला होता. चार दिवस जेमतेम ती अशा अवस्थेत जगली. मांसाचा तापलेला गोळा. पाचव्या दिवशी झिजून झिजून प्राण गेला.

जाईच्या शरीरभर मुंग्या येताहेत असा भास झाला तिला. डोकं सून्न झालं. भय पुन्हा एकदा मनावर अधिराज्य गाजवणार हे तिच्या लक्षात आलं. ती उठली. ताजे मीठाच्या पाण्याने भरलेले बाऊल्स तिने जुन्यांच्या जागी भरून ठेवले. वाईट लहरींना शोषून घेण्यासाठी असे करतात असे अलीकडेच तिच्या वाचनात आले होते. आता शहानिशा करत बसायला तिला वेळ नव्हता. ज्यांने हानी नक्की नाही हे पटेल ते सर्व, परिणाम होतोय की नाही याचा विचार न करता, करायचे असे तिने ठरवले होते. तिला केव्हातरी यशच्या बोलण्यातून समजलेले संदर्भ आठवले. यशला रावसाहेबांनी मर्तिक झाल्याबरोबर शहरी जाऊन आईच्या मृत्यूबद्दल सांगितले. जरा ताप आला आणि तो डोक्यात गेला असे सांगितले. दुसरे काही त्यांना तरी काय माहीत. त्याने आता वाड्यावर येऊ नये आणि स्वत:स जपावे असे सांगितले. वडिलांना असे हळवे होताना तो प्रथमच पहात होता. आई गेल्याचे दु:ख होतेच वर वडिलांची ही अशी हळवी अवस्था. त्या क्षणात तो कित्येक वर्षांनी मोठा झाला.

मग तो म्हणाला "बाबा, आता तुम्हीही सगळं विकून टाका. शहरात या. आपण एकत्रच राहू. आईला तेच आवडेल."

रावसाहेब अकाली प्रौढ झालेल्या आपल्या मुलाकडे पाहत राहिले. आपण सावरायला हवे हे त्यांना जाणवले. "शिक्षण होईपर्यंत हॉस्टेलवर रहा. मित्रांची संगत बरी या वयात. तोपर्यंत मी ही तिथले बस्तान हलवतो" रावसाहेब म्हणाले.

त्यानंतर यशने स्वत:भोवती एक अदृश्य कोटच बांधून घेतला. तिथे त्याने सगळ्यांना प्रवेश नाकारला. ना मित्र, ना मैत्रिणी. भयंकर शिष्ठ आहे असंच म्हणत सगळे. मुलींच्या मते देखणा, पण कोरडा, इनसेंसेटीव्ह. मग फारसे कोणी वाट्यालाच गेले नाही. तो त्या कोशात सेफ फील करायचा. कोणी फार जवळ यायला नको आणि मग ते अपरिहार्य दु:खही नको. लग्न-बिग्न करायचंच नाही हे ही त्याने त्या कोवळ्या वयातच ठरवून टाकले होते. जाईला बघेपर्यंत हे निश्चय कायम होते. तिच्या प्रथमदर्शनातच हा भक्कम बांधलेला कोट ढासळू लागला. जाई विचार करू लागली. ‘काय होतं असं आपल्यात? चारचौघीत उजवी असेन रुपाने पण सौंदर्यखणी नक्कीच नव्हे. यातही काही ऋणानुबंधच असावा का?’