तोच चंद्रमा.. - 7 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोच चंद्रमा.. - 7

पार्टी!

दोनएक दिवस गेले. बाबांचा रेड अॅलर्ट संपला एकदाचा. तिकडे आॅफिसात बसून कंटाळले म्हणावे, तर आले घरी तेव्हा एकदम खुशीत होते.

"काय अंबू.. अंबुजा सिमेंट .. हाऊ आर यू?"

बाबांची ही जुनी सवय होती.. अंबर नावाचा जमेल तितक्या पद्धतीने अपभ्रंश करायचे खुशीत आले की. कधी अंबुजा, कधी आंबोळी तर कधी अांबिल.. अंबाबाई .. अंबालिका.. कधी समानार्थी शब्दांनी मारायचे हाक.. ख.. आकाश.. नभ.. गगन.. स्काय वगैरे! असे झाले की समजावे, त्यांचा मूड चांगला आहे!

"मी काय.. मजेत आहे. इंटरव्ह्यूची तयारी करतोय."

"गुड. आज संध्याकाळी तयार रहा.. राॅबिन .."

"यस्सर.."

"अरे आज वेलकम पार्टी अाहे ह्या अंबीहळदीची. बी रेडी!"

"यस्सर .."

पृथ्वीवरून नवीन कोणी आले की अशी पार्टी होते म्हणे. ग्रँड वेलकम अाॅन मून! मून लँडिंग पार्टी म्हणतात तिला. मून लँडिंग नंतर आता तीन एक आठवडे उलटून गेलेले. राॅबिनला माझ्या मनातले लक्षात आले असावे ..

"अरे ब्रो.. यू नीड दॅट मच टाईम टू अॅक्लमटाईझ! त्यानंतरच होते ही पार्टी. सगळे सरकारी मून इंडियातले येतील तिथे!"

"ओ के! आज संध्याकाळी."

"तू पण तयार रहा.."

बाबांनी आईला सांगितले. आई आपल्या लिहिण्यातून डोके वर काढत म्हणाली, "हो.. खूप दिवसांत बाहेर नाही पडले घराच्या.. जाऊयात. ते घारपुरे आहेत की गेले परत?"

"घारपुरे? अगं ते कधीच परत गेले पृथ्वीवर. इकडचे सगळ्यांना मानवते थोडीच? तू अशी अॅडजस्ट झालीस म्हणून ठीक पण सगळेच नाही करून घेत."

"हुं. त्यात काय एवढे. तिकडे काय नि इकडे काय.. उलट इकडे लिहायला वेळ मिळतोय मला. दहा भाग झालेत लिहून."

"वा! लेखिका बाई. मराठी साहित्याला हे माझे योगदान म्हणावे लागेल.."

"वा! लिहिते आई.. आणि क्रेडिट तुमचे?"

"अर्थात अंबू.. मी चंद्रावर आलो नसतो तर तिने लिहिले असते का सारे?"

"वा! व्हाॅट ए लाॅजिक! पण आईचे पुस्तक झाले की मी पण वाचेन. आयॅम इगरली वेटिंग. मीन व्हाईल आई काही अडले तर विचार.. आय अॅम देअर!"

मी गंमतीत म्हणालो. मला पण उत्सुकता होती काय लिहित असेल ती याची. पण पूर्ण झाल्यावाचून ती वाचायला देतच नाही. त्यात ती एक रफ.. मग माॅडिफाइड.. मग रेक्टिफाइड.. मग फायनल ड्राफ्ट बनवते. लिहायला इतका वेळ लागावा आजच्या या सुपर फास्ट युगात?

दुपारी मला एकटाच पाहून राॅबिन बसला समोर..

"अंबर ब्रदर.. पार्टी .. मजाय तुझी"

"मजा.. माझी?"

"अर्थात. म्हणजे एक संधी आहे.."

"कशाची?"

"तीच.. न्यू बिगिनिंग! अरे इकडे कमीत कमी दहा मुली आहेत तुझ्या वयाच्या.. चान्स आहे. आणि तुझ्यासारखे एलिजिबल बॅचलर्स कुठेत इकडे?"

मी काही बोललो नाही पण राॅबिन म्हणाला त्यात तथ्य होतेच. पण उगाच मला काही फरक पडत नाही हे दाखवायला म्हणालो,

"ओ राॅबिन डिअर, तुझी ती क्युरी पण येईल ना? म्हणून खूश दिसतोयस!"

मला वाटले, प्रोग्राम्ड असता तर लाजला असता राॅबिन!

"हुं.. जनाब अपना देखो पहले.. नोकरी पुढच्या आठवड्यात मिळेल.. छोकरी मिळते का पहा आजपासून.."

राॅबिन एखादा मित्र बोलावा त

तसा बोलत होता माझ्याशी.

"हे बघ.. अजून एक.. त्या दिवशी तुला टेन्शन अाले ना.. की तू नसताना मी मॅडमना सारे सांगेन.. तर मी आॅटो प्रोग्राम चेंज करून माॅडिफाय केलाय.."

"म्हणजे?"

"माझ्या ह्युमन ब्रेन इंटरफेजवर टाकून ठेवलेय हे.."

"काय?"

"हेच.. कुठल्याही मुलीबद्दल तू काही बोलशील किंवा आपले जे बोलणे होईल ते फक्त रेकाॅर्ड होईल.. रिवांईड नाही होणार!"

"म्हणजे?"

"तू ट्यूबलाईट आहेस काय?"

"ट्यूबलाईट? राॅबिन तू हा शब्द कुठे शिकलास? तुझ्या मशिनीत ट्यूबलाईटचा असा अर्थ नसणारच.."

"ब्रो, डोन्ट फरगेट.. त्यादिवशी तूच शिकवलास हा शब्द मला! डोन्ट बी लाइक विसराळू विनू.. नाऊ डोन्ट आस्क मी.."

"आय नो.. मीच तुला हा शब्दही शिकवला.. ओके.."

"तर.. नाऊ यू कॅन टेल मी एव्हरीथिंग.. मी ते सीक्रेट ठेवेन!"

"वाॅव! राॅबिन यू आर अ डार्लिंग!"

"सो.. तयार हो. मस्त जॅकेट घाल. नि जीन्स. यू शुड लुक डॅशिंग.."

"डॅशिंग आणि स्पेससुटात? अरे संध्याकाळी स्पेससूटच घालायचाय.. जास्त तयारीची गरजच नाही ना?"

"अरे नो नो.. तिकडे पार्टी हाॅल आहे.. इट्स लाईक होम. स्पेससूट काढून ठेवायचा तिकडे. बघशीलच पोरी कशा नटूनथटून येतील त्या!"

"आणि तुझी क्युरी पण?"

"हा! हा! क्युरी येईल, मार्था येईल, आणि केविन नि कोपर्निकस पण येईल!"

"हे कोण?"

"अर्थात माझे काँटेपररीस्.. माय फेलो ह्युमनाॅईड्स!"

"वा! ते ही तुझ्या सारखेच आहेत?"

"तुला सांगू .. माणसांच्या दुनियेत असतील कुणी उच्च नि खालचा.. आमच्या इथे आॅल आर इक्वल! उगाच भेदाभेद नाही आमच्यात!"

बोलता बोलता राॅबिनने मानवजातीला असा चिमटा काढावा ना? राॅबिनला बरे ठाऊक हे सारे.. आणि त्यात चुकीचे ते काय होते? माणूस वागतोच असा.. बहुतेकदा!

संध्याकाळी पार्टीत चांगलीच गर्दी होती. म्हणजे आपल्या पृथ्वीच्या मानाने काहीच नाही पण इकडे आल्यावर सारे कसे मोकळे बघायची सवय झालेली त्या मानाने गर्दी म्हणावी.

हाॅल म्हणजे एक मोठाला तंबू होता. बाहेर स्पेससूट काढायला भली मोठी जागा. आणि आत तंबू सारख्या जागेत पार्टीचा हाॅल. सुंदर सजावट. मध्ये कारंजी, झुंबरं आणि विविध रंगांचे दिवे. आत थंडी असेल तर हीटर नि उष्ण हवा असेल तर एअर कुलिंगची सोय. अशी गेट टुगेदरे क्वचित होत असावीत. कारण झाडून सारे आले असावेत पार्टीला असे गर्दी पाहून वाटत होते. तेवढेच सगळ्यांना बाहेर पडायला मिळत असावे.. तेही चांगले चुंगले कपडे घालून. नाहीतर स्पेस सुटाखाली कोणी काय घातले असावे.. त्याने काय फरक पडणार होता? त्यामुळे ठेवणीतले कपडे घालून लोक येत होते. बहुतेक एकेकटे. काही आपल्या बायकोला घेऊन. नि अगदीच थोडे, ज्यांच्या बरोबर त्यांची मुले असतील इथे.

"अंबर ब्रदर, इथे यंग हँडसम आणि एलिजिबल बॅचलर तूच एकटा. मला विचार .. मोजून दहा मुली आहेत. दोन महिन्यापूर्वी एक मुलगी आलीय.. पण ती लग्न करून शिफ्ट झालीय. बाकीच्या आहेत इथे.. बघशीलच तू.."

राॅबिन बोलत असतानाच पाठून हाक आली,

"अंबर राजपूत? तू इकडे?"

आवाज ओळखीचा होता नि अनपेक्षित होता. मागे वळून पाहण्याआधी छाती धडधडली माझी. कारण तो थेट वर्षाचा वाटला मला आवाज..

तसा वाटायला कारण होते.. कारण तो तिचाच आवाज होता.. चक्क वर्षा इथे?

"तू इथे? मी आश्चर्याने किंचाळलोच."

"दुनिया गोल आहे नाही?"

"हुं.. आहे.. असेल.. बट राँग उदाहरण.. आपण दुनियेच्या बाहेर आहोत.."

"खरेय. तर तो तू आहेस.. ज्याच्यासाठी आहे ही पार्टी! तुला पाहून किती आनंद झालाय सांगू.."

तीच वर्षा.. तशीच सुंदर.. माझ्यापुढे मलाच सांगतेय .. किती आनंद झालाय म्हणून! काॅलेजात असताना ही इतके बोलले नसू आम्ही. आणि तेव्हा बोलली असती तर कशाला उपद्व्याप केला असता इकडे येण्याचा?

खरे सांगतो, पुढच्या काही क्षणात मी जे काही केले त्याला मनात मांडे खाणेच म्हणता येईल. माझी नि तिची जोडी जमेल आता.. तशी स्पर्धाच नाही इकडे.. आणि बहुधा हेच विधीलिखित असावे.. नशिबात असलेल्या गोष्टी मिळतातच.. कुठल्याही पद्धतीने का होईना! कुठल्या कुठल्या पोथ्या पुराणात नि कुठल्याशा स्वामी नि बाबांनी सांगितलेले ते.. 'जे होणार ते होणारच' अशा काही अर्थाचे वचन आठवून गेले मला. आता माझे मन त्या कारंज्यासारखे थुईथुई नाचायला लागणार तितक्यात वर्षा म्हणाली,

"हल्लीच शिफ्ट झालेय इकडे. लग्नानंतर!"

बोलता बोलता ती मंगळसूत्राशी चाळा करत होती!

माझ्या मनातले मांडे मी पटकन् खाऊन संपवले. अशा वेळी बोलावे तर काय बोलावे? मी दूर कुठे तरी एक माणूस उभा होता त्याला हात केला.. आणि वर्षाला 'एक्स्यूज मी प्लीज' म्हणून निघून गेलो. असे काही होईल असे स्वप्नातही पाहिले नसते मी. आजवरचा ब्रेकअपच्या बँडेज करकरून बांधलेल्या पट्ट्या उघड्या होणार .. जखम भळाभळा वाहणार की काय परत? मी निघालेला पाहून राॅबिन मागोमाग आला,

"व्हाॅट्स मॅटर ब्रो?"

मी रडवेला होता होता सावरलो.

"नंतर सांगतो तुला .."

"एक मिनिट यार.. ही अँटीरूम आहे.. कमाॅन. इथे कुणी येणार नाही .. तू खूपच अपसेट दिसतोयस.."

आम्ही त्या रूम मध्ये शिरलो. मी राॅबिनला काय घडले ते सांगितले तसा तो हसत सुटला ..

"व्हाॅट यार.. तू क्लोज करून आलेला तो चाप्टर .. व्हाय आर यू ओपनिंग इट अगेन..आता डबल हार्टब्रेक? दॅट्स नाॅट डन .. यू नीड टू स्टार्ट न्यू चॅप्टर यार.."

"पण राॅबिन .."

"यू आर नाॅन सेन्स.. मूव्ह अाॅन यार. असा रडतोंड्या गेलास तर असलेल्या दहा पोरी पण बघणार नाहीत तुझ्याकडे.."

राॅबिन म्हणाला त्यात तथ्य होते. असेही मी वर्षा प्रकरण विसरून गेलेलो. खरेतर त्यात प्रकरण म्हणावे असे काही नव्हतेच. तरीही ती दोन मिनिटे .. मनात मांडे खाण्याची.. चांगलीच महाग पडली मला. त्या दोन मिनिटांत मी उगाच विद्ध झाल्यासारखा विव्हळू लागलो. खरेतर माझे उद्दिष्ट होते आता येणाऱ्या साऱ्या जणी मिळून पाहाणे. आणि निर्णय घेणे. त्यात हातून जी गेलीय तिच्यामागे रडण्यात काय अर्थ होता? वन शुडन्ट क्राय ओव्हर उतू गेलेले दूध. मी एकाएकी उठून म्हणालो, "राॅबिन ब्रदर.. यू आर राईट! तू म्हणतोस तेच खरे आणि तेच बरे.. चल जाऊ बाहेर!"

पार्टीत आता अजून लोक आलेले. आॅफिशियली घोषणा होईल म्हणे.. वेलकम टू न्यू कमर मि.अंबर राजपूत.. मग कुणी गाणे गाईल.. कुणी नृत्य सादर करेल.. काही अजून कार्यक्रम.. मग जेवण!

सारे यथासांग झाले. माझ्या नावाची घोषणा होताच मी स्टेजवर गेलो.. वर्षाने मला खालून चिअर अप केले! आणि बाकी मुली माझ्याकडे पाहात होत्या.. हे मी चोरून पाहून घेतले.. वर्षाने चक्क गाणेही गायले .. 'तुम जो मिल गये हो.. तो ये लगता है.. ये जहां मिल गया!' हेच ती तेव्हा माझ्याकडे पाहून म्हणाली असती तर? जेवण्याच्या वेळात बाकी तीन चार मुली भेटल्या. बऱ्यात तशा. सायली, ज्योती आणि विद्या. तिन्ही मराठी. चौथी होती एल्ली .. गोव्याची. चांगलीय पण कोंकणी कळतेय कुठे मला? अर्थात चौघींकडे पाहूनही कुछ कुछ होता है नाही झाले मला.. त्यातल्या त्यात सायली आवडली मला, ती वर्षाची मैत्रीण म्हणून. अर्थात इथे येऊन झालेली. तिच्याशी ओळख करून देताना वर्षा म्हणाली,"मीट धिस स्डुडियस बाॅय फ्राॅम माय काॅलेज.. ह्याचे अभ्यास सोडून कशात लक्ष असेल तर शपथ! ही वाॅज मोस्ट वाँटेड अमंग अस गर्ल्स.. पण या भोळ्या शंकराचे कुठे लक्ष असेल तर ना!"

बाप रे! ह्यालाच इंग्रजीत 'इन्सल्ट टू इंज्युरी' म्हणत असावेत का? म्हणजे कदाचित वर्षा देखील? की आता हे उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढवणे? काश! पण काही असले तरी अाता त्याचा उपयोग नव्हताच. माझ्या नव्या फिलाॅसाॅफर गुरूचे, म्हणजे राॅबिनचे ऐकून भूतकाळाचे भूत गाडलेलेच बरे!

पार्टी चांगली झाली. बाबा तिकडे सीनियर. त्यामुळे त्यांना आणि आईला खास मान होता. मी नवा म्हणून लोकांचे माझ्याकडे लक्ष होते. आणि.. राॅबिनही माझ्यावर नजर ठेऊन होता!

बाकी काहीही होवो, पार्टीचे माझ्यासाठी फलित इतकेच.. काही पोरी विचार करण्याजोग्या आहेत. पण नथिंग अॅट फर्स्ट साईट! रात्री बराच वेळ बसून होतो. पार्टीत घडलेले आठवत. राॅबिन कसा काय नाही आला? मला आश्चर्य वाटले. कदाचित थकला असेल.. त्यांच्यात पण थकतात का कुणी? कोण जाणे.

दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा गेले आॅफिसात नि राॅबिन उगवला.

"हाय ब्रो! हाऊ आर यू? उठलायस की अजूनही स्वप्ने पाहतोयस.. कोण मग? सायली की एल्ली?"

"चूप. कुठे होतास? मला वाटले तूच स्वप्न पाहत झोपलास की काय.. मादाम क्युरीची. बट राॅबिन शी इज गुड यार.. काय जोडी शोभेल.. आय टेल यू.."

"ब्रदर .. वेक अप.. रात्री काय झाले तुला ठाऊक नसेल.. पण तुझी जोडी इथल्याच कुणाशी जमवण्याबद्दल साहेब बोलत होते. ते माझ्याकडून सगळी माहिती घेत होते.."

"सगळी?"

"म्हणजे इकडच्या सगळ्या मुलींची!"

"मग?"

"मग काय.. मी दिली!"

"कुणाकुणाची?"

"घाबरू नकोस.. वर्षाराणी सोडून .."

"चूप.. तू दुष्ट आहेस का रे थोडासा?"

"थोडा नाही .. खूप. पण मी तुझे ब्रेन मॅपिंग केले काल तिथेच .."

"व्हाॅट?"

"यस्स.. माय कन्क्लूजन इज.. यातल्या कुठल्याही मुलीबद्दल तुला तसे काही वाटलेले नाहीये.. अॅम आय राईट?"

"तू काय क्राॅस चेक करतोयस? बट यू आर राईट डिअर राॅबिन! आणि मी पण केले तुझे ब्रेन मॅपिंग .. त्यात क्युरीला पाहून कुछ कुछ होता है राॅबिन भय्याला.."

राॅबिन हातातल्या मशिनीवर पाहू लागला.

"ओह! बट आयॅम नाॅट फ्राॅम यूपी? देन व्हाय भय्या?"

प्रसंगनिष्ठ विनोद म्हणून हा चांगला होता विनोद!

त्याला जास्त न समजवता म्हणालो, "इ का बात करत हो तुम राॅबिन भइया .. हमरी समज मा नाही आवत.."

राॅबिन गोंधळला चक्क! त्याच्या हातचे मशीन त्याला कसली मदत करतेय या हिंदी भाषांतराला!

थोडक्यात पार्टीचे रामायण संपले. रामाची सीता कोण हे ठाऊक होते सर्वांना.. पण माझ्या घरातले चंद्रावर माझ्यासाठी चांदणी शोधत होते!

आणि मी?

लवकरच येणाऱ्या इंटरव्ह्यू मधून एक नोकरी! छोकरी विल फाॅलो!