तोच चंद्रमा.. - 12 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

तोच चंद्रमा.. - 12

१२

तोच चंद्रमा नभात!

घरी आलो तर आई वाटच पाहात होती.

"उशीर झाला रे?"

"हो ना! अगं हा राॅबिन आला होता आॅफिसात. त्याच्या बरोबर बागेत गेलो.. गप्पा मारत बसलो तर थोडा उशीर झाला."

"असू देत. तुझे बाबा आज बाहेर गेलेत. त्या मून चायनाच्या मून इंडिया काऊन्सलेटमध्ये. मग तिकडे उशीर झाला तर कदाचित उद्या सकाळी येतील. आणि तू आलास ते बरे झाले.. पुस्तक लिहून झालेय माझे एकदाचे. पहिला ड्राफ्ट. वाच एकदा. मग अजून सुधारेन.."

"वा! बघू.. वाचतो लवकरच."

"जेवून घे आधी नि मग.. राॅबिन .."

"यस मॅडम.. डिनर मॅडम."

"हुं.. अंबर थकलेला दिसतोय .."

एरवी राॅबिन काही न काही गंमतीदार बोलला असता यावर.. खास करून कालच्या त्या पार्टीनंतर. पण आता तो अतिच गंभीर मूडमध्ये आहे.. म्हणजे ह्युमनाॅईड्सना पण मूड्स असतात?

जेवण झाल्यावर आईने ते बाड हाती दिले. ते घेऊन मी जाऊन बसलो आपल्या खोलीत. खरे सांगतो, कालचा मूड आज बदलला होता. काल या वेळी ब्रुनीसोबत होतो मी. काल तिच्याकडे पाहात बसलो होतो नि आज तिच्या टायटॅनिक ओळखीने हललो होतो. म्हणजे मला त्या परग्रहावरील ओरिजिनने फरक पडत होता असे नाही पण त्यामुळे सारे काही कसे होणार, किंवा होणार की नाही याचे टेन्शन. राॅबिन म्हणाला ते दुर्लक्ष करण्यासारखे नव्हते हे खरे. त्यामुळे पुस्तक वाचण्याचा मूड नव्हता हेही खरे. ते बाजूला ठेऊन झोपलो डोळे मिटून. झोप लागेना. कालची ब्रुनीची आठवण.. मंतरलेल्या संध्याकाळचे ते क्षण. तिची नि माझी गप्पा मारता मारता झालेली ओळख .. माझे गिटारवर खरेतर तिच्यासाठी आणि तिलाच उद्देशूनच 'चुरा लिया है तुमने जो दिलको' वाजवणे.. आणि माझ्या गिटार वादनाबद्दल तिने कौतुकाने बोलणे.. आणि अगदी शेवटचे ते शब्द.. आमच्याकडे गिटार हे वाद्यच नाही हे सांगणे.. आणि कळस म्हणून आज राॅबिनने ती परग्रहावरून आलेली आहे हे सांगणे! चोवीस तासांत काय उलथापालथ झालीय माझ्या मनात. वर्षाला मी माझ्याच शामळूपणाने गमावलेले.. पण तेव्हा वय कमी होते माझे. आता ही चूक करून चालायचे नाही. ज्या पद्धतीने वर्षा बोलत होती काल, थोडा लाजाळूपणा सोडला असता तर आज आम्ही दोघे कदाचित पृथ्वीवर असतो किंवा ती मिसेस राजपूत म्हणून आज इथे असती माझ्यासमोर. थोडक्यात काही हातपाय हलवायला हवेतच. सुनर दॅन लॅटर .. फाॅर इट टू मॅटर!

झोप काही येईना नि बघू आईने काय लिहिलेय म्हणून ते बाड उघडले मी. पुस्तकाचे नाव होते.. 'तोच चंद्रमा नभात..' एकूण आई इकडे आली त्यानंतर चंद्रावर सुचलेले कथानक असावे .. आणि त्यात चंद्र तितकाच महत्त्वाचा असावा! प्रस्तावनेत तेच म्हटलेले.. इथे येऊन एक वर्ष झाले.. आता ह्या वर्षात आजूबाजूस पाहून सुचलेली ही प्रेमकथा!

प्रेमकथा! हे वाचताच मी उडालो. मला वाटले काही गंभीर कथानक असेल.. तर ही निघाली लव्हस्टोरी! वाचलीच पाहिजे म्हणत मी वाचायला लागलो ..

रात्री जागून वाचून काढली कादंबरी. छान. म्हणजे कथानक घडते ते चंद्रावरती. एक तरूण मुलगी येते चंद्रावर रहायला. ती इकडे कुठलीतरी नोकरी शोधत येते. चंद्रावर तशी नोकरी मिळतेही. इकडे चंद्रावरच्या एकूणच वातावरणाचा आढावा होता. ती तरूण मुलगी कशी जुळवून घेते तिकडे याबद्दल सगळे वर्णन होते.. पुढे प्रेमकथा म्हटले तर अर्थातच तिला कुणीतरी भेटतो चंद्रवासी. दोघांच्या आणाभाका होतात. पण दोन्ही घरून विरोध .. दोघांनाही. कधी चंद्रावर कायमची राहिल मुलगी याबद्दल आक्षेप.. तर कधी चंद्रावरच्या संस्कृतीवर.. किंवा तिच्या अभावावर आक्षेप. त्यात जात वेगळी असणे, भाषा भिन्न असणे वगैरे नेहमीचे यशस्वी मुद्दे तर आहेतच.. पण दोघेही खमके निघतात .. प्रेमाला कसलाच अडसर नाही ..'चंद्रावरीलच काय.. उद्या कुणी परग्रहावरून आलेल्या व्यक्तीच्या प्रेमाचा पण स्वीकार करीन मी..' ती नायिका बाणेदार उत्तर देत राहते.. आणि गंगेत घोडे न्हाते! 'ना उम्र की सीमा हो.. ना जन्म का हो बंधन.. जब प्यार करे कोई तो देखे केवल मन..' या नोटवर पुस्तक संपवलेले.

म्हटली तर साधी प्रेमकथा.. त्यात चंद्रावरील वातावरण.. मुलगा चंद्रावरचाच.. आणि पुढे कधी घडले हे तर.. कुण्या परग्रहावरून आलेल्याच्या प्रेमकथा ही घडू शकतात ही भविष्यातली एक हिंट!

याहून जास्त योगायोग कुठला असू शकतो? ब्रुनीशी ओळख होणे.. मग ती एलियन असणे ज्या दिवशी कळावे त्याच रात्री या पुस्तकात अशी प्रेमकथा वाचायला मिळणे.. आणि एकूण लिखाणातून किमान आईचा त्याला विरोध नसावा असे वाटणे.. मी मनातून खूश झालो. किमान ब्रुनी एलियन आहे म्हणून तरी तिला घरून नकार मिळणार नाही. मनावरचे एक ओझे उतरले माझ्या. याहून मोठे सरप्राईज कुठले मिळणार मला?

रात्रीचे तीन वाजले असतील. हळूच राॅबिनला बोलावून सारे सांगावेसे वाटले. बाहेर आलो तर आई जागीच होती..

"झोपली नाहीस अजून?"

'अरे, लिहून झाले ना.. एकदम रिकामे वाटतेय. झोपच नाही येत.."

"हुं. खूप दिवसांपासून लिहित होतीस ना?"

"हो ना. आपण लिहितो ना तर ती पात्रे तेवढे दिवस अापल्या विचारांचा एक भाग बनतात बघ. पात्रे काल्पनिकच पण मनात जिवंत वाटायला लागतात. कधी तर आपणच त्यांच्याशी बोलतोय असे वाटायला लागते. आणि आता हातावेगळे झाले लिखाण तर .. वन स्टार्टस मिसिंग देम. झोपच येत नाही .."

मी ही संधी हातची घालवणार थोडीच होतो..

"मी वाचले ते पुस्तक .."

"अख्खे?"

"होय. माझा स्पीड ठाऊक आहे तुला.."

"कसे वाटले तुला?"

"मस्त! अगदी छान भाषा आहे आई तुझी. एकाचवेळी खेळकर नि गंभीर भाष्य करणारी."

"हुं. पण गोष्ट कशी आहे?"

"छानच. फक्त तू म्हटलेस ते एलियन्स बद्दल .."

"म्हणजे?"

"म्हणजे एलियन्स आहेत हे ठाऊक आहे तुला?"

"नाही रे. पण असणारच .. किती पुढे गेलोय आपण! अरे माझ्या लहानपणी मी चंद्र दुर्बिणीतूनही नव्हता पाहिला. मी काॅलेजात असताना ही चांद्रयाने जायला यायला लागली. तेव्हा कुणी सांगितले असते की मी एक दिवस याच चंद्रावर येऊन राहिन.. तर पटले असते कुणाला? तसेच हे. असणार कुणी ना कुणी परग्रहावर. पाहिले नाहीत म्हणून नाही का म्हणावे?"

"पण अगदी कुठल्या पृथ्वीच्या रहिवाशाशी लग्न करण्याबद्दल .."

"ते एकूण माणसाच्या भेदाभेद करण्याच्या वृत्तीबद्दल रे. आणि मला सांग, जर समजा असतील एलियन्स पण माणसासारखे .. म्हणजे वागणुकीत नाही हां.. तर एकूण दिसायला, असायला माणसासारखे तर का होऊ नयेत असली लग्नं? थोडा हायपोथेटिकल वाटेल कुणाला पण.. वसुधैव कुटुंबकम् म्हणजे तरी दुसरे काय? तुला काय वाटते?"

"मला? मला काय वाटायचंय!"

आईची हायपोथेटिकल सिच्युएशन लवकरच सत्यात येणार हे आईला कुठे ठाऊक होते? अर्थात हे सारे ब्रुनीचा होकार गृहित धरून म्हणत होतो मी! पण एक झाले, कमीत कमी आईची बाजू तरी कळली. आता बिनघोर घोरायला.. म्हणजे झोपायला हरकत नाही! राॅबिनला न जागवता मी जाऊन झोपी गेलो. पुढचे पुढे!