९
ब्रुनी!
नव्या नोकरीचा पहिला दिवस! सकाळ सकाळी माझा खास टाय आणि जाकिट घालून आॅफिसात गेलो. कृष्णन माझी वाट पाहात असावेत.
"हॅलो यंग मॅन. वेलकम टू न्यू आॅफिस. लोढा आणि गुंदेचा बिल्डरच्या या आॅफिसात तुझे स्वागत आहे.
आज आपला खास दिवस. वेलकम टू द न्यू एम्प्लाॅयी मि. अंबर राजपूत."
एवढे बोलून त्यांनी बेल वाजवली. त्याबरोबर आॅफिसातून सारा स्टाफ येऊन उभा राहिला. त्यात हर्ली तर होतीच अाणि दोन मुलं नि चार मुली होत्या. बाकी सारे ह्युमनाॅईड्स. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले माझे. वेलकम स्पीच झाले. आॅफिसबद्दल नि कामाच्या पद्धतीबद्दल भाषणे झाली. मग समोसे आले.. चहा आला.. एक तास असा प्रोग्राम चालला. गप्पा झाल्या. हर्ली वगळता चार पोरी अजून होत्या. त्यांचे दर्शन झाले. ह्युमनाॅईड्सची ओळख झाली. चांगले होते तेही, पण राॅबिन त्यांच्याहून खास वाटला मला. कदाचित माझा मित्र असल्यामुळे असेल. एकूण इकडचे वातावरण छान होते. आपल्याकडची काॅर्पोरेट आॅफिसेस पाहिलेल्या मला आवडले ते.. आणि ते तसे असणे अनपेक्षित होते. आपल्याकडे सगळे टारगेट ओरिएंटेड आणि घड्याळ्याच्या काट्यावर.. खरेतर सेकंद काट्यावर चालणारे .. इकडे काम आहे, कामाची शिस्त ही आहे पण डोक्यावर टांगती तलवार नाही .. अर्थात हे पहिल्या दिवशीचे इंप्रेशन होते.. आणि तशी इकडून तिकडून माहिती गोळा केलेली मी. मग घोषणा झाली, आज दुपारी माझ्या स्वागतासाठी खास पार्टी!
मला गंमत वाटली. त्या तिकडे म्हणजे पृथ्वीवर कुणी आले नि गेले तर कुणी दखल घेत नाही. आणि इकडे असे स्वागत. आणि असे स्वागत सगळ्याच नवीन येणाऱ्यांचे होते म्हणे. म्हणजे आपण तिकडे पृथ्वीवर काय काय मिस करत असतो नाही? इकडे माणसेच कमी म्हणून माणसांना माणसांची किंमत कळत असावी!
काम चांगलेच इकडे. साऱ्या आॅफिसेस मधल्या अकाउंट्सच्या फायली. सगळा रेकॉर्ड काॅम्प्युटर मध्ये. कृष्णन आणि त्यांच्याबरोबर एक पंजाबी साहेब .. मि.भैरोसिंग कैरो. त्यांच्याकडे पाहून पहिला प्रश्न पडला.. त्यांच्या त्या पगडीवर स्पेससूट त्यांना कसा फिट होत असेल? पण दोघे चांगले स्वभावाने. सगळे समजावून दिले दोघांनी आणि मी कामाला लागलो.
दुपारपर्यंत बिझी होतो मी. तसा माझा आवडीचा नि हातखंडा विषय. पण सारा रेकॉर्ड इतस्ततः पसरल्या सारखा. सगळ्याची व्यवस्था लावायची तर महिना पुरणार नाही.
मी तसे म्हणालो तर कैरो म्हणाले, "ओए पुत्तर, की जल्दी है.. ले ले अपना टैम.."
मी कामाला लागलो. खूप दिवसांनी असे काम करत होतो. हाताला काम आणि पगार सुरू. म्हणजे बहुतेक आयुष्य मार्गी लागलेच म्हणावे!
अशा विचारात असतानाच लंच टाईमची बेल वाजली. आणि सारे आॅफिस लंच हाॅलकडे निघाले. कृष्णन सर म्हणाले, "सो, सेट?"
"यस सर.. "
"कम. आज तुला वेलकम लंच आहे.."
"थ्यांक्स सर.."
लंच हाॅल मोठा होता खूप. समोर टेबलावर सारे मांडून ठेवलेले. आणि ती सारी व्यवस्था बघणारी
एक मुलगी होती.. तिच्या बॅजवर नाव होते.. मिस ब्रुनी.
"ब्रुनी, नाईस अरेंजमेंट.. अॅट शाॅर्ट नोटिस .." कृष्णन म्हणाले.
"थ्यांक्स. पण माझे कामच आहे हे.." ब्रुनी.
ही ब्रुनी सकाळी नव्हती. म्हणजे आॅफिसची स्टाफ नसणार. होती खूप छान. म्हणजे दिलकी तार क्षणार्धात छेडणारी अशी ..
"मीट अवर न्यू कमर.. हा अंबर राजपूत." त्याच्यासाठीच आज ही पार्टी आहे.
"हाय!"
तिने हात पुढे केला. तिचा हात हातात घेत म्हणालो, "हाय! ?"
चांगलाच मऊ होता तिचा हात. मृदू म्हणावा असा.
हाय! ब्रुनी! हीच ती जिला मी शोधतोय. हाय! आता हिची स्वप्ने पडणार ..? ही केटरिंगवाली मुलगी?
"अंबर ही ब्रुनी. मून अँड मून केटरिंग सर्विसेसची हेड अँड होल अँड सोल.."
"अौर पुत्तर .. हमारी अन्नदाता!"
हे अन्नदाता प्रकरण मला नंतर कळाले. चंद्रावर अन्नधान्य नि हे सारे नाॅनव्हेज कुठून येत असावे? हा विचारच कधी आला नव्हता मनात तोवर. त्याचे उत्तर मला ब्रुनीकडूनच नंतर मिळाले. नंतर म्हणजे तिच्याशी ओळख झाली चांगली .. एकदा ती मुद्दाम भेटायला आली आॅफिसात.. तेव्हा. हे सारे जेवण म्हणे मूळ स्वरूपात म्हणजे अगदी सूक्ष्म रूपात पृथ्वीवरून येते. म्हणजे चिकन सेल्स येतात. किंवा वेगवेगळ्या भाज्यांच्या सेल्स येतात. मग ब्रुनी तिच्या लॅबमध्ये वाढवते त्या सगळ्या गोष्टी. बायोटेक्नाॅलाॅजीचा वापर करून. अगदी प्रयोगशालेय शेती म्हणा. आणि चंद्रावर हे करणारी तिची कंपनी पहिलीच. आणि ही ब्रुनी त्यांची चीफ. बायोटेक मधली एक्स्पर्ट. चंद्रावर त्यानंतर एकदोन अजून आले फूड आंत्रप्रुनर. पण ब्रुनीसारखी तीच.
तर ही इकडची अन्नदात्री.
पार्टीमध्ये मी ब्रुनीकडेच पाहात होतो. ती सगळीकडे उत्साहात फिरत होती. हवे नको ते पाहात होती. राॅबिन असता तर ब्रेन मॅपिंग करत बसला असता. त्यात त्याला कळलेच असते मला ही आवडली ते. पण मला ब्रेन मॅपिंगची काय गरज? माझ्या ब्रेनच्या आतले तर मला ठाऊकच आहे!
आॅफिसातल्या दोन मुलांची ओळख झाली. एक बलविंदर. कैरो साहेबांच्या नात्यातला. नि दुसरा डॅनिअल. गोव्यातून इकडे आलेला. दोघे आऊटडोअरला असतात दिवसभर. हर्ली म्हणजे सगळ्या बाॅसेसची पी.ए. हुशार नि कामसू. बाकी चार मुली याच बाॅसेसच्या दूरच्या नात्यातल्या.
दुपारी पार्टी संपल्यावर सगळे कामाला लागले. मी पण आॅफिसात बसलो कामाला. आजचा दिवस खास म्हणावा. आज नोकरी तर मिळालीच.. बहुधा छोकरीपण मिळेल! कमीत कमी कोणी आवडली तरी. काही ना काही तरी व्हायला पाहिजे. इकडे तसे वातावरण मोकळे आहे. नि तशी लोकांची गर्दी ही नाही. त्यामुळे ब्रुनीशी पुढे ओळख वाढवता यायला हवी.. फक्त त्या माझ्या लाजाळू स्वभावावर मात करता यायला हवी.
रात्री घरी आलो. खूपच चांगला गेला आजचा दिवस. राॅबिन वाटच पाहात होता. आईबरोबर. बाबा परत आॅफिसच्या रेड अॅलर्टवर असल्याने घरी आले नव्हते. मी आलो नि आई तिच्या लिहिण्यात मग्न झाली.
"काय मग? हॅपी?"
"यस ब्रदर. आॅफिस इज गुड. आणि स्टाफ चांगला आहे."
"तुला सांगू, इकडे आले ना की लोक बदलून जातात. इथे लोकं कमी आहेत म्हणून असेल. एकेका माणसाची किंमत असते इकडे. मी आलो चार वर्षापूर्वी, काही गोष्टी बदलल्या.. काही तशाच आहेत. पण माणसं एकमेकांना धरून राहतात इकडे."
"वा! बराच अभ्यास दिसतोय राॅबिन .. माणसाच्या स्वभावाचा!"
"अरे, तुला माहिती नाही .. इथे येण्याआधी ट्रायल म्हणून मी पृथ्वीवर होतो. एक वर्ष. पीपल आर व्हेरी मीन आऊट देअर! आॅलवेज आऊट टू पुट समवन डाऊन. आणि इकडे त्याच्या उलट! ते जाऊ देत.. कुणी दिसली की नाही?"
"मी काय त्या कामासाठी गेलेलो? राॅबिन तू बिघडलायस.. मला दुसरे काही सुचत नाही का?"
"हा! हा! लूक हू इज टाॅकिंग! बरं जाऊ देत.. दोन दिवसांनी वेलकम पार्टी तुझी .."
"अजून एक?"
"येस.. दिस टाईम वर्किंग मेन्स असोसिएशन इज काॅलिंग यू!"
"कुठे?"
"त्यांचा हाॅल आहे तिकडे. कांदळगावकरांचा आज मेसेज आला घरी. मी पण येईनच. आपापले प्रायव्हेट रोबोज येऊ शकतात त्या पार्टीला."
"छान. तू येच. क्युरीला पण बोलव!"
"ती? कशाला?"
"तुला कसे करमेल तुझ्या गर्लफ्रेंड शिवाय?"
"पाहिलंस.. आॅलवेज थिंकिंग आॅफ गर्ल फ्रेंड.. आणि म्हणतोस दुसरे काही सुचत नाही का!"
एकूण काय अजून एक पार्टी बाकी आहे. दिवसभराच्या कामाने दमलेलो थोडा.. लवकर झोपलो. तुम्हाला वाटेल स्वप्नात आली ती ब्रुनी.. पण तसे काहीच नाही झाले. सरळ दुसऱ्या दिवशी सकाळीच उठलो.. परत पाऊले चालती आॅफिसची वाट म्हणत!