भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ९) Vinit Rajaram Dhanawade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ९)

कोमल , संजना ,सुप्री आणि मंडळी, शहरातून गावाकडे निघाली होती. काही तुटक माहिती आणि खूप सारा आत्मविश्वास घेऊन प्रवास सुरु झालेला. आता सकाळचे ८ वाजले आहेत, एका तासात पोहोचू , असा कोमलचा अंदाज. सुप्री गप्प, संजना तिच्या शेजारी झोपलेली. आणखी काही मंडळी इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत झोपलेलं बरं म्हणत निद्राधीन झालेली. अमोल मात्र भारी खुश होता. जाग आल्यापासूनच त्याचं "click... click... " सुरु झालेलं. बहुतेक बसच्या बाहेर दिसतं होतं तेच फोटो होते. गुपचूप १-२ सुप्रीचेही फोटो काढले होते त्याने. कॅमेरा तसा महागातला होता त्याचा. दूरवरचे फोटो सुद्धा स्पष्ठ दिसायचे. खुपचं फोटो क्लिक झालेले, नंतर एवढा मोठा पाऊस सुरु झाला कि फोटोत फक्त पाणीच दिसेल. अमोलने फोटोचा नाद सोडून दिला. काढलेले फोटोच बघू लागला. एका फोटोत त्याला अजब वाटलं काही. तसा तो कोमलला शोधू लागला.
" Excuse me !! कोमल मॅडम... " कोमल जागीच होती.
" अरे !! मॅडम काय... फक्त कोमल बोल.. चालेल मला. " ,
" ok ok.. तर कोमल ... हा फोटो बघ जरा... काही वेगळं वाटते का... ?? " कोमलने फोटो बघितला. एक पडका किल्ला, त्या आडून होणारा सूर्योदय आणि आजूबाजूला घेराव करणारे पावसाळी काळे ढग... किती सुंदर फोटो क्लिक केला होता अमोलने.
" Wow !! किती छान !! मस्तच रे ... ",
" मस्त काय ... वेगळं वाटत नाही का ? " ,
" काय ? " अमोलने कॅमेरा हातात घेतला आणि एका गोष्टीवर झूम केलं. " हे आहे वेगळं " कोमल पुन्हा निरखून पाहू लागली. अगदी स्पष्ठ नसलं तरी कोणीतरी एक व्यक्ती होता.
" हम्म " कोमल निरखून बघत होती. " नक्की सांगू शकत नाही.. तो खरंच कोणी माणूस आहे कि एखादं झाडं.... कधी कधी असा संभ्रम निर्माण होतो .. शिवाय एवढ्या पावसात कोण जाईल त्या पडक्या किल्यावर, तोही एकटा.. सोबतीला कोणी दिसत सुद्धा नाही. " कोमलने आपलं मत सांगितलं.
" तुला कसा दिसलं एवढ्या खालून ते... ",
" नाही... तो मागे पडका किल्ला दिसला तर काढला फोटो... मलाही तसंच वाटते , झाडं असावे ते.. कोणी वेडाच जाईल एकटा , एवढ्या वरती... " अमोल पुन्हा त्याच्या जागी जाऊन बसला. सुप्री मात्र एकटक पावसाकडेच पाहत होती कधीची.


अश्याप्रकारे, "फारच" चांगल्या रस्त्यामुळे आणि मुसळधार पावसाच्या साथीने, या सर्वाचा पुढचा प्रवास साधारण सकाळी ९:२० वाजता संपला. सगळेच आळसावलेले . इतके तास एकाच जागी बसून कंटाळलेले जीव, बस मधून उतरले तसे ताजेतवाने झाले. पावसाने तोवर विश्रांती घेतली होती. बस त्यांना सोडून पुढे निघून गेली. मोकळाच तो बसचा थांबा.. रस्त्याच्या एका कडेला. तिथून समोर असलेलं गावं नजरेस पडत होतं. लाल चिकणमातीची पायवाट. जागेवरूनच दिसणारी काही कौलारू घरे. सोबतीला अश्याच उभ्या केलेल्या झोपड्या. त्यामधून उभे असलेले मोठे डेरेदार वृक्ष. पावसाने आराम केल्याने घरातून बाहेर पडलेले गावकरी आणि घरट्यातून निघालेले पक्षी... या सर्वांच्या मागे अगदी दिमाखात उभे असलेले डोंगर आणि त्या डोंगरावरून प्रवास करणारे काही ढगांचे पुंजके... विलक्षण द्रुश्य ना.. अमोलने कॅमेऱ्यात कैद केलं ते. गावकरी सुद्धा या १५-२० जणांचा गोतावळा बघून या जवळ आले.


"नमस्कार !! " कोमलने पुढाकार घेतला. " आम्ही सर्व शहरातून आलो आहोत. " काही गावकरी होते जवळ, त्यात एक मंदिराचा पुजारी ही होता." नमस्कार , स्वागत आहे तुमचं.. " स्वागत करून झालं तोच आभाळातून विजेने गर्जना केली. साऱ्यांचे डोळे आभाळाकडे. " चला चला... तुम्ही सर्व माझ्यासोबत चला.. जवळच एक मंदिर आहे. तिथे थांबा तात्पुरतं, पाऊस थांबेपर्यंत. " पुजारी सर्वाना घेऊन मंदिरात आले. पुढच्या १० मिनिटात पाऊस पुन्हा सुरु झाला. मंदिरात सर्वाना आडोसाही भेटला आणि पायही मोकळे झाले.


----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------


" Excuse me !!.. " सईने एका गावकऱ्याकडे पाहत हाक मारली. त्याने मागे वळून पाहिलं.
" इथे कुठे असं ठिकाण आहे का , जिथून चांगले फोटो काढता येतील. means ... पूर्ण गावं दिसावं असं ठिकाण... " सईने विचारलं. तो बुचकुळ्यात. काय बोलते हि..
" माहित आहे का तुम्हाला.. " तो काहीच बोलेना.. त्यांचं बोलणं ऐकून आणखी एक जण थांबला.
" तुम्ही कुठून आलात ... काही हवे आहे का तुम्हाला... " ,
" मी सई.. कर्नाटक ला असते. सध्या फोटोग्राफी शिकते आहे. आमच्या सरांनी सांगितलं कि महाराष्ट्रात पावसात , दऱ्या-खोऱ्यात छान फोटो मिळतील तुमच्या पोर्टफोलिओ साठी म्हणून आली इथे. मला वाटते आम्ही रस्ता चुकलो आहोत, पण ते जाऊ दे... तुम्हाला माहित आहेत का अशी ठिकाणं .. जिथे मला छान फोटो मिळतील. " सई बोलत होती. भर पावसात हे संभाषण सुरु होतं.


" तुम्ही आधी एका कडेला या.. " म्हणत त्याने या सगळ्यांना एका आडोशाला आणलं.
" इथे सगळी आपापल्या कामात असतात... कोणाला वेळ आहे हे सगळं बघायला... " सई त्या वाक्याने हिरमुसली. तिच्या सोबत आणखी ५ जण होते. तेही फोटोग्राफी साठीच आले होते. त्यांना मराठी एवढं येतं नव्हतं, तरी सईने सांगितल्यावर सगळ्यांचा हिरमोड झाला. शेजारीच चहाची टपरी होती. गरमा-गरम चहा आणि पाऊस.. काय मस्त combination ना !! चहा घेताना छान वाटतं होतं तरी फोटोग्राफिच काय ... हा मोठा प्रश्न उभा होता समोर.
" हा... एक जण होता... तो असता तर फिरवलं असत त्याने... ",
" कोण ? " ,सईने लगेच विचारलं.
" भटक्या .... तो फिरत असतो सगळीकडे... त्याला माहित आहेत खूप जागा... गेल्या महिन्यात होता ... आता नाही " ," छट्ट यार !! " सई मनातल्या मनात.. आता तर पुन्हा घरीच जावे लागेल वाटते... एकतर माहित नाही इथे काही, त्यात तो कोण होता तोही निघून गेला..
" आरं.. भटक्या नं... कालचं दोघे बोलत व्हते.. आला हाय परत गावात त्यो.... " कुठेतरी आशेचा किरण दिसला.
" कुठे असतो तो... ",
" हा.. ते तुमाला हुडकायला लागलं... गावात इचारात जावा..भटक्या कुठं हाय मनून ... कोणी बी नेऊन सोडलं तुमाला.. " ,
" can we trust him ? " सईच्या ग्रुप मधली एक मुलगी बोलली. त्या दोन्ही गावकऱ्यांना कळलं नाही ते.. सईने मराठी मध्ये सांगितलं..
" विस्वास .... त्यो एकच मानुस हाय त्या लायकीचा... लय चांगला गुणाचा मानुस हाय तो... त्याज्या सारका सोधून पण सापडायचा नाय... " पाऊस सुद्धा कमी झालेला.
" चला काका.. आम्ही निघतो. मदत केल्याबद्दल थँक्स .. " म्हणत सई आणि तिचा लहानसा ग्रुप पुढे गावात निघाले.


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: