भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ३) Vinit Rajaram Dhanawade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ३)

" तुम्ही मघाशी ओरडलात ना... ऑफिसमध्ये.. नक्कीच हिने चिमटा काढला असेल.. " सुप्रीने संजनाच्या पाठीवर हळूच चापटी मारली.
" तुम्ही कोण ? ",
" मी कोमल... travel blogger आहे. एका मॅगजीन साठी लिहिते मी. ",
" खूप छान... फिरायला आवडते वाटते... बरं आहे.. मी सुप्रिया... हिची लहानपणापासूनची मैत्रिण.. हिचं जास्त मनाला लावून घेऊ नका.. आणि मला माहित आहे, तुमचा कोणता विषय सुरु आहे ते.... ह्या संजूला ना वेडं लागलं आहे... काहीही करते, कोणालाही बोलावते आणि डोळ्यांचा नळ सुरु करते. ये रडू बाई.. हसतेस कि करू गुदगुल्या... " सुप्रिया संजनाकडे पाहत बोलली. तशी संजनाने हलकीशी smile दिली.
" मी हिला जेवायला बोलवायला आलेले.. तुम्ही येता का आमच्यासोबत.. ",
" नाही ... नको.. मी निघतच होते.. " कोमल ..
" आम्ही गरीब आहोत ना... आमच्याकडे कसं खाणार तुम्ही.. " कोमलच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह...
" येडे.. ती तुला ओळखते का... तुझे हे डायलॉग माझ्यापुरते ठेव.. कोमल, तुला बोलली ना... वेडी आहे हि... " संजना हसत म्हणाली.
" चला, मी निघते मग.... छान वाटलं बोलून.... " कोमल निघाली.
" गणू तुमचं भलं करो.. " सुप्री बोलली. कोमल "Bye " करून निघून गेली.


कोमल निघून गेली. सुप्रीने तिच्या फोटोज चा album नीट लावून ठेवला. संजना चुपचाप बघत होती तिच्याकडे. काही बोलणार इतक्यात अमोल आला.
" काय... दोघींना भूक लागली कि नाही... कधीपासून वाट बघतो आहे मी... जेवायचं तरी आहे ना... ",
" हो, हो ... आलो... व्हा पुढे तुम्ही.. " सुप्रिया हसत बोलली. " चल गं.. काही बोलू नकोस.. सरळ जेवायला चल... भूक लागली आहे. नाहीतर तो येईल परत .... साहेब आपला "


अमोल आधीपासूनच टेबलावर टिफिन घेऊन बसला होता. " काय यार !! वेळेचं काही आहे कि नाही तुम्हाला . मग पुन्हा घाई करणार. वेळ झाला , वेळ झाला , बोलायचं मग... ",
" हो हो सर.. आलोच आम्ही. या संजूचे नखरे... तीची मैत्रीण आलेली ना, म्हणून या पोरी मुळे उशीर झाला. मी सांगते ना सर तुम्हाला.. या पोरीचा पगारच कट्ट करा.. मग येईल वेळेत जेवायला... " सुप्री संजनाला चिडवत बोलली.
" आयडिया छान आहे हा सुप्रिया ... " अमोल हसत म्हणाला.
" का सर... तुम्ही कशाला नादाला लागता हिच्या... डोक्यावर पडलेली माणसं अशीच असतात. " संजनाने सुप्रीला चिमटा काढला.
" झालं का दोघींचे सुरु पुन्हा ...जेवायचं कि नाही... " त्या ग्रुपमधला एक जण बोलला.
" नाही... आज डब्बे उघडून त्याच्याकडे बघत बसू .. आपोआप पोट भरेल.. " सुप्रीने त्याला वेडावलं. अमोलला आणखी हसू आलं. तोवर त्याने त्याचा डब्बा उघडला. काय सुगंध त्या पदार्थाचा. अमोलच्या डब्यातील जेवण नेहमी चवदार असायचं. सगळेच तुटून पडायचे त्यावर. आजही तेच झालं. अमोल ऑफिसला जॉईन झाल्यापासून सर्व एकत्रच जेवायला बसायचे. नेहमीप्रमाणे त्याचा टिफिन सर्वाकडे फिरला. सरतेशेवटी त्याच्याकडे येईपर्यंत अर्धा-अधिक संपला होता.


" ओ.. अमोल सर, कशाला एवढे दानशूर होता.... कशाला वाटता एवढं, तुम्हालाच तुमचा टिफिन खाता येत नाही. " सुप्री.
" काय आहे ना.. मला दुसऱ्यांना ' वाटायला ' खूप आवडते. आईसुद्धा बोलते , अश्या गोष्टी वाटत राहायचे. छान असतं. " अमोल भरभरून बोलला.
" मग तुमचा मिक्सर बिघडला असेल. " सुप्रीचा डायलॉग. थोडावेळ कोणाला काहीच कळलं नाही. नंतर मिक्सरमध्ये पदार्थ बारीक करतात म्हणजेच ' वाटतात ' हे अमोलला समजलं. आणि किती मोठयाने हसला तो. बाकीचेही मनापासून हसत होते. असंच हसत -खिदळत वेळ जायचा त्यांचा.

अमोल.. एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व... उंच, धिप्पाड, देखणा... गोरा रंग, पाणीदार डोळे, केसांची modern style... इंग्लिश बोलण्यात तरबेज तरी मराठीवर प्रचंड प्रेम.. आणि सर्वात महत्वाचं, सुप्री-संजनाच्या बॉसचा मुलगा. ६ महिनेच झालेले त्याला हे ऑफिस जॉईन करून. दिल्ली ऑफिसला होता तो आधी. तिथेच शिकलेला. ४ वर्ष तिथे काढली त्याने. आता मुंबईत जॉईन होतो बोलला आणि आला देखील. कामात चोख. दिसायला हिरो प्रमाणे होता , त्यात सिंगल... त्यामुळे मुंबई ऑफिस मधल्या मुली already फिदा झाल्या होत्या त्याच्यावर.. फिरण्याची भारी आवड. स्वभाव एकदम friendly.. सर्वांशी हसून -बोलून असायचा. " बॉसचा मुलगा " असा कधी वागलाच नाही. सुरुवातीला सगळेच दूर असायचे त्याच्यापासून. म्हणूनच त्याने दुपारचं जेवण एकत्र करायचं , असा नियम काढला. तोही त्यांच्यात यायचा. ओळख झाली ती अशी. ऑफिसमधले सगळेच त्याचे मित्र , सगळ्याच मैत्रिणी.... पण या दोघीना जास्त पसंत करायचा अमोल. संजना आणि सुप्रीला.. त्यातल्या त्यात सुप्रीला... तिचा sense of humor, स्वभाव, सारखं हसत राहणं, मस्करी करणं , दुसऱ्यांना मदत करणं... आवडायचं त्याला... infact, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बोलायला यायचा या दोघी बरोबर. छान मैत्री आकारास येत होती. परंतु अमोलला सुप्री बाबत काही माहिती नव्हती. किंवा कोणी तिच्याबद्दल अमोलला काही सांगितलं नव्हतं. अमोल येण्याआधीच " आकाश " च उरकलं होतं. शिवाय ऑफिसमध्ये सगळ्या ग्रुपने ठरवलं होते कि आकाशचा विषय निदान सुप्री समोर तरी काढायचा नाही. सगळ्यांनी ती काळजी घेतली होती. त्यामुळेच अमोलला काहीच माहित नव्हतं. अमोल म्हणाल तर तसाच होता. भूतकाळापेक्षा वर्तमानात रमणारा. त्याला कळलं असतं तरी त्याला काही वाटलं असतं,हा विचार करण्यासारखा प्रश्न होता. तरी सगळं नीट सुरु होतं. मुख्य करून, अमोल आल्यापासून ऑफिस जरा जास्तच खुश आणि आनंदी वाटायला लागलं होतं.

" Hiiiii.. सुप्रिया.. निघत आहेस का... ? " अमोल सुप्रिसमोर येऊन उभा राहिला.
" हो... अजून १० मिनिट आहेत निघायला. का असा विचारलं ?? " ,
" मी निघत आहे. तुला घरी सोडतो आज. " ,
" नको बाबा... आमच्या एरियात कोणी बघितलं ना.. तर डायरेक्ट घरी जाते बातमी.... breaking news सारखी... कोणाकोणाला सांगणार तुमच्या बद्दल... ",
" अरे !! मित्रच आहोत ना... मग त्यात काय घाबरायचे एवढे... " ,
" तुम्हाला काय कळणार ते... शिवाय हे संजू... तिच्याबरोबर बसली नाही ना scooty वर... तर घाबरते आणि balance जातो तिचा... खरंच हा... त्यात हिला रस्ते कळत नाहीत, समोर कोणी आलं ना.. सरळ अंगावर घालायची गाडी... म्हणून सर्व करावं लागते हा मला बिचारीला.. " सुप्रीने उसासा सोडला.
" गप्प गं येडे... पकाव कुठली... तुम्ही जा अमोल सर.. " संजनाने सुप्रीला चापटी मारली.
" एक मिनिट !! सर काय बोलता सारखं सारखं.. तुमच्या एवढाच आहे ना मी .. अमोल बोला फक्त... only अमोल.. माझ्या पप्पांना सर बोलता तेव्हढं पुरे... " अमोल हसत बोलला.
" नको बाबा... उगाच तुमच्या बाबांनी , अमोल बोलताना ऐकलं तर पगार कापायचे, एकतर गरीब माणसं आम्ही.. त्यात पैसे कापले तर काय करायचं.. " सुप्री . अमोलला हसायला आलं. तसे या दोघीही हसू लागल्या.


बोलत बोलत तिघेही ऑफिसच्या बाहेर आले. यांची scooty तर अमोलची मोठी , वजनदार बुलेट... त्याची भटकंतीची जोडीदार होती ती बुलेट. एकटाच तर कधी ग्रुपने फिरायचा तो. इतकंच काय, आई शिवाय त्याने त्या बुलेट वर कोणा दुसऱ्या स्रीला बसू दिलं नव्हतं त्यावर. आज प्रथमच कोणा वेगळ्या मुलीला म्हणजेच सुप्रीला तो मान मिळत होता. नाही म्हणाली ना.. अमोल बिल्कुल वाईट वाटलं नाही. दोघी गेल्या त्याला Bye करून. नजरेआड होईपर्यंत तो सुप्रीला पाहत होता. " कशी मुलगी आहे ना... वेगळीच.... नकार सुद्धा एवढ्या style ने दिला कि दिल खुश हो गया... " मनोमन खुश होतं त्याने हेल्मेट घातलं आणि खुशीतच घराकडे निघाला.


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: