भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ४) Vinit Rajaram Dhanawade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ४)

संजनाने सुप्रीला घरी सोडलं. ऑफिसमधे जरी काही दाखवलं नसलं तरी तिने कोमल-संजनाचं बोलणं ऐकलं होतं. आकाशची आठवण झाली तिला. आणि तो दिवसही आठवला. फ्रेश होऊन खिडकीसमोर बसली होती सुप्री. आकाशच्या आठवणी जाग्या झाल्या. " आई !! मी गच्चीवर आहे. " म्हणत ती गच्चीवर आली. मे महिन्याची संध्याकाळ ती. थोडासा वारा वाहत होता. ढगांचे तर नामोनिशाण नाही आभाळात. सुप्री पुन्हा तेच आठवू लागली... " तो " दिवस.. !!


गेल्यावर्षी जून मध्ये पाऊस कमी पडलेला , त्यामुळे वातावरणात म्हणावा तसा थंडावा नव्हता. आकाशने सुद्धा "भटकंती" ला जाण्याआधीच... " जूनमध्ये पाऊस कमी असेल " असं भाकीत केलं होतं. म्हणूनच जुलै मध्ये सर्व ग्रुप सोबत फिरायचा प्लॅन तयार होता त्याचा. परंतु जून महिन्यात १५ तारखे पर्यंत येतो म्हणून सांगून गेलेला आकाश, १ जुलै उजडाला तरी आलाच नाही. सुप्री त्याचाच विचार करत तिच्या सोसायटी बाहेर उभी होती, संजनाची वाट बघत. त्यात आभाळ काळवंडलेले होते. वारा हळूहळू वेग पकडत होता. आकाश सोबत २ वर्षांचा अनुभव होता तिला. त्यावरून तिने " वादळाची शक्यता आहे " असं स्वतःलाच सांगितलं. संजना जरा उशिराने आली scooty घेऊन. ट्राफिक लागलेलं ना. दोघी निघाल्या तस पुढेही ट्राफिक लागलं. या सर्वामुळे ऑफिसला अर्धा - पाऊण तास उशीरा पोहोचल्या दोघी.


" काय ग संजू !! जरा लवकर आली असती तर काय झालं असतं. जवळ जवळ १ तास उशीर झाला आपल्याला आज. आता बॉस पासून गणूचं वाचवेल आपल्याला... " सुप्रीने डोळे बंद करत हात जोडले. " ये नौटंकी.. चल... आधीच उशीर झाला आहे. त्यात तुझी नाटक नको सुरु.. काय... " संजनाने गाडी पट्कन स्टँडला लावली. दोघी धावत वर आल्या. पण काहीतरी विचित्र होतं आज. कुजबुज... त्याचाच आवाज पहिला आला कानावर. वर येईपर्यंत सगळीकडे गर्दी दिसली त्या दोघींना. गर्दी होती आकाशच्या ऑफिस बाहेर. त्या गर्दीत तर सुप्री, संजनाच्या ऑफिस मधले. मित्र -मैत्रीणी सुद्धा होत्या. मुलींच्या डोळ्यात पाणी. मुलांचे चेहरे दुःखी. काहीतरी झालंय नक्की. सुप्रीने अंदाज लावला. दोघी जश्या या गर्दी समोर आल्या, तसे काही डोळे आणखी पाझरू लागले. खास करून , सुप्रीच्या ऑफिसच्या मैत्रिणी.


काय चाललंय... सुप्री पुढे आली, गर्दीतून वाट काढत. समोर आकाशची आई रडत बसली होती. वडील सुद्धा दुःखी-कष्टी वाटतं होते. म्हणजे आकाश !! .... सुप्री तडक आकाशच्या आई जवळ गेली. " आई .... काय झालं ... का रडतं आहात तुम्ही... " आई सुप्रीला बघून आणखी रडू लागली. बाकीचे सुद्धा शांत झाले अचानक. " अरे !! काय झालं .. का रडत आहात तुम्ही.. " सुप्री मोठयाने ओरडली. तसं, तिच्या मागून... सुप्रीच्या ऑफिस मधली, त्यातल्या त्यात मोठी असलेली एक मुलगी पुढे आली. तीही रडत होती. पण त्यावेळेस तिने अश्रू थांबवले. सुप्री जवळ आली. " सुप्रिया... आकाश... आकाश नाही राहिला आपल्यात.. सोडून गेला तो सर्वाना ... " ती पुन्हा रडू लागली सांगताना.


" मैत्रीण आहेस म्हणून काही पण बोलू नकोस हा... मस्करीची हद्द असते... पार करू नकोस... समजलं ना. " सुप्रीने तिला दूर केलं. एव्हाना संजनाला कळलं होतं ते. तिचाही विश्वास बसेना. शब्दच येतं नव्हते तिच्या तोंडातून. पण सुप्रीला किती मोठा धक्का बसला असेल. हा विचार करून तिने स्वतःला सावरलं. त्यात सुप्रीचा चढलेला आवाज ऐकला तिने. आपणचं सांभाळू शकतो तिला. जलद गतीने पुढे आली संजना.
" सुप्री !! ऐक... खरं सांगत आहेत ते.. मान्य कर.. " ,
" गप गं... तो जाईलच कसा... तुझी पण चेष्टा -मस्करी खूप झाली. संजू.. शांत बस.. " पुन्हा चढलेला आवाज. डोळ्यात पाणी तर जमा झालेलं होतं तिच्या. पण तयारच होतं नव्हती सुप्रिया. शेवटी आकाशची आई तिच्या समोर आली. दोन्ही हातांनी सुप्रीचे खांदे घट्ट पकडले.
" सुप्रिया !! नीट ऐक.... आकाश नाही आहे या जगात आता. माहिती आहे, हे पचवणं कठीण आहे... पण हेच खरं आहे... तू नाही बदलू शकत त्याला... " तशी सुप्रीला भोवळ आली. पायातले त्राणच निघून गेले. मट्कन खाली बसली. संजनाने तिला पकडलं. तिच्या बाजूला बसली. सुप्रीची नजर शून्यात.. संजना धीर करून बोलली. " पण काय झालं नक्की ?? " आकाशचे बॉस होते तिथे... त्यांनाही अपार दुःख. कोणीतरी बोलावं म्हणून बोलले.
" काल रात्री मला अनोळखी नंबर वरून फोन आलेला. पोलिसांचा फोन होता तो... रात्री १२.३० ला फोन आलेला. भेटायचं होतं त्यांना, तरी एवढ्या रात्री नको म्हणत ऑफिसचा पत्ता मागितला आणि उद्या सकाळी ८ वाजता येतो असं सांगितलं. तसे ते बरोबर ८ वाजता आले आज. एका ठिकाणी मिनी बसला अपघात झाला होता.. १५ जूनला.. नदीत कोसळली बस.. फक्त ४ लोकं वाचले. बाकीचे सर्व वाहून गेले. त्यात आकाश सुद्धा होता. त्याची ऑफिसची बॅग सापडली त्यांना त्या बुडालेल्या बस मध्ये.. जी बॅग फक्त आकाशला दिली होती... बॅग मध्ये कार्ड सापडलं... ते पोलीस तिथून आलेले सांगायला.. " आणि ते सर रडू लागले.

कोणाला काय बोलावं आणि कोणी काय बोलावं, तो बोलल्याप्रमाणे शहरात येण्यास निघाला असावा, असा संजनाने मनातच अंदाज लावला. " आकाश येईल ना परत. " सुप्री खूप वेळाने बोलली. संजना तिच्याकडे पाहून रडत होती. " येईल बोलला होता तो... असा कसा जाईल ... त्याची डायरी सांभाळून ठेव बोलला जाताना... सांभाळली ना... मग येणार तो... खूप फोटो काढूया बोलला होता, म्हणून नवीन मोठा फोटो अल्बम घेतला आपण ... मला नाही पटतं.. तो येईल पुन्हा.... माझ्यासाठी " सुप्री ,संजनाला मोठी मारून रडू लागली. भयानक वातावरण झाले होते. सगळे पांगले थोड्यावेळाने. दोन्ही ऑफिसचं काम बंदच ठेवलं. वाईट झालं ना. काही वेळाने सर्व नॉर्मल झाले. नक्की काय झालं तिथे.... ते विचारण्यासाठी काही जण पोलीस स्टेशनला निघाले. हट्ट करून सुप्री ही सोबत निघाली. पोलिसांनी सांगायला सुरुवात केली.


" नदीला मोठा पूर आलेला. त्यात रस्ते निसरडे... अचानक ड्रायव्हरचा ताबा सुटला गाडीवरचा. बस पुलावरून जात असताना झालं हे, बस थेट नदीत... पाण्याची ताकद माहीतच असेल सर्वाना... पूर्ण बस वाहून नेली त्या पाण्याने... ",
" मग प्रेतं... I mean ... डेड बॉडी... सापडल्या का तुम्हाला... " आकाशच्या वडिलांनी प्रश्न केला.
" शक्यंच नव्हतं... तरी गेले १५ दिवस प्रयत्न सुरु आहेत. बस तेवढी सापडली. तिघे -चार जण तेवढे वाचले... कसे ते त्यांनाच माहित... ती बॅग सापडली तुमच्या ऑफिसची... त्यात कार्ड सापडलं ... म्हणून कळवायला आलो तुम्हाला... " पोलिसांनी सांगितलं.
" म्हणजे तुम्हाला डेड बॉडी सापडल्याचं नाहीत... " एकाने विचारलं.
" कश्या मिळणार ... सांगा मला तुम्ही... ती नदी अजूनही ओसंडून वाहते आहे.... काय उतरणार पाण्यात ... तरी जीवाची बाजी लावून ती बस तरी बाहेर काढली आमच्या माणसांनी.. मेलेली माणसं एव्हाना खूप दूरवर वाहून गेली असतील. नाहीतर पाण्यातल्या माशांनी खाऊन टाकली असतील. ते वाचले ना... त्यांच्या ओळखीची होती माणसं त्या गाडीत... पट्टीचे पोहोणारे होते त्यात काही... झाले ते पण गुडूप... निसर्ग आणि देवापुढे कोणाचंच काही चालत नाही.. हेच खरं.. " पुन्हा काही डोळे पाणावले.


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: